शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

दादांचा ‘राम राम’ आणि शिवसेनेचा जय महाराष्ट्र!

दादांच्या चित्रपटाला थिएटर मिळवून देण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मदत केली होती, त्यामुळेच मुंबईत दादांसह सर्वच मराठी सिनेमांना हक्काचं थिएटर मिळू लागलं. पुढं तर युती शासनाच्या काळात दादांचे मित्र प्रमोदभाऊ नवलकर सांस्कृतिकमंत्री झाल्यामुळं त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वच चित्रपटगृहांना वर्षातले किमान ५० दिवस मराठी चित्रपट लावणं बंधनकारकच केलं! हा घटनाक्रम तसा सर्वांनाच माहिती आहे. बाळासाहेबांचं दादांच्यावर भलतं प्रेम होतं. दादाही बाळासाहेबांचे भक्त होते. म्हणजे अगदी १४ मार्च १९९८ रोजी दादांचं दादरच्या त्यांच्या राहत्या घरी ‘राम निवास’मध्ये निधन झालं त्या दिवसापर्यंत आठवड्यातून एकदातरी दादांचं अन् बाळासाहेबांचं फोनवरून संभाषण होत असे. महिन्यातून एकदा भेट! दादा बाळासाहेबांकडे जाताना त्यांचे आवडते आलूवडे अन् पाव घेऊन जात असत. पण हा किस्सा नकोच सांगायला. उगाच वड्याचं तेल वांग्यावर निघायचं! आधीच वड्याचं तेल वगैरे बरंच ‘सूप’ वाजलय. या भेटीत काय व्हायचं मला माहिती नाही. म्हणजे मी नसायची सोबत. पण दादांच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियरला साहेब यायचे. त्यावेळी माझ्याशीही बोलायचे. ‘काय चाललय तुझ्या बकरीचं?’ असं हटकून म्हणायचे. त्यावर छगन भुजबळ ‘समदयासी लागलाय लळा’ असं म्हणाले होते. साहेबांनी त्यांना चांगलच फैलावर घेतलं होतं. मराठी कलावंतांशी विशेषत: महिला कलावंतांविषयी आदराने बोला!’ असं साहेबांनी भुजबळांना सुनावलं होतं. भुजबळ तेव्हा मुंबईचे महापौर होते हे विशेष! दादांनी शिवसेनेचा प्रचारही केला. विशेषत: मुंबईबाहेर शिवसेनेचा शाखा विस्तार चालू असताना, त्या मोहिमेत छगन भुजबळ आघाडीवर होते अन् दादा शिलेदार! अनेकदा चित्रपटांचं शुटींग रद्द करून दादा शिवसेनेच्या शाखा स्थापनेसाठी जात. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, नाशिक-धुळ्यात वगैरे. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात सभेला गर्दी होत असे. दादाही अस्सल दादा स्टाईलमध्ये सभा गाजवीत. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आलं तेव्हा बाळासाहेबांनी दादांना चक्क विधान परिषदेची ऑफर दिली होती. ‘आमदार व्हा; तुम्हाला सांस्कृतिकमंत्री करून टाकतो’ असं बाळासाहेब म्हणाले होते म्हणे. अर्थात हे मी स्वत: ऐकलेलं नाही. दादांनीच एकदा हा किस्सा सांगितला होता. नवलकरांना सांस्कृतिक मंत्रीपद माझ्यामुळं मिळालं असं दादा आम्हाला म्हणाले होते. ‘साहेबांनी मला ऑफर दिली होती, पण मी म्हणालो तिथं हाप चड्डीत गेलं तर चालेल काय? त्यावर साहेब काय म्हणाले माहीतय काय; नागडा जा! नाही तरी तिथं सगळे नागडेच जातात!’ एवढं सांगून दादा म्हणाले – ‘मी साहेबांना म्हटलं, साहेब तुम्ही जसे ‘qहदू हृदयसम्राट आहात, तसा मी देखील मराठी चित्रपट रसिक हृदयसम्राट आहे! हे पद मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठं आहे. सांस्कृतिक खात्याचा मंत्री होऊन काय करू? इकडे नाचतोय – बागडतोय तो बरा आहे. तुम्ही नवलकरांना सांस्कृतिकमंत्री करा. माणूस रसिक आणि कलासक्त आहे. अन् मग नवलकर मंत्री झाले’. आता दादांनी सांगितलेला हा किस्सा किती खरा किती खोटा कुणास ठावूक. पण दादांनी हा किस्सा सांगितला तेव्हा तिथं ज्येष्ठ सिनेपत्रकार इसाक मुजावर देखील होते. त्यांनी नंतर (माझ्या देखतच) प्रमोद नवलकरांना दादांचे म्हणणे कन्फर्म करण्यासाठी फोन लावला. नवलकर म्हणाले, ‘असेल बुवा; दादा काहीही बोलू शकतात अन् साहेब काहीही करू शकतात!’ नवलकर असं उपरोधाने म्हणाले की खरच; कुणास ठावूक. इसाक मुजावरनी दादांवर लिहिलेल्या ‘एका सोंगाड्याची बतावणी’ या पुस्तकात हा किस्सा नमूद केला आहे. अर्थात तो दादा कसे थापाडे होते हे अधोरेखीत करण्यासाठी उद्युक्त केलेला आहे. इसाक मुजावरांनी लिहिलेलं ‘एका सोंगाड्याची बतावणी’ आणि अनिता पाध्ये नावाच्या एका पत्रकार पोरीने शब्दांकन केलेलं ‘एकटा जीव’ हे दादांचं आत्मनिवेदनात्मक पुस्तक (ज्यावर आता बॅन आहे) हा स्वतंत्र विषय आहे. त्यावर लिहीन पुन्हा कधीतरी. पण दादा आणि शिवसेना, दादा आणि बाळासाहेब हे एक समीकरण होतं. दोघं एकमेकांच्या प्रेमात होते हे कुणीही नाकारू शकणार नाही. बाळासाहेबांचं ‘मराठी’ प्रेम आणि रसिकता हे या जवळीचं कारण होतं. म्हणूनच दादांचा चित्रपट मुंबईत लागावा यासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना ‘मराठा मंदिर’ वर थेट राडाच करायचा आदेश दिला होता. घडलं असं की मुंबईत मराठी चित्रपट लागायचे ते फक्त परळच्या ‘भारतमाता’ सिनेमात. बाकीचे चित्रपटगृहांचे मालक मराठी चित्रपट म्हटलं की अंगावर पाल पडल्यासारखं करीत. अगदी मॉर्निंगला लावा म्हटलं तरी ‘नाहीच’ म्हणत. दादांचा सोंगाड्या अन् एकटा जीव भारतमातालाच लागले, पण कमाई फारशी नाही. एक तर थिएटर छोटं. त्यात पुन्हा तिकीट दीड रुपया अन् अडीच रुपये. बाल्कनी नव्हतीच. बरं परळचं सगळं पब्लीक चाळीत राहणारं. सगळे गिरणी कामगार. दीड रुपयात सिनेमा बघणारे. अप्पर स्टॉल रिकामच असायचं. दादा मग गर्दी भरून दिसावी, चित्रपट हाऊसफुल्ल चाललाय असं वाटावं म्हणून फुकटे प्रेक्षक धरून आणून अप्पर स्टॉलमध्ये बसवीत. त्या बदल्यात त्यांना संवादांच्या वेळी मोठमोठ्याने हसण्याची अन् गाणं चालू झाल्यावर शिट्ट्या वाजवीत नाचण्याची ‘बोली’ दादा करीत. हा प्रयोग यशस्वी झाला. खोटी गर्दी पाहून खरी गर्दी वाढली. दादा त्याला ‘गर्दी गम्मत’ म्हणत. एकटा जीवच्यावेळी दादांनी ही गर्दी गम्मत केली होती. राम राम गंगारामच्या वेळी मात्र दादांना दादरचं मराठा मंदिर हवं होतं, पण मराठा मंदिरचा पारशी मालक दादांना ‘दाद’ देत नव्हता. त्यात पुन्हा त्याचवेळी राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’ आणि ऋषी कपूर – qडपल कपाडीयाचा ‘बॉबी’ हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. दादांनी मराठा मंदिरचा मालक फिरदोस तारापोरवाला बरोबर चार महिने आधी ‘मॉर्निंग शो’चा करार केला होता. वास्तविक चित्रपट प्रदर्शनाचे हक्क विकत घेण्याची पद्धत होती, पण तारापोरवालाने ‘तुजा शिनमा एक हप्ताच लावीन. त्येचा बदल्यामधी तू मला २० हजार रुपये आधी देवून ठेवावा पडेल. वीस हजारच्या पुढे धंदा बनला तर तुजा वीस हजार परत देऊन टाकीन, पण आठ-दहामधी अटकून गेला तर माझा २० हजार काटून घेईन. अशी अट घातली. दादांनी तीही मान्य केली. तरी ऐनवेळेला ‘बॉबी’ अन् ‘हाथी मेरे साथी’ आल्यावर तारापोरवाल्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने नोकराकरवी दादांचे २० हजार रुपये आणि लाल फुली मारलेला अ‍ॅग्रीमेंट कॅन्सल असं लिहिलेला कागद दादांकडे पाठवून दिला. इकडे दादांनी मराठा मंदिरला द्यायचं म्हणून ग्रामीण भागातून मागणी असूनही एक रिळ राखून ठेवलं होतं. ते आता तसच पडणार. म्हणून दादा धास्तावले. एक रिळ पडणं म्हणजे कमाईच बुडण्यासारखं होतं. पारशानं धंदेवाईक धोका केला होता. त्यानं बॉबी सिनेमाचे हक्क पैसे देऊन घेतले होते. अन् चारी शोला बॉबी लावला होता. दादांचा ‘मराठी सिनेमा’ त्याला फुकटसुद्धा नको होता. दादांनी तारापोरवाल्याला थिएटरवर जाऊन हात जोडले, अजीजी केली, तो ऐकूनच घेईना तेव्हा शिव्याही दिल्या. तारापोरवाल्याने गुंड बोलावले. दादांना बाहेर घालवलं. मग दादा थेट बाळासाहेबांकडे गेले. त्यांना कैफीयत सांगितली. तारापोरवाल्याने अ‍ॅग्रीमेंट करून धोका दिला. माझं नुकसान होईल. काहीतरी करा असं म्हणून दादांनी बाळासाहेबांच्या थेट पायालाच मिठी घातली. त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘रडताय काय असे, त्या तारापोरवाल्याचा पायजमा फाडून तुमच्या हातात देतो. थांबा जरा. लगेच साहेबांनी छगन भुजबळ आणि मोहन रावलेंना बोलावून घेतलं. आत्ताच्या आत्ता त्या पारश्याला उचलून माझ्यापुढं आणा, आणि मराठा मंदिरवरचे बॉबीचे पोष्टर काढा; असा आदेशच दिला. अध्र्याच तासात मोहन रावळेंनी तारापोरवाल्याला बखोटीला धरून साहेबांपुढं आणलं. तिकडे भुजबळांनी तोवर पोष्टर उतरवून ठेवले होते. साहेबांनी तारापोरवाल्याला कडक शब्दात सुनावलं. ‘चर्चा नको, दादा कोंडकेंचा सिनेमा लावायचा! कळलं… अन् फक्त मॉर्निंग नाही, चारही शो! मी सांगेपर्यंत सिनेमा उतरवायचा नाही! नाही तर तुला तुझ्या थिएटरसकट उतरवीन! तारापूरवाला पावसात भिजलेल्या कोंबड्यासारखा अंग आखडून नुसता टुकूटकू बघत होता. बाळासाहेब म्हणाले, ‘चला निघा आता!’ पारशी उठला. पार गळपटला होता. रावळेंनीच त्याला धरून बाहेर आणला. मराठा मंदिरला सिनेमा लागला अन् अक्षरश: धो धो चालला. स्पर्धेतले बॉबी अन् हाथी मेरे साथी सुपर हिट झालेच, पण राम राम गंगाराम सिल्व्हर ज्युबीली हिट झाला. त्यावेळी टॅक्स फ्रीची भानगड नव्हती. राम रामनं दादांना धो धो कमाई अन् प्रसिद्धी दिली. अशोक सराफचा ममद्या खाटीक, दादांचा गंगाराम, माझी गंगी, राणी बकरी अन् भगवान दादांबरोबर गाजलेलं गाणं;
‘रूपानं देखणी, अंगानं चिकणी
कोकीळेचा गळा…
गं बाई माझ्या बकरीचा
समद्यासी लागलाय लळा!’
पब्लीक अक्षरश: झुंडीनं सिनेमाला यायचं. चिक्कार गर्दी. सिनेमा सिल्व्हर ज्युबीली हिट झाल्यावर स्पेशल शोला बाळासाहेब देखील आले होते. त्यावेळी तारापोरवाल्याने दादांना मिठी मारून ‘छोकरा बडा डिकरा हाये’ म्हणत आता यापुढे दादाचा हरएक सिनेमा आपण पैला लावणार अशी ग्वाही बाळासाहेबांना दिली होती. त्यावर ‘नाही, लावला तर मी आहेच!’ असं बाळासाहेब म्हणाले होते. पारशी हात जोडून म्हणाला, ‘धंदा होयेंगा तो कोन छोडेंगा साहेबजी… मराठी फिल्लम को पैली बार इतना पब्लीक देखा. ये दादाजी का कमाल है! और ये छोकरी भी कमाल है! क्या बोलती वों माझ्या बकरीचा म्या! खडा पारशी आडवा झाला होता. दादांचा ‘राम राम’ चालला होता अन् शिवसेनेचा जय महाराष्ट्र पावला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा