शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

स्मृती एका झंझावाताच्या…

शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱया परळ येथील के.ई.एम. रूग्णालयात शिक्षण आणि वैदय़कीय सेवा देणारे डॉ. रवी बापट संघटना ते राजकारण हा मराठी माणसाच्या भल्याचा कैवार घेणाऱया पक्षाचा प्रवास अन् बाळासाहेबांचा करिष्मा अगदी सहजपणे उलगडून दाखवतात.  शब्दांकन- निलेश अहिरे

2000 साली कम्युनिस्ट चळवळीतला असूनही शिवसैनिकांनी अगदी आग्रह करून माझ्या हस्ते शिवसेनेच्या परळ शाखेचे उद्घाटन करून घेतले. त्यानंतर बाळासाहेब नेहमी म्हणायचे हा बापट आपल्या शिवसैनिकांवर उपचार करतो, त्यांची मदत करतो, आपल्या कार्यक्रमांत सहभागी होतो, मग आपल्याकडे येत का नाही?
तो काळंच अत्यंत भारावलेला होता… आताची बंद दाराआड राहून मूग गिळून गप्प बसणाऱयांची संस्कृती तेव्हा नव्हती… अन्याय, अत्याचाराविरूद्ध आवाज उठवणारी… आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पेटून उठणारी… चळवळ  करणारी पिढी त्याकाळी महाराष्ट्राच्या घराघरांत वाढत होती… आपल्या प्राणांची बाजी लावून मुंबईसह `संयुक्त महाराष्ट्रा’चे स्वप्न साकार करण्यात या पिढीचा फार मोलाचा वाटा आहे.
 मुंबईसह `संयुक्त महाराष्ट्र’ लढय़ाच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र अक्षरश: पेटलेला होता. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट, प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी आणि कॉंग्रेसेतरांनी मिळून `संयुक्त महाराष्ट्रा’चा लढा हाती घेतला होता. सेनापती बापट, एस.एम. जोशी, प्र.के. अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमरशेख आणि प्रबोधनकार ठाकरे असे मातब्बर नेते या लढय़ाचे विविध टप्प्यावर नेतृत्व करत होते. चळवळीच्या माध्यमातून सत्ताधाऱयांना कडवी झुंज देऊन चारी मुंडय़ा चीत केल्यानंतर अखेर 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचा `मंगलकलश’ मराठी बांधवांच्या हाती आला. `संयुक्त महाराष्ट्र समिती’चे उद्दीष्टय़ पूर्ण झाले होते. काळ हळुहळू पुढे सरकत होता…
 सन 1957 मध्ये मी मध्य प्रांतातून मुंबईत शिक्षणाच्या निमित्ताने दाखल झालो होतो व पुढे डॉक्टर झाल्यानंतर 1959 मध्ये परळच्या के.ई.एम. हॉस्पिटल व जी.एस. मेडिकल कॉलेजात रूजू झालो. शिवसेनेची चळवळ जिथे फोफावली, वाढली त्याचा केंद्रबिंदू परळ, लालबाग असल्याने मला हा सारा अनुभव अत्यंत जवळून घेता आला.
मराठी बहुभाषिकांचे राज्य अस्तित्त्वात आले होते खरे, पण या राज्यात मराठी लोकांसाठी, खासकरून तरूणांसाठी कुठलाही ठोस व कृतिशिल कार्यक्रम राबवला जात नव्हता. राज्यात कॉंग्रेस सोडल्यास कामगारांच्या हक्कांसाठी झगडत कारखानदार आणि सत्ताधाऱयांना जेरीस आणणारा कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षच काय तो संघटीतपणे कार्यरत होता, परंतु हे पक्षही तरूणांना दिशा देण्यात कमी पडत होते. मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्र समितीची सत्ता होती. त्यात कम्युनिस्ट आणि समाजवादी हे घटक पक्षही होते, मात्र एकमेकांच्या उखाळय़ा पाखाळय़ा काढण्यातच हे पक्ष मश्गुल असल्याने तरूणांच्या प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते. तरूणांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यातली अस्वस्थता दिवसागणिक वाढत होती.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अवघ्या तीनच महिन्यात सुरू झालेल्या `मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकामधून व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी समाजातली अन् तरूणांच्या मनातली हीच अस्वस्थता टिपायला सुरूवात केली. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱयातून मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम बाळ ठाकरे करत होते. त्याला लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला लागला. त्यांच्या भोवती मराठी तरूणांची गर्दी जमायला लागली होती. मराठीच्या मुद्दय़ावर भूमिपुत्रांठी कायमस्वरूपी लढणारी एखादी संघटना असावी असा विचार पुढे येऊ लागला. बाळासाहेंबाकडे धमक होती, नेतृत्व करण्याची क्षमता होती, तरूणांना आकर्षित करणारी आणि त्यांच्यात जोश फुंकणारी ज्वलजहाल वाणी होती तसेच व्यंगचित्रकार असल्याने समाजातले-राजकारणातले व्यंग अचूकपणे टिपण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे होते.
मराठी बांधवांच्या असंतोषाचा ज्वालामुखी आतल्या आत धगधगत होता, त्याला येनकेन प्रकारे बाहेर पडायचेच होते… महाराष्ट्राच्या राजकीय आसमंतात एकप्रकारची पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी कोणाला तरी भरून काढायचीच होती… त्यासाठी हिच वेळ योग्य होती. मराठी बांधवांच्या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी अन् कम्युनिस्ट पक्षाला मुळापासून उखडून काढण्यासाठी सत्ताधारी पक्ष तसेच काही अदृष्य शक्तींनी एकत्र येऊन चळवळीला सुरूवात करून दिली. चळवळीचा केंद्रबिंदू `मराठी माणूस’ ठरवण्यात आला व या चळवळीचे नेतृत्व अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती आले. चळवळीचे वारे जोरदारपणे वाहत होते. बाळासाहेबांनी बी.के. देसाई, माधव देशपांडे, श्याम देशमुख या शिलेदारांना हाताशी घेत नेतृत्वाची धुरा सांभाळली. आपल्या खणखणीत भाषणांद्वारे आणि `मार्मिक’मधल्या व्यंगचित्रांद्वारे बाळासाहेबांनी या वाऱयाला झंझावाताचे स्वरूप प्राप्त करून देत सत्ताधाऱयांना `फटकारे’ मारायला सुरूवात केली. बाळासाहेबांच्या मागे दिशाहीन असलेला तरूणवर्ग एकवटायला लागला…
पुढे शिवसेनेची स्थापना कशी झाली हा इतिहास तर सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु सांगण्याचा मुद्दा हा की, वर नमूद केलेल्या परिस्थितीने बाळासाहेबांसारख्या मनस्वी कलावंताला राजकारणात पडण्यास उदय़ुक्त केले. बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा लाभलेला होता. संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ त्यांनी स्वत: अनुभवली होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर समाजात आणि राजकारणात निर्माण झालेल्या अनागोंदीतील व्यंग त्यांना न दिसते तरच नवल.
बाळासाहेबांनी मराठी तरूणांची मोट बांधताना ते कुठल्या जाती -धर्माचे, कुठल्या आर्थिक स्तरातील आहे हे न बघता केवळ त्यांच्यातील तडफ, नेतृत्व करण्याची क्षमता आणि वत्कृत्व गुण हेरून त्यांना संघटनेत नेतृत्वाची संधी दिली. यातूनच डॉ. हेमचंद्र गुप्ते, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडीक यांच्यासारखे नेते उदयास आले. संघटनेला चेहरा प्राप्त करून देतानाच मराठी मनातली धुसमुस बाहेर काढण्यासाठी प्रबोधनकारांचे विचार आणि अत्र्यांसारख्या धारदार पण सामान्य लोकांना कळेल-भिडेल अशा भाषणशैलीचा वापर करत त्यांनी साऱया तरूणवर्गाला चेतवले, `हटाव लुंगी, बजाव पुंगी’ सारख्या घोषणा देत एकामागोमाग एक करत दक्षिणात्य, कम्युनिस्ट आणि शेटजींविरूद्ध आघाडय़ा उघडल्या.
ही सगळी धामधुम सुरू असताना मी मात्र कम्युनिस्ट चळवळीकडे ओढला गेलो होतो. विरूद्ध पार्टीतला असल्यामुळे सहाजिकच त्यावेळी शिवसैनिकांच्या रोषाचा मला सामना करावा लागायचा. मला आणि माझ्या सहकाऱयांना लाल माकडं म्हणूनही तेव्हा ते हिणवायचे. मारामाऱया, तोडाफोडीचे सत्र ऐन रंगात असताना बहुतेक जखमी शिवसैनिकांचे टोळकेच्या टोळके उपचारांसाठी के.ई.एम.मध्ये येऊन दाखल व्हायचे. डॉक्टर या नात्याने मीही त्यांच्यावर आत्मियतेने उपचार करायचो. यातूनच पुढे मी कम्युनिस्ट विचारसरणीचा असलो, तरी शिवसैनिकांच्या मनात माझ्याविषयी आदरभाव निर्माण होत गेला. त्यानंतर शिवसेनेचा कुठलाही साधा शिवसैनिक असो वा महत्वाच्या पदावरचा नेता त्याच्या उपचारासंबंधी सर्वात पहिला फोन मलाच यायचा…
केवळ हाणामाऱयांतून मराठी तरूणांच्या मनातली धग बाहेर काढण्यास शिवसेनेने वाट करून दिली म्हणून तरूणवर्ग शिवसेनेकडे आकर्षित झाला असे नव्हते, तर शिवसेनेने तरूणांच्या नोकरी-धंदय़ाचा प्रश्न उपस्थित करून `स्थानीय लोकाधिकार समिती’द्वारे हा प्रश्न सोडवण्याचा यशस्वी प्रयत्नही त्याकाळी केला होता. अनेक सुशिक्षीत तरूणांना `स्थानीय लोकाधिकार समिती’च्या माध्यमातून शिवसेनेने रिझर्व्हं बॅंक, एअर इंडिया, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा वगैरेंसारख्या ठिकाणी नोकऱया मिळवून दिल्या. विविध बॅंका आणि खाजगी आस्थापनांमध्ये मराठी तरूणांचा टक्का वाढवण्यात शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली होती. खेळाडूंना विशेषकरून कबड्डी/खो खो खेळणाऱयांना नोकऱया मिळवून देण्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. एवढेच नव्हे, तर अशिक्षीत-अकुशल तरूणांसाठी त्यांनी `वडापाव’च्या गाडय़ांचा अभिनव प्रयोगही राबवला.
फुकाचा राजकीय आणि सामाजिक विचार देत न बसता तरूणांना अर्थप्राप्ती करून देण्यावर बाळासाहेबांनी भर दिल्यामुळे शिवसेना मराठी कष्टकऱयांच्या घराघरांत शिरू शकली. जिथे मराठी तरूणांना हिणवले जायचे तिथेच बाळासाहेबांनी गिरणगावांतल्या मराठी माणसाला वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मग तो कुठल्याही व्यवसाय-धंदय़ातला असला, तरी बाळासाहेबांनी त्याला खंबीरपणे पाठिंबा दिला व पक्षासाठी त्यांचाही योग्य प्रकारे उपयोग करून घेतला. शिवसेनेने तरूणांच्या मनाचा इतका ठाव घेतला की, एकाच घरात वडील कॉ. डांगेंचे अनुयायी आणि मुले बाळासाहेबांचे; अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच ऋणानुबंध तयार झाला होता तो त्यांच्या पारदर्शी स्वभावामुळे. एखादी गोष्ट मनाला पटली की सामाजिक आणि राजकीय मतांची पर्वा न करता ते त्याला पाठिंबा देत. बोफोर्स घोटाळय़ात सापडलेल्या अमिताभलाही त्यांनी याचप्रकारे पाठिंबा दिला होता. शिवसैनिकांवर बाळासाहेब अतोनात प्रेम करायचे. त्यांच्या लहानसहान प्रश्नांमध्ये जातीने लक्ष दय़ायचे. खरं तर शिवसेना आणि शिवसैनिक यांना जोडणारा महत्वाचा दुवा एकमेव बाळासाहेबच होते. जुन्या पिढीतल्या शिवसैनिकांना `मातोश्री’ म्हणजे आपले माहेरच वाटायचे. बाळासाहेबांच्या बरोबरीनेच मीनाताई ठाकरे यांचा वाटाही मोलाचा होता. घरी आलेल्या शिवसैनिकांचे त्या अगदी मनापासून आगत-स्वागत करायच्या. त्यांची आपुलकीने चौकशी करायच्या. त्यांना काय हवे नको ते बघायच्या. बाळासाहेब आणि मीना वहिनींनी आपल्या तरल व मनस्वी स्वभावाच्या जोरावर असंख्य शिवसैनिकांत जिव्हाळय़ाचे नाते निर्माण केले होते. के.ई.एम.मध्ये कोणीही ओळखीची व्यक्ती ऍडमीट असेल तर त्या मला आवर्जून फोन करून पेशंटची काळजी घ्यायला सांगायच्या.
बाळासाहेबांच्या स्वभावातला मोकळेपणा मला अनुभवायला मिळाला तो त्यांच्यावर केलेल्या उपचारांदरम्यान. यांच काळात बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायची संधी मला मिळाली. साधारण 1983 मध्ये बाळासाहेब तब्बल पाच आठवडे आजारी होते. त्यांच्या आजारपणामुळे शिवसेनेतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हा शिवसेनेचे परळमधील नगरसेवक विजय गावकर माझ्याकडे आले व बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती देऊन त्यांना तपासणार का म्हणून मला विचारले. मी तात्काळ हो म्हटले व त्यांची इच्छा असेल, तर लगेच जाऊया म्हणालो. त्यानंतर मी बाळासाहेबांना तपासले, त्यांच्या आजाराचे निदान केले. एवढा मोठा नेता असूनही स्वत:च्या आजाराबाबत कुठलीही गुप्तता न पाळता त्यांनी मला अगदी खुल्लम खुल्ला सर्व माहिती दिली. उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांनी मला सहकुटुंब मातोश्रीवर पावभाजी खाण्याचे आमंत्रण दिले होते.
शिवसेनेचे नेते असोत वा ठाकरे कुटुंबियांतील कुठलीही व्यक्ती उपचारांसाठी अत्यंत विश्वासाने सर्वात प्रथम के.ई.एम. सारख्या महापालिका रूग्णालयात यायची. सामान्य लोक व राजकारणातल्या वरच्या स्तरातल्या माणसांमधली दरी कमी होण्यास यामुळे कुठेतरी मदत व्हायची. लोकांना ती आपल्यातलीच एक वाटायची. पंचतारांकित रूग्णालयांच्या आगमनानंतर मात्र हे चित्र बदलले आणि शिवसेनेच्या हाती सत्ता असूनही पुढे महापालिका रूग्णालयांना अवकळा आली.  
शिवसेनेने मराठी माणसाला आणि मराठी माणसाने शिवसेनेला नेहमीच आधार दिला. पण काळ बदलत होता… पूर्वी म्हणजेच 1966 ते 80 दरम्यानच्या काळात शिवसैनिक स्वत:च्या खिशातून पैसे काढून भिंती रंगवत असत. 1980 मध्ये मुंबई महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर पायी चालणारा शिवसेनेचा नेता गाडय़ांमधून फिरू लागला. 1995 नंतर त्यांच्याकडे इम्पोर्टेड गाडय़ा आल्या. छोटय़ा छोटय़ा कामांसाठीही कार्यकर्ते हात पुढे करू लागले. यांतून नेत्यांमध्ये आणि सामान्य शिवसैनिकांमध्ये अंतर निर्माण झाले. मनातून दुखावला असला, तरी कडवट शिवसैनिक केवळ बाळासाहेबांच्या प्रेमाखातर शिवसेनेशी एकनिष्ठ राहीला होता. आता बाळासाहेब आपल्यात नाहीत…

हेच का ते बाळासाहेबांचे खरे ‘श्वास’ ?केतन बेटावदकर कल्याण दि. २५ जानेवारी (एलएनएन वेबमिडिया) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. एक असे उत्तुंग आणि असामान्य व्यक्तिमत्व. ज्यांच्या अफाट कर्तृत्वापुढे आतापर्यंत भले भले नतमस्तक होवून गेले. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे या नावाची जादू केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळाली आणि मिळत आहे. ‘शिवसेना’ नावाच्या बलाढ्य ताकदीच्या कायम केंद्रस्थानी राहूनही साहेबांनी नेहमी ‘शिवसेने’तील सामान्य कार्यकर्त्यालाच बळ देत मोठे केले. आपल्या हयातीमध्ये साहेबांनी कधीही ना या केंद्रस्थानाला महत्व दिले ना सत्तेला. पक्ष स्थापनेपासून ते आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांनी फक्त आपल्या लाडक्या शिवसैनिकाला, सामान्य कार्यकर्त्यालाच आपली ताकद आणि संपत्ती मानत अक्षरशः फुलासारखे जपले. त्यामुळेच तर शिवसैनिक त्यांना आपले दैवत आणि ते शिवसैनिकांना आपला श्वास समजत. परंतु बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त कल्याणात आयोजीत करण्यात आलेला ‘बाळासाहेब ठाकरे स्मारका’च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, ज्याप्रकारे संपन्न झाला, तो पाहता हेच का ते बाळासाहेबांचे खरे ‘श्वास’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब म्हणजे शिवसेनेचे कुटुंबप्रमुख. त्यांना जेवढी काळजी शिवसेना नेत्यांची तेवढी काळजी सामान्य शिवसैनिकांची. बाळासाहेबांचे आतापर्यंत झालेले कोणतेही भाषण हे ‘शिवसैनिकां’च्या उल्लेखाशिवाय पूर्ण झाले नाही. साहेब नेहमीच आपल्या सैनिकांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवायचे. यामुळे अनेक शिवसैनिकांची आणि त्यांची नाळ जुळली ती कायमचीच. बाळासाहेबांनी मतांसाठी आपल्या तत्वाला कधीच तिलांजली दिली नाही. सत्ता आणुन दिली पण तिला शिवलेसुद्धा नाही. ‘पोटात आणी ओठात एकच’ असणारे शिवसेनाप्रमुख चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगांमध्ये नेहमीच शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राज्याच्या विधानसभेवर भगवा फडकल्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये साहेबांनी “ या विजयाचे मानकरी तुम्ही आहात आणि म्हणूनच ज्या वेळेला हे ऋण फेडेन तेव्हा फेडेन, पण आज मी तुमचा अत्यंत उत्तरदायी आहे. फार मोठा ऋणी आहे” असे सांगत चक्क साष्टांग नमस्कार घातला होता. शिस्त आणि अवघ्या समाजासाठी आपले आयुष्य झोकून देणारा शिवसैनिक प्रमाण मानूनच बाळासाहेबांनी सेनेला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच तर ते नेहमी म्हणत, “मी सर्वांना सांगतो शिवसैनिक हे माझं सर्वस्व आहे, शिवसैनिक हे आपलं भांडवल आहे. ते आहेत म्हणून तुम्ही आहात, मी आहे’. असे हातचे काहीही राखून न ठेवता बाळासाहेबांनी ज्यांच्यावर एवढे अतोनात प्रेम केले, त्यांच्याकडूनच आपल्याला अशी सामान्य दर्जाची वागणूक मिळेल असा विचारही बाळासाहेबांनी कधी केला नसेल. ज्या व्यक्तीमुळे आणि त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेमुळे आज आपण सत्तेची फळे उपभोगत आहोत, समाजामध्ये मानमुरातब मिळवत आहोत, आपल्या पदांचा टेंभा मिरवत आहोत, त्यांच्या उत्तुंग कार्याची जाण ठेवण्याची अपेक्षा शिवसैनिकांकडून नाही करायची तर कोणाकडून? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा म्हटल्यावर तो ‘त्या’ नावाला साजेसा होणे अपेक्षित होते. मात्र कोणत्याही प्रकारची वाच्यता न करता आणि घाईघाईने हा सोहळा का उरकला गेला? एरव्ही रस्ते-पायवाटांचे भूमिपूजन समारंभही मोठ्या थाटामाटात आणि गाजावाजात करणाऱ्यांना, बाळासाहेबांच्या स्मारकाचा सोहळा एवढ्या छोटेखानी पद्धतीने का करावासा वाटला? या प्रश्नांची उत्तर मिळणे आवश्यक आहे. त्याहून गंभीर म्हणजे या भूमिपूजन सोहळ्याकडे सेनेच्या बहुतांश आणि वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवकांनी फिरवलेली पाठ. जी व्यक्ती आपल्या उभ्या हयातीमध्ये सुखा-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहिली, तिच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला अनुपस्थित राहून आपण नेमकी कोणती ‘कृतज्ञता’ व्यक्त केली याचे भानही संबंधिताना न उरावे. हे बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

अखेरचा हा तुला दंडवत…

सकाळी 7 पासून
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेल्याची बातमी शनिवारी संध्याकाळी शिवसैनिकांना समजली आणि केवळ मुंबईतूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपर्यातून शिवसैनिकांचे तांडेच्या तांडे वांद्रे कलानगर येथील मातोश्री बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. रविवारी सकाळी 7 वाजता बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कला नेण्यात येणार होते. परंतु आपल्या देवाचे अखेरचे `दर्शनघेण्यासाठी शनिवारची अख्खी रात्र हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर जागून काढली. सकाळचा सूर्य उगवण्याआधी लाखो शिवसैनिक कलानगर परिसरात दाखल झाले होते, ते आपल्या लाडक्या दैवताला अखेरचा दंडवत घालण्यासाठीपोलिसांनी वारंवार विनंत्या करूनही शिवसैनिक मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे अंत्ययात्रेला दोन तास उशिराने म्हणजे 9 वाजता सुरूवात झाली. ठाकरे कुटुंबियांपैकी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सर्वप्रथम बंगल्याबाहेर पडले आणि ज्या फुलांनी सजवलेल्या रथावर बाळासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात येणार होता, त्याच्याजवळ येऊन उभे राहिले. शिवसेनेच्या वाघाचे पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचे हात उंचावून अभिवादन करतानाचे पोस्टर या रथावर लावण्यात आले होते. मराठा मावळ्याच्या वेषातील शिवसैनिक हातात भगवा ध्वज फडकवत होता. नऊच्या सुमारास बाळासाहेबांचे पार्थिव मातोश्रीबाहेर आणण्यात आले. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांच्यासह तमाम शिवसेना नेते लाडक्या साहेबांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी तिथे होते. याठिकाणी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी जमल्याने थोडा काळ गोंधळाची आणि धक्काबुक्कीची स्थिती निर्माण झाली. बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने पोलिसांनी सर्वप्रथम त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर तिरंगी झेंडय़ामध्ये लपेटलेला बाळासाहेबांचे पार्थिव पोलिसांनीच फुलांनी सजवलेल्या रथावर आणून ठेवला. सुमारे साडेनऊच्या सुमारास प्रत्यक्ष महाअंत्ययात्रेला सुरूवात झाली. बाळासाहेबांचे पार्थिव असलेल्या रथावर शिवसेनेचे यच्चयावत नेते उपस्थित होते. साहेबांच्या पार्थिवाशेजारी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला देखील उभ्या होत्या. गेली कित्येक वर्षे बाळासाहेबांची अत्यंत निष्ठेने त्यांची सेवा करणारे नेपाळी अंगरक्षक चंपासिंग थापा हे हातात गुलाबपुष्प घेऊन साहेबांच्या पार्थिवाला तन्मयतेने वारा घालत होते. उपस्थित शिवसैनिकांनी ठाकरे कुटुंबीय अभिवादन करत होते. राज ठाकरे मात्र या रथावर चढले नाहीत, त्याऐवजी त्यांनी पायी चालणे पसंत केले. मातोश्रीच्या बाहेर कलानगर जंक्शनजवळ शिवसैनिकांची एवढी तोबा गर्दी उसळली होती की, मुंगी शिरायलाही रस्त्यावर जागा नव्हती. अगदी समोरच्या उड्डाणपुलावर तसेच स्कायवॉकवरही राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी कब्जा केला होता. अगदी मुंगीच्या पावलांनी महाअंत्ययात्रा माहीमच्या दिशेने सरकायला सुरूवात झाली.     (प्रकाश सावंत)

उसळला जनसागर

स्थळ ः शिवसेना भवन
वेळ ः सकाळी 7 ते संध्या. 4
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त महाराष्ट्रभर पसरताच त्यांच्या अंत्यदर्शनसाठी चहात्यांनी मुंबईकडे धाव घेतली. अंत्यदर्शनासाठी बाळासाहेबांचा पार्थिव शिवाजी पार्क येथे ठेवण्यात येणार असे शिवसैनिकांच्या कानी पडले. परंतु शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनास अडचण निर्माण होऊ शकते हे लक्षात घेता सेना भवनाजवळच साहेबांचे दर्शन घ्यावयाचे असा निर्णय असंख्य चहात्यांनी घेतला. त्यामुळे आज सकाळी 7 वाजल्यापासून चहात्यांनी सेनाभवन जवळ एकच गर्दी केली होती आणि ती म्हणजे साहेबांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी.
गेली चाळीस वर्षे मराठी माणसांच्या हद्यात घर करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त शनिवारी काही वेळेतच महाराष्ट्रभर पसरले. रविवारी सकाळी 7.30 वा. मातोश्रीवरुन साहेबांची अंत्ययात्रा निघणार असून 10 वाजेपर्यंत शिवाजी पार्क येथे पोहचणार असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. मात्र शिवाजी पार्क येथे पार्थिव नेण्यापूर्वी काही वेळेसाठी सेनाभवनाजवळ पार्थिव ठेवण्यात येणार असल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागली. परंतु मातोश्रीवरुन साहेबांची अत्ंययात्राच सकाळी नऊ वाजता निघाली. त्यामुळे शिवाजी पार्क येथे साहेबांचा पार्थिव पोहचण्यास दुपारचे तीन चार वाजणार याचा अंदाज शिवसैनिकांनी घेतला. त्यामुळे सेनाभवन जवळ पार्थिव आल्यावर साहेबांचे अंत्यदर्शन घ्यावा, असा निर्णय असंख्य चहात्यांनी घेतला.
बाळासाहेबांच्या अंतिम दर्शनासाठी रविवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच सेनाभवनजवळ शिवसैनिकांसह साहेबांना मनापासून मानणार्या लोकांनीही एकच गर्दी केली होती. सेनाभवना समोर कोहिनूर स्कॅवेअर या नवीन टॉवरचे बांधकाम सुरु आहे. परंतु आज या टॉवरचे बांधकाम पूर्णतः बंद होते. याच गोष्टीचा फायदा घेत साहेबांच्या चहात्यांनी टॉवरच्या पहिल्या ते तिसर्या मजल्यावर धाव घेतली. यामागे शिवसैनिकांचा एकच उद्देश साहेबांचे अंतिम दर्शन योग्य प्रकारे व्हावे.
मुंबईसह महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त पसरताच चहात्यांनी अंत्यदर्शनसाठी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांची एक झलक पहाण्यासाठी असंख्य शिवसैनिक रविवार सकाळपासूनच सेनाभवना जवळ ठाण मांडून बसल्याचे नजरेस पडले. सेनाभवन परिसरात जागा मिळेल तेथे शिवसैनिकांनी आपले बस्तान मांडले होते. सेना भवनाची भिती, सेना भवनाला लागून असलेल्या इमारती, झाडे , दुकाने आदी ठिकाणच्या जागेचा ताबा शिवसैनिकांनी घेतलेला दिसत होता. ताबा घेण्यामागे शिवसैनिकांचा एकच उद्देश  असल्याचे स्पष्ट होत होते ते म्हणजे साहेबांचे शेवटचे अंत्यदर्शन व्यवस्थित व्हावे.
सकाळपासून साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी  उभे असणार्या शिवसैनिकांचा आवाज अचानक फुटला आणि एक घोषणा सुरु झाली. बाळासाहेब `अमरे रहे’  `साहेब आपण परत या’ `कोण आला कोण आला शिवसेनेचा वाध आला’ या घोषणांनी सेना भवन परिसर दणाणून उठला. आणि सकाळपासून साहेबांच्या अंत्यदर्शनाची प्रतिक्षा करणार्या शिवसैनिकांची इच्छा पूर्ण झाल्याचा एक वेगळा अनुभव शिवसैनिकांच्या चेहर्यावर बघायला मिळला.    (गिरीश चित्रे)
…साहेब आले, पण बोलले नाहीत
स्थळ ः शिवाजी पार्क
वेळ ः सकाळी 7 ते संध्या. 7
गेल्या कित्येक वर्षांपासून दादरच्या शिवाजीपार्क मैदानावर शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली असेल ती नेहमी दसरा मेळावा साजरा करण्यासाठी. वेळेआधी पार्कात यायचे आणि सर्वात पुढची जागा पकडायची. उन्हातान्हात तासंतास बसून वाट पाहायची. कारण तेव्हा त्यांचे लाडके बाळासाहेब पार्कात येऊन त्यांना मार्गदर्शन करायला येणार असायचे. मात्र आजचा माहोल काही वेगळाच होता. आजही शिवसैनिकांनी हजेरी लावली. सर्वात पुढची जागा पकडली. कारण आजही त्यांचे `साहेब’ येणार होते. फरक फक्त इतकाच होता की आज साहेब काही बोलणार नव्हते, आज ते त्यांच्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार नव्हते. तर आज फक्त साहेबांना ते पाहणार होते. ते देखील अखेरचे.
1966 सालापासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कमध्ये सुरवात झाली. ज्याला वर्षानुवर्षे हे शिवसैनिक अत्यंत आनंदाने आणि जोषाने साजरा करत आहे. दरवर्षी घोषणा आणि जयघोषांमध्ये शिवाजीपार्कमध्ये शिवसैनीक प्रवेश करत. आजही दादरपासून ते शिवाजीपार्क पर्यंतच्या रस्त्यांवर `अरे आवाज कुणाचा, शिवसेनेचा’ `बाळासाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा ऐकायला मिळत होत्या. मात्र या घोषणांमध्ये नव्याने भर झालेली ती `जब तक सुरज चाँद रहेगा, बाळासाहब आपका नाम रहेगा’, `परत या परत या, बाळासाहेब परत या’ , `बाळासाहेब अमर रहे’ या घोषणांचा. मुंबईसह नागपूर, सोलापूर, धुळे, अहमदनगर, अमरावती, बीड, कोल्हापूर, नाशीक अशा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून शिवसैनिक आज पहाटेपासूनच पार्कात जमा झाले होते. कुणी 86 मिटरचा भगवा झेंडाच पार्कात आणि पार्काच्या बाहेर फिरवत होते. शिवसैनीकांनाच आपले कुटुंब मानणार्या बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपले भाऊबंद शिवसैनिक वेगवेगळ्या शहरातून आलेत, ते लांबचा प्रवास करुन आलेत. तसेस हॉटल्स आणि दुकाने बंद असल्याने त्यांची उपासमार होणार याची जाणीव असल्याने दुखःच्या या क्षणी देखील ठिकठिकाणी दादरमधील शिवसैनिकांनी चहा, कांदेपोह्यांचे वाटप सुरु केले होते. तर कुठे पाण्याचेही टँकर उभे करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर पार्कामध्येही पाण्याच्या बाटल्या पुरविण्याचे काम हे शिवसैनिक करत होते. बाळासाहेबांचा अंत्यविधी शिवाजीपार्कमध्ये करण्यात येणार असल्याने त्याची सर्व योजना ही कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केले होते.
आज बोचणार्या उन्हाचे चटके त्यांना जाणवत नव्हते कारण `साहेब’ गेल्याच्या बातमीने त्यांच्या मनाला लागलेल्या चटक्याचे दुखणे हे अधिक होते. पार्कात सतत `हरे रामा, हरे कृष्णा’ चा मंत्रजाप सुरु होता. पार्कात येणार्या गर्दीला मुंबई पोलिसाही अत्यंत हुशारीने नियंत्रणात आणत होते. तसेच सेनेच्या मोठय़ा पदाधिकार्यांकडूनही योग्य ते सहकार्य पोलिसांना मिळाले होते. साहेबांची वाट पाहणार्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेची माहिती वारंवार घोषणा करुन दिली जात होती. त्यामुळे प्रत्येकाच्या ह्दयाचे ठोके वाढले होते. गेल्या दसरा मेळाव्याला बाळासाहेबांनी `व्हीडीओ कॉन्फरसींग’ द्वारे शिवसैनिकांशी संपर्क साधला होता. थकलेला आवाजही या मावळ्यांना दिलासा देऊन गेला. मात्र आज साहेबांना या अवस्थेत पाहणे खर्या अर्थाने त्यांच्यासाठी फार मोठे आव्हान होते. ज्याला पेलण्याची हिंमत त्यांना परमेश्वराने द्यावी, अशी प्रार्थनाही ते मनोमन करताना दिसत होते. अखेर बाळासाहेबांचे पार्थीव या परिसरात दाखल झाले आणि सर्वांच्याच अश्रूंचा तो बांध कधी फुटला हे त्यांनाही समजले नाही.
(गौरी टेंबकर)