मंगळवार, २० जानेवारी, २०१५

राजकारणापलीकडील बाळासाहेब

‘वज्रादपि कठोराणि कुसुमादपि मृदुणि च|’ ही उक्ती बाळासाहेबांना तंतोतंत लागू पडणारी आहे. आपल्या लेखन-भाषणातून विरोधकांवर आसूड ओढणारे बाळासाहेब व्यक्तिगत आयुष्यात मात्र कमालीचे स्नेहपूर्ण आणि हळवे होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे हे लहान असताना; त्यांच्या अंगावर एकदा मटणाचा गरमागरम रस्सा सांडला. त्यावेळी; त्यांना मलमपट्टी करण्यापासून अगदी सर्व सुश्रुषा बाळासाहेबांनी स्वतः केली. ते पूर्णतः बरे होयीपर्यंत बाळासाहेब स्वतः त्यांच्यासोबत झोपत असत. केवळ आपल्या कुटुंबियांबद्दलच नव्हे तर सर्वसामान्य शिवसैनिकापर्यंत प्रत्येकाच्याच बाबतीत बाळासाहेब हळवे होते.
बाळासाहेब म्हणजे शिवसेनेचे कुटुंबप्रमुखच. कुटुंबप्रमुखाचे लक्ष त्यांच्या कुटुंबातील थोरा-मोठ्यांपासून ते लहान बालकापर्यंत असते तसेच बाळासाहेबांचे असते. त्यांना शिवसेना नेत्यांची जेवढी काळजी असे; तेवढीच काळजी सामान्य शिवसैनिकांची असे. म्हणून ते नेहमी सांगत, “मी सर्वांना सांगतो शिवसैनिक हे माझं सर्वस्व आहे, शिवसैनिक हे आपलं भांडवल आहे. ते आहेत म्हणून तुम्ही आहात, मी आहे. त्यांना जपा, कधीच त्यांच्याशी उर्मटपणे वागू नका, हे माझं सगळ्यांना स्पष्ट सांगणं आहे.”
शिवसैनिक जखमी झाला तर त्याच्या घरी बाळासाहेब हमखास जात. शिवसैनिकाचे निधन झाले तर त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी जातात आणि बॉम्ब स्फोटासारख्या दुर्दैवी घटनेत जर कोणी मृत्युमुखी पडले तर त्या व्यक्‍तीच्या कुटुंबीयांना दिलासा आणि आर्थिक मदत करायला बाळासाहेब कधीही विसरत नसत. म्हणून ते केवळ शिवसेनेचे कुटुंबप्रमुख राहिले नाहीत तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख झाले. ज्या वेळी पक्षाचे कार्यकर्ता आपल्या नेत्यांवर इतके अकृत्रिम प्रेम करतात त्यावेळी त्या कुटुंबप्रमुखासाठी प्राण पणाला लावण्यासदेखील ते मागेपुढे पाहत नाहीत.
आपल्या राजकाराणातील विरोधकांशीसुद्धा वैयक्तिक पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध असणारे बाळासाहेबांसारखे दिलदार व्यक्तिमत्व सापडणे जवळजवळ अशक्य होय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षप्रमुख असलेले श्री. शरद पवार यांच्यासारखे नेते जरी त्यांचे राजकीय शत्रू असले तरी वैयक्तिक पातळीवर मात्र; अतिशय चांगले स्नेही होते. बाळासाहेबांच्या पश्चात दिलेल्या प्रतिक्रियेत श्री. पवार म्हणतात की; “बाळासाहेब एक विशिष्ट विचारधारा ठेवून आयुष्याचे मार्गक्रमण करत होते. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, मराठी माणसाची भूमिका, महाराष्ट्रातून देशासाठी हवे ते योगदान देण्याची तयारी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. बाळासाहेबांनी अन्य विरोधी राजकीय पक्षांवर कायम टीका केली, पण व्यक्तिगत टीका कधी केली नाही. मराठी, मुंबईसाठी बाळासाहेबांचे योगदान मोठे आहे. शिवसेनेची स्थापना केल्यानंतर हजारो शिवसैनिक आणि शिवसेनेचे चाहते शिवाजी पार्कवर जमले होते. त्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो. शिवाजी पार्कवर जाऊन सभेतील त्यांचे भाषण ऐकले होते. चार महिन्यांपूर्वी मी त्यांना लीलावती रुग्णालयात भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांच्याशी मी बराच वेळ चर्चा केली होती. बाळासाहेबांचे योगदान कायम उपयुक्त ठरणार आहे. सत्तेच्या पदापासून दूर राहण्याची भूमिका कौतुकास्पद होती. बाळासाहेबांचे नाव इतिहासात नोंदले जाईल.’’
सिनेक्षेत्र, नाट्यक्षेत्र, गायन, साहित्य…हर एक क्षेत्रातील लोकांशी बाळासाहेबांचे स्नेहपूर्ण संबंध होते. अनेक कलाकारांना तर ते पितृस्थानी होते. त्यांनी नेहमीच चांगल्या कलेची कदर केली. परंतु देशाशी गद्दारी करणाऱ्या कला-क्रीडेला मात्र कडाडून विरोध केला. त्यामुळेच पाकिस्तानशी क्रिकेट खेळू देणार नाही अशी ठाम भूमिका मांडली असतानाच भूतपूर्व पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादला मात्र त्यांनी भेटण्यास वेळ देवू केला. मात्र आपला चांगला मित्र असलेल्या दिलीपकुमार यांच्यासारख्या अभिनेत्याने ‘निशान-ई-इम्तियाज’ सारखा सर्वोच्च पाकिस्तानी पुरस्कार घेण्याची तयारी दाखविल्यानंतर मात्र त्यांच्यावर टीका केली. कित्येक प्रसिद्धीमाध्यमांनी त्यावेळेस या गोष्टीवरून टीकेचे रान उठवले होते. खरेतर त्यांना बाळासाहेब कळलेच नाहीत असेच म्हणावे लागेल!!
शिवसेनाप्रमुख असले तरीही पक्षीय राजकारणाच्या चौकटीत कधीच बंदिस्त न होवू शकणारे व्यक्तिमत्व म्हणजेच बाळासाहेब ठाकरे. पक्ष कोणताही असो; बाळासाहेबांचे चाहते आपल्याला प्रत्येक ठिकाणी हमखास दिसून येतील.
- डॉ. परीक्षित स. शेवडे,
एम.डी. (स्कॉ.) [आयु.]
संपर्क: ९८१९५१०७७०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा