बुधवार, १४ जानेवारी, २०१५

भाग १३ : ठाण्यावर भगवा

शिवसेनेनं विरोध केल्यानं लोकसभेच्या १९६७च्या निवडणुकीत कृष्ण मेनन यांचा पराभव झाला. यामुळं सेनेच्या अंगात बारा वाघांचं बळ संचारलं. त्यातच ठाणे नगरपालिकेची निवडणूक आली. या निवडणुकीच्या मैदानात आपण उतरायचं, असं बाळासाहेब आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ठरवलं. 

बाळासाहेबांचं हे मित्रमंडळ म्हणजे, प्रबोधनकारांकडं नियमित येणारे समीक्षक आणि विचारवंत धोंडो विठ्ठल देशपांडे, ‘मार्मिकचे लेखक प्रा. स. अ. रानडेएड. बळवंत मंत्रीमाधव देशपांडेश्याम देशमुख, पद्माकर अधिकारी आदी मंडळी. हे लोक आपापले नोकरीधंदे सांभाळून संध्याकाळी शिवसेनेचं काम करण्यासाठी येत. यापैकी देशमुख आणि देशपांडे हे सिव्हिल इंजीनिअर होते. 

शिवसेनेच्या नव्याने स्थापन होणा-या शाखांशी, तरुणांशी माधव देशपांडे संपर्क ठेवून असत. त्यांनी १९६७-६८च्या मुंबई, ठाणे, पुणे या निवडणुकांमध्ये तिकीट वाटण्यापासून ते प्रचारापर्यंतची सर्व कामे केली.
ठाणे नगरपालिका निवडणुकीच्या वेळी या मित्रमंडळाला येऊन मिळाले, मनोहर जोशी, त्यांचे भाचे सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर.
   
त्या काळात बाळासाहेबांकडं स्वत:ची गाडी नव्हती. पण जोशी मामा भाच्याकडं स्वत:च्या मोटारी होत्या. बाळासाहेबांनी सुरुवातीला बराचसा प्रवास या गाड्यांमधूनच केला. मनोहर जोशी कधी गाडी चालवत तेव्हा ‘माझा ड्रायव्हर एलएलबी आहे’, असं बाळासाहेब गमतीनं म्हणायचे.

१३ ऑगस्ट १९६७ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. शिवसैनिकांनी प्रचारानं ठाणे ढवळून काढलं. बाळासाहेबांसोबत मनोहर जोशीदत्ताजी साळवी, सुधीर जोशी प्रचाराच्या मैदानात उतरले.

मतदानाच्या दिवशी ठाण्यात पाऊस सुरू होता. तरीही ७० टक्के मतदारांनी मतदान केलं. १४ ऑगस्टला लगेच निकाल लागला. एकूण ४० जागांपैकी पैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले. त्यामुळं शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला. या निवडणुकीत जनसंघाचे ८प्रजासमाजवादीचे ३अपक्ष ८ उमेदवार निवडून आले.

ठाणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी वसंत मराठे आणि उपाध्यक्षपदी एड. अरविंद दीक्षित हे निवडून आले. या दोघांच्या सत्कारासाठी स्वतशिवसेनाप्रमुख उपस्थित राहिले. त्यावेळच्या भाषणात ते म्हणाले, ‘‘जनतेच्या हितासाठी लढणारी संघटना ठाण्यात उतरण्याचा १०० वर्षांतील हा पहिलाच प्रसंग होय. 
पुष्कळ लोक म्हणत होते कीशिवसेना नष्ट होईल. आम्हाला फक्त जनताच नष्ट करू शकेल. नगरपालिकेत खूप लाचलुचपत आहे असे म्हणतात. ती आम्ही साफ गाडून टाकू. 
लोक आम्हाला देशप्रेमाचे धडे देतात. आम्हीही भारतमातेचीच लेकरं आहोत. प्रथम आम्ही देशच मानतो आणि नंतर महाराष्ट्र. पण महाराष्ट्र जगला तरच देश जगेल, हेही ध्यानात ठेवा. ठाणे शहरात आम्ही सुधारणा करू शकलो नाही तर आम्हाला खुशाल आणि जरूर बाहेर काढा.’’

या विजयामुळं शिवसेनेचा वट वाढला. एरवी शिवसेनेला जमेतही न धरणारे पक्ष शिवसेनेचं कौतुक करू लागले.
शिवसेनेच्या या विजयावर बोलताना प्रजासमाजवादी पक्षाचे नेते डॉ. जी. जी. पारीख म्हणाले, ‘अन्य प्रांतातील एकूण प्रांतीय राजकारणाची दिशा लक्षात घेताशिवसेनेचा विजय अगदी अपेक्षित असाच आहे. 
या निर्विवाद विजयामुळं शिवसेना मराठी भाषिक जनतेच्या भावनांचं प्रतिबिंब व्यक्त करणारा राजकीय पक्ष म्हणून विकास पावेलअसं मानण्यास प्रत्यवाय नाही. शिवसेनेच्या काही मागण्यांशी मीही सहमत आहे.’’ युतीच्या राजकारणाची ही नांदी होती. त्याविषयी उद्याच्या भागात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा