शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

वादातले वादळ..

बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.’ किंवा ‘तुम्ही दाऊदला पोसत असाल, दाऊद तुम्हाला तुमचा वाटत असेल, तर मग अरुण गवळी आमचा आहे’, असे बेधडकपणे सांगण्याचे धैर्य फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच दाखवू शकत होते. बाळासाहेब ठाकरे म्हणजे घोंगावणारे वादळ होते. या वादळाच्या भोव-यात अनेक जण सापडले. समाजातील काही व्यक्तींबद्दल कुणी बोलण्याचे धाडस करीत नसे. कधी भीतीने तर कधी आदरयुक्त धाकाने त्यांच्या वाट्याला जाण्याचे लोक टाळत. परंतु अशी माणसंही शिवसेनाप्रमुखांच्या कचाट्यातून सुटली नाहीत. आचार्य अत्रेंपासून ते पु. ल. देशपांडेपर्यंत आणि वसंत बापटांपासून ते सुरेश भटांपर्यंत समाजमान्य साहित्यिकांशीही हे वादळ भिडले. अगदी अलीकडचे उदाहरण सांगायचे तर अण्णा हजारेंविरोधात बोलणे म्हणजे महाभयंकर पाप, असे वातावरण असताना शिवसेनाप्रमुखांनी त्यांनाही खडे बोल सुनावले. अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचे तात्त्विक वाद झाले तरी त्यांनी कायम वैरभाव मात्र ठेवला नाही.
सत्तेची पदे हात जोडून पुढे उभी राहिली तरी त्याचा मोह झाला नाही. परंतु सत्ता नाही म्हणून त्यांचा रुबाब, शब्दातील धार आणि दरारा कधी कमी झाला नाही. केवळ व्यंगचित्रकार म्हणून नोकरी करताना जो स्वाभिमान होता, तीच रग आणि शब्दातील धग राज्यातील सत्तेचे प्रमुख असतानाही होती. सत्ता गेली तरी त्यात कोणताही बदल झाला नाही. एखादी भूमिका घेतली की, मग त्यातून राजकीय आणि वैयक्तिक हित-अहिताचा विचार कधी झाला नाही. एक पक्ष आणि एक नेता, असे राजकारणातील हे दुर्मीळ रसायन होते. त्यांनी वेळोवेळी अनेक वादग्रस्त भूमिका घेतल्या. एकदा घेतलेल्या भूमिकेपासून ते कधी हटले नाही. पाकिस्तान आमच्या देशात हिंसाचार करत असताना त्यांच्या क्रिकेटपटूंना आणि कलाकारांना भारतात पाय ठेवू देणार नाही, ही त्यांनी घेतलेली भूमिका केवळ भारतातच नव्हे तर जगात चर्चेचा विषय ठरली. त्यामुळेच ते अखेरपर्यंत पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर होते.
समाजातील अनेक मान्यवर, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार यांच्याशीही शिवसेनाप्रमुखांचे वाद झाले. एकदा शब्द निघून गेला की, त्याच्या परिणामाची तमा त्यांनी केली नाही. त्यांचा पहिलाच वाद गाजला तो आचार्य अत्रे यांच्यासोबत. खरं तर अत्रे आणि शिवसेनाप्रमुखांचे, प्रबोधनकारांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. शिवसेनाप्रमुखांची काही व्यंगचित्रेही ‘मराठा’मध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र, पुढे या दोन महान कलाकारांत ठिणगी पडली आणि मोठय़ा वादाला तोंड फुटले. आज त्या वादाची चर्चा जुन्या साहित्यिक पत्रकारांकडून ऐकायला मिळते. खरे तर अत्रे म्हणजे अंगार होते. त्यांच्या वाटय़ाला शक्यतो कुणी जात नसे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनाही भिडले. त्यावेळी शिवसेनेची स्थापनाही झालेली नव्हती. ‘मार्मिक’ची नुकतीच सुरुवात झाली. हा वाद वैयक्तिक स्वरूपात सुरू झाला आणि पुढे त्याला राजकीय रंग चढला. या वादाबद्दल सांगताना प्रबोधनकार ठाकरे यांचे त्यावेळचे लेखनिक आणि सध्या ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक असलेले पंढरीनाथ सावंत म्हणाले, ‘‘तो वाद अगदी किरकोळ कारणाने सुरू झाला आणि पुढे तो वाढत गेला. ‘मार्मिक’मध्ये दं. भा. खांबेटे नावाचे त्यावेळचे प्रसिद्ध विनोदी लेखक होते. त्यांना अध्यात्माची आवड होती. आचार्य अत्रे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते. खांबेटे यांची ‘बेलनाथबाबा’ नावाच्या एका महाराजांवर श्रद्धा होती. ते बाबा मुंबईत आले असताना खांबेटे त्यांना घेऊन अत्रे यांच्याकडे गेले. मात्र बुवा-बाबांवर विश्वास नसणा-या अत्रे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब खांबेटे यांना खटकली. त्याच रागातून खांबेटे यांनी अत्रे यांच्या विरोधात एक लेख लिहिला.’’
अत्रे म्हणजे आग्यामोहोळच होते. त्यांनी ‘मार्मिक’मध्ये त्या आलेल्या लेखांचा राग मनात धरून थेट प्रबोधनकार ठाकरे यांच्या विरोधात चौकट छापली. त्यात प्रबोधनकारांवर वैयक्तिक टीका केलेली होती. त्याला थेट प्रबोधनकार यांनीच ‘मार्मिक’मधून उत्तर दिले. ‘मार्मिक’ विरुद्ध ‘मराठा’ असा ‘सामना’ रंगला. त्यावेळी आचार्य अत्रेंचे व्यंगचित्र काढून शिवसेनाप्रमुखांनी त्याला ‘वरळीचे डुक्कर’ असे शीर्षक दिले. पुढे हा वाद सार्वजनिक जीवनातही राहिला. चीन-भारताचे युद्ध सुरू असताना प्र. के. अत्रे, कॉ. एस. ए. डांगे, एस. एम. जोशी या समाजवादी मंडळींनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. चीनचे युद्ध सुरू असताना, देश संकटात असताना बंद पुकारू नये, अशी भूमिका बाळासाहेबांनी मांडली होती. त्यासाठी बाळासाहेबांनी एक व्यंगचित्र काढले. ‘त्यात भारत माता डोळे पुसत आहे आणि भारताचा नकाशा भयभीत झाला आहे,’ असे चित्र काढले. त्याच्या बाजूला अत्रे, डांगे, जोशी यांचे चित्र काढून बाजूला लिहिले, ‘भारत मातेचे तीन दलाल’. त्यावेळी कम्युनिस्टांची मुंबईवर हुकूमत होती. हे व्यंगचित्र प्रसिद्ध होताच ‘मार्मिक’च्या अंकाची होळी झाली. बाळासाहेब घरी नसताना त्यांच्या घरावर हल्ला झाला. दगड-धोंडय़ाबरोबरच चपलाही घरावर भिरकावल्या. त्यावेळी प्रबोधनकार एकटेच घरात होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून हल्ला परतवला. बाळासाहेब परतले तेव्हा दारात आणि घरात पडलेले अनेक दगड-धोंडे पाहिले. प्रबोधनकारांनी सर्व हकिगत त्यांना सांगितली. लोकांनी भिरकावलेले दोन बूटही घरात पडले होते. शिवसेनाप्रमुखांनी दुस-या आठवडय़ात चित्र काढले. घराच्या फुटलेल्या काचेतून दोन बूट पडले आहेत. त्यांना नावे दिली डांगे आणि अत्रे. या वादाचे अनेक किस्से आहेत.
इतका पराकोटीचा वाद झाला तरी शिवसेनाप्रमुखांनी त्याबाबतचा राग कायम ठेवला नाही. अत्रे यांच्याबद्दल त्यांना कायम आदर वाटत आला. इतकेच नव्हे तर पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेला पुण्याकडच्या बाजूंनी अत्रेंचे नाव द्यावे आणि मुंबईकडच्या बाजूने पु. ल. देशपांडे यांचे नाव द्यावे, असा त्यांचा मानस होता. यावरून ते कायम कुणाचा दु:स्वास करीत नसत हे दिसून येते.
ज्या पु. ल. देशपांडे यांचे नाव एक्स्प्रेस हायवेला देण्यासाठी शिवसेनाप्रमुख कायम आग्रही होते, त्यांच्यासोबतही शिवसेनाप्रमुखांची चकमक झडली होती. मात्र ती अढीही कायमची राहिली नाही. तर पु. ल. पुढे आजारी असताना शिवसेनाप्रमुख पुण्याला त्यांच्या घरी गेले. पायावर डोके ठेवून नमस्कार केला आणि मी तुमचा फॅन असल्याचे सांगितले.
या वादाची सुरुवातही मोठी गमतीशीर आहे. राज्य सरकारने नाटकाच्या तिकिटावरील कर कमी केला होता. तरीही नाटय़संस्थांनी तिकिटाचे दर कमी केले नव्हते. हे तिकिटाचे दर कमी न करण्याचे कारण नाटय़ कलाकारांचे वाढते मानधन आहे, त्यामुळे तिकिटाचे दर कमी करण्याची अपेक्षा ठेवू नये, असे सांगत पुलंनी मराठी माणसांवर टीका केली होती. बाळासाहेबांना ही टीका झोंबली आणि त्यांनी खरमरीत अग्रलेख लिहून पुलंची हजेरी घेतली. त्यात त्यांनी नाटय़संस्था किती पैसे कमावतात, कलाकारांना कसे राबवून घेतात, याचा संपूर्ण हिशेबच मांडला होता. पुलंशी युतीचे सरकार असतानाही बाळासाहेबांची चकमक झडली. दादर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष होते, कवी वसंत बापट. युती सरकारने या संमेलनासाठी अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद केली होती. मात्र त्याच वेळी राजकीय व्यक्ती संमेलनाच्या व्यासपीठावर असावी की नसावी, असा वाद उफाळून आला. राजकीय व्यक्तींनी विनाकारण साहित्य संमेलनात घुटमळू नये, अशी भूमिका संमेलनाध्यक्ष वसंत बापट यांनी मांडली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यासपीठावर येऊ नये, असा त्यांचा सूर होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी अत्यंत रोखठोक बजावले होते- ‘राजकीय व्यक्तींचे पैसे चालतात, मग ते का चालत नाहीत?’ त्यावर बापटांनी मी सरकारच्या २५ लाखांवर थुंकतो, असे वक्तव्य केले होते. त्यातून हा वाद वाढत गेला. शिवसेनाप्रमुखांनी बापट यांचीही खरडपट्टी काढली. तेव्हा त्या वादात पुलंनीही उडी घेतली. तेव्हा त्यांच्यातही सामना रंगला. अभिनेते नाना पाटेकरही पुढे या वादात पडले. मात्र, बापट वगळले तर पुलं आणि नाना यांच्यासोबत बाळासाहेबांचे असलेले स्नेहाचे नाते पुढेही कायम राहिले.
छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली, तेव्हा कवी सुरेश भट यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात एक गझल लिहिली होती.
बेगुमान वरवंट्याचा जाहला अचानक पाटा।
हे हिंदुहृदयसम्राटा तो छगन तुज करी टाटा॥
मात्र त्याच सुरेश भटांनी पुढे शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. गझलसम्राट आणि हिंदुहृदयसम्राट यांच्यात झालेल्या त्या भेटीने दोघांचीही मने निर्मळ झाली आणि शिवसेनाप्रमुखांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मग सुरेश भटांनी दुसरी गझल लिहिली.
दे तुझ्या दिव्य तेजाचा अंगार आज देशाला।
दे तुझ्या दिव्य श्वासाचा हुंकार आज देशाला॥
साहित्यिकांबरोबरचे त्यांचे वाद जसे गाजले तसेच सिनेमांच्या काही कलाकृतींबद्दलही त्यांनी वाद ओढवून घेतले. पाकिस्तानी कलाकर सिनेमात घेतले म्हणून त्यांनी ‘हिना’ या चित्रपटाला विरोध केला होता, तर महिलांतील समलैंगिकता हा विषय असलेल्या ‘फायर’ या चित्रपटातील महिल कालाकारांची नावे हिंदू देवतांची असल्याने ठाकरेंनी चित्रपटाला केलेला विरोधही चांगलाच गाजला होता. शाहरुख खानसोबत उद्भवलेल्या वादातून ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता. आयपीएलच्या सामान्यात पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग असावा, असे मत शाहरुखने व्यक्त केले होते. त्यामुळे शिवसेनेने चित्रपट बंद पाडण्याचे पाऊल उचलले होते. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावर काँग्रेस सरकारने बंदी आणली तेव्हा मात्र शिवसेनेने या नाटकाचे समर्थन केले होते.
राजकीय वाद
साहित्यिक आणि कलाकृतींच्या वादाबरोबरच त्यांचे अनेक राजकीय वादही गाजले. शिवशाहीच्या काळात अण्णा हजारे यांनी युतीच्या भ्रष्ट नेत्यांविरोधात उपोषण सुरू केले. त्यावेळी अण्णा हजारेंची भ्रष्टाचारविरोधक इमेज तयार होत होती. त्यांच्या विरोधात कुणीही बोलत नव्हते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ म्हणून अण्णांची संभावना केली होती. अलीकडे रामलीला मैदानावर अण्णांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर त्यांच्याविरोधात बोलणे म्हणजे पाप समजले जात होते. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी अण्णांच्या भूमिकेला विरोध करण्याचे धाडस दाखविले होते.
शिवसैनिकांचा अभिमान
‘मंदिर वहीं बनायेंगे’चा नारा देत भाजपची रथयात्रा देशभर फिरली. भाजपच्या नेतृत्वाखाली कारसेवकांनी गावागावात शीलापूजन केले. परंतु ज्यावेळी बाबरी मशिदीचे पतन झाले, तेव्हा भाजपने जबाबदारी झटकली. बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिक असावेत, असा कयास काढण्यात आला. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेनाप्रमुखांनी एका क्षणाचाही विलंब न होऊ देता जाहीर करून टाकले, ‘बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान वाटतो.’ त्यांच्या या विधानामुळे पुढे त्यांच्यावर न्यायालयीन खटलाही दाखल झाला तरी त्यांनी आपले शब्द मागे घेतले नाहीत.
मुंबईत गँगवॉर उसळले होते. दररोज गँगवॉरमध्ये मराठी तरुणांचा बळी जात होता. या गँगवॉरमध्ये अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम यांच्या टोळ्या समोरासमोर भिडल्या होत्या. गवळी तुरुंगात होता तर दाऊद दुबईमध्ये. गँगवॉरमध्ये निष्पाप मराठी तरुण मारले जात होते. यामुळे शिवसेनाप्रमुख कमालीचे संतप्त झाले. सरकारच्या दबावाखाली पोलिस दाऊद गँगच्या गुंडांना पाठीशी घालत आहेत, असे चित्र होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी गँगवॉरवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश न आल्याने अनेक तरुणांचा बळी जात आहे. सरकार दाऊदला पाठीशी घालत आहे. तुमचा दाऊद असेल तर मग आमचा अरुण गवळी आहे, असे जाहीर केले. गवळीसारख्या अंडरवर्ल्ड डॉनची उघड पाठराखण करण्याची भूमिका घेण्याचे धाडस फक्त शिवसेनाप्रमुखच करू शकत होते. त्यांनी एकदा भूमिका जाहीर केल्यानंतर त्याबाबत कितीही वाद झाला तरी ते कधी आपल्या भूमिकेपासून मागे जात नसत. त्यामुळे त्यांच्या जीवनात कायम वादळे राहिली. वादातले हे वादळ आता कायमचे शांत झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा