शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवतीर्थ आणि दसरा मेळावा हे समीकरण मागील चार दशकांपेक्षा जास्त काळ सर्व देशाच्या परिचयाचं झालं आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाची व्हिडिओ चित्रफीत शिवतीर्थावर दाखवण्यात आली. शिवसेनाप्रमुख प्रत्यक्षात शिवतीर्थावर नव्हते, मात्र त्यांच्या भाषणातला अंगार उपस्थितांना तितकाच रोमांचित करणारा होता. मात्र शिवसेनाप्रमुखांचे हे अखेरचं भाषण ठरलं. ज्या शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली, ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांनी लाखोंच्या सभा गाजवल्या त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुखांनी शेवटचं भाषण केलं.
शिवसेनाप्रमुखांशिवायचा हा पहिला दसरा मेळावा. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणी मनात उचंबळून येत आहेत. त्याच इथं मांडण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.
23 जानेवारी 1926 या दिवशी जन्माला आलेले बाळ केशव
ठाकरे यांनी जगाच्या इतिहासात स्वत:ची ओळख निर्माण केली. फ्री प्रेस जर्नलमधून
व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरूवात केली. त्यांचे वडील केशव ठाकरे
म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रबोधनाचा वारसा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
यांना लाभला. फ्री प्रेस जर्नलमध्ये नोकरी करत असतानाच त्यांना मुंबईत
भूमीपुत्रांवर होणारा अन्यायही दिसत होता. एक व्यंगचित्रकार म्हणून जागतिक पातळीवर
ख्याती असतानाही बाळासाहेब ठाकरे वृत्तपत्रातल्या नोकरीत रमले नाही. मुंबईचा
भूमीपुत्र मराठी माणूसच या शहरातून हद्दपार होत होता. परप्रांतीय शिरजोर होत चालले
होते. नोकरी, व्यापार या सगळ्याच क्षेत्रात मराठी माणसांची
पिछेहाट होत होती. अटकेपार झेंडा फडकावणारा हा मराठी गडी त्याच्याच राज्याच्या
राजधानीत नोकरीसाठी वणवण फिरत होता. मात्र मोठ्या पदांवर बसलेले परप्रांतीय
भूमीपुत्रांवर अन्याय करून परप्रांतीयांची भरती करत होते. त्यामुळे बाळासाहेब
ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून मार्मिक हे साप्ताहिक काढलं.
मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकात त्यांनी "वाचा आणि थंड बसा" असं शिर्षक
देऊन मुंबईतल्या विविध आस्थापणांमध्ये नोकरीला लागणा-या परप्रांतीयांची यादीच
छापायला सुरूवात केली. यातून मराठी माणसांमध्ये योग्य संदेश जाऊ लागला. मराठी मनं
यातून चेतायला लागली. नंतर, "वाचा आणि पेटून उठा" असा थेट आदेशच
देण्यात आला. मात्र हे सर्व कार्य करण्यासाठी एक संघटना असणं गरजेचं होतं, ही
बाब शिवसेनाप्रमुखांचे वडील असलेल्या प्रबोधनकारांनी हेरली. त्यांनीच संघटनेला
शिवसेना हे नाव सुचवलं. आणि 19 जून 1966 रोजी शिवसेनेचा जन्म झाला.
मुंबईत मराठी
माणसांच्या हक्कासाठी शिवसेना आक्रमकपणे लढत होती. मराठी माणसांना न्याय मिळावा
यासाठी शिवसेनेनं स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना केली. शिवसेना आणि स्थानिक
लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक कंपन्यां, सरकारी आस्थापनांसमोर आंदोलनं करण्यात येऊ लागली. चर्चा -
वाटाघाटी करून मराठी माणसांना नोक-या मिळायला लागल्या. ज्यांना ही भाषा कळत नव्हती
त्यांना शिवसेना स्टाईलने प्रसाद मिळू लागला. सुधीर जोशी,
दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार या बिनीच्या शिलेदारांनी यात मोलाची भूमिका
बजावली. रस्त्यावर शिवसैनिकांच्या मोर्चाचं नेतृत्व करणारे दत्ताजी नलावडे आणि आत
कंपन्यांच्या व्यवस्थापना बरोबर चर्चा करणारे मधुकर सरपोतदार ही दुकली तेव्हा
चांगलीच लोकप्रिय होती. प्रत्येक वॉर्डातल्या शाखेतून शिवसेना मुंबईकरांबरोबर घट्ट
जोडली जात होती. शिवसेनेची शाखा सामान्यांचा आधार होती. कोणत्याही अडलेल्या
कामासाठी सामान्य नागरिक शाखेत यायचे. त्यांची कामंही तत्परतेनं पूर्ण केली जायची.
अनेकदा इथं न्यायनिवाडाही केला जायचा. या माध्यमातून शिवसेने मराठी माणूस जोडून
घेतला. मात्र फक्त मराठी मतांच्या जोरावर सत्ता मिळणार नव्हती. त्यामुळे शिवसेनेनं
हिंदूत्वाचाही मुद्दा हाती घेतला. रामजन्मभूमीच्या आंदोलनात हिंदूत्वाचा मुद्दा
घेणारा संघ परिवार, विश्व हिंदू परिषद यांच्यापेक्षा सामान्यांना बाळासाहेब
ठाकरेंची आक्रमक भूमिका भावली. देशात एक प्रखर हिंदूत्ववादी नेता अशी बाळासाहेब
ठाकरेंची प्रतिमा तयार झाली. संघ परिवाराचा हिंदूत्वाचा मुद्दा शिवसेनेचा अजेंडा
बनला.
1990 च्या
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले. त्यानंतर 1992 साली उसळलेल्या
दंगली 1993 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर शिवसेनेनंही त्यांचं
हिंदूत्व आक्रमक केलं. 1994 साली झालेल्या नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या
अधिवेशनात "दार उघड बये दार उघड" असं साकडं घालण्यात आलं. देवीनंही
शिवसेनेला उजवा कौल दिला. 1995 च्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या
झंझावाती प्रचाराला यश आलं. विधानसभेवर भगवा फडकावण्याचं शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न
साकार झालं. कोणताही आर्थिक पाठिंबा नसताना त्यांनी राज्यात काँग्रेसचा पराभव
केला. देशातल्या राजकीय इतिहासातली ही महत्वाची घटना घडली. सामान्य शिवसैनिकांना
शिवसेनाप्रमुखांनी खासदार आमदार केलं. रस्त्यावर लढणारे सामान्य शिवसैनिक नगरसेवक
- आमदार झाले. उमेदवार निवडताना शिवसेनाप्रमुखांनी कोणत्याही उमेदवाराची जात
पाहिली नाही. निकष फक्त एकच, निष्ठावंत शिवसैनिक. शिवसेनाप्रमुखांच्या या दिलदारीचं
त्यांच्या विरोधकांनीही कौतुकच केलं.
शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्तारत होता. मुंबई - ठाण्यातल्या
शिवसेनेविषयी राज्यात उत्सुकता निर्माण होऊ लागली. 1984 नंतर शिवसेना राज्यात
विस्तारण्यासाठी मुंबई-ठाण्याच्या बाहेर पडली. तेव्हा शिवसेनेत असलेल्या छगन
भुजबळांनी मेहनत घेऊन शिवसेना राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचवली. 1988 हे वर्ष
शिवसेनेच्या इतिहासात महत्वाचं ठरलं. औरंगाबादची पहिली महापालिका निवडणूक जाहीर
झाली होती. शिवसेनेनंही त्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबादेतल्या
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची
विराट सभा झाली. या सभेनं मराठवाडा जिंकला. औरंगाबादच्या महापालिकेत शिवसेनेचे 27
नगरसेवक निवडून गेले. औरंगाबादेतलं शिवसेनेचं हे घवघवीत यश पक्षाला मराठवाड्याच्या
गावागावात घेऊन गेलं. मराठवाडा, खान्देश भागात शिवसेनेची ताकद वाढू लागली होती.
1991 साली शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले. मात्र
त्याच्या दुस-याच वर्षी म्हणजे छगन भुजबळांनी केलेलं बंड गाजलं. शिवसेनेसाठी हा
मोठा धक्का होता. मात्र त्यावरही मात करत 1995 मध्ये शिवसेनेनं सत्ता मिळवली.
मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर
शिवसेना विरूद्ध राणे असा संघर्ष पेटला होता. शिवसेनेतला मुंबई आणि कोकणातला मोठा
नेता पक्षातून बाहेर पडला होता. मात्र हा धक्काही छोटा वाटावा अशी घटना अजून
घडायची होती. ती घटना राणेंच्या बंडानंतर दुस-या वर्षी घडली. हे बंड बाहेरच्या
नेत्याने नव्हे तर खुद्द घरातला पुतण्या राज ठाकरे यांनी केलं होतं. 2006 मध्ये
राज ठाकरेंनी शिवसेना सोडून नवा पक्ष स्थापण केला. त्यामुळे शिवसेनेची मोठी शक्ती
कमी झाली. याचा परिणाम 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाला. कोकणात
शिवसेनेच्या जागा घटल्या. तर मनसेमुळे झालेल्या मतविभागणीनं मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे
या पट्ट्यात युतीच्या पन्नास उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. राज ठाकरेंचं
बंड हा शिवसेनेच्या इतिहासातला सर्वात धक्कादायक कालखंड होता. एक काका या नात्यानं
शिवसेनाप्रमुखांनाही हा धक्का पचवणं जड गेलं होतं.
वाढतं वय हे
कुणाच्याही हातात नसतं. शिवसेनाप्रमुखांनीही वाढत्या वयासमोर नाईलाज असल्याचं
म्हटलं होतं. वाढत्या वयामुळे शिवसेनाप्रमुखांना राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेणं
शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना 2009 च्या निवडणुकीत सभा घेता आल्या नव्हत्या.
मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ते दरवर्षी संबोधित करायचे. अर्थात प्रकृतीमुळे
त्यांना सभेच्या ठिकाणी येता यायचं नाही. मात्र त्यांचं रेकॉर्डेड भाषण सभेच्या
ठिकाणी दाखवलं जायचं. 2012 च्या दसरा मेळाव्यात त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे
अखेरचं मार्गदर्शन ठरलं. या मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचं रेकॉर्डेड भाषण दाखवण्यात
आलं होतं. या भाषणाने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांचं डोळे पाणावले. "मला
सांभाळलत, उद्धव आणि आदित्यलाही सांभाळा" शिवसेनाप्रमुखांचे हे शब्द ऐकून
सगळी सभा निस्तब्ध झाली. अंगार चेतवणा-या शिवसेनाप्रमुखांचे हे शब्द नेहमीचे
नव्हते. शिवसेनाप्रमुखांना ओळखणा-या शिवसैनिकांना त्यांची ठाकरी भाषा माहित होती.
आणि हे शब्द त्यांच्या ठाकरी भाषेतले नव्हते. ही वेगळी भाषा ऐकून शिवसैनिकांच्या
काळजाच्या ठिक-या उडाल्या होत्या.
यंदाही
दस-याच्या दिवशी मुंबई भगव्या ध्वजांनी सजेल. मात्र मुंबईतल्या कलानगरमध्ये असणारा
शिवसैनिकांचा विठ्ठल शिवसैनिकांना दिसणार नाही. कारण तिथल्या देव्हा-यातला देव
इहलोकीच्या यात्रेला गेला आहे. या जगात शाश्वत असं काहीच नाही. त्याला कुणीच
अपवादही नाही. मात्र सगळ्यांच्याच मनात एकाच नेत्याच्या आठवणीचा स्मृतीगंध दरवळत
रहावा असा एक अपवाद आहे, आणि तो अपवाद म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा