शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

दिलदार

व्यंगचित्रकार, राजकीय नेता, वक्ता... बाळासाहेब ठाकरे यांची अशी कितीतरी प्रकारे ओळख करून देता येईल. पण त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांची या सगळ्यापलीकडे जाणारी ओळख होत असे. आपल्या आयुष्यात बाळासाहेबांच्या दिलदार वृत्तीचा अनेक वेळा अनुभव घेतलेले ज्येष्ठ प्रकाशक अप्पा परचुरे हे त्यांपैकीच एक होत. त्यांनी सांगितलेल्या काही आठवणी.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि परचुरे प्रकाशन मंदिर यांचे ऋणानुबंध फार जुने आहेत. बाळासाहेबांच्या ऐन उमेदीच्या काळात आमच्या काही प्रकाशनांची मुखपृष्ठे त्यांच्या कुंचल्यातून साकार झालेली आहेत. माझे वडील ग. पां. परचुरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या गाठीभेटी आचार्य अत्रे यांच्या घरी होत असत. त्यातूनच पुढे त्यांचे कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले. बाळासाहेबांनी हा वारसा पुढे चालू ठेवला.
माझ्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. आमंत्रणाचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला. स्वागत समारंभाला नक्की येण्याचे त्यांनी मान्य केले. स्वागत समारंभाला पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई मुद्दाम पुण्याहून आले होते. योगायोगाने "पु.ल' तिथे असतानाच बाळासाहेबांचे आगमन झाले आणि त्यांची ऐतिहासिक भेट तेथे झाली. "पु.ल' आणि बाळासाहेब बराच वेळ जुन्या आठवणींना उजाळा देत बोलत बसले होते. माझ्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रणसुद्धा त्यांनी स्वीकारले होते. चि. नरेनला आशीर्वाद देण्यासाठी बाळासाहेब जेव्हा आले, तेव्हा माझ्या सुनेच्या माहेरची मंडळी (पेठे कुटुंबीय) फोटो काढून घेण्यासाठी आली होती. बाळासाहेबांचे निरीक्षण किती सूक्ष्म होते याची प्रचिती मला अनुभवायला मिळाली. फोटो काढून झाल्यावर बाळासाहेबांनी हळूच मला विचारले, "तुम्ही पत्रिका पाहून लग्न जमवता, की रंग आणि डोळे बघून लग्न जमवता?' कारण सर्व पेठे मंडळी घारी आणि गोरी होती.
मला जेव्हा संधी मिळत असे, तेव्हा मी बाळासाहेबांची भेट घेत असे. आमची नवीन प्रसिद्ध झालेली पुस्तके त्यांना नेऊन देत असे. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते आतील मजकुरापर्यंत ते सूचना करीत असत. असाच एकदा एक पुस्तक देण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी केलेली सूचना माझ्या चांगली लक्षात आहे. पुस्तकातील टाइप बघून ते म्हणाले, ""माझ्यासारखे वयोवृद्ध लोक पुस्तके वाचत असतात. टाइप थोडा मोठा वापरत जा, म्हणजे वाचणे सोपे जाईल.''
बाळासाहेबांच्या दिलदारीला तोड नव्हती. मला त्यांच्या दिलदारीचा अनेक वेळा अनुभव आलेला आहे. आमचे नवीनच प्रकाशित झालेले पुस्तक देण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. पुस्तकाचे शीर्षक मी गोल्ड एम्बॉसिंग केले होते. हे गोल्ड एम्बॉसिंगचे काम मी कोठे करून घेतो, याची त्यांनी चौकशी केली. माझ्या एका अमराठी मित्राकडून मी ते करून घेत असे. ती गोष्ट त्यांना फारशी रुचली नाही. ते म्हणाले, "माझ्याकडे एम्बॉसिंगचे एक जुने मशिन आहे. ते घेऊन जा.' आपल्या सेवकाला त्यांनी बोलावले व माळ्यावर असलेले मशिन काढून माझ्या गाडीत नेऊन ठेवण्याची त्यांनी सूचना दिली. "यापुढे सर्व कामे या मशिनवर करीत जा,' असा आदेश त्यांनी मला दिला.
बाळासाहेबांना हिटलरबद्दल विशेष प्रेम होते. बाळ सामंत लिखित "हिटलर ः एक महान शोकांतिका' हे पुस्तक मी प्रकाशनार्थ घेतले होते. ते पुस्तक बाळासाहेबांनी प्रकाशित करावे, अशी बाळ सामंत आणि माझी इच्छा होती. बाळासाहेबांना भेटून प्रकाशन समारंभाला येण्याची विनंती आम्ही त्यांना केली. प्रकाशन समारंभ जुहूला एका पंचतारांकित हॉटेलात करण्याचे ठरले. प्रकाशन समारंभाच्या दिवशी सकाळी बाळासाहेबांकडून एक निरोप आला. तो निरोप असा होता - संध्याकाळी घरी ये आणि प्रकाशन समारंभाला मला घेऊन जा. "मातोश्री' बंगल्याचे काम सुरू असल्यामुळे त्या वेळी त्यांचा मुक्काम पारशी कॉलनीत होता. मी ठरल्या वेळी घरी गेलो. जुहूला जाण्यासाठी गाडीत त्यांनी फक्त मला घेतले. पारशी कॉलनी ते जुहू या प्रवासात बाळासाहेब हिटलरवर सतत बोलत होते. हिटलरच्या शिस्तीबद्दल ते सांगत होते. भारतीय जनतेत शिस्त आणि स्वच्छता याचा संपूर्ण अभाव आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. भारतीय जनतेत शिस्त आणण्यासाठी आपल्या देशाला एखाद्या हिटलरची आवश्‍यकता आहे, असे ते नेहमी म्हणत असत. प्रकाशन समारंभात भाषण करताना, आपण या पुस्तकाच्या पाचशे प्रती विकत घेणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. प्रकाशन समारंभ संपल्यावर पाचशे प्रती घरी आणून देण्याचा आदेश त्यांनी मला दिला. त्याचबरोबर, "तुझे जे काही बिल असेल ते मॉंसाहेबांकडून घेऊन जा,' अशी सूचनाही केली. पुस्तकाच्या पाचशे प्रती तयार झाल्यावर मी त्या नेऊन मॉंसाहेबांच्या स्वाधीन केल्या. उत्सुकतेपोटी मी मॉंसाहेबांना विचारले, "बाळासाहेब या पाचशे प्रतींचे काय करणार आहेत?' मॉंसाहेब म्हणाल्या, "उद्यापासून बाळासाहेबांकडे भेटीला आलेल्या प्रत्येकाला हे पुस्तक भेट म्हणून मिळणार आहे.' घडलेही तसेच. बाळासाहेबांनी त्या पाचशे प्रती वाटून टाकल्या. इतर नेत्यांप्रमाणे त्यांनी नुसती घोषणा केली नव्हती. केवढे हे औदार्य!
"अक्षरधारा'चे संचालक रमेश राठिवडेकर यांनी पुस्तकविक्रीसाठी एक मोबाईल व्हॅन तयार केली होती. या व्हॅनचे उद्‌घाटन बाळासाहेबांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली. राठिवडेकरांची कल्पना मला आवडली होती म्हणून बाळासाहेबांना भेटून त्या व्हॅनचे उद्‌घाटन त्यांनी करावे, अशी विनंती केली. ती व्हॅन संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाडी पुस्तके घेऊन फिरणार असल्याचे मी त्यांना सांगितले. ही कल्पना त्यांनापण आवडली आणि व्हॅनचे उद्‌घाटन करण्याचे त्यांनी मान्य केले. "उद्‌घाटनासाठी ती व्हॅन "मातोश्री'वर घेऊन ये,' असा आदेश त्यांनी मला दिला. दिवस नक्की झाल्यावर मी व रमेश व्हॅन घेऊन "मातोश्री'वर पोचलो. त्या व्हॅनचे नाव आहे, ज्ञानसूर्य रथ! मातोश्री बंगल्याच्या दारातच आम्ही व्हॅन उभी केली. बाळासाहेब उद्‌घाटनासाठी आल्यावर रमेशने व्हॅनला लावलेली रिबिन कापून व्हॅनचे उद्‌घाटन करण्याची विनंती केली. व्हॅनमध्ये पुस्तकांची आकर्षक मांडणी केली होती. पाच-सहा पायऱ्या चढून बाळासाहेब व्हॅनमध्ये आले. बालवाङ्‌मयाच्या विभागात आल्यावर त्यांनी बरीच पुस्तके घेतली. इसापनीतीचे पुस्तक पाहिल्यावर ते म्हणाले, "अशी पुस्तके लहान मुलांना आवर्जून दिली पाहिजेत.' दत्तू बांदेकरांचे पुस्तक पाहिल्यावर ते त्यांच्याबद्दल भरभरून बोलले. उद्‌घाटनपर भाषणात ते म्हणाले, ""माझे मित्र अप्पा परचुरे आणि रमेश राठिवडेकर यांनी ग्रामीण भागाकरिता सुरू केलेला प्रकल्प खूप महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील वाचकांसाठी एका रथाने भागणार नाही. प्रत्येक जिल्ह्याकरिता अशी मोबाईल व्हॅन असायला हवी. याकरिता माझी जी काही मदत लागेल ती मी आनंदाने करीन. "अक्षरधारा'चा हा ज्ञानसूर्य रथ महाराष्ट्रभर दौडत राहावा, अशी इच्छा मी व्यक्त करतो.'' प्रकाशन समारंभ संपल्यावर बाळासाहेब मला म्हणाले, ""लगेच जाऊ नकोस. आतल्या खोलीत जाऊन बस.'' कार्यक्रमासाठी आलेल्या मंडळींना भेटून झाल्यावर बाळासाहेब आत आले आणि त्यांनी माझ्या हातात एक बंद पाकीट दिले. म्हणाले, ""ही मी बोहनी करीत आहे असे समज.'' बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन मी बाहेर आलो. बाहेर येऊन पाहतो तर त्यात काही रक्कम होती. पाकिटात किती रक्कम होती याला महत्त्व नाही; परंतु ज्या भावनेने बाळासाहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिला, तो लाखमोलाचा होता. त्यांच्या आशीर्वादाला उच्च भावनांचे वलय असे.
मी व्यवसायाने प्रकाशक असल्यामुळे बाळासाहेबांकडून एका पुस्तकाची अपेक्षा करीत होतो. याबाबत मी एकदा त्यांच्याशी बोललो होतो. या गोष्टीला बरीच वर्षे होऊन गेली. बाळासाहेबांकडून लिखित स्वरूपात मी अपेक्षा केली नव्हती. माझी पुस्तकाची कल्पना अशी होती- पुस्तकाची सुरवात शिवसेनेच्या स्थापनेपासून करायची. संघटना बांधण्यासाठी त्यांनी केलेले अपार श्रम, त्यांना आलेले अनुभव, त्यांनी सांगायचे. मी ते रेकॉर्ड करून घ्यायचे. या कामासाठी मला त्यांची वेळ पाहिजे होती. दुसऱ्या विभागात त्यांनी काढलेली व्यंगचित्रे घ्यायची. तिसऱ्या विभागात त्यांची गाजलेली भाषणे आणि मुलाखतींचा समावेश करायचा. दुसऱ्या आणि तिसऱ्या विभागाचे काम मलाच करायचे होते; परंतु, बाळासाहेब त्यांच्या कामात इतके व्यग्र होते, की आवश्‍यक तेवढा वेळ ते देऊ शकले नाहीत.
ग. वा. बेहेरे आणि बाळासाहेबांचे संबंध काही कारणामुळे दुरावले होते. परंतु, हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर दोघे एकत्र आले होते. त्या दोघांत आपुलकी निर्माण झाली होती. निवडणुकीच्या काळात ग. वा. बेहेरे यांनी शिवसेनेचा जोरदार प्रचार केला होता. पुणे जिल्ह्यात प्रचारासाठी त्यांना एक जीप देण्यात आली होती; परंतु, जीपच्या प्रवासाचा बेहेरे यांना त्रास होत होता. ही अडचण लक्षात घेऊन बाळासाहेबांनी त्यांना एक कोरी ऍम्बॅसिडर गाडी घेऊन दिली. भारतीय कामगार सेनेच्या नावावर असलेली ती गाडी शेवटपर्यंत त्यांच्याकडेच होती. निवडणूक प्रचार संपला तरी ती गाडी बाळासाहेबांनी त्यांच्याकडेच ठेवली. याला मनाचा मोठेपणा लागतो.
माझी आणि बाळासाहेबांची शेवटची भेट गेल्या मे महिन्यात झाली. माझ्या नातवाची मुंज पुण्यात झाली. मुंजीचे निमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पूर्वीचे गिरगाव, दादर, शिवाजी पार्क त्यांना आठवत होते. बटाटेवडे आणि चहाचा आस्वाद घेताना एक तास कसा गेला ते कळलेच नाही. मी नुकतीच प्रकाशित केलेली पु. लं.ची पुस्तके त्यांना दिली. पु. लं.चे अनेक किस्से त्यांनी सांगितले. मा. दीनानाथांची आणि बालगंधर्वांची नाट्यगीते, पु. लं.च्या कॅसेट्‌स हा त्यांचा विरंगुळा होता. गप्पांच्या ओघात, माझा मुंबई-पुणे प्रवास एक्‍स्प्रेस हायवेमुळे आता सुखकारक झाला आहे की नाही याबद्दल त्यांनी मला विचारले. मी त्यांना म्हणालो, ""बाळासाहेब, केवळ आपल्यामुळेच एक्‍स्प्रेस हायवे झाला आणि त्यासाठी आपणाला लाख सलाम. फक्त आम्हाला जो टोल भरावा लागतो, तो जरा कमी करता आला तर बघा.'' या वेळी मला पु. लं.ची आठवण झाली. एका समारंभात पु. लं.ना आणि इतर मान्यवरांना लामणदिवा भेट म्हणून देण्यात आला. त्या वेळी "पु. ल.' आपल्या भाषणात म्हणाले होते, ""हा लामणदिवा आमच्या सगळ्यांच्या घरी निश्‍चित तेवत राहील; फक्त तेवढे तेलाचे भाव खाली आले तर जरा बरे होईल.''
बाळासाहेबांनी जो दिलदारीचा राजमार्ग बांधून दिला आहे, त्या राजमार्गावर आयुष्यातील माझा पुढील प्रवास चालू राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा