बुधवार, १४ जानेवारी, २०१५

भाग १७ : बाप कम्युनिस्ट, पोरं शिवसैनिक!

भाग १७ : बाप कम्युनिस्ट, पोरं शिवसैनिक!
काळाचा महिमा अगाध असं म्हणतात. संयुक्त महाराष्ट्राच्या रणमैदानात जीवाची बाजी लावली, गिरणगावातल्या कामगारांनी. पण म्हणजे तुम्ही आमचं काय भलं केलंत? असा सवाल त्यांना पोटची पोरं करू लागली. या लढ्यातून मुंबईवर खरंच मराठी माणसाचं राज्य आलं का? आमचे प्रश्न सुटले का? असं ही पोरं विचारू लागली.

दारोदार हिंडूनही नोक-या मिळत नाहीत. साधी वडापावची गाडी टाकायची म्हटली तर बापाजवळ पैसे नाहीत. अशा परिस्थितीत मराठी माणसांची नोकरी, भाकरी आणि घर’ यासाठी आवाज उठणारे बाळासाहेब ठाकरे या तरुणांना जवळचे वाटू लागले. शिवसेनेच्या दाक्षिणात्यांविरोधातल्या ‘बजाओ पुंगी, हटाओ लुंगी’त हे तरूण मग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. शिवसेनेच्या ‘जला दो जला दो, लालबावटा जला दो’ या घोषणेच्या तालावर ही कम्युनिस्टांची पोरं नाचू लागली.

बाप कट्टर कम्युनिस्ट आणि पोरगा शिवसैनिक१९६८च्या निवडणुकीत गिरणगावात हे चित्र सर्रास दिसू लागलं. कारण तेव्हा कम्युनिस्ट संघटना मालक विरुद्ध कामगार एवढीच लढाई लढत होते. स्थानिकांना नोक-या मिळाव्यात हा मुद्दा त्यांच्या गावीही नव्हता. त्यामुळं बेरोजगार तरुणांना शिवसेनेचं अपिल पटू लागलं. रोखठोक रांगडी भाषा, राडा करणा-या पोरांच्या मागं ठामपणं उभं राहणं, तुरुंगात गेलेल्या पोरांच्या घरच्यांची काळजी घेणं, हे पाहून कामगारांची पोरं बाळासाहेबांवर फिदा झाली.

दुसरीकडं या पोरांच्या आई-बापांची जामच गोची झाली होती. आपलीच पोरं आहेत म्हणून त्यांना गप्प बसावं लागत होतं. लाल बावटा जला दो म्हणा-या पोरांना भगवा झेंडा जला दो असं प्रत्युत्तर देता येत नव्हतं. कारण तो झेंडा शिवरायांचा. 

६८च्या निवडणुकीतलं वातावरण अनुभवणारे कम्युनिस्ट पक्षाचे अरविंद घन:श्याम पाटकर सांगतात, ‘‘शिवसेनेच्या पोरांच्या झुंडीच्या झुंडी त्यावेळी रस्त्यावर असत. चाळीतली सर्व पोरं सेनेत असायची. पाच ते १५-२० वर्षांची पोरं. काही कळायचं नाही, पण शिवसेना जिंदाबाद! कुठं गडबड, तणाव झाला की पोरं तिकडं धावायची.
कम्युनिस्ट उमेदवारासोबत दोघे तिघे त्याच्या चाळीतले कार्यकर्ते असायचे. पण शिवसेनेच्या उमेदवारासोबत पोरांची ही गर्दी असायची. सर्वांवरच या गर्दीचं दडपण यायचं. सेनेलाच मत द्या असा हट्ट ही पोरं आईबापाकडं करायची. मतदार चाळीतून निघाला की तो बूथपर्यंत जाईपर्यंत पोरं त्याची पाठ सोडायची नाहीत. या सळसळत्या रक्ताच्या पोरांनीच ख-या अर्थानं ही निवडणूक लढवली.’’

१९६८च्या निवडणुकीपर्यंत कार्डवाटप हा महत्त्वाचा प्रकार होता. आपली माहिती असलेलं कार्ड मतदाराला मतदानासाठी घेऊन जावं लागे. पक्ष कार्यकर्ते हे कार्ड बनवायचे. या निवडणुकीत कार्ड कम्युनिस्ट पक्षाचं आणि मत शिवसेनेला असा प्रकार झाला.
१९६८मधला सेनेचा हा कार्यकर्ता पूर्ण कोरा होता. त्याच्या डोक्यात फार मोठं तत्वज्ञान, दिशा असं काही नव्हतं. फक्त मराठी माणसाचं भलं झालं पाहिजे, एवढंच त्याला कळत होतं. पण भारावलेला कार्यकर्ता किती हिंमतीनं काम करतो त्याचं अनोखं उदाहरण या पोरांच्या रुपानं पाहायला मिळालं. 

बरं, निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आणि कार्यकर्ते दोघंही फाटक्या खिशाचे. पण मनात जबरदस्त जिगर होती. दोस्तांच्या खिशातून मिळतील तेवढे पैसे गोळा करून, अपार मेहनतीची तयारी ठेवून उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्याविषयी बोलूयात उद्याच्या भागात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा