सोमवार, १२ जानेवारी, २०१५

स्वाभिमान जागवलात…निखारा फुलवलात!

स्वातंत्र्योत्तर काळानंतर या देशाच्या इतिहासात मोठ्या अभिमानाने आणि स्वाभिमानाने ज्या नेत्यांचे नाव घेतले जाई त्या यादीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अग्रस्थानी असेल. प्रबोधनकारांकडून मिळालेला रोखठोक बाणा अखेरच्या क्षणापर्यंत जपत त्यांनी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जिवंत ठेवला. राजकारणातले अनेक चढ उतार अनुभवत असताना त्यांनी स्वतःची किंवा कोणत्याही शिवसैनिकाची मान झुकू दिली नाही. राजकारण, जातीव्यवस्था, समाजवाद, सर्वधर्मसमभाव या संकल्पनांचे राजकारण्यांनी घेतलेले सोयीचे अर्थ समाजासमोर मांडत त्यांनी प्रस्थापित ढोंगी राजकारण्यांचा बुरखा फाडला. शिवसेनेच्या जीवावर मोठे होऊन अनेकांनी शिवसेना सोडली, शिवसेनेत फुट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या करिष्म्याने अशी कोणतीही ताकद शिवसेनेला काडीचाही धक्का लावू शकली नाही. शिवसेनाप्रमुखांचा एकेक शब्द जोपर्यंत प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास आहे तोपर्यंत शिवसेनेचा किल्ला असाच अभेद्य राहील. सत्ता असो किंवा नसो शिवसेना आपल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मंत्रानुसार काम करतच राहिली. शिवसेनाप्रमुखांचा दरारा इतका होता की, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही नेत्याची शिवसेनेकडे बोट दाखवण्याची हिंमत नव्हती. सर्वसामान्य जनतेच्या मनातील चीड त्यांच्या प्रत्येक शब्दातून बरसत राहायची. लाखोंचा जमाव मंत्रमुग्ध होऊन बाळासाहेब ठाकरे नावाच्या झंझावाताशी एकरूप व्हायचा. अलीकडच्या राजकारणात मित्रपक्षांनी शिवसेनेची जी वाताहत केली ती शिवसेनाप्रमुख असते तर कधीच झाली नसती. यापुढच्या राजकारणातही शिवसेनेचे स्थान काय असेल हे सध्या सांगता येत नसले तरी जोपर्यंत शिवसैनिकांच्या रूपाने शिवसेनाप्रमुखांनी फुलवलेला अंगार या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धगधगत आहे तोपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाचा झंझावात इतिहासाच्या पानापानात झळकत राहणार. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना Live ग्रुप तर्फे विनम्र अभिवादन!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा