शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

खूप शिकायचे राहून गेले.. प्रभाकर वाईरकर

खूप शिकायचे राहून गेले..
प्रभाकर वाईरकर
response.lokprabha@expressindia.com
मार्मिकया बाळासाहेब ठाकरे यांच्या साप्ताहिकाचे मुखपृष्ठ करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या, त्यानिमित्त त्यांना नियमित भेटणाऱ्या एका व्यंगचित्रकाराने रेखाटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे भावचित्र



बाळासाहेबांनी मराठी माणसाला व्यंगचित्र पाहायला, वाचायला शिकवले. चित्रकला पाहणे, अनुभवणे हेच जिथे आपले दिवास्वप्न होते, तिथे बाळासाहेबांनी व्यंगचित्राचे साप्ताहिक सुरू करून एक क्रांतिकारी पाऊलच टाकले होते.
बाळासाहेब नक्की कोण? राजकारणी की व्यंगचित्रकार? मला वाटते, व्यंगचित्रकला ही बाळासाहेबांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होती. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे या कलेची प्रेरणा होती.
बाळासाहेबांना एक व्यंगचित्रकार म्हणून जवळून पाहण्याचा योग गेल्या काही वर्षांत आला. नेमकं सांगायचं तर, ‘मनसेची स्थापना माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन नंतर पाठीवर थाप मारून स्वागत करण्याच्या बाळासाहेबांच्या रिवाजाची सुरुवात एकाच वर्षांत झाली. राज ठाकरे (शिवसेना सोडण्यापूर्वी) ‘मार्मिकदिवाळी अंकाचे मुखपृष्ठ करीत होते. त्यांनी शिवसेना सोडल्यावर ती जबाबदारी बाळासाहेबांनी माझ्यावर सोपवली. गेली सहा वर्षे मुखपृष्ठ करण्याच्या निमित्ताने एका पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला. अचूक मार्गदर्शक आणि व्यंगचित्रकला ज्याच्या हाडामांसात भिनलेली आहे, असं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्त्व मलाही दिसू लागलं.
अगदी या ऑक्टोबरातच त्यांच्याशी तीनदा चर्चा करण्याचा योग आला. मार्मिक दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासंदर्भातच ही चर्चा होती. थरथरत्या हाताने जमेल तसे ड्रॉइंग काढून दाखवत, स्वत:ची कल्पना सांगत, एवढेच नाही तर त्या व्यंगचित्राखालची कॅप्शनही अचूक सांगत.
तिसऱ्यांदा गेलो ते रंगीत, फायनल व्यंगचित्र त्यांच्यासमोर पसंतीला ठेवण्यासाठी. हा एका मुखपृष्ठासाठी तीन भेटींचा शिरस्ताही नेहमीचा. प्रत्येक वेळी ते चित्र निरखून पाहणार, त्यात जराही चूक त्यांना चालत नसे. कधी कधी वाटायचे की इतक्या वेळा जायचे एका कव्हरसाठी, मग मला कशाला नेमले. पण नंतर लक्षात येऊ लागले, मी जितक्या वेळा जात राहिलो तितका माझा जास्त फायदाच होत होता. एक तर मला बाळासाहेबांचा सहवास लाभतोय, त्याचबरोबर व्यंगचित्रातले खूप काही शिकायलादेखील मिळायचे. मागून देखील मिळाले नसते ते या सहा वर्षांत मार्मिकच्या या कामामुळे मिळाले होते. गेल्या महिन्यात, बाळासाहेबांनी स्वत: चितारलेल्या व्यंगचित्रांचे भांडार माझ्यापुढे ठेवले. त्यांनी मला दाखवली असतील अवघी २० ते २५ चित्रे. तरीही ते भांडारच, कारण एवढय़ा वर्षांत मी कधीही त्यांचीओरिजिनलचित्रे पाहिली नव्हती. एकेक चित्र दाखवताना प्रत्येकाचे मर्म ते सांगत होते. बारीक जाड फटकाऱ्यांतून त्यांनी साधलेला पर्स्पेक्टिव्ह, कलर बॅलन्स हे सारे त्यांच्या तोंडून ऐकणे हा अनुभव म्हणजे, उत्खनन करता करता सुंदर ऐतिहासिक शिल्प सापडावे, तसा होता!
हे सारे सांगतानाही त्यांच्या खुर्चीच्या बाजूला त्यांची पाठराखण करणारे मोठय़ा आकारातील (साधारण १५ बाय १२ इंच) व्यंगचित्रकलेत बाळासाहेबांनी गुरू मानलेल्या डेव्हिड लो यांचे भारताच्या संरक्षणाची दुर्दशा दाखवणारेओरिजिनलव्यंगचित्र होते. व्यंगचित्रे मोठय़ाच आकारात काढणे बरे वाटते, असे बाळासाहेब म्हणत पण मी पाहत होतो ती व्यंगचित्रे साधारण तीन वा चार कॉलमचीच होती. म्हणजे आकाराने लहानच, तरीही त्यामध्ये पाच-सहा मनुष्याकृती.. प्रत्येक व्यक्तीचे चित्रण अगदी पक्के. फटकारे अगदी तोलून-मापून मारलेले. कंट्रोल्ड. एखादा फटकारा आपल्याला हवा तसा जमला नाही म्हणून तेवढय़ापुरता पांढरा रंग सर्वच व्यंगचित्रकार लावत असतील, पण बाळासाहेबांच्या तेवढय़ा चित्रांमध्ये फक्त एकदाच मला तसा पांढरा केलेला एकच चुकार फटकारा दिसला. माझ्या दृष्टीने हा चमत्कारच- बाळासाहेबांचा रियाज, चित्रकलेची जबरदस्त ओढ आणि हातामध्ये असलेले कौशल्य यांच्या संगमातून घडलेला. बाळासाहेबांनी ही कला स्वत:च्याच निरीक्षणाने, चित्रकलेच्या ध्यासाने, रियाजाने अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवली. दादा नेहमी बाळासाहेबांना इंग्लिश नियतकालिके आणून देत आणि त्यातील व्यंगचित्रांचे निरीक्षण आणि आवडलेल्या व्यंगचित्रांची कॉपी या प्रकारे बाळासाहेबांचीप्रॅक्टिससुरू झाली. या शिकण्यादरम्यान त्यांना प्रख्यात ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रकारांनी वेड लावले. लो यांच्या व्यंगचित्रांतील मार्मिकता, त्यांची रचना, बॅलन्स, ॅनाटॉमी (हो, व्यंगचित्रांतल्या शरीरांच्या रचनेचेही शास्त्र- ॅनाटॉमी- असते. फक्त हे शास्त्र पुस्तकी नसते, तर प्रत्येक व्यंगचित्रकार ती ॅनाटॉमी आपापल्या स्टाइलप्रमाणे ठरवतो-) तसेच लो यांनी वापरलेल्या कॅप्शन्स वा कॉमेंट्स या सर्व गुणांनी बाळासाहेब राजकीय व्यंगचित्रांकडे अधिक डोळसपणे पाहू लागले. इतर व्यंगचित्रकारांनीही बाळासाहेबांवर दुरूनच प्रभाव पाडला, त्यात ब्रिटिश व्यंगचित्रकार बेन बेनरी स्ट्रॅव्ब यांची नावे वरची. परंतु बाळासाहेबांचा देव एकच, डेव्हिड लो!
ते नेहमीच इतर कलाकारांचा सन्मान करत. आपल्यापेक्षा लहान आहे, मग त्याने केलेल्या कामाला दाद का द्यावी असा विचार (जो काही महान चित्रकारही करतात) बाळासाहेबांच्या मनाला शिवत नसे. बाळासाहेब भेटलेल्या माणसाची कायम आठवण ठेवायचे. त्यातही तो कलाकार असेल तर तो त्याच्या गुणदोषांसकट लक्षात राहायचा. त्यांच्या संपर्कात येण्यापूर्वी त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त मी एक शुभेच्छापत्र पाठवले होते. ८० या आकडय़ात त्यांचा चेहरा चितारला होता. जानेवारीत पाठवलेल्या या शुभेच्छापत्राची आठवण त्यांनी मी ऑगस्टमध्ये भेटल्यावर आवर्जून करून दिली होती. खरे तर त्यांनी लक्षात ठेवावे असे काय होते माझ्यात.. पण हे बाळासाहेबांचे कलाकृतीच्या आणि ओघानेच कलाकाराच्या प्रती असणाऱ्या स्नेहभावाचे प्रतीक होते. मी तर तसा त्यांच्या सहवासात नवखाच, पण मार्मिकच्या निमित्ताने मी खूप वेळ त्यांच्या सहवासात राहू शकलो. अनेक जुन्या सैनिकांनादेखील असा लाभ झाला नसेल, पण मला झाला. कारण बाळासाहेबांचे कलाप्रेम.
एकदा मार्मिकच्या दिवाळी अंकाचे कव्हर करताना त्यांनी मला त्यांची कल्पना चितारून दाखवली. परंतु ते समाधानी दिसत नव्हते. थोडय़ा वेळाने मी जरा धैर्य एकवटून त्यांना विचारले, ‘साहेब, मीही दोन-तीन कल्पना चितारल्या होत्या, दाखवू का?’ तर माझी ती स्क्रिबल्स बाळासाहेबांनी पाहिली म्हणाले, ‘ही तुझी कल्पना आपण कव्हरसाठी वापरू या आणि मी केलेली आतल्या पेजवर वापरू या.’ मी अवाक् झालो.
व्यंगचित्रकलेत बाळासाहेबांचा आवडता विषय आहेकॅरिकेचर’. या अर्कचित्रांमध्येलाइकनेसमहत्त्वाचा, त्यात जराही तडजोड त्यांना खपत नसे. हा आग्रह त्यांची कॅरिकेचर पाहतानाही जाणवतो. त्यांची अनेक कॅरिकेचरमास्टरपीसठरतील, त्यापैकी मला आवडते ते नेहरूंचे- तोंडात रबरी निपल असलेले दुडदुडणाऱ्या बालकाचे रूप त्या नेहरूंना बाळासाहेबांनी दिले आहे. विषयावर अगदी अचूक बोट ठेवणारे हे परिणामकारक कॅरिकेचर आहे. कॅरिकेचरिस्ट म्हणून त्यांचे अनेक आवडते व्यंगचित्रकार होते, पण त्यामध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख अगदी नेहमीचा.‘राजा कॅरिकेचर छान काढतो,’ असे ते नेहमी म्हणत.
बाळासाहेब हे शिक्षकच! व्यंगचित्रासंदर्भात चर्चा करताना ते व्यंगचित्र कसे असावे, कसे असू नये, त्याची रचना आणि त्याचे मर्मस्थळ, यासंबंधी सारे काही समजून सांगावेसे त्यांना वाटे. चित्रात डिटेल्स भरपूर हव्यात. कोणत्या व्यक्तीचे व्यंगचित्र आहे ते नुसते पाहूनच समोरच्याला ओळखता आले पाहिजे. तुम्हाला त्याखाली नाव लिहायची गरज भासली नाही पाहिजे. बाळासाहेब सांगत, ‘तुमचे व्हिजुअल, थॉट एकदम स्ट्राँग हवे आणि त्याला चांगल्या ड्रॉइंगची जोड हवी. अशा वेळी त्यांच्याखजिन्यातील अनेक परदेशी व्यंगचित्रकारांची पुस्तकेही ते आवर्जून समोर ठेवत. त्यातली नेमकी चित्रे दाखवत.
बाळासाहेबांच्या प्रत्येक चित्राला एक वेगळीच खोली असायची. त्याची पाश्र्वभूमी सुस्पष्ट असायची. सुपर फिनिश असायचे. चित्राइतकीच त्याची कॅप्शनदेखील टोकदार, बोचरी अशी असायची. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रात तुम्हाला अगदी सूक्ष्म असे पॉज दिसतील. असे पॉज घेण्यासाठी त्या कलेवर तुमची हुकुमत असावी लागते. ती बाळासाहेबांच्यात होती. अलीकडेच संगणकाचा जमाना आला. एकदा उद्धवनी त्यांना आयपॅडवर स्केचसंबधी काही गोष्टी करून दाखविल्या, बाळासाहेब अतिशय उत्सुकतेने पाहत होते. बाळासाहेबांचा हात थरथरायच्या आधी जर त्यांना संगणक मिळाला असता तर कदाचित आपणास आणखीन काही नवीन पाहता आले असते.
बाळासाहेबांना लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे खूप आवडे. त्यांनी एकदा त्यांचे फोटो-बायोग्राफी पुस्तक मला भेट दिले, वर सांगितले यावर मला आठ दिवसांत तुझी प्रतिक्रिया हवी आहे. बाळासाहेबांनी राजकीय व्यंगचित्र ही संकल्पना मराठीत चांगलीच रुजवली. बाळासाहेब अनेक राजकारण्यांना आपल्या कुंचल्याचे फटकारे द्यायचे. मला तर असे वाटते की, आपले व्यंगचित्र बाळासाहेबांनी एकदा तरी काढावे अशीच प्रत्येक राजकारण्याची इच्छा असावी.
यामार्मिकच्या सफरीत त्यांची अनेक रूपे पाहिली- बाप, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, खटय़ाळ मित्र, घरगुती साधा माणूस, विनोदकार, नकलाकार, अजातशत्रू..
ही रूपे आता कोरली गेली आहेत. कधी कधी वाटते की मला बाळासाहेबांकडे जायला उशीरच झाला. त्यांच्याकडून खूप काही शिकायचे राहूनच गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा