बुधवार, १४ जानेवारी, २०१५

भाग १८ : बिनपैशांची निवडणूक

भाग १८ : बिनपैशांची निवडणूक
पेटी’, ‘खोका’ हे शब्द हल्ली अगदीच बापडे वाटतात; असा पैशांचा प्रचंड खेळ निवडणुकांच्या निमित्तानं अवतीभोवती पाहायला मिळतोय. अशा वातावरणात कुणी ‘बिनपैशाची’ निवडणूक असा शब्द जरी उच्चारला तरी खुळ्यातच काढतील. 
 
भल्या भल्या मंत्र्यांना लाजवेल असं साम्राज्य मुंबईल्या नगरसेवकाचं असतं. पण जीवलग दोस्तांनी गोळा केलेल्या पैशांतून, चाळीतल्या मावशी, आजींनी दिलेल्या हक्काच्या मतांवर नगरसेवक म्हणून निवडून येण्याचाही एक काळ होता. त्याचं उदाहरण म्हणजे १९६८ची मुंबई महापालिकेची निवडणूक.

गिरणगावातले कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक नारायण घागरे सांगतात, ‘ त्यावेळी पक्षाचा निवडणूक खर्च अत्यंत कमी असायचा. चाळीतल्याच लोकांकडून वर्गणी काढून बॅनर लावले जात. गिरणीच्या गेटवर एकेक रुपया निवडणूक निधी गोळा केला जाई. तो गरजू उमेदवारांना दिला जा.’

या निवडणुकीतले एक उमेदवार आणि ज्येष्ठ पत्रकार मधू शेट्ये सांगतातनिवडणुकीसाठी माझ्याजवळ पैसे असण्याचं कारणच नव्हतं. माझा मतदारसंघ ताडदेव होता. तिथल्या कार्यकर्त्यांनीच प्रत्येकी पाच ते दहा रुपये काढले. असे ८०० रुपये जमा झाले. त्यावेळी डिपॉझिट अवघं अडीचशे रुपये होतं. तेव्हा हजार पाचशे रुपयात सहज निवडणूक लढवली जायची.

शिवसेनेच्या उमेदवारांचीही अशीच परिस्थिती होती. पण सत्ताधारी काँग्रेसकडं साहजिकच मुबलक पैसा होता. त्यांनी या निवडणुकीत भरपूर झेंडे, बॅच, टोप्या आदी साहित्य आणलं. शिवाय त्यांनी शिवसेनेलाही पैसे पुरवले, असा आरोप अजूनही जुने कम्युनिस्ट नेते करतात.

आताच्या सारखी प्रचार करणा-या कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची सोय परस्पर होत नव्हती. प्रचारासाठी राबणारे हे कार्यकर्तेही अर्थातच फाटक्या खिशांचे. पण खिशात पैसे नसले तरी मनात दिलदारी होती. अर्ध्या कप चहात मित्राच्या प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला जायचा. या कार्यकर्त्यांचे अड्डे म्हणजे इराण्याची हॉटेल्स
गल्ली, रस्त्याच्या कोप-यावर असलेली ही हॉटेल्स आकाराने भरपूर मोठी असायची. हॉटेलमालक कधीही गि-हाईकाला किती वेळचा बसलाम्हणून उठवायचा नाही. त्यावेळीआम आदमीचं खाणं म्हणजेब्रून मस्का-चहा, खारी-चहा, खिमा-पाव, आम्लेट-पाव. इराण्याचं हॉटेल म्हणजे कॉम्रेडससाठी एक चहा आणि सिगारेट यावर तासन् तास गप्पा मारण्याची हक्काची जागाया कार्यकर्त्यांमुळं इराणी हॉटेल्स नेहमी भरलेली दिसत.

कार्यकर्त्यांना परवडतील असे पदार्थ हॉटेलवाले ठेवायचे. त्यावेळी बटाटावडा फेमस नव्हता. उडप्याच्या किंवा काही मराठी हॉटेल्समध्ये ऊसळ पाव, वडा ऊसळ, घावण ऊसळ, भजी, कांदाभजी मिळायचे. कमी किंमतीतले हे पदार्थ राबणा-या कार्यकर्त्यांच्या पोटाला आधार द्यायचे. निवडणुकीच्या काळात प्रचार करणा-या कार्यकर्त्यांसाठी एकत्रित ऊसळ-पाव बनवला जायचा. यातूनच कम्युनिस्ट कार्यकर्त्यांबद्दल एक म्हण प्रचलित झाली. ‘लाल बावटा ऊसळ परोटा’!
 
त्यावेळी लाल बावट्याखाली जमलेल्या तरुणांना आंदोलनासाठी कशाचंही निमित्त पुरायचं.गिरण्यांमधली छोटी छोटी आंदोलनं तर पावाचा आकार छोटा आहे, ऊसळ बरोबर नाहीअशा कारणांवरून व्हायची. पण एक व्हायचं, यामुळं कार्यकर्ते जोडले जायचे. हे कार्यकर्ते रात्र रात्र जागून बॅनर लावायचे. भिंती रंगवायचे. हो, या भिंतींचा आणि त्यांच्यावर रंगवलेल्या घोषणांचाही एक इतिहास आहे. हे उद्याच्या भागात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा