मंगळवार, २० जानेवारी, २०१५

शिवसेना काल-आज-उद्या--श्री.मनोहर जोशी

हे पुस्तक शिवसेना या अफ़ाट संघटनेचे चरित्रलेखन आहे. हे पुस्तक आदरणीय़ श्री.मनोहर जोशी यांनी लिहीले आहे. श्री.सुभाष देसाई यांनी हे पुस्तक “प्रबोधन” या संस्थेकडून प्रकाशीत केले आहे. प्रबोधन गोरेगाव संस्थेने आजपर्यंत ’शतपैलु सावरकर’, ’समर्थ रामदास’ अशी अनेक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. दर्जेदार पुस्तकांच्या प्रकाशनातील एक महत्वाचे व मानाचे पाऊल म्हणजेच ’शिवसेना : काल – आज – उद्या’. सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्याची सुवर्णसंधी दिल्याबद्दल ’प्रबोधन गोरेगाव’ संस्था शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाध्यक्ष माननीय श्री. उद्धव ठाकरे व ह्या ऎतिहासिक ग्रंथाचे लेखक माननीय श्री. मनोहर जोशी यांची आभारी आहे.
शिवसेनेची स्थापना इ. स. १९६६ मध्ये (जून) झाली. १९६७ एप्रिलमध्ये माननीय श्री. मनोहर जोशी यांनी पक्षसंघटनेत प्रवेश केला. तेंव्हापासून आजपर्यंत ४० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेतील चढऊतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. शिवसेनाप्रमुखांचा सर्वश्रुत – सर्वमान्य करिश्मा तसेच शिवसेनेचा आजवरचा अथक प्रवास यांचे वर्णन म्हणजेच ’शिवसेना : काल – आज – उद्या’ पुस्तक. पुस्तकाचा उद्देश :- शिवसेनेची निर्मिती एका विशिष्ट परिस्थितीत झाली. शिवसेनेचा जन्म पक्ष म्हणून झाला नाही तर एक चळवळ म्हणून झाला. महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील मराठी भाषिकांचे ते एक आंदोलन होते. शिवसेना म्हणजेंच घटनांची रेलचेल. अनंत आंदोलने, अनेक मोर्चे, असंख्य जाहीर सभा, मेळावे. संयुक्‍त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय प्रवाह ज्या संघटनेमुळे निर्माण झाला त्या शिवसेनेची वाटचाल, जनतेचे लाभलेले समर्थन आणि मा. शिवसेनाप्रमुखांचे कणखर नेतृत्व लाभल्यामुळे शिवसेनेची चळवळ वाढली. चळवळीतून राजकीय पक्ष उभा राहत गेला ही गोष्ट खरी आहे. हे पुस्तक म्हणजे या सर्व घटनांचा मागोवा, जे घडले त्याचे वस्तुनिष्ठ दर्शन, ४२ वर्षांचा इतिहास – अगदी जसा घडला तसा. सदर पुस्तकासाठी माननीय मनोहर जोशी यांनी दीड वर्ष प्रचंड मेहनत घेतली. संदर्भ गोळा केले. प्रत्येक घटनेचा आधार शोधला. ह्या पुस्तकात शिवसेनेच्या आजवरच्या सर्व घडामोडींची माहिती वर्षा-वर्षाप्रमाणे केली आहे. स्वत: शिवसेनाप्रमुखांनी मानपत्रासारखी प्रस्तावना देऊन पुस्तकाचा गौरव केला आहे.
प्रकाशन सोहळा :-  सदर पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाच्या समयोचित समारंभात बुधवार, दिनांक २३ जानेवारी, २००८ रोजी झाले. सदर पुस्तकास साजेसा भव्यदिव्य प्रकाशन समारंभ गुरूवार, दि. २४ जानेवारी, २००८ रोजी सायंकाळी ६ वाजता रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न झाला. सदर प्रकाशन सोहळ्यास शिवसेनेच्या मान्यवरांनी आपली उपस्थिती लावून सदर पुस्तकास आपल्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना कर्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे, इतिहासकार श्री. बाबासाहेब पुरंदरे, भाजप राष्ट्रीय नेते श्री. गोपीनाथ मुंडे, साहित्यिक डॉ. राम शेवाळकर, कलावंत प्रभाकर पणशीकर, निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रबोधन गोरेगाव संस्था स्थापने पासून शिवसेनाप्रमुखांनी घालून दिलेल्या तत्वांवर वाटचाल करीत आहे. सदर भावनिक नात्यामुळेचं हा प्रकाशन समारंभ व हे पुस्तक प्रबोधन गोरेगाव संस्थेसाठी एक संस्मरणीय घटना म्हणून प्रबोधन गोरेगावच्या कायम आठवणीत राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा