गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

बाळासाहेब ठाकरे विद्यार्थ्यांना म्हणाले होते, इंग्रजीचा द्वेष करून चालणार नाही; पण…


कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही मराठी भाषेचं संवर्धनाविषयी चर्चा झाली. मराठी विरूद्ध इंग्रजी असा भाषिक वादही सातत्यानं ऐकायला मिळतो. मराठी आणि इंग्रजी या भाषिक वादावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचा उपदेश दिला होता.
किस्सा आहे मार्च २००० सालचा. षणमुखानंद सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होता. या सोहळ्याला भाजपाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बाळासाहेबांना भाषेविषयी मौलिक मूलमंत्र दिला. बाळासाहेब म्हणाले,”तुम्ही उत्तम इग्रंजी बोला. आता एक विद्यार्थिनी इंग्रजी छान बोलली. त्याचबरोबर मातृभाषाही तुम्हाला विसरता येणार नाही. खरं सांगायचं तर अत्यंत गरजेच आहे. इग्रंजी बोलाच, पण मराठीही शिका. जितक्या भाषा शिकता येतील तितक्या शिका. इंग्रजीचा द्वेष करून चालणार नाही. इंग्रज गेले पण, इंग्रजी राहिली पाहिजे. इंग्रजी आलीच पाहिजे. आपल्या पोरांनी जो मार खाल्ला तो इंग्रजी येत नसल्यामुळे,” असंही बाळासाहेबांनी यावेळी सांगितलं.
प्रत्येक भाषेतील शिव्या शिकून घ्या-
बाळासाहेब म्हणाले,”जुनी गोष्ट आहे. एका पोराला विचारला what is your Father name? ते म्हणालं,’माझा बाप काढू नको तुला सांगतो. कानाखाली आवाज काढेल.त्याला काय वाटलं बापाविषयीचं काहीतरी वाईट उद्गार काढले. म्हणून ते म्हणालं कानाखाली आवाज काढेल. एव्हढं तरी.. मी फ्री प्रेसमध्ये असताना पहिलं कामं केलं की, तामिळ शिव्या शिकून घेतल्या. दिली तर कळलं पाहिजे. शिवी दिल्यानंतर थँक्यू व्हेरी मच करण्यात काय अर्थ आहे का? त्यामुळे प्रत्येक भाषेतील शिव्या शिका,” बाळासाहेबांनी असा सल्ला देताच उपस्थित विद्यार्थ्यांमधून हास्याचे कारंजे उडाले.
इथं पहिल हिंदी आमचं-
जर्मनीमध्ये जर्मन भाषेला खुप महत्त्व आहे. तिथं गेलं की, जर्मनमध्येच बोलाव लागतं. स्विझर्लंडचंही तसंच. नाहीतर आपल्याकडं दूधवाला भैय्या आला तरी पहिल हिंदी आमचं. आणि हिंदी पण काय? आज दूध में पाणी जास्त लगता है?,” असं सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मराठी भाषेविषयीच्या भूमिकेलाही टोला लगावला होता.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

कोण होते बाळासाहेब ठाकरे?

मराठी समाजाला भूरळ घालणारे लोकप्रिय नेते, की भारतीय समाजात फूट पाडणारे हिंदुहृदयसम्राट?
बाळासाहेब एक व्यंगचित्रकार होते, की व्यंगचित्रातून बोलणारे राजकीय नेते?
विरोधी विचारांची माध्यमं बंद पाडणारे ते हुकूमशहा होते का?
ते बॉलिवुडचे गॉडफादर होते, की खरेखुरे आश्रयदाते?
अडल्या-नडलेल्याला मदतीचा हात देणारे ते रॉबिनहूड होते, की श्रीकृष्ण आयोगात म्हटल्याप्रमाणे सेनापती?
बाळासाहेब ठाकरे दोस्तांचे दोस्त आणि दुष्मनांचेही दोस्तच होते का?

असे असंख्य प्रश्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युनंतर विचारता येतील. माझ्या मते, बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका व्यक्तिमत्त्वात अनेक परस्परविरोधी रूपं दडलेली होती. प्रस्थापित राजकीय आणि सामाजिक नियमांच्या चौकटीत न बसणारा असा हा कलंदर नेता होता. स्वतःच्या शैलीत, स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या तंद्रीत आणि स्वतःच्या आवेगात त्यांनी राजकारण केलं. त्यातून महाराष्ट्राच्या गेल्या ५२ वर्षांच्या राजकारणातला ‘ठाकरे इफेक्ट’ उभा राहिला. या इफेक्टमुळे अनेक संसार उभे राहिले आणि काही उद्ध्वस्त झाले. एक अत्यंत वलयांकित आणि वादग्रस्त नेता असं बाळासाहेबांचं वर्णन करता येईल.

माझ्या वाट्याला आलेले पहिले ठाकरे हिंसक होते. त्यांनी घटनेनं मला दिलेला आविष्कार स्वातंत्र्याचा आणि जगण्याचा अधिकार नाकारला. १९७९ पासून आजपर्यंत पाच वेळा शिवसैनिकांनी माझ्यावर किंवा माझ्या कार्यालयावर जीवघेणे हल्ले केले. आधी ‘साप्ताहिक दिनांक’, मग ‘महानगर’ आणि २०१० साली ‘आयबीएन लोकमत’. या सर्व हल्ल्यांना माझ्या सहकार्यांनी जिद्दीनं तोंड दिलं. ‘महानगर’च्या अंकावर बहिष्कार टाकण्याचा बाळासाहेबांनी दिलेला आदेश मुंबईतल्या मराठी जनतेनंच नाकारला. ठाकरेशाही पुढे आम्ही झुकणार नाही, हे माझ्या सहकार्यांनी दाखवून दिलं. १९९२-९३ च्या दंगलीनंतर माझे एक सहकारी युवराज मोहिते यांनी श्रीकृष्ण आयोगासमोर मोठ्या निर्भयपणे साक्ष दिली. न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात ताशेरे ओढले. ठाकरे आणि शिवसैनिकांविरुद्धच्या एकाही खटल्यात आम्ही माघार घेतली नाही. तडजोड करण्याचा न्यायमूर्तींचा सल्लाही मानला नाही. पण सरकार आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे आजवर एकाही खटल्यात हल्लेखोरांना शिक्षा झालेली नाही. आम्हाला या ठोकशाहीच्या कचाट्यातून जिवंत ठेवलं ते सर्वसामान्य जनतेनं आणि नियतीनं.

आज बाळासाहेबांच्या मृत्युनंतर हे सगळं आठवताना गंमत वाटतेय. नकळत बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले होते. त्यांनी हल्ले करायचे आणि मी माझी पत्रकारिता तेवढ्याच त्वेषानं पुढे सुरू ठेवायची, हा गेल्या २० वर्षांतला परिपाठच झाला आहे. ज्या ज्या वेळी बाळासाहेबांशी बोलण्याचा प्रसंग आला, त्या त्या वेळी त्यांनी या हल्ल्यांचा संदर्भ देऊन आपल्या खास शैलीत मला म्हटलं, ‘तू हरामखोर आहेस! स्वतःचा हट्ट सोडायचा नाहीस!’ आज याचसाठी मला त्यांचे आभार मानायचे आहेत. बाळासाहेबांनी एक प्रकारे माझ्यातल्या जिद्दीला जिवंत ठेवलं. त्यांनी ललकारलं म्हणूनच पत्रकारितेवरचा माझा विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी हल्ले केले म्हणूनच माझ्या मनातली मृत्यूची भीती पळून गेली. त्यांच्या द्वेषपूर्ण राजकारणामुळेच धर्मनिरपेक्षतेवरची माझी श्रद्धा पक्की झाली. एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे हे माझे ‘प्यारे दुष्मन’ बनले.

बाळासाहेबांचं आणखी एक रूप मी जवळून अनुभवलं. १९७९ साली मी त्यांची पहिली मुलाखत घेतली त्यादिवशी आणि १२ फेब्रुवारी २०१२ रोजी मी त्यांची शेवटची मुलाखत घेतली त्यावेळी. वैयक्तिक भेटीतले हे बाळासाहेब अगदी विरोधी टोकाचे होते. अत्यंत प्रेमळ आजोबांसारखे ते वागले. खरं तर माझी त्यांची शेवटची मुलाखत कशी होईल याची चिंता उद्धव ठाकरेंसकट अनेकांना वाटत होती. पण मुलाखती आधीच्या दहा मिनिटांतच आमचे सूर जुळले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि अत्यंत प्रेमानं सगळी चौकशी केली. राज आणि मीनाताईंच्या आठवणींनी ते गहिवरले. माझ्या पहिल्या मुलाखतीच्या वेळी मीनाताईंनी मला चहा आणि पोहे दिले होते, हेही ते विसरले नव्हते. बारीकसारीक तपशील त्यांना या वयातही आठवत होता. त्या पहिल्या मुलाखतीनंतर त्यांनी माझी कॉपी तपासली होती, त्यावर आपली लफ्फेदार सहीही केली होती आणि मला स्वतःचं व्यंगचित्रही काढून दिलं होतं. त्यांची आठवण पक्की होती. माझी मुलाखत चांगली होणार याची खात्री मला तिथंच झाली. आता मी आणि बाळासाहेब दोघांना कुणीही थांबवू शकत नव्हतं. माझे प्रश्न आणि त्यांची उत्तरं असा सामना पुढे पावणेदोन तास चालला. माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी टाळलं नाही. अर्थात त्यांची बाजू ते सांगत होते, तेच अंतिम सत्य होतं असं नव्हे. जाताना मला आणि माझ्या सहकाऱ्यांना त्यांनी तोंडभरून आशीर्वाद दिला. म्हणाले, ‘पुन्हा ये. आता जाहीरसभेत बोलण्यापेक्षा अशाच मुलाखती करू. तुझ्याशी बोलताना मजा येते.’ पण गेल्या आठ महिन्यांत त्यांना भेटण्याची संधी पुन्हा आली नाही. दसरा मेळाव्यातलं त्यांचं भाषण पाहिलं आणि चरकलो. फेब्रुवारीत मी भेटलो तेव्हा त्यांची तब्बेत चांगली होती. मग पुढच्या आठ महिन्यांत झालं काय? मनात तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली जी १७ नोव्हेंबरला खरी ठरली. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक खरी पोकळी निर्माण झाली. आता राजकारणाचा तो पोत दिसणार नाही.

बाळासाहेब ठाकरे नावाचा करिष्मा का निर्माण झाला, हे जाणून घ्यायचं असेल तर ५२ वर्षं मागे जावं लागेल. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानं मराठी माणसाला मोठी स्वप्नं दाखवली होती. हे राज्य मराठी असेल असं आश्वासन खुद्द यशवंतराव चव्हाणांनी दिलं होतं. मराठी माणसाला नोकऱ्या मिळतील, मराठी भाषेचं संवर्धन होईल, सर्वसमावेशक अशा मराठी संस्कृतीला मानाचं स्थान मिळेल, अशी आशा या आंदोलनाचे दोन ज्येष्ठ नेते एस.एम. जोशी आणि कॉ. डांगे यांनीही व्यक्त केली होती. पण पुढच्या पाच वर्षांत मुंबईतल्या मराठी माणसाला वेगळाच अनुभव आला.

राज्याच्या राजधानीत आपली कोंडी होत असल्याची भावना मराठी समाजाच्या मनात निर्माण झाली. याला सत्ताधारी काँग्रेसकडेही उत्तर नव्हतं आणि डाव्या पक्षांकडेही. वास्तविक संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं नेतृत्व या डाव्या पक्षांकडेच होतं. त्यांनी मराठी माणसाला अशा प्रकारे कळत नकळत वाऱ्यावर सोडायला नको होतं. पण राष्ट्रीय राजकारणाच्या रेट्यात मराठी अस्मितेचा मुद्दा मागे पडला. काँग्रेसला तर सोयरसुतकच नव्हतं. ‘मार्मिक’चे संपादक असलेल्या बाळ ठाकरेंनी नेमका हाच मुद्दा उचलला. त्यावेळी ‘मार्मिक’मध्ये टेलिफोन डिरेक्टरीतल्या याद्या प्रसिद्ध व्हायच्या. त्यातील अमराठी माणसांची बहुसंख्या मराठी तरुणांना चकित करून सोडायची. ‘वाचा आणि थंड बसा’ असा सुरुवातीला या मालिकेचा मथळा होता. मालिका लोकप्रिय झाल्यावर तो ‘वाचा आणि पेटून उठा’ असा झाला. त्याला मराठी तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हळूहळू बाळ ठाकरे नावाच्या व्यंगचित्रकाराच्या सभांनाही गर्दी होऊ लागली. समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्षातले तरुणसुद्धा त्यांच्या सभांना दाद देऊ लागले. १९६६ साली शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळ केशव ठाकरे या व्यंगचित्रकाराचे बाळासाहेब झाले आणि शिवसेनेचा पुढचा प्रवास सुरू झाला. या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर प्रचंड प्रतिसाद मिळाला.

काँग्रेसचे काही नेतेही या मेळाव्याला उत्सुकतेपोटी हजर होते. रामराव आदिक व्यासपीठावर होते, तर शरद पवार शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून ठाकरेंचं भाषण ऐकत होते. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही त्या वेळी शिवसेनेची घोषणा होती. ‘राजकारण म्हणजे गजकरण’ असंही ठाकरे म्हणायचे. पुढे या सगळ्या घोषणा विरल्या आणि शिवसेना राजकारणात उतरली. पण माझ्या मते, बाळासाहेब ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या लोकप्रियतेत मोठा वाटा या समाजकारणाचा आहे. अर्थात हे समाजकारणही खास ठाकरे स्टाईल होतं. पण त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची एक शाखा उभी राहिली. प्रत्येक शाखेत ५० ते १०० तरुण क्रियाशील झाले. सरकारी कार्यालयातून नकार घंटा ऐकणाऱ्या सामान्य माणसाला आपली तक्रार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं. या शाखेसोबत भागाभागात फलक लागू लागले. फलकावर ‘मार्मिक’मधली व्यंगचित्रं जशीच्या तशी चितारलेली असायची. प्रचाराचं एक मोठं माध्यम संघटनेला उपलब्ध झालं. कार्यकर्त्यांच्या अशा फळीमुळेच शिवसेना आजपर्यंत टिकून राहिली आणि वाढली आहे. शिवसेनेचं बळ या शाखा पद्धतीत आहे. या पद्धतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांनी केला, पण त्यांना शिवसेनेइतकं यश कधी आलं नाही. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जी प्रचंड गर्दी झाली, त्यामध्ये शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तर होतेच, पण त्यांच्या घरातलीही माणसं होती. या कार्यकर्त्यांशी बाळासाहेबांनी जोडलेलं थेट नातं हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे.

सुरुवातीला शिवसेनेला ‘वसंत सेना’ म्हटलं जायचं. कारण कम्युनिस्टांच्या कामगार संघटना तोडण्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि बजाज यांच्यासारख्या उद्योगपतींनी शिवसेनेला छुपा आशीर्वाद दिल्याची चर्चा होती. बाळासाहेबांनी हा आरोप नेहमी नाकारला असला तरी त्यात अजिबात तथ्य नव्हतं, असं म्हणता येणार नाही. शिवसेनेनं प्रारंभीच्या काळात ज्या प्रकारे कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर हल्ले केले, कॉ. कृष्णा देसाईचा खून केला त्यावरून या आरोपांना बळकटी मिळते. सरकारनंही शिवसेना आणि ठाकरेंबद्दल कायम बोटचेपी भूमिका घेतली होती. एवढे राडे आणि दंगली करून शिवसैनिकांनी किंवा ठाकरेंना किती वेळा कडक शिक्षा झाली, हे तपासलं तर या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं.

आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत शिवसेनाप्रमुख काही दिवसांसाठी तुरुंगात गेले आहेत. त्याही वेळी सरकारनं त्यांना पाठीशी घालून सुटका केल्याचा आरोप झाला होता. बाळासाहेब ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन वसंतराव नाईक यांची मध्यरात्री भेट घेतात अशीही चर्चा होती. ठाकरे यांनी वसंतरावांप्रमाणेच बंद गळ्याचा कोट घालायला सुरुवात केल्यामुळे या चर्चेत भरच पडली. काँग्रेस सरकारचा आशीर्वाद नसता तर मुंबईत शिवसेनेला एवढे पाय रोवणं अशक्य होतं. पंजाबमध्ये इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे जर्नेलसिंग बिंद्रनवाले यांना खतपाणी घातलं, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ठाकरे यांचं नेतृत्व उभं करण्यात आलं, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र त्याच काँग्रेसच्या मानगुटीवर शिवसेना बसली.

शिवसेनेची ही सगळी पार्श्वभूमी मुंबईतल्या मराठी माणसाला ठाऊक नव्हती असं नाही. पण मनातल्या न्यूनगंडामुळे मराठी माणसानं याकडे दुर्लक्ष केलं. मुंबईत येणाऱ्या अमराठी लोंढ्यांपासून या मराठी मध्यमवर्गाला संरक्षण हवं होतं. आपली बाजू मांडणारा नेता त्यांना बाळासाहेब ठाकरेंमध्ये दिसला. या सुशिक्षित मध्यमवर्गानं त्यासाठी शिवसेनेच्या राडेबाजीकडेही कानाडोळा केला. दुसरीकडे शिवसेनेमुळे मराठी बेरोजगारांना आपला आवाज मिळाला. ‘हटाओ लुंगी, बजाओ पुंगी’ ही शिवसेनेची पहिली मोहीम लोकप्रिय होण्याचं पहिलं कारण तेच होतं. दाक्षिणात्यांनी आपल्या नोकऱ्या बळकावल्याचा मराठी समाजाचा ग्रह वस्तुस्थितीला धरून नव्हता. कारकून, स्टेनोग्राफर्स यांच्या नोकऱ्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता प्रामुख्यानं दाक्षिणात्यांमध्ये होती. पण समाजातील एका मोठ्या गटाला नेहमी सोपी उत्तरं हवी असतात. ठाकरे त्यांना ती देत होते. हिटलरनं ज्याप्रमाणे ज्यूंना टार्गेट केलं, त्याप्रमाणे मुंबईत बाळासाहेबांनी पहिल्यांदा दाक्षिणात्यांना नंतर गुजरात्यांना, त्यानंतर उत्तर भारतीयांना आणि शेवटी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन मुसलमानांना टार्गेट केलं. एक शत्रू निवडायचा आणि प्रक्षोभक विधानं करत त्याला झोडपत रहायचं, ही बाळासाहेबांची रणनीती राहिली आहे. त्यांची हीच विचारधारा. याला फार तर ‘ठाकरेवाद’ म्हणता येईल.

बाळासाहेबांच्या मूडप्रमाणे या विचारधारेचे रंग वेळोवेळी बदललेले आहेत. म्हणूनच सुरुवातीला मराठी अस्मितेसाठी लढणारे बाळासाहेब १९७८ च्या नंतर रशियाच्या प्रॅक्टिकल सोशॅलिझमचे पुरस्कर्ते झाले आणि नंतर हिंदुत्ववादीही बनले. मीनाताई ठाकरेंच्या निधनानंतर तर ते नास्तिकही बनले होते! पण मराठी मध्यमवर्गाचे आक्रमक तारणहार हा धागा त्यांनी कधी सोडला नाही. भूमीपुत्रांचा प्रश्न भाषावार प्रांतरचनेमुळे निर्माण झाला आहे, तो खरा आहे आणि मांडायलाही हरकत नाही. पण हे सगळं भारतीय घटनेच्या चौकटीतच व्हायला हवं. हिंसेच्या आधारे नव्हे. ठाकरेंनी घटना तर धाब्यावर बसवलीच, पण हिंसेलाही प्रोत्साहन दिलं. एक प्रकारे भारत नावाच्या राष्ट्राच्या संकल्पनेवरच त्यांनी आघात केला. पण मराठी मध्यमवर्गाचा पाठिंबा आणि सरकारचा बोटचेपेपणा, यामुळे त्यांची ताकद वाढत गेली.

ज्या मराठी अस्मितेचा झेंडा ठाकरेंनी खांद्यावर घेतला होता, त्या मराठी माणसाचे प्रश्न तरी शिवसेनेमुळे सुटले का? वडापावच्या गाड्या, स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मिळालेल्या कारकून आणि प्यूनच्या नोकऱ्या यापलीकडे शिवसेना कधी गेली नाही. पण काहीच हातात नसलेल्या निम्नमध्यमवर्गीय आणि बहुजन समाजातील तरुणाला या गोष्टीही महत्त्वाच्या वाटल्या. दुष्काळामध्ये अन्नाचे दोन घासही आशा देऊन जातात. तशीच आशा शिवसेनेनं मराठी तरुणांच्या मनात निर्माण केली. पण भावनात्मक राजकारणामुळे प्रश्न सुटत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे फक्त भावना होत्या आणि भावनेतून निर्माण झालेले शब्द होते. विचाराधारित कार्यक्रम काहीच नव्हता. त्यामुळे आज ४६ वर्षांनंतरही मराठी माणसाचे प्रश्न कायम आहेत. भावना भडकवण्याच्या राजकारणातून हिंसा भडकते. शिवसेनेनं अशीच हिंसा केली. हिंसेलाच आपलं हत्यार बनवलं आणि दरारा वाढवला. आज बाळासाहेबांच्या मृत्युनंतर हा इतिहास बदलू शकत नाही. शांतपणे याचा विचार करण्याची गरज आहे.

बाळासाहेबांच्या लोकप्रियतेचा विचार करावाच लागेल. राजकारणाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी पठडीतल्या राजकीय नेत्याची नव्हती. त्यांच्या प्रतिक्रिया या एका व्यंगचित्रकाराच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. त्यात वेगवेगळ्या प्रतिमांचा भरणा होता. मग कधी आचार्य अत्रेंना ‘वरळीचा डुक्कर’ म्हणा, शरद पवारांना ‘मैद्याचं पोतं’ म्हणा, असे असंख्य प्रकार घडले. जणू काही त्यांचा कुंचलाच त्यांच्या जीभेतून बोलत होता. बाळासाहेबांच्या वक्तृत्वाची अशीच खासीयत आहे. ते नाथ पै, मधू दंडवते, अटलबिहारी वाजपेयी किंवा शिवाजीराव भोसले यांच्यासारखे पट्टीचे वक्ते नाहीत. श्रोत्यांबरोबरची प्रश्नोत्तरं आणि क्रिया-प्रतिक्रियांच्या माध्यमातून त्यांचं भाषण रंगतं. त्यांची भाषाही राजकारणाच्या चौकटीबाहेरची असते. नाक्यावर गप्पा मारणाऱ्या तरुणांची ही भाषा आहे. मराठी तरुणांनी बाळासाहेबांना आपलं मानलं ते यामुळेच. यातूनच ‘ठाकरी भाषा’ तयार झाली. प्रबोधनकारांच्या जहालपणाचा वारसा होताच, त्यात भर पडली व्यंगचित्रकाराच्या प्रतिमांची. याच भाषेच्या जोरावर बाळासाहेबांनी वादळं निर्माण केली. राजकारणातल्या संबोधनाचा दर्जा खाली जायला, ही ठाकरी भाषा जबाबदार आहे हे निश्चित. पण शिवसैनिकांच्या दृष्टीनं ही भाषा म्हणजे त्यांची जान होती. शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही याच भाषेत पुढे बोलण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा बाळासाहेबांवर प्रक्षोभक लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल एकही खटला चालला नाही किंवा यशस्वी झाला नाही, हे विशेष.

राजकीय व्यासपीठावरून प्रक्षोभक भाषणं करून माणसं तोडणारे बाळासाहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र माणसं जोडत होते. त्यांच्यासारखा दिलदार नेता शोधून सापडणार नाही. आपल्या विरोधकांबद्दलही त्यांनी कधी कटुता बाळगली नाही. लेखक, कलावंत, व्यंगचित्रकारांच्या मैफलीत ते खुलायचे. असंख्य गरजू माणसांना त्यांनी मदत केली. यामध्ये अनामिक व्यक्तींपासून संजय दत्त-अमिताभ बच्चनपर्यंत सिताऱ्यांचाही समावेश आहे. बाळासाहेबांनी शब्द दिला आणि पाळला नाही असं क्वचितच घडलं. यातूनच त्यांच्या करिष्मा तयार झाला. व्यक्तिगत प्रेमानं त्यांनी जोडलेली प्रतिष्ठित माणसं त्यांच्या सामाजिक आणि राजकीय अपराधांकडे दुर्लक्ष करू लागली. आपल्यावर टीका करणाऱ्या मराठी माध्यमांशी शत्रुत्व करणारे बाळासाहेब इंग्रजी माध्यमातल्या पत्रकारांना मात्र वाईन पाजत होते आणि सिगारही ऑफर करत होते. मीडियानंही त्यांचा हा कलंदरपणा उचलून धरला. दुटप्पीपणा त्यांच्यात अजिबात नव्हता. मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं हा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच मी बिअर पितो, असं जाहीरपणे सांगायला ते कधी कचरले नाहीत. राडा केलेल्या शिवसैनिकांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. मग पोरंही त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार झाली. त्यांच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीचं गुपित ओळखायचं असेल तर हे समजून घेतलं पाहिजे.

महाराष्ट्राच्या राजकारणातलं बाळासाहेबांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांनी बहुजन समाजातील बिनचेहऱ्याच्या तरुणाला चेहरा दिला. हातगाडी ओढणारे, पेंटिंग करणारे, अर्धशिक्षित, अल्पशिक्षित नगरसेवक बनले किंवा आमदारही झाले.

सुरुवातीच्या काळात शिवसेना नेतृत्वाचा चेहरा शहरी सुशिक्षित मध्यमवर्गीय असा होता. पुढे तो बदलत जाऊन त्याला ग्रामीण ढंगही मिळाला. १९८५ पर्यंत मुंबईपुरती मर्यादित असणारी शिवसेना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात का वाढली याचं उत्तर इथं मिळतं. १९८६ साली शरद पवार काँग्रेसमध्ये गेले आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षाची एक पोकळी निर्माण झाली. शिवसेना-भाजप युतीनं, विशेषतः शिवसेनेनं ही पोकळी भरून काढली. गैरकाँग्रेसी विचारांचा प्रवाह शिवसेनेत सामील झाला आणि सत्ताकारण करू लागला. हिंदुत्व हा बोनस होता, मूळ पगार नाही! बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी जातीपातीचा विचार कधी केला नाही. हे त्यांनी जाणतेपणी केलं की अजाणतेपणी केलं, याचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. कदाचित बाळासाहेबांच्या राजकारणातल्या उत्स्फूर्तपणात याचं उत्तर सापडेल. पण महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचं धाडस त्यांनी दाखवलं.

हिंदुत्ववादी असूनही शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये ओबीसी, दलित-आदिवासी यांचा भरणा असतो. छगन भुजबळ हेच खरे शिवसेनेतले या समाजाचे नेते होते. त्यांच्यामुळेच ग्रामीण भागात शिवसेना वाढली. पण बाळासाहेबांनी मनोहर जोशींना महत्त्व दिल्यामुळे भुजबळ नाराज झाले आणि शिवसेना सोडून गेले. पुढे १९८५ साली मुख्यमंत्री पदासाठी सुधीर जोशींचं नाव घेतलं जात होतं. पण अंबानी यांनी शब्द टाकल्यामुळे मनोहर जोशींची निवड झाली अशा बातम्या या काळात प्रसिद्ध झाल्या आहेत. नामांतर आणि रिडल्सबाबतच्या विरोधी भूमिकेमुळे त्यांनी आंबेडकरवाद्यांना लक्ष्य केलं. पण त्याच आंबेडकरवाद्यांना त्यांनी नंतर जवळ घेतलं. आपल्या मनाला वाट्टेल तो निर्णय बाळासाहेब घेतात. ही उत्स्फूर्तताच त्यांच्या आयुष्याचा कणा आहे. त्यामागे फार मोठा विचार असतो, अशातलाही प्रकार नाही.

बाळासाहेबांची लोकप्रियता अभूतपूर्व म्हणावी लागेल. एस.एम., डांगे, जॉर्ज फर्नांडिस, शरद जोशी, शरद पवार, दत्ता सामंत यांच्या सभा मी बघितलेल्या आहेत. पण एवढी सातत्यानं गर्दी कुणाच्याही सभेला झालेली नाही. बाळासाहेबांची लोकप्रियता चार दशकं टिकून राहिली आहे. त्यांच्या एवढी प्रचंड अंत्ययात्रा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कुणाचीही झाली असेल असं वाटत नाही. समर्थकांच्या दृष्टीनं ते देवाच्या ठिकाणी होते. आणि विरोधकांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं भुरळ घातली, हे एक कठोर सत्य आहे. १९७५ ते ८० या काळात मात्र जनता पक्षाच्या लाटेमुळे शिवसेनेच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली होती. पण तो अपवाद म्हणता येईल.

बाळासाहेब ठाकरे नावाचं वादळ निर्माण केलं कुणी आणि वाढवलं कुणी, हेही पाहिलं पाहिजे. ही इथल्या समाजाची निर्मिती आहे. हा आपलाच बरा-वाईट चेहरा आहे. भारतीय लोकशाहीनंच अशा प्रकारच्या ठाकरी राजकारणाला जन्म दिला आहे. याचं श्रेय आणि अपश्रेय आपल्या सगळ्यांचं आहे. सुरुवातीला मराठी मध्यमवर्गाची ती मानसिक गरज होती, पुढे दंगलीच्या काळात ठाकरेंच्या रूपानं हिंदूंना आपला तारणहार मिळाल्याचा आनंद झाला. सरकारी दुर्लक्षामुळे आणि बॉलिवुडमुळे बाळासाहेब ठाकरे मुंबईचे गॉडफादर बनले. आपल्या जीवनशैलीनं त्यांनी या दराऱ्याला ग्लॅमर दिलं. त्यांच्या कपड्यातला बदलही लक्षात घेण्यासारखा आहे. राजकारणासाठी माध्यमांचा कसा वापर करून घ्यायचा, हे बाळासाहेबांना चांगलं ठाऊक होतं. किंबहुना ‘पेपर टायगर’ अशीच त्यांची प्रतिमा होती. कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. म्हणून ते स्वतःच एक प्रश्न बनून राहिले. हाच प्रश्न उलगडण्याचा प्रयत्न मी केला आहे. भावना भडकू न देता तो समजून घ्याल ही अपेक्षा आहे. बाळासाहेब नावाच्या कलंदर व्यक्तिमत्त्वाचा शोध इथेच थांबणार नाही. ही सुरुवात आहे.

.......................................................................................................................

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

हळवा ‘हृदयसम्राट’!


बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन विशेष


दिनेश गुणे
मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारेहिंदुहृदयसम्राटशिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती व्यंगचित्रकार बाळ ठाकरेयांच्या कुंचल्यात होती, तीच शक्तीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला..
फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढय़ाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली, आणि बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागली. १९६० मध्ये फ्री प्रेसमधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली. मुंबईतील परप्रांतीयांमुळे मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून असलेल्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी मार्मिकमधून घुमली आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचे मराठी मनांवरील राज्य सुरू झाले.. मराठी माणसावरील अन्याय केवळ व्यंगचित्रे काढून दूर होणार नाही, त्यासाठी अधिक संघटित प्रयत्न हे वास्तव जाणलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय घेतला.. प्रबोधनकारांशी आणि सहकाऱ्यांशी दीर्घ विचारविनिमय झाला, आणि संघटनेचे नाव निश्चित झाले. १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुखम्हणून ओळखू लागला.. महाराष्ट्र श्रीमंत आहे, पण मराठी माणूस गरीबच आहे, ही स्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठी माणसाच्या मनामनांत जिवंत केली आणि मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहिला. स्थापनेनंतर चार महिन्यांतच, ऑक्टोबरमध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्याच मेळाव्याला जवळपास पाच लाख लोकांची गर्दी झाली, तेव्हाच शिवसेनेच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब झाले होते.. तेव्हापासून पुढे, महाराष्ट्रात आणि मुंबईत, बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे समीकरण झाले. त्यांच्या सभांना होणाऱ्या विक्रमी गर्दीमुळे अन्य राजकीय पक्षांच्या सभा फिक्या ठरत गेल्या. स्थापनेनंतरच्या पुढच्या दशकात, राज्यातील काही राजकीय पक्षांच्या सोबतीने शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणावरही ठसा उमटविण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात राजकीय क्षेत्र आणि कामगार क्षेत्रात दबदबा वाढविण्यासाठी शिवसैनिकांनी जाणीवपूर्वक अंगीकारलेल्या राडा संस्कृतीमुळे शिवसेनेची मुंबई आणि कोकणात जबरदस्त पकड बसली. तोवर मुंबईच्या कामगार क्षेत्रावर कम्युनिस्ट आणि समाजवादी संघटनांची पकड होती. ही मोडून काढण्यासाठी सेनेने प्रसंगी दंड, भेद नीतींचाही वापर केला आणि एकहाती अंमल प्रस्थापित केला.
अमोघ वक्र्तृत्वाबरोबरच, भेदक व मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन ही बाळासाहेबांची खास शैली होती. बाळासाहेबांच्या लेखनालादेखील त्यांच्या प्रखर भाषणांइतकीच प्रभावी धार होती, म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी अनोखी ओळख मिळाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा राज्यातील प्रभाव वाढत असतानाच राजकारणातही ही संघटना पाय रोवत होती. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकल्यानंतर राजकारणातील शिवसेनेचा ठसा अधिकच ठळक झाला, आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याकरिता स्थापन झालेली ही संघटना राजकीय पक्षाच्या रूपात उदयास येऊ लागली. राष्ट्रीय राजकारणातही शिवसेनेचे नाव अधोरेखित होऊ लागले. याच काळात शिवसेनेच्या अभेद्य तटबंदीला छगन भुजबळ, गणेश नाईक आदी नेत्यांनी पक्षांतराचे खिंडार पाडले. शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून राज्याच्या विधानसभेत सरकारविरुद्ध लढणारे भुजबळ पक्षाबाहेर पडल्यानंतर संघटना दुबळी होईल, ही अटकळ बाळासाहेबांनी फोल ठरविली आणि पक्षाला नवी ताकद देण्यासाठी अविश्रांत परिश्रम सुरू झाले. झंझावाती दौरे, सभा घेत आणि माणसे जोडत बाळासाहेबांनी शिवसेनेला नवी संजीवनी देण्याचा जणू ध्यास घेतला, आणि राजकीय समीकरणांचाही आढावा घेण्यास सुरुवात केली. हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात हुकुमाचा एक्का ठरणार हे बाळासाहेबांच्या जाणकार आणि द्रष्टय़ा नजरेने ओळखले आणि याच मुद्दय़ाच्या आधारावर त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करून युतीच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. तोवर राष्ट्रीय राजकारणात युती आघाडीच्या राजकारणाचा जम बसलेला नव्हता. शिवसेना-भाजप युतीचा हा प्रयोग अभूतपूर्व यशस्वी ठरला आणि १९९५ ते २००० हा काळ शिवसेना-भाजपसाठी सुवर्णकाळ ठरला. देशात आणि महाराष्ट्रातही सेना-भाजपच्या राजनीतीला जनतेचा अभूतपूर्व कौल मिळाला. महाराष्ट्रात युतीचा भगवा फडकला, आणि बाळासाहेब ठाकरे हे निर्विवाद नेते ठरले.. युतीच्या सत्ताकाळात बाळासाहेबांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे साकारून महाराष्ट्रात जिवंत झाली. दोन रुपयांत गरिबांना झुणका-भाकर देणे हे त्यांचे स्वप्न होते. युतीचे सरकार राज्यात आल्यावर ते साकारले. पुढे व्यवस्थापनातील ढिलाईमुळे ही योजना टिकाव धरू शकली नाही, पण एका क्रांतिकारी निर्णयाचे शिल्पकार म्हणून बाळासाहेबांचे नाव महाराष्ट्राच्या सत्तापटलावर कायमचे कोरले गेले. राज्यात मातोश्री वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडीवासीयांना मोफत घरे, मुंबईतील उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अशी अनेक स्वप्ने जपत महाराष्ट्राच्या सामाजिक व भौतिक विकासाचा ध्यास बाळासाहेबांनी घेतला होता. यापैकी अनेक योजना साकारल्या आणि द्रुतगती मार्ग, उड्डाणपूल अशा योजनांनी महाराष्ट्राच्या विकासाची नवी दालने खुली झाली..
आक्रमक हिंदुत्वाचा आणि कडव्या मुस्लिमविरोधाचा प्रखर पुरस्कार करताना बाळासाहेब ठाकरे अनेकदा टीकेचे आणि वादाचेही धनी झाले, पण आपल्या प्रत्येक शब्दाशी ठाम राहण्याच्या स्वभावातून त्यांनी यावरही मात केली. गुळमुळीत लोकशाहीपेक्षा रोखठोक ठोकशाही चांगली असे सांगत त्यांनी अनेकदा सत्ताधीशांना धारेवर धरले. कलेची जाण असलेला हिटलर हा त्यांचा आदर्श होता, तसे ते बोलूनही दाखवीत. त्यांच्या या रोखठोक स्वभावामुळेच, बाळासाहेबांच्या केवळ आदेशानिशी प्राण पणाला लावण्याची तयारी असलेल्या कडव्या शिवसैनिकांची फौज मुंबईतच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाली. सन २००२ मध्ये इस्लामी दहशतवादाचे भयंकर सावट मुंबईने अनुभवल्यानंतर हिंदू आत्मघातकी पथके स्थापन करण्याच्या त्यांच्या आदेशामुळे प्रचंड खळबळ माजली. राज्य सरकारने त्यांच्यावर खटला दाखल केला. मात्र, प्रत्येक मुस्लीम आपला शत्रू नाही, तर देशविरोधी मुस्लीम शत्रूच आहे, असे ठणकावून सांगत मुंबईतील दंगलींनंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार आणखी प्रखर केला. मुस्लीम दहशतवाद हा देशापुढील सर्वात मोठा धोका आहे, हे वारंवार उघडपणे बजावून सांगताना त्यांनी राजकीय परिणामांची तमा बाळगली नाही. राजकारणात असे तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे बाळासाहेब व्यक्तिगत आयुष्यात मात्र, खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होते, हे त्यांच्या जीवनपटावरून सहज जाणवते. पत्नी मीनाताई यांचे निधन, मुलगा बिंदुमाधव यांचा मृत्यू, शिवसेनेतील राजकीय बंडामुळे दूर होणारे निकटवर्तीय अशा अनेक प्रसंगांत त्यांचे हळवेपणही महाराष्ट्राने अनुभवले. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक अशी अनेक माणसे राजकीयदृष्टय़ा दुरावली, पण बाळासाहेबांच्या मोठेपणाच्या आठवणी या नेत्यांच्या मनाच्या हळव्या कप्प्यात आजही जिवंत आहेत, त्याचे हेच कारण! मीनाताईंच्या निधनानंतर अनेकदा त्यांच्याशी बोलताना, किंवा त्यांना जनतेसोबत साधलेल्या संवादातून, मानसिकदृष्टय़ा हळवे झालेले बाळासाहेब महाराष्ट्राने अनुभवले. पुतण्या राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून स्वत:चा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपली वेदना लपविली, पण राज ठाकरे यांच्या विभक्तपणाचे दु:ख अनेकदा त्यांच्या वागण्यातून व्यक्त झालेलेही महाराष्ट्राने पाहिले. शिवसैनिक हा माझा प्राण आहे, ही माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे असे सांगत सामान्य शिवसैनिकाच्या हृदयात घर करणाऱ्या या असामान्य नेत्याने आपल्या अखेरच्या भाषणातही, त्याचाच पुनरुच्चार केला होता. माझे हृदय तुमच्यापाशी आहे, असे सांगत बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची हृदये काबीज केली.. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या हृदयातील स्थान यापुढेही अढळ राहणार आहे..
(पुनर्प्रकाशित)