शनिवार, २४ जानेवारी, २०१५

राजा कलावंतांचा ! ----वासुदेव कामत

राजा कलावंतांचा !
वासुदेव कामत
(शब्दांकन - विनायक परब)

response.lokprabha@expressindia.com
जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला शिकत असताना आमचा मित्रांचा एक गट होता. या संपूर्ण गटाचे तेव्हाचे आकर्षण होते, मार्मिक ! बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेले व्यंगचित्र त्याच्या मुखपृष्ठावर असायचे आणि आतमध्ये सेंटरस्प्रेडवरही बाळासाहेबांचीच व्यंगचित्रे असायची. आमच्यापैकी प्रत्येकाला ती खूप आवडायची. त्यावेळेस आर. के. लक्ष्मण हेदेखील तेवढेच प्रसिद्ध होते. पण आरकेंची व्यंगचित्रे लहान आकाराची होती, अर्थात ती पॉकेट कार्टुन्स असायची. आणि बाळासाहेबांची मात्र मोठय़ा आकारात. त्या मोठय़ा आकारातील व्यंगचित्रांचे एक वेगळे आकर्षण होते. बाळासाहेब त्या व्यंगचित्रामध्ये त्या संबंधितांचे व्यक्तित्त्व नेमके कसे पकडतात, ते पाहणे हा आमच्यासाठी त्यावेळेस अभ्यासाचा विषय होता. खरेतर त्या वेळेस माझा शिवसेनेशी तसा काहीच संबंध नव्हता. पण बाळासाहेबांना आम्ही सर्वजण एक चांगले कलावंत मानायचो. मानवी शरीररचनाशास्त्राचा अर्थात अ‍ॅनाटॉमीचा बाळासाहेबांचा अभ्यास अतिशय दांडगा होता, हे त्यांची व्यंगचित्रे पाहून जाणवायचे आणि त्याचे प्रचंड कौतुकही वाटायचे. कुदळीच्या पात्याप्रमाणे नाक असलेले इंदिरा गांधीचे त्यांनी चितारलेले व्यंगचित्र तर त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडी; असेच होते. त्यानंतर अनेक वर्षे मी त्या व्यंगचित्रावर विचार करत होतो. आजही ते व्यंगचित्र मला स्पष्ट आठवते आहे.

बाळासाहेबांच्या व्यंगचित्रात त्यांनी कधीच ओढून ताणून व्यंग त्यात आणलेले मी पाहिलेले नाही. किंबहुना त्यामुळेच त्यांची व्यंगचित्रे पाहताना एक वेगळीच धमाल त्या वयात वाटायची. हे सारे मी कॉलेजमध्ये असतानाचे म्हणजे १९७४ ते ७७ या कालखंडातील आहे. ज्यांना व्यंगचित्रांची आवड होती, अशी सर्वच मंडळी त्यावेळेस मार्मिक विकत घ्यायची. त्यात शिवसैनिक नसणाऱ्यांचाही समावेश होताच. त्यानंतरही बाळासाहेबांची व्यंगचित्रे पाहण्यात होतीच. पण प्रत्यक्ष संबंध यायला बराच अवधी जावा लागला. १९९७ साली मला म्हाडाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे चित्र चितारण्यासाठी पाचारण करण्यात आले. दिलीप नेरूरकर यांनी माझे
नाव सुचवले होते. म्हाडाच्या मुख्यालयाच्या इमारतीची रचनाही मंत्रालयाच्याच इमारतीप्रमाणेच आहे. महाराज गडावरून उतरत असल्याचे प्रसिद्ध चित्रकार कांबळी यांनी केलेले चित्र मंत्रालयात आहे. तसेच चित्र या म्हाडाच्या मुख्यालयातही असावे, अशी एक कल्पना त्यावेळेस पुढे आली होती. मला पाचारण करण्यात आले त्यावेळेस मी म्हटले की, इमारती वेगवेगळ्या आहेत त्यातून चालणारा कारभारही वेगळाच आहे. तर मग चित्र तेच कशासाठी? आतले चित्र वेगळे असावे. त्यावेळेस डोक्यात एक कल्पना घोळत होती. आजपर्यंत आपण शिवाजी महाराजांची पाहिलेली सर्व चित्रे ही प्रोफाइल पद्धतीची एका बाजूने महाराज दिसतील, अशा पद्धतीने चितारलेली आहेत. त्यात एका बाजूस इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करत असल्याचे गाजलेले चित्रही आहे. ..पण राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपतींच्या चेहऱ्यावरचे भाव समोरच्या बाजूने दाखवता आले तर? महाराज मेघडंबरीमध्ये विराजमान आहेत, त्याचे चित्र मला चितारायचे होते.
विषय निश्चित केला. विषयासाठी आवश्यक त्या संदर्भाचा अभ्यासही केला. त्यावेळेस असे लक्षात आले की, तेव्हा खूर्ची नव्हती. त्यामुळे खाली पाय सोडून बसण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे मग खूरमांडी घालून बसलेले शिवराय असे वेगळे स्केच तयार केले. ते रेखाचित्र बाळासाहेबांना दाखवायचे आणि त्यांनी ‘हो’ म्हटले तर विषय पुढे सरकणार, असे सांगण्यात आले होते. पहिल्यांदा एकदा सुभाष देसाई यांच्यासमवेत मातोश्रीवर गेलो होतो. पण त्यावेळेस बाळासाहेबांची भेट झालीच नाही. निराशेने परतलो. नंतर दुसऱ्यांदा गेलो त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई दोघेही तिथेच होते. बाळासाहेबांसमोर मॉडेल ठेवले त्याचवेळेस ते खुश झाले आणि सुभाष देसाईंकडे पाहून म्हणाले. ही खरी भारतीय बैठक. याला खुरमांडी म्हणतात. हे केले आहेस ते अगदी बरोबर आहे ! ती बाळासाहेबांची झालेली पहिली थेट भेट होती !
त्यांच्या कौतुकाने उत्साह दुणावलेला होता. नंतर परत एकदा बाळासाहेबांची भेट झाली त्यावेळेस मी माझे चित्रांचे आल्बम घेऊन गेलो होतो. त्यांनी आल्बम व्यवस्थित पाहिले त्यातील चित्रांवर त्यामधल्या बारकाव्यांवर चर्चाही केली. मग त्यांच्या संग्रहामध्ये असलेली काही चित्रेही दाखवली. त्यात प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी चितारलेल्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या चित्राचाही समावेश होता.
त्या आणि नंतर झालेल्या भेटींमध्येही मला जाणवलं होतं की, बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला कलाकार-कलावंत यांच्याबद्दल विशेष आपुलकीची भावना होती. ‘म्हाडा’साठी केलेले ते चित्र पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सजावटीचे काम प्रसिद्ध नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर यांनी केले होते. त्याचे उद्घाटन बाळासाहेबांच्याच हस्ते व्हायचे होते. कार्यक्रमापूर्वी तळाशीलकर मला म्हणाले, ‘ आपली राजकीय मते काहीही असोत. कलाकारांबद्दल बाळासाहेबांच्या मनात आपुलकी व प्रेम कसे असते, याचा प्रत्यय तुला येईलच.’ ते असे का म्हणाले ते मला तेव्हा कळले नव्हते. पण नंतरच्या कार्यक्रमात मला त्याचा प्रत्यय आला. त्या कार्यक्रमात बाळासाहेबांच्या हस्ते अनेकांचा सत्कार झाला.
पण आमच्या दोघांच्या सत्काराच्या वेळी बाळासाहेब खुर्ची मागे करून व्यासपीठाच्या एका बाजूला चालत जात टेबलांच्या पुढच्या बाजूस आले आणि त्यांनी मी व तळाशीलकर यांचा सत्कार केला. ते त्या वेळेस म्हणालेही की, कलावंतांचा मान वेगळा असतो. तो त्यांना द्यायलाच हवा!
त्यानंतर बाळासाहेबांचा संबंध आला तो बोरिवली येथे प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाची निर्मिती झाली त्या वेळेस. प्रबोधनकारांचे व्यक्तिचित्र साकारण्याची संधी मला मिळाली होती. चित्रकलेच्या बाबतीत बाळासाहेब अतिशय काटेकोर होते. शिवाय त्यांच्यासमोरचा माणूस कितीही मोठा असला तरी त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर ते कुणालाही ऐकवायला कमी करीत नाहीत. शिवाय बाळासाहेबांचे शब्द म्हणजे धारदार. या सर्व गोष्टींचे टेन्शन होतेच. पण माझ्या अभ्यासाविषयीदेखील मला खात्री होती. मी आवश्यक ते सर्व संदर्भ गोळा केले. प्रबोधनकारांचे फारसे फोटो उपलब्ध नव्हते. पण प्रबोधनकारांची पाहिलेली चित्रे आणि बाळासाहेबांचे फोटो यावरून त्यांच्यातील अनेक साम्यभेद लक्षात आले होते. अखेरीस माझ्या अभ्यासानुरूप मी व्यक्तिचित्र साकारले. उद्घाटनाच्या वेळेस सुभाष देसाई म्हणाले की, उद्घाटनाच्या वेळेस सोबत राहा.
बाळासाहेब म्हणजे उत्स्फूर्तपणा आणि त्याचबरोबर बेधडकपणाही. त्यामुळे ते काय व कशी दाद देतात याकडे माझेही लक्ष लागून राहिले होते.. उद्घाटनाच्या वेळेस चित्रावरचा पडदा दूर झाला आणि बाळासाहेब खूश झालेले दिसले. बाळासाहेबांना प्रबोधनकारांचे व्यक्तिचित्र आवडले होते. स्वत: चित्रकार असलेल्या बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांचे व्यक्तिचित्र आवडणे हीच माझ्यासाठी मोठी पावती होती. पाठीवर बाळासाहेबांची शाबासकीची थाप होती. ते म्हणाले, उत्तम झालंय पोर्ट्रेट. एका क्षणात मला माझी छाती अभिमानाने फुलल्याचा प्रत्यय आला.
या उद्घाटन सोहळ्यातही पुन्हा एकदा तोच प्रत्यय आला. सुमारे ३० जणांचा सत्कार होता. पहिल्या १५ जणांचा सत्कार बाळासाहेबांच्या हस्ते पार पडला. त्यानंतरचा सत्कार तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार राम नाईक यांच्या हस्ते होता. माझे नाव पुकारताच बाळासाहेबांनी राम नाईक यांना खुर्चीतून न उठण्याविषयी खुणावले व ‘हा सत्कार मी केला तर चालेल ना..’ असे विचारले, अर्थात रामभाऊंनी होकारच दिला. आणि मग पुन्हा एकदा बाळासाहेब सर्व समोरची टेबलांची रांग ओलांडून पुढे आले आणि माझा सत्कार केला. त्याही वेळेस ते राम नाईक आणि माझ्याकडे पाहून म्हणाले.. कलाकाराला द्यायचा सन्मान वेगळा असतो. त्यांचा मान त्यांना मिळायलाच हवा.
मला जी व्यक्तिमत्त्वे आवडतात त्यांची व्यक्तिचित्रे अर्थात पोर्ट्रेट्स करण्याची संधी मी मागून घेतो. बाळासाहेबांचे असेच व्यक्तिचित्र करण्याची संधी मिळावी, ही अनेक दिवसांची इच्छा होती. त्याचा योग जुळून आला तो सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाच्या दिवशी २००८ साली. बाळासाहेबांनी होकार दिला. खरे तर त्या वेळेस त्यांची तब्येत तेवढी चांगली नव्हती. पण तरीही त्यांनी वेळ दिला. तब्बल दीड तास ते व्यक्तिचित्रणासाठी न हलता बसून होते. अर्थात ते बाळासाहेबच, त्यामुळे चित्रण करतानाही त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. कधी वाढलेल्या त्यांच्या दाढीवर तेच टिप्पणी करीत होते तर कधी अलीकडच्या चित्रकलेवर. पण तब्येत बरी नसलेल्या अवस्थेतही त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. तैलरंगात केलेले ते बाळासाहेबांचे पहिले व्यक्तिचित्र होते. त्याच वेळेस त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे मी चित्र काढत असताना त्यांना पाहायचे होते मागे बसून. मी त्यांना म्हटले की, मलाही आवडेल की, मी चित्र काढतो आहे आणि एक महान कलावंत मागे बसून ते पाहतो आहे. यापेक्षा एका कलावंतांच्या आयुष्यात दुसरा दुर्मिळ योग काय असू शकतो?
हा योग नंतर जुळून आला तो २००९ साली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मी चितारलेले व्यक्तिचित्र त्यांना भेट द्यावे असे बाळासाहेबांना वाटले आणि मग त्यांनी मला मातोश्रीवर बोलावून घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याचे व्यक्तिचित्र करायचे त्याच्याशी उत्तम संवाद साधावा लागतो. माझा बाबासाहेबांचा फारसा परिचय नव्हता. पण मी मातोश्रीवर पोहोचलो त्या वेळेस लक्षात आले की, मी तिथे पोहोचण्यापूर्वी बाळासाहेबांनीच बाबासाहेबांना माझी पुस्तके, माझे काम, माझे आल्बम दाखवून मी चांगला कलावंत असल्याचा विश्वास दिला होता. त्यामुळे मी माझ्या कामाविषयीची खात्री त्या बोलण्यातूनच बाबासाहेबांना आली होती. बाळासाहेब कुणाचीही खोटी स्तुती करीत नाहीत, याचा माझ्यापेक्षा बाबासाहेबांनाच अधिक अनुभव असावा. मग बाळासाहेबांनी त्यांच्यासमोर बसवून माझ्याकडून बाबासाहेबांचे व्यक्तिचित्र करवून घेतले. पुन्हा एकदा मी त्याच तणावाखालून जात होते. मागे बाळासाहेबांसारखा जाणता कलावंत बसलेला त्याच्यासमोर काम करायचे. पण बाळासाहेबच ताण हलका करीत होते. बाळासाहेब म्हणजे अनेक विषयांमधील किश्शांचा ओघवता धबधबाच होता. व्यक्तिचित्रण सुरू असताना ते सतत बोलतच होते. कधी चित्रांबद्दल, कधी चित्रांच्या वैशिष्टय़ांबद्दल, तर कधी त्यांना जाणवलेल्या चित्रांच्या गुणविशेषांबद्दल. त्यामुळे हास्यविनोदामध्ये काम करणे फारसे अवघड गेले नाही. ते व्यक्तिचित्रही बाळासाहेबांना खूप आवडले. ते त्यांनी बाबासाहेबांना भेट दिले.
त्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेबांकडून बोलावणे आले ते लीलावतीच्या विजयभाई मेहता यांच्या व्यक्तिचित्रणासाठी. विजयभाईंना त्यांचे व्यक्तिचित्र भेट देऊन बाळासाहेबांना कृतज्ञता व्यक्त करायची होती आणि ते व्यक्तिचित्र मीच करावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. बाळासाहेबांची इच्छा हीदेखील मी माझ्या कामाला मिळालेली पावती म्हणूनच घेत होतो.
विजयभाईंचे चित्र करण्यासाठी घेतले. टर्पेंटाइनची बाटली उघडली आणि त्याच्या उग्र वासाने बाळासाहेबांना खोकला आला. डॉक्टरांनी त्यांना तिथे बसून राहण्यास मनाई केली. त्यावर ते म्हणाले, काम बंद करू नका, सुरूच ठेवा आणि आतमध्ये त्यांच्यासाठी खास केलेल्या आयसीयूमध्ये गेले. पण बाहेर चित्रण सुरू आहे आणि आपल्याला ते पाहायला मिळत नाही, त्याचा आनंद लुटता येत नाही, याची खंत त्यांच्या मनात होती आणि म्हणून ते त्याही अवस्थेत तब्बल तीन ते चार वेळा बाहेर काम पाहण्यासाठी आले. थोडा वेळ थांबायचे, काम पाहायचे आणि मग आतमध्ये परत जायचे.
कलावंताला काम करताना पाहण्याची हौस ही पट्टीच्या कलावंतांना असतेच. बाळासाहेब हे स्वत: उत्तम दर्जाचे कलावंत होते आणि त्यांची ती आस, ओढ, हौस त्यांच्या त्या अस्वस्थतेतून आणि परत परत बाहेर येऊन चित्र पाहण्यातून त्या दिवशीपुरती जाणवली. फार कमी राजकारण्यांना चित्रकलेविषयी आवड किंवा आस्था असते आणि त्यांना त्यातील ज्ञानही असते. बाळासाहेब हे असे विरळा अपवादात्मक राजकारणी होते. महत्त्वाचे म्हणजे आजवरच्या सर्व भेटींमध्ये कधीही आमच्या चर्चेत राजकारण हा विषय बाळासाहेबांनी कटाक्षाने बाजूला ठेवला होता. विजयभाईंच्या व्यक्तिचित्रणाच्या वेळेसही बाळासाहेबांनी मी पोहोचण्यापूर्वीच माझ्या पुस्तके आणि आल्बममधून त्यांना माझा परिचय करून दिला होता आणि चित्रणाबद्दल विश्वासही जागवला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेबांनी पाचारण करून केलेल्या प्रत्येक चित्राचा मोबदला त्यांनी मला न मागता दिला. कलावंताला कधीही दु:खी करायचे नाही आणि त्याच्याकडून फुकटही काही करून घ्यायचे नाही, हा त्यांचा खाक्या होता. राजकारणी मंडळी फार कमी वेळा स्वत:च्या खिशात हात घालतात, असे म्हटले जाते. माझ्यासाठी बाळासाहेब हे अपवाद होते.
बाळासाहेबांशी झालेल्या गप्पांमघ्ये जलरंग, प्रसिद्ध चित्रकार वॉल्टर लँगहॅमर, व्यंगचित्रे असेच विषय असायचे. २००८ मध्ये केलेल्या पहिल्या व्यक्तिचित्राच्या वेळेस बाळासाहेबांची तब्येत चांगली नव्हती. पण नंतर ते बरे झाले आणि मग पुन्हा एकदा ताजेतवाने झालेल्या बाळासाहेबांचे व्यक्तिचित्र साकारले. यात बाळासाहेबांचे तेज अधिक जाणवते. (‘लोकप्रभा’च्या याच अंकाच्या मुखपृष्ठावर ते व्यक्तिचित्र वापरण्यात आले आहे) उद्धव ठाकरे यांनीही त्या वेळेस बरेच फोटो काढून घेतले. उद्धवजी मला म्हणाले, ‘एरवी मीही खास फोटोग्राफीसाठी बाळासाहेबांच्या मागे लागलो होतो. पण एवढा वेळ त्यांनी दिला नाही. त्यामुळे मीही संधी साधून घेतली.’ त्या वेळच्या गप्पांमध्ये जाणवलेला एक विशेष म्हणजे बाळासाहेब स्वत:वरही विनोद करायचे. हे सर्वानाच जमत नाही. पहिल्या व्यक्तिचित्राच्या वेळेस त्यांच्या कपाळावर एक चामखीळ होती. नंतर मात्र ती नव्हती, त्यावरून ते म्हणाले होते, कामत पूर्वीच्या चित्रात असलेला कपाळावरचा तिसरा डोळा आता नाही. कारण सारे काही स्पष्ट दिसतेय, त्यामुळे त्याची गरज नाही !
त्यानंतर बाळासाहेबांची पुन्हा भेट झाली ती, १४ फेब्रुवारी २०१० रोजी ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘पोर्ट्रेट्स’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस. मातोश्रीवरच बाळासाहेबांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळेस त्यांनी पुस्तकातील जवळपास प्रत्येक चित्रातील बारकावे पाहिले एवढेच नव्हे तर त्यावर चर्चाही केली. ती चर्चाही अशी होती की, त्यातून त्यांच्यातील कलासमीक्षक कुणालाही लक्षात यावा. अखेरीस म्हणाले, काय देऊ? मी म्हटले आशीर्वाद लिहून द्या. त्यांनी त्यांच्या साहाय्यकाला पाचारण केले आणि सांगितले.. ‘एका महान कलावंतास..’ मग पुन्हा थांबले व म्हणाले.. हे सारे कमीच आहे. ते खोडून टाका आणि लिहा ‘एका महान कलामहर्षीस.. ’ त्यांनी मला कलामहर्षी म्हणणे ही माझ्यासाठीची आजवरची सर्वात मोठी बिदागी होती !
राजकारणी व्यक्तींवर राजकारणाचे एवढे रंग चढलेले असतात की, त्यांना बाकी काहीच दिसत नाही. बाळासाहेबांच्या बाबतीत असे कधीच झाले नाही. ते उत्तम वक्ता, कलारसिक तर होतेच पण ते खूप चांगला माणूस होते. म्हणूनच २६ जुलै रोजी आलेल्या महापुराच्या वेळेस जेव्हा शेजारच्या बंगल्यातील ज्येष्ठ चित्रकार माधवराव सातवळेकर यांच्या घरातील चित्रे भिजली तेव्हा मदतीला माणसे सर्वप्रथम पाठवणारे बाळासाहेबच होते. बाका प्रसंग आला की, प्रथम आपण आपली वस्तू जपतो. बाळासाहेबांनी माणसे जपली आणि त्यांची कला जिवापाड जपण्यासाठी प्रयत्न केले.
असेच त्यांना एकदा विचारले तुला काय देऊ? नंतर त्यांचे छायाचित्रकार बाळ मुणगेकर यांना बोलावले आणि माझ्या खांद्यावर हात टाकून फोटो काढून दिला. त्यावर बाळ मुणगेकर नंतर बाहेर आल्यावर म्हणाले की, यापूर्वी बाळासाहेबांनी खांद्यावर हात टाकून काढलेला कलावंत म्हणजे मायकेल जॅक्सन आणि आता तुम्ही! बाळासाहेबांनी अशा अनेक क्षणांनी मला वेळोवेळी श्रीमंतच केले!
यंदाच्या वर्षी तर त्यांनी मला आणखी एक सुखद धक्का दिला. २७ एप्रिल रोजी सकाळीच बाळासाहेबांचा फोन आला. शुभेच्छा देण्यासाठी.. त्या दिवशी वाढदिवस होता माझा. बाळासाहेबांची ही आपुलकी हीच माझी खरी श्रीमंती होती.
आज बाळासाहेब आपल्यात नाहीत, हे मनाने स्वीकारणे खूपच जड जाते आहे. असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही! खरे तर हे विधान आजवर अनेकदा ऐकलेले आहे. पण हे विधान कुणाला तंतोतंत लागू होत असेल तर ते बाळासाहेबांनाच. फार पूर्वी कलावंतांना राजाश्रय मिळायचा. प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहेमान यांनी शाहू महाराज गेल्यानंतर प्रचंड हळहळ व्यक्त केली होती. ती हळहळ शब्दांत सांगता येणार नाही, असे ते म्हणाले होते. त्या वेळेस रहेमान यांना नेमके काय वाटले होते ते मला आज बाळासाहेब गेल्यानंतर जाणवते आहे! त्याच भावना आज माझ्याही आहेत. कलावंतांना आपलंसं करून घेणारं दुसरं कुणी व्यक्तिमत्त्व आज आहे, असे वाटत नाही. तमाम कलावंतांसाठी त्यांचा राजाच आज काळाच्या पडद्याआड गेला आहे!

जेजेबाबत मात्र अढी!
एकदा मातोश्रीवर जाणे झाले. त्या वेळेस बाळासाहेबांनी खूप व्यक्तिगत माहिती विचारली. मी माझे आल्बम घेऊन गेलो होतो. ते आस्थेने पाहिले. त्यातील चित्रांविषयीदेखील त्यांनी चर्चा केली. कुठे शिकलात, मार्गदर्शन कुणाचे घेतले, असे अनेक प्रश्न विचारले. मी जे जेमध्ये शिकलो. असे म्हटल्यानंतर मात्र काहीसे चिडलेल्या स्वरात ते म्हणाले की, जे जे वगैरे काही नाही. ही चित्रकला हे तुमच्या तपश्चर्येचे फळ आहे.. जे जे विषयी मात्र बाळासाहेबांच्या मनात नेहमीच एक अढी होती. कदाचित त्याचे मूळ त्यांच्या पूर्वानुभवात आणि त्यांच्या बालपणीच्या एका घटनेमध्ये दडलेले असावे. हा किस्सा मला खुद्द बाळासाहेबांनीच सांगितला होता. ते म्हणाले होते की, बाबुराव पेंटर प्रबोधनकार ठाकरेंचे चांगले मित्र होते. ते घरी आले त्या वेळेस त्यांनी पाहिले की, लहानगे बाळासाहेब चित्र काढत होते. त्यांचे चांगले चित्र पाहून त्यांनी प्रबोधनकारांना सांगितले की, याची चित्रकला चांगली आहे. मोठा चांगला चित्रकार होईल. फक्त जे जेला घालू नका, नाही तर चित्रकला बिघडेल.



मथितार्थ : ब्रॅण्ड आणि ग्रॅण्ड; बाळासाहेब !


विलेपाल्र्यामध्येच लहानाचा मोठा झालेला कॅप्टन विनायक गोरे हा युवक काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाला. केवळ विलेपार्लेच नव्हे तर अवघा महाराष्ट्र त्याची शौर्यगाथा ऐकून सुन्न आणि त्याच वेळेस शोकाकुलही झाला. एरवी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली ऑपरेशन्स याचे काही फारसे नावीन्य सामान्य माणसाला नव्हते. मात्र कॅप्टन विनायक गोरे हा आपला होता, अशी भावना सामान्यांमध्ये होती आणि म्हणूनच त्याआधी त्याचे नाव फारसे चर्चेत नसतानाही त्याच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी होती. त्याच सुमारास विलेपाल्र्याच्या प्रसिद्ध पार्ले ग्लुकोज कंपनीजवळ रेल्वेमार्गावरून जाणारा पूल तयार होत होता. या पूर्ण होत आलेल्या पुलाला कॅप्टन विनायक गोरे यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव समोर आला आणि तसेच व्हायचेही होते. पण त्याच वेळेस माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यानंतर परिस्थिती वेगात पालटली. त्यानंतर लगेचच विलेपाल्र्यात शिवसेनेचे फलक लागले. त्यावर लिहिलेले होते की, त्या पुलाला आता माँसाहेबांचेच नाव दिले जाणार. खरे तर पार्लेकरांच्या मनातील इच्छेविरोधात हे सारे होत होते. पण बोलणार कोण, हा प्रश्न होता. कारण शिवसेनेला आणि शिवसैनिकांना अंगावर घेण्याची ताकद कुणातच नव्हती. शिवसेनेचा दरारा आड येत होता. अखेरीस थेट बाळासाहेबांशीच संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेब फोनवर आले.. शहीद कॅप्टन विनायक गोरे यांची माहिती देण्यास सुरुवात करताच बाळासाहेब म्हणाले, बातम्या मी वाचल्या आहेत पुढे बोला.. समस्त पार्लेकरांची इच्छा त्यांच्या कानावर घालण्यात आली. त्यावर ते म्हणाले, मग अडचण काय आहे? त्यांना कौशल्याने सांगण्यात आले की, माँसाहेबांचे नावच त्या पुलाला देणार असे शिवसेनेचे फलक लागले आहेत आणि कुणी मध्ये आले तर खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेब म्हणाले, लिहून घ्या.. ‘विलेपार्ले येथील पुलाला शहीद कॅप्टन विनायक गोरे याचे नाव वगळता इतर कोणतेही नाव देण्याचा प्रयत्न झाल्यास तिथे येऊन मी स्वत: ती नावाची पाटी उखडून फेकून देईन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’! अर्थात दुसऱ्या दिवशीच्या ‘लोकसत्ता’मध्ये पहिल्या पानावर हे वृत्त अर्थात बाळासाहेबांचे विधान प्रसिद्ध झाले.. आणि त्या पुलाला कॅप्टन विनायक गोरे यांचेच नाव मिळाले!
हे बाळासाहेब होते. लोकभावना समजून घेणारे आणि मागचा पुढचा विचार न करता देधडक-बेधडक वागणारे! शिवसैनिकांना थोपविण्याची ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेबांमध्येच होती. म्हणूनच तर बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर १९६९ साली तत्कालीन काँग्रेस सरकारवर नामुष्की आली आणि त्यांनाच बाळासाहेबांना विनंती करावी लागली की, त्यांनी तुरुंगातूनच शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करावे.. कारण मुंबई पेटण्यास सुरुवात झाली होती आणि शिवसैनिकांना रोखण्याची ताकद कुणाकडेच नव्हती. पोलिसी बळाचा वापर करून प्रश्न चिघळला असता याची जाणीव काँग्रेसी राज्यकर्त्यांना होती.
एवढेच नव्हे तर अगदी बाळासाहेब गेल्यानंतरही त्यांची ताकद दिसली ती लाखोंच्या संख्येने जमलेल्या त्यांच्या चाहत्यांमध्ये. आणि लोकमान्य टिळकांनंतर झालेला हा दुसरा सार्वजनिक अंत्यविधी. त्याला परवानगी देतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता टाळण्यासाठी असे कारण देऊन अपवाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष मृत्यूनंतरही ती ताकद कायम होती !
ही ताकद बाळासाहेबांकडे आली ती त्यांच्यातील गुणवैशिष्टय़ांमुळे. अमोघ वक्तृत्व, धारदार शैली, थेट काळजाला भिडणारे भाषण आणि नसानसांत भरलेला बेधडकपणा यामुळे. अगदी आधुनिक चष्म्यातून पाहायचे तर बाळासाहेब हे स्वत:च एक उत्तम ब्रॅण्ड होते. त्यांचे ते ब्रॅण्ड असणे त्यांच्या चालण्यावागण्या आणि बोलण्यातूनही जाणवायचे. त्यांनी स्वत:ला तसे सादर केले. एका उत्तम ब्रॅण्डमध्ये जी सर्व गुणवैशिष्टय़े असावी लागतात ती सर्व बाळासाहेबांमध्ये होती. त्यामुळेच केस विस्कटलेले, गचाळ अवस्थेतील बाळासाहेब कधीच पाहायला मिळाले नाहीत. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र प्रसिद्ध झालेली छायाचित्रे पाहिली तर हे अगदी सहज लक्षात येईल.
सुरुवातीच्या काळात जोधपुरी कोट हा त्यांचा पेहराव होता. त्यानंतर सदरा, पायजमा, अंगावर शाल समोरून गळ्यात दिसणाऱ्या रुद्राक्षांच्या माळा आणि हाताच्या बोटांमध्येही ती रुद्राक्षाची माळ अडकलेली ! बाळासाहेब हे सर्वोत्तम ब्रॅण्ड असल्याचीच ही सारी लक्षणे होती.
‘ठाकरी शैली’ आणि ‘ठाकरी बाणा’ हे तर केवळ त्यांच्या वक्तृत्व आणि भाषेसाठी खास वापरण्यात आलेले शब्दप्रयोग यामध्येही त्यांचे नाव आहेच. ही ठाकरी शैलीच सामान्यांना सर्वाधिक भावली. त्या सर्व गोष्टींच्या मुळाशी होती ती उत्स्फूर्तता आणि बेधडकपणा. जाऊन थेट धडकायचे नंतर काय होणार याचा फारसा विचार त्या मागे नसायचा. खरे तर तारुण्यामध्ये प्रत्येक माणूस कमी-अधिक फरकाने हा गुण मिरवत असतो. बाळासाहेबांनी तो आयुष्यभर मिरवला, ते आयुष्यभर तरुणच राहिले. त्यांची भाषणे ही प्रामुख्याने तरुण सळसळत्या रक्ताच्या तरुणांना आवाहन करणारी असायची. त्यात आवाहन कमी आणि आव्हानच अधिक असायचे. ती भाषणे अंगार फुलवणारी आणि चेतवणारी होती. म्हणूनच त्यांच्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे हे चिथावणीखोरीचे होते! सर्व गुन्ह्य़ांमध्ये चिथावणीखोरीचे कलम समान दिसेल. हाच त्यांचा बेधडकपणा, अंगावर घेण्याची वृत्ती प्रकर्षांने जाणवली ती ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर. त्याची जबाबदारी घेण्यासाठी रास्वसंघ किंवा मग भाजपा, विश्व हिंदूू परिषद कुणीच तयार नव्हते. त्यावेळेस ते शिवसैनिक होते, अशी आवई आली. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेबांचे विधान आले.. ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे!
त्यांचा हा दरारा काही केवळ जनसामान्यांपुरताच मर्यादित नव्हता. तर थेट न्यायालयांपर्यंत होता. बाळसाहेबांचे अभय अनेकांना मोठा मदतीचा हात देऊन गेले. बोफोर्स प्रकरणात वादग्रस्त ठरलेला अमिताभ बच्चन असो किंवा मग बॉम्बस्फोटांच्या आरोपाखाली पकडला गेलेला संजय दत्त असो. संजय दत्तच्या सुटकेसाठी तर मग बाळासाहेबांनी थेट टाडा न्यायालयाच्या न्यायमूर्तीनाच लक्ष्य केले. किणी प्रकरणात राज ठाकरे अडकले होते तेव्हाही त्यांनी थेट दसरा मेळाव्यात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवरच आरोप केले! एवढे सारे होऊनही बाळासाहेबांवर या दोन्ही प्रकरणांत कोणतीही कारवाई झाली नाही. हा दरारा की, सरकारची निष्क्रियता यावर वाद होऊ शकतो!
कोणताही ब्रॅण्ड वर्षांनुवर्षे तसाच राहिला तर तो कालगतीत नामशेष होण्याचा धोका असतो. बाळासाहेबांनी कालगतीनुसार बदलही केला. हिंदुत्वाच्या मुद्दय़ाचा स्वीकारही त्यांनी असाच केला. मग तो अखेपर्यंत कायम होता. त्यानंतर बदललेले बाळासाहेब नंतर केवळ भगव्या वेशातच दिसले. त्यांची शालही भगवी होती. अंत्यसंस्काराच्या वेळेसही त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रेच होती. फक्त पेहेराव नाही तर बाळासाहेबांच्या सवयीदेखील त्यांच्या ब्रॅण्डच होत्या. सुरुवातीस त्यांच्या तोंडातील चिरूट हा त्यांचा परिचय होता. कधी हातात सिगार असायचा. नंतर हाताच्या बोटांमध्ये रुद्राक्षांची माळ विसावली. त्यांचा मोठय़ा फ्रेमचा चष्मा हादेखील तसाच. यातील प्रत्येक गोष्ट ही बाळासाहेबांचा परिचय होती.
पण या सर्वाना दशांगुळे उरणारी गोष्ट होती ती त्यांचे धारदार नेतृत्व. त्यांचे वागणे, बोलणे, भूमिका यांत अनेकदा विरोधाभास असायचा. त्यामागे त्यांचे स्वत:चे असे वेगळे तर्कशास्त्र होते. पण सामान्य माणसाचा मात्र गोंधळ व्हायचा. पाकिस्तानी संघाला विरोध करणाऱ्या बाळासाहेबांच्याच घरात जाऊन जावेद मियांदाद मेजवानी कशी काय घेऊ शकतो, असा प्रश्न सामान्यांच्या मनात यायचा. पण हा विरोधाभास हेदेखील बाळासाहेबांचेच पेटंट असावे.
मनात येईल ते बोलायचे हे त्यांचे तत्त्व होते म्हणून त्यांना कदाचित रूढार्थाने राजकारणी म्हणताना थोडा विचार करावा लागतो. कारण राजकारणी व्यक्ती अनेकदा केवळ मतलबाचेच बोलतात. बाळासाहेब हे एक अजब रसायन होते. म्हणूनच ते या ब्रॅण्डच्याही पलीकडे जाऊन ‘ग्रॅण्ड’ ठरले. भव्यदिव्यता हे त्यांचे आकर्षण होते, असे त्यांनी स्वत: एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर चिरकूट गोष्टींपेक्षा भव्यतेची आस धरावी, तर माणूस मोठा होतो!
त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा हा ब्रॅण्ड स्वत:सोबत वागवला. पण हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे! म्हणूनच सर्वाना आता प्रश्न सतावतो आहे, बाळासाहेबांनंतर काय? शिवसेनेचे काय होणार? खरे तर हा प्रश्न कदाचित बाळासाहेबांच्याही मनात होताच म्हणूनच तर त्यांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले. बाळासाहेबांचा हा ब्रॅण्ड पुढे नेणे सोपे काम तर निश्चितच नाही आणि आताच्या परिस्थितीत तर ते अधिकच कठीण असणार आहे. त्यांचा वारसा सांगणाऱ्या प्रत्येकाला हाच विचार करावा लागेल की, बाळासाहेब ठाकरे नावाच्या ग्रॅण्ड अशा ब्रॅण्डचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आपल्यात आहे काय?
vinayak.parab@expressindia.com

आता असमंतही भगवा झाला…!!!


महाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांची लाट – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांचा झंझावात… सांगलीत प्रचंड सभा, दक्षिण कराडमध्ये दणदणीत रोड शो
13th October 2014

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी सांगली, विटा आणि कराड येथे दणदणीत रोड शो आणि प्रचंड सभा झाली. त्यांच्या सभेला आणि रोड शोला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करताच ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विधानसभा निवडणुकीत ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचवा आणि महाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांचीच लाट असल्याचे दिल्लीश्‍वरांना दाखवून द्या, असे जबरदस्त आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
सत्ता मिळविण्यासाठी स्वाभिमान सोडून महाराष्ट्र दिल्लीश्‍वरांसमोर कधीही झुकणार नाही. विधानसभा निवडणुकीत ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचवा आणि महाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांचीच लाट असल्याचे दिल्लीश्‍वरांना दाखवून द्या, असे जबरदस्त आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. आता शिवसेनेचे सरकार येणार असून मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होणार असल्यामुळे कराड येथे सभांचा समारोप केला, असे ते कराड विमानतळावर बोलताना म्हणाले.
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज सांगली, विटा आणि कराड येथे दणदणीत रोड शो आणि प्रचंड सभा झाली. त्यांच्या सभेला आणि रोड शोला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करताच ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी युवकांनी परिसर दणाणून सोडला. आदित्य ठाकरे म्हणाले, सत्तापरिवर्तनासाठी लोक प्रचंड उत्सुक आहेत. ज्या भाजपसाठी आपण लढलो, झगडलो त्या भाजपने आपला विश्‍वासघात केला. मला अभिमान आहे शिवसेना पक्षप्रमुखांचा. सत्तेसाठी ते भाजप किंवा मोदींसमोर झुकले नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख झुकतात फक्त छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरच. आता वेळ आली आहे दिल्लीश्‍वरांना आपली ताकद दाखवण्याची, असे आवाहन त्यांनी केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, आजही नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आहे, पण एका सत्तेमुळे कसली ही मस्ती? राज्यातील शिवसेना-भाजपची गेल्या २५ वर्षांची युती तोडली. शिवसेनाप्रमुखांनी ज्या विश्‍वासाने तुमच्याशी २५ वर्षे युती सांभाळली त्यांच्या पाठीत केलेला हा वार सर्वसामान्य जनता सहन करणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. यावेळी शिवसेना सचिव आदेश बांदेकरही उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण सह्या करा… सह्या करा, कराडमध्ये घोषणाबाजी
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कराडमधील रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोड शोला दत्त चौकातून प्रारंभ झाला. संपूर्ण कराड शहरातून रोड शो झाला. यावेळी तरुणांनी ‘मुख्यमंत्री सह्या करा… सह्या करा’ची घोषणाबाजी करीत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील रोष व्यक्त केला. यावेळी तरुणाईने ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी युवकांनी परिसर दणाणून सोडला.
शिवसेनेचे सुवर्णयुग येणार
विधानसभा निवडणुकीचे मतदान १५ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी महाराष्ट्र्रासमोरील समस्यांचा रावण शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून मारून टाका आणि शिवसेनेच्या सुवर्णयुगाला सुरुवात करा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा तयार आहे. क्रांतिकारी निर्णयातून महाराष्ट्रात सुवर्णयुग अवतरणार आहे. युवकांनी पुढाकार घेऊन विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
- महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच
कराड : कॉंग्रेस पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात मी शेवटचा आलो आहे, कारण यापुढे येणारे सरकार हे शिवसेनेचे असून मुख्यमंत्रीसुद्धा शिवसेनेचाच असणार आहे, असा विश्‍वास आदित्य ठाकरे यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा वाढता पाठिंबा हा शिवसेनेलाच आहे. सर्व महाराष्ट्रात भगवे वातावरण दिसते आहे. त्यामुळ या वेळेस शिवसेना सत्तेवर येईल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे याची मला खात्री आहे. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे स्वबळाचे सरकार येणार आहे. यापुढच्या सरकारचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

मंगळवार, २० जानेवारी, २०१५

अखेरचा "जय महाराष्ट्र'

शिवसेनेचे सरसेनापती, हिंदुहृदयसम्राट आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला सातत्याने हलवत पाच-सहा दशकांहून अधिक काळ गाजणारा झंझावात म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांना आज अखेरचा "जय महाराष्ट्र' म्हणताना राज्यातील गरम रक्ताच्या तरुणाईला आणि मराठी माणूस म्हणून मिरवत असलेल्या असंख्य लोकांना हुंदका फुटला असणार. "आव्वाज कुणाचा', अशी ललकारी मारत भगवा फडकवणाऱ्यांचे शब्दही गोठले असणार. लोकप्रियतेच्या अत्युच्च लाटेवर आरूढ होऊन सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले एक दुर्मिळ नेते, चमत्कार वाटावेत, असे झुंजार नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय! प्रबोधनकारी विचारांची परंपरा असलेला एक तरुण व्यंग्यचित्रकार कुंचल्याच्या मदतीने प्रस्थापित राजकारणाला एकावर एक फटके मारत स्वतःच एक महानेता बनतो काय आणि महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करीत दिल्लीच्या राजकारणावरही पंजा मारतो काय, सारे काही अचंबित करणारेच होते. कोणत्याही राजकीय लाटेबरोबर किंवा कोणत्याही प्रस्थापित राजकीय प्रवाहाबरोबर नव्हे, तर प्रवाहांच्या विरोधात जाऊन राजकारण कसे करता येते आणि लोकप्रियतेच्या शिखरावर कसे पोचता येते, याचे आधुनिक राजकारणातील एक उत्तम उदाहरण म्हणजेही बाळासाहेब ठाकरे होय. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने त्यांचे राजकारण सुरू झाले आणि पुढे पन्नास वर्षे ते या त्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे दिशा देत राहिले. मराठी माणसाचा जयजयकार करत प्रस्थापितांना दोन देण्याचे आणि दोन घेण्याचे त्यांचे हे राजकारण होते. मराठी माणसाची अस्मिता जागी करून तिला सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचे हे राजकारण होते. खरे तर तसे हे खूप अवघड होते. हुकूमशाही पद्धतीने संघटना चालवून लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकण्याचे हे राजकारण होते. पिंजऱ्याबाहेर असलेल्या वाघ-सिंहावर रोज बसण्याचे हे राजकारण होते. ते यशस्वी करून दाखविणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी पर्वाचे नाव होते बाळासाहेब ठाकरे. वाघनखे असलेल्या कुंचल्यातून निर्माण झालेले हे राजकारण माळ धारण केलेल्या त्यांच्या मनगटावर टिकून राहिले. महाराष्ट्राने असे विलक्षण राजकारण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. आपल्या खास ठाकरे शैलीच्या या राजकारणाला बाळासाहेबांनी नाव दिले होते, "शिवशाही!' अर्थातच शिवसेनेची शिवशाही... आपल्या देशात आणि राज्यात स्वातंत्र्यानंतरचे राजकारण कल्याणकारी मानले जाते; पण याकल्याणकारी राज्यातही सर्वसामान्यांच्या अस्मितेचे प्रश्‍न असतात. माणूस एकाच वेळी नागरिकही असतो आणि मराठी माणूसही असतो. तो एकाच वेळी देशाच्या नकाशातही असतो आणि त्याच वेळी बेळगावसारख्या सीमा भागात घुसमटतही असतो. एकाच वेळी तो वर्तमानही असतो आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने भारावून गेलेला इतिहासही असतो. बाळासाहेबांनी सर्वप्रथम हात घातला तो मराठी माणसाच्या संवेदनांना. या संवेदनांचे त्यांनी घोषणांमध्ये आणि राजकारणामध्ये रूपांतर केले. "जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा आणली. लोकशाहीचा तिरस्कार करत आणि तिच्या मर्यादांवर बोट ठेवत स्वत:चे शिवशाहीचे मॉडेल मांडण्यास आणि मराठी माणसाच्या सर्व प्रश्‍नांवर शिवसेना हेच एक उत्तर आहे, असे विश्‍वासाने सांगण्यास सुरवात केली. सीमा भागातील मराठी माणसाच्या मदतीसाठी ते सर्व शक्तीनिशी धावले. या प्रश्‍नावरून त्यांनी रान उठविले. मोरारजी देसाई यांची गाडी अडवून तुरुंगवास पत्करला. मराठी माणूस आणि त्याचा विकास हेच माझे आणि माझ्या शिवशाहीचे एकमेव ध्येय आहे, असे म्हणत पंतप्रधानांपासून ते गल्लीतल्या एखाद्या गब्बर पुढाऱ्यापर्यंत साऱ्यांशीच सातत्याने दोन हात केले. आपल्या कृतीच्या परिणामाची तमा त्यांनी कधीही बाळगली नाही. माझा शिवसैनिक म्हणजे माझी कवचकुंडले, असे ते सांगत राहिले. त्यांचा फाटकातुटका कार्यकर्ताही "आवाज कुणाचा' अशी गगनभेदी घोषणा देत अन्याय करणाऱ्यावर तुटून पडायचा. गळ्यात बाळासाहेबांचा फोटो आणि हातात शिवसेनेचे बॅनर घेऊन रस्त्यारस्त्यावर तो उभा ठाकायचा. बाळासाहेब हीच या कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि बाळासाहेब हेच त्यांचे हत्यार होते. बाळासाहेबांनी हल्लाबोल असा आदेश दिला, की कार्यकर्ते कशाचीही तमा न बाळगता तुटून पडायचे. शिवसेनेसाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास सज्ज राहा, असा जबरदस्त ट्रिपल डोसही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. शिवसेनेत पदाला किंवा जातीला महत्त्व नसते, तर त्यागाला आणि कामालाच महत्त्व असते, हा मंत्र त्यांनी बिंबवला. प्रस्थापित कॉंग्रेसच्या सत्ताभिमुख आणि ऊबदार राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर खरे तर हे सारे अवघड होते. तरीही बाळासाहेब ते करत होते. आपण यशस्वी होणारच, असा जबरदस्त विश्‍वास बाळगून लोकांच्या प्रश्‍नांना ते थेट भिडत होते. प्रश्‍नांच्या आड येणाऱ्यांना "दे दणका'सारखा कार्यक्रम राबवून वचक निर्माण करत होते. जेथे जेथे मराठी माणसांची कोंडी होईल तेथे तेथे शिवसेना धावून येईल, असे चित्र निर्माण होऊ लागले. प्रशासन आणि राजकारणातही त्यामुळे शिवसेनेचा दबदबा निर्माण होत होता.
वरकरणी सामाजिक व अस्मितारक्षक वाटणारी शिवसेना हळूहळू राजकीय शक्तीत रूपांतरित होत होती. पुढे पुढे तर "ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण' हे सूत्र उलटे झाल्यानंतरही लोकांनी ते आनंदाने स्वीकारले. शिवसेनेला सत्तेवर बसविले. 1966 ला शिवसेना जन्माला आली आणि अनेक वर्षे आग, विस्तव, वादळ, डोंगर यांच्याबरोबर सातत्याने लढत लढत 1995 मध्ये भगवा घेऊन ती सत्तेच्या सिंहासनावर गेली. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट आदी पक्षांबरोबर तिने टक्कर दिली. मुंबईच्या महापौरापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि लोकसभेच्या सभापतिपदापर्यंत एका प्रादेशिक पक्षाने मोठ्या आत्मविश्‍वासाने मारलेली ही धडक होती. या काळात बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला, साहित्यिकांना बैल म्हटले, आणि होय, आम्हीच बाबरी मशीद पाडली, असे ठणकावून सांगितले. हिंदुत्ववादाच्या बाबतीत भाजप मिळमिळीत आणि शिवसेना आक्रमक आहे, असे सांगत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याची स्वप्ने पेरली आणि ती उगवली तीही त्यांच्या हयातीतच. बाळासाहेबांच्या अंगा-खांद्यावर वाढलेले आणि मोठे झालेले त्यांचे काही सरदार शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याबाहेर पडले. शिवसेनेला जातिवादी ठरविणारे काही जण शिवसेनेच्या किल्ल्यात येऊन किंवा शिवसेनेच्या मदतीने सत्तेची ऊब भोगू लागले. याच काळात मुंबईत मायकल जॅक्‍सनचा प्रयोग घेऊन बाळासाहेबांनी संस्कृतिरक्षकांना जबरदस्त धक्का दिला होता. याच काळात शिवसेनेला अनेक पराभवही पचवावे लागले होते आणि शिवसेनाप्रमुखपदही सोडेन, अशी घोषणाही बाळासाहेबांनी याच काळात केली होती. सर्वांत धक्कादायक घटना म्हणजे याच काळात राज ठाकरेही शिवसेनेबाहेर पडले. आणखी काय काय झाले, हे सांगता येऊ नये इतके घडत गेले. लोकांनी मात्र आपला महानायक म्हणून बाळासाहेबांवरील आपली अभंग निष्ठा कायम ठेवली होती. त्यांची प्रकट झालेली विविध रूपे मान्य केली होती. मला प्रबोधनकारांची श्रेष्ठ परंपरा आहे, असेही बाळासाहेब सांगायचे आणि त्याच वेळेला "गर्व से कहो हम हिंदू है' हेही सांगत एका विशिष्ट समूहावर तुटूनही पडायचे. लोकांनी बाळासाहेबांच्या या भूमिकांविषयी कधीही प्रश्‍न उपस्थित केला नाही. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे हेच बळ होते. साहित्यिकांना बैल म्हणणारे बाळासाहेब पुढे कुसुमाग्रजांच्या पायावर माथा टेकवतात, हेही लोकांनी पाहिले होते. देश सोनिया गांधींच्या इटलीत गहाण पडलाय, असे म्हणणारे बाळासाहेब महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देतात, हेही पाहिले होते. एक मनस्वी आणि स्वतःला वाटेल तेच करणारा आणि त्याची बरी-वाईट किंमत मोजणारा, कधी वादळाच्या हातात हात देऊन तर कधी वादळावर स्वार होऊन जगणारा आणि स्वतःच्या हिमतीवर राजकारण वळवणारा हा नेता होता.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक पक्ष आणि संघटना जन्माला आल्या. काही काळ त्या चमकल्या आणि निस्तेजही झाल्या; पण शिवसेनेचे मात्र तसे झाले नाही. यामागची नेमकी कारणे शोधण्याचा नीट प्रयत्न झाला पाहिजे. बाळासाहेब नुसतेच व्यंगचित्रकार नव्हते, तर ते धूर्त, मुरब्बी राजकारणीही होते. त्यांना राजकारणाचे वारे नीट कळायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात तेव्हा विविध समाजघटकांचे विविध पक्षांत विभाजन झाले होते. दलित, अल्पसंख्याक कॉंग्रेसकडे, उच्चवर्गीय भाजपकडे, श्रमिक डाव्यांकडे, अशी ढोबळमानाने ती विभागणी होती. बाळासाहेबांनी या सर्वांचा खोलवर अभ्यास केलेला होता. जे समूह वा घटक सत्तेच्या विभागणीबाहेर फेकले गेले होते त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेत खेचले. मराठेतर ओबीसी, बौद्धेतर दलित, अल्पशिक्षित, बेरोजगार तरुण असे हे घटक होते. यांपैकी बहुतेकांना स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या कारणाने सत्ता मिळाली नव्हती. ती मिळण्याची शक्‍यताही नव्हती. हा सारा वर्ग शिवसेनेने आपल्याकडे वळवला. त्याला थेट सत्तास्थानावर नेऊन बसविले. बाळासाहेबांनी घडवलेला हा राजकीय चमत्कार होता. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी घडले नव्हते. शिवसेनेत जात-पात मानली जात नाही, हे बाळासाहेबांनी कृतीतूनच सिद्ध केले. मातंग, चर्मकार, साळी, माळी, कोष्टी, कोळी, तेली, तांबोळी आदी अनेक उपेक्षितांमधील लोक विधानसभेत आणि लोकसभेत शपथ घेताना दिसले. सत्ता तळागाळापर्यंत नेण्याचा दावा कॉंग्रेस करत होती आणि बाळासाहेब प्रत्यक्षात ते घडवत होते. हेही खरे आहे, की बाळासाहेबांची अनेक कल्याणकारी स्वप्ने "ओव्हरसाइज' होती; पण लोकांनी त्याकडे कानाडोळा केला. गरिबांसाठी गावोगाव झुणका-भाकर केंद्रे, चाळीस लाख झोपडवासीयांना मुंबईतच मोफत घरे, सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज, प्रत्येकाला नोकरी अशी किती तरी आश्‍वासने म्हणजे वचननामे शिवसेनेने आभाळभर पसरवली होती. प्रत्यक्षात या वचननाम्यांचे काय झाले हे सर्वश्रुत आहे. अर्थात, सत्तेच्या राजकारणात बाळासाहेबांनीच अशी वचने दिली असे नाही. पुढे इतरांनाही या वचननाम्यांची भुरळ पडली हा भाग वेगळा. राजकारणातच शिवसेना तयार झाली असे नाही, तर अल्पावधीतच कामगार सेना, विद्यार्थी सेना, शेतकरी सेना, टपरीधारक सेना, दलित सेना, कलावंत सेना, महिला सेना, वाहनधारक सेना अशा असंख्य रूपांत ती प्रकट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात अद्‌भुत कादंबरी वाटावी असे एक वैशिष्ट्यपूर्ण पर्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. मराठी माणसाच्या हितापोटी जन्माला आलेली शिवसेना पुढे पुढे व्यापक रूप घेऊ लागली. गरिबांचे तारणहार आम्हीच आहोत, असे सांगू लागली. दुसऱ्या बाजूला बदलत असतात तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि तीच शिवसेना, असे समीकरण रूढ होऊ लागले. मराठी माणसाच्या उद्धाराचा निर्धार कायम ठेवत शिवसेनेने हे बदल घडविले होते. सर्वांनाच आश्‍चर्यचकित करणारे हे बदल आहेत. आयुष्यभर लढत राहिलेला हा महानेता मृत्यूशीही लढत राहिला. बऱ्याच वेळेला विजय मिळवत राहिला; पण शेवटी माणूस हरतो आणि मृत्यूच विजयी होतो, हे निसर्गाचे सूत्र त्यांनाही स्वीकारावे लागले. मराठी माणसाच्या अस्मितेला जेव्हा केव्हा यापुढेही अंकुर फुटतील, अंकुराचे टोकदार भाले व्हायला लागतील, तेव्हा याद येत राहील ती बाळासाहेबांचीच. या महापराक्रमी नेत्याला अखेरचा जय महाराष्ट्र.

बाळासाहेब आणि शिवसेना राजकारणात एक चमत्कार वाटत असला, तरी या चमत्काराच्या मागेही काळ आणि माणूस वेळीच समजून घेण्याचा प्रयत्नही होता.