शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा एक श्वास, ज्वलंत हिंदुत्वाचा एक हुंकारच !!!

शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी व्यक्‍तिमत्त्व म्हणजे प्रबोधनकारांचा प्रगल्भ वारसा असणारे एक नेतृत्व ! बाळासाहेब म्हणजे एक आगळा-वेगळा मनस्वीपणा !! शिवसेनाप्रमुख म्हणजे परिणामांची चिंता न करता ठाम पणे वर्तन करणारा ज्येष्ठ राजकीय नेता !!! बाळासाहेब म्हणजे जबर आक्रमकता ! दिलेल्या शब्दाला शंभर टक्‍के जागणारे नेतृत्व !! बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा एक श्वास, ज्वलंत हिंदुत्वाचा एक हुंकारच !!! बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे मूल्यमापन करणे हे तसे फार कठीण आहे, कारण राजकीय क्षेत्रातील हा एक सरळ-साधा माणूस आहे. त्यामूळे बाळासाहेबांशी वागणे फार सोपे जाते. जे मनात, तेच ओठात असते. त्यात कोणतीही फसवेगिरी नाही. बोलणे पण रोखठोक ! 'पटलं तर बोला अन्यथा, विषयच सोडा' या स्वभावामुळे सध्याच्या दगदगीच्या व स्वार्थी राजकीय जीवनातही त्यांचा वेगळा असा ठसा उमटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मूळचे एक व्यंगचित्रकार. त्यांचे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक'. त्यातील काही व्यंगचित्रे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. व्यक्‍तिचे नीट निरीक्षण करणे, तिच्यातील व्यंग शोधून काढणे, व्यंगचित्राद्वारे ते चित्र अचूक तुमच्यासमोर उभे करणे यात बाळासाहेबांचा हात क्‍वचितच कोणी धरू शकेल. म्हणूनच बाळासाहेब म्हणतात की, ' मी शिवसेना प्रमुख झालो त्याचं कारण माझी व्यंगचित्रकला. आपल्या आजुबाजुला घडणार्‍या अनेक विविध गोष्टींकडे सतत जागरूकपणे, मार्मिकपणे ते पहात असतात. आपल्या चिकित्सक निरीक्षणांनी आयुष्यातील उणिवा वेचून थोडयाशा मिस्किलपणे त्या लोकांसमोर मांडीत असतात. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रकलेला उत्तेजन दिले. ते म्हणत, 'शाळेत शिकून शिक्‍का मिळतो, शिक्षण नव्हे." बाळासाहेबांची काही व्यंगचित्रे लंडनमधून प्रसिध्द होऊ घातलेल्या इंग्रजीतल्या चर्चिल बायोग्राफी इन कार्टून्स" या पूस्तकासाठी निवडली गेली होती. शिवाय 'फ्री प्रेस' मधून त्यांची व्यंगचित्रे प्रसिध्द होतच असत. त्यांचे स्वत:चे 'मार्मिक' हे व्यंगचित्र साप्ताहिक अत्यंत लोकप्रिय झाले होते. १९६७ मध्ये केंद्रात इंदिराजींचे, तर इतर नऊ राज्यांत विरोधी सरकारे आली होती. बाळासाहेबांनी त्यावेळी काढलेल्या व्यंगचित्रात इंदिराजींचे बाकदार नाक काढले असून त्यावर छोटे छोटे नऊ मुख्यमंत्री काढले होते आणि खाली फक्त तीनच शब्द लिहिले होते 'नाकी नऊ आले.' मराठी वाकप्रचाराचा व्यवहारात सुंदर उपयोग करणे हे तर बाळासाहेबांचे खास वैशिष्ट्य. त्यांचे दुसरे व्यंगचित्र म्हणजे इंदिराजींच्या मृत्यूनंतर त्यांनी एक नुकतीच विझलेली पणती दाखवली व त्या पणतीच्या धुरातून त्यांनी इंदिराजींच्या चेहर्‍याची अस्पष्ट होत असणारी आकृती काढली होती. हे व्यंगचित्र पहाताक्षणीच 'मदर इंडिया' ने बाळासाहेबांचा 'बेस्ट कार्टूनिस्ट ऑफ इंडिया' म्हणून गौरव का केला ते कळते. बाळासाहेब म्हणजे शिवसेनेचे कुटुंबप्रमुख. कुटुंबप्रमुखाचे लक्ष त्यांच्या कुटुंबातील थोरा-मोठ्यांपासून ते लहान बालकापर्यंत असते तसेच बाळासाहेबांचे असते. त्यांना जेवढी काळजी शिवसेना नेत्यांची तेवढी काळजी सामान्य शिवसैनिकांची. म्हणून ते नेहमी म्हणतात, मी सर्वांना सांगतो शिवसैनिक हे माझं सर्वस्व आहे, शिवसैनिक हे आपलं भांडवल आहे. ते आहेत म्हणून तुम्ही आहात, मी आहे. त्यांना जपा, कधीच त्यांच्याशी उर्मटपणे वागू नका, हे माझं सगळ्यांना स्पष्ट सांगणं आहे. शिवसैनिक जखमी झाला तर त्याच्या घरी बाळासाहेब हमखास जातात. शिवसैनिकाचे निधन झाले तर त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी जातात आणि बॉम्ब स्फोटासारख्या दुर्दैवी घटनेत जर कोणी मृत्युमुखी पडले तर त्या व्यक्‍तीच्या कुटुंबीयांना दिलासा आणि आर्थिक मदत करायला बाळासाहेब कधीही विसरत नाहीत. म्हणून ते केवळ शिवसेनेचे कुटुंबप्रमुख राहिले नाहीत तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख झाले. ज्या वेळी पक्षाचे कार्यकर्ता आपल्या नेत्यांवर इतके अकृत्रिम प्रेम करतात त्यावेळी त्या कुटुंबप्रमुखास पहिले वंदन करणे हे माझे कर्तव्यच ठरते. शिवसेना प्रमुख म्हणजे समाजाची अचूक नाडी ओळखणारा नेता. ही गोष्ट तर खरीच आहे की, ज्याला जनतेची नाडी ओळखता येते तोच त्यांचा नेता बनतो. मराठी माणूस मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात स्वाभिमानाने जगला पहिजे ही काळाची निकड होती. शिवसेनाप्रमुखांनी ती ओळखली. ज्यावेळी हिंदुस्थानात हिदूंना मरगळ येत होती, त्यावेळी तेही त्यांनी ओळखले आणि शिवसैनिकांना जेव्हा धाडसी नेतृत्वाची जरूरी होती त्या त्या वेळी शिवसेनाप्रमुख मागे राहिले नाहीत तर हिंमतीने पुढे गेले. एकदा आदेश दिल्यानंतर 'माझा तो आदेश नव्हताच" असे ते म्हणाले नाहीत. म्हणूनच बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर एका नेत्याने जेव्हा अशी भूमिका घेतली की, बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक होते, त्यावेळी बाळासाहेब ठामपणे म्हणाले, "ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान वाटतो. पळपुटेपणा त्यांना स्पर्शच करू शकत नाही.' लोकांची, कार्यकर्त्यांची नाडी ते अचूक ओळखतात. विशेष म्हणजे महापौरपद, मुख्यमंत्रीपद, लोकसभेचे अध्यक्षपद किंवा कोणत्याही मोठ्या पदाचा शिवसेनाप्रमुखांना कधीच मोह होत नाही. 'कोणत्याही निवडणुकीला मी उभा रहाणार नाही किंवा कोणतेही राजकीय पद मी स्वीकारणार नाही.' असे म्हणणारा राजकीय नेता फक्त बाळासाहेबच.
'वक्‍ता दशसहस्त्रेषू' असे म्हणतात. दहा हजारात एखादाच माणूस चांगला वक्‍ता होतो आणि एखाद्या माणसाच्या प्रत्येक सभेला कमीत कमी लाख लोक उपस्थित रहातात. त्यांचे भाषण म्हणजे ढगांचा गडगडाट, विद्युल्लतेचा लखलखाट आणि विचारांचा महामंत्र. आणि एवढे असूनही शिवसेनाप्रमुख कृत्रिम वाटले नाहीत. ते सरळसरळ समोरच्या प्रत्येक माणसाशी सहजपणे बोलतात, जवळीक साधतात.
त्यांच्या भाषणातील लोकांना आकर्षित करणारा आणखी एक गुण म्हणजे त्यांचा विनोद. कधी तो भाषणात येतो तर कधी मुलाखतीत. कधी 'मार्मिक' च्या किंवा 'सामना' च्या अग्रलेखात, तर कधी सहज गप्पा मारताना. विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या सभांना असणारी प्रचंड गर्दी कधीच कमी झाली नाही. लोकांना हसवावे आणि चेतवावे ते बाळासाहेबांनीच. म्हणूनच असे जरी म्हटले तरी अतिशयोक्तीचे होणार नाही की शिवसेनेच्या प्रत्येक यशात सिंहाचा (की वाघाचा?) वाटा हा बाळासाहेबांचाच. त्यांच्या भाषणांनी त्यांनी शिवसेना निर्माण केली आणि वाढविली, हेच खरे. आता तर शिवसैनिकांनी घोषणाच शोधून काढली आहे, 'मराठी माणूस भडकला, भगवा झेंडा फडकला.' म्हणूनच शिवसेनेचे कार्यप्रमुख श्री. उध्दव ठाकरे म्हणतात, 'बाळासाहेबांचं नेतृत्व, वक्‍तृत्व यांचा एक वेगळाच बाज आहे. तो अभ्यासण्याचा मी कायम प्रयत्‍न करीत आलो आहे. त्यांचं वक्‍तृत्व कसं आहे? तर ते संयत आहे, धारदार आहे, तळपत्या तलवारीसारखे आहे. त्यांच्यावर प्रबोधनकार, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे यांच्या वक्‍तृत्वाचा प्रभाव असल्याचं त्यांनीच ठिकठिकाणी सांगितलं आहे. मला यात महत्त्वाची गोष्ट वाटते ती त्यांच्या प्रांजळपणा. मुळात आपल्यावर विशिष्ट व्यक्‍तींचा प्रभाव आहे, हे मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो. तो त्यांच्यात आहे.' ते पुढे म्हणतात, 'साहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वात एक किमयागार दडलेला आहे. ते सभास्थानी आले की, जणू सामूहिक संमोहन झाल्याप्रमाणे सभेत रोमांच निर्माण होतो. शिवसैनिकांच्या अंगात वारं संचारतं. जोडीला फटाक्यांची धूमाधूम असते. भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक नाचायला लागतात. साहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा शिवसैनिक बेभान होऊन देत असतात. वातावरणात एक अपूर्व असा जल्लोष निर्माण होतो. 'माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनी आणि मातांनो' हे शब्‍द त्यांनी उच्‍चारताच पहिल्या वाक्याला टाळ्या घेणारा नेता एकच आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेच.' बाळासाहेबांची भाषा ओघवती असते. श्रोत्यांशी ते व्यक्तिश: बोलत आहेत असा भास होतो. त्यांचे विरोधक सुध्दा त्यांचे भाषण ऐकल्यावर त्यांचे भक्‍त होतात. अनेकांनी अनेकदा मान्य केले आहे की, जीवनावश्यक संप्रेरक मिळण्याचे ऊर्जास्थान म्हणजे बाळासाहेबांचे भाषण. वक्‍तृत्व असो अथवा विचार असतो, श्रोते नेहमीच बाळासाहेबांशी समरस झाले. का होणार नाहीत? त्यांची भाषा, त्यांचे शब्द हे महत्त्वाचे. बाळासाहेब म्हणतात, 'आयुष्यात मी दोन गोष्टींचा कमालीचा तिरस्कार केला. एक, अप्रामाणिकपणा आणि दुसरी बेइमानी. मला कुणी फसवलं की खूप दु:ख होतं. मी विश्वास टाकतो तेव्हा हाताचं राखून न ठेवता विश्वास टाकतो. माझं म्हणणं - शब्द देताना दहा वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यावर तो पाळा.'
'माझी एक अपेक्षा आहे की, माझ म्हातारपण अत्यंत निवांतपणे जावं. तसंच आतापर्यंत जे कार्य मी उभं केल आहे त्याबाबत लोकांनी माझ्या पाठीत वार करू नये. लोकांनी माझा विश्वासघात करता कामा नये. मी तर लोकांचा विश्वासघात निश्‍चितच करणार नाही
असे धारदार शब्द आणि ओजस्वी विचार असणारे बाळासाहेब! शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये एक विलक्षण आकर्षण आहे, त्यामुळे सर्वच क्षेत्रांतील व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होतात. आज त्यांना भेटण्यासाठी सारा देश उत्सुक आहे. आम्ही काम करताना कधी चुकलो तर त्यांच्याकडे आम्ही पोहचण्यापूर्वीच आमची चूक त्यांना सांगितली जाते. अनेक शिवसैनिक आणि इतर मान्यवर बाळासाहेबांना भेटायला आणि त्यांच्या मनातील विचार बाळासाहेबांसमोर मांडायला उत्सुक असतात. आपल्या यशाचे श्रेय देवतांना आणि देवांना देणारा हा महान नेता, 'मार्मिक'मध्ये बाळासाहेबांची एक दिलखुलास आगळी - वेगळी अराजकीय बातचीत छापून आली होती : आपल्याजवळ असलेल्या बाबींपैकी कुठली गोष्ट आपल्याला अमूल्य वाटते?
- सर्वप्रथम माझे छंद, हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि शिवसैनिकांचे अमाप प्रेम. बागकाम, निसर्गात रममाण होणं हे माझे आवडते छंद आहेत. घरातलं छोटेखानी मत्स्यालय तासंतास न्याहाळंण, हा माझा आवडते छंद आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, रंगाचे मासे, त्यांच्या हालचाली, त्यांची भांडण हे सार लोभसवाणं असतं. निसर्गाच्या सान्‍निध्यात तर मी देहभान हरपून जातो. आज घडीला वेळ मिळत नाही म्हणून मला क्रिकेटचे सामने पहाता येत नाहीत. एकेकाळी क्रिकेटचा मी जबरदस्त चाहता होतो आणि आजही आहे. क्रिकेटचा सामना बघताना मी सर्व काही विसरून जातो. वेळ मिळाला तर चिखलमाती तुडवत शेतात शेतकाम करणंही मला खूप आवडल असतं.
कुठल्या गोष्टीमुळे आपण निराश किंवा अस्वस्थ होता?
- जेव्हा कोणी माझ्या पाठीत वार करतो तेव्हा.
स्वत:च्या व्यक्तिमत्वातील कोणती गोष्ट आपणाला सर्वाधिक नावडती आहे?
- ते ठरवण्यासाठी मला प्रदिर्घ काळ आरशासमोर उभे राहून स्वत:च निरीक्षण केलं पाहिजे.
आपल आवडत स्वप्‍न कोणतं?
- माझ्याजवळ भरपूर संपत्ती असावी आणि ती इतरांकरिता मनमुराद दान करण्याची संधी मला परमेश्वराने द्यावी.
आपणाला सर्वात जास्त भय कोणत्या गोष्टीचं वाटतं?
- माझ्या वडीलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळे 'भय' हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
ही बाळासाहेबांची अराजकीय बातचीत त्यांचा स्वभाव दाखवते.
- 'शिवसेनेच्या भवितव्याबद्दल तुम्ही काय सांगाल?' असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, 'ही जाग जी आहे नं, शिवसेनेने आणलेली, ती कधीच मरायची नाही. ते तेज कायम राहणार. पण पुढे चालवायचं कसं? कोणी? आणि किती स्पष्ट पारदर्शक विचाराने तो प्रश्‍न नंतरचा आहे. तो नंतरच उभा राहील. जे कोणी असतील चालविणारे त्यांनी फक्‍त काँग्रेस होणार नाही याचीच काळजी घ्यावी. शिवसेना ही शिवसेनाच राहिली पाहिजे. पण जोपर्यंत ती जाग आहे तोपर्यंत शिवसेनेला कोणी धक्‍का लावू देणार नाही. मी असलो काय नसलो काय तरी पण. मी तर नाहीच नाही, पण ती जाग बर्‍याच लोकांमध्ये आहे. तेव्हा चावटपणा आणि पाचकळपणा कोणाला करू देणार नाही.'
बाळासाहेब अत्यंत धाडसी आहेत, जसे धाडसी आहेत तसेच पारदर्शी आहेत. पोटात एक ओठात दुसरे हे गलिच्छ राजकारण त्यांनी कधी केले नाही. म्हणूनच त्यांची लोकप्रियता सतत वाढत राहिली. राजकारण म्हणजे खोटे बोलणे असाच अर्थ समजला जातो त्या काळात बाळासाहेबांसारखा पारदर्शी नेता लोकांना भावतो, हे मात्र खरे. रोज वर्तमानपत्रे नियमितपणे वाचणे हा बाळासाहेबांचा छंद आहे. एवढे असूनही ते काही वेळा सांगतात, "फार वाचू नका नाही तर तुमचे ओरिजिनल विचार टिकणार नाहीत.' शिवसेनाप्रमुख पूर्ण आस्तिक आहेत आणि परमेश्‍वराठायी निष्ठा बाळगणारे आहेत. आई जगदंबेचे भक्‍त आहेत. देवावर त्यांची पूर्ण श्रध्दा आहे. पण ते दैववादी नाहीत. उलट कर्तृत्वावर ते प्रेम करतात. म्हणूनच या शक्‍तीच्या जोरावर ते 'सदैव सैनिका पुढेच जायचे' असा ईशारा शिवसैनिकांना देतात. बाळासाहेब कसे आहेत याबद्दल बोलताना उध्दव ठाकरे म्हणतात, 'मला जो सहवास मिळाला त्यावरून सांगू शकेन की, ते जेवढे कणखर, आक्रमक भासतात तेवढेच टोकाचे हळवे आहेत. एका अर्थाने त्यांच्या कणखरपणाच मूळ त्यांच्या हळवेपणात आहे. एखाद्यावरील अन्यायाने ते हळवे होतात आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी म्हणून ते आक्रमक रूप धारण करतात.' लोकांना मदत करण्याची त्यांची पध्दती तर अनेक नेत्यांनी गिरवावी अशी आहे. 'पत्र द्या, निवेदन द्या' असे ते कधीच म्हणत नाहीत. फोन उचलतात आणि काम करायला सांगतात आणि त्यांचे हे सांगणे म्हणजेच आदेश असतो. बाळासाहेबांचे प्रशासन जर देशात आले तर देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल.
'वज्राहुनी कठोर परंतु कुसुमापरी मृदू' हे जर खर्‍या अर्थाने पहायचे असेल तर बाळासाहेबांमध्येच पाहावे.
या निर्भय नेत्याला प्रणाम. बाळासाहेब हे असे आहेत. हजार हातांनी देणारे आणि स्वत: संन्यस्त वृत्तीने जगणारे; झाडा-फुलांवर, कलेवर प्रेम करणारे आणि त्यांच्याबरोबर दुसर्‍याच्या दु:खाने व्यथित होणारे ; आपल्या पत्‍नीवर, कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारे आणि सोबत लाखो शिवसैनिकांचा संसार मांडणारे; आपल्या नातवंडांबरोबर घोडा होऊन खेळणारे आणि प्रसंगी मोठमोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेत्यांना लोळविणारे; कुणी त्यांच्या पायावर लोळण घेऊन माफी मागितली तर द्रवणारे आणि त्याचबरोबर कर्तव्यकठोर होऊन निर्णय घेणारे; क्षणभर दुसर्‍याला हसविणारे व्यंगचित्र काढणारे आणि दूसर्‍या क्षणी आपल्या आसूडासारख्या वाणीने विरोधकांना फटकवणारे; एकदा एकाची संगत धरल्यावर त्याला आयुष्यभर अंतर न देणारे आणि एखाद्याने त्यांची संगत सोडल्यावर त्याला कधीही माफ न करणारे. बाळासाहेबांची अक्षरश: शेकडो, नव्हे हजारो रूपे आहेत. त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी मी कित्येक जणांना भेटलो परंतु मला ते पूर्णपणे कळले आहेत असं अजिबात म्हणता येणार नाही. त्यांना आज कडक सुरक्षा व्यवस्था आहे, त्यांच्या जीविताला लोक सांभाळताहेत, परंतू 'या झेड प्लस सुरक्षाव्यवस्थेमुळे माझा बुलेटप्रूफ गाडीच्या काचा खाली करून मला लोकांना हात दाखवता येत नाही. मला पूर्वीसारखं जास्त लोकांना भेटता येत नाही !' म्हणून ते व्यथित होतात. 'ज्या पदासाठी लोक आयुष्य पणाला लावतात ते मुख्यमंत्रीपद सहज मिळण्यासारखे असूनही नाकारतात व 'माझ्या शिवसैनिकांचं प्रेम हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे.' असे म्हणतात; लाखो शिवसैनिकांचे आजन्म नेतृत्व करणारे शिवसेनाप्रमुख होतात व 'शिवसेनाप्रमुख म्हणण्यापेक्षा मला व्यंगचित्रकार म्हणा" असेही सांगतात; व्यासपीठावरून आपल्या आग ओकणार्‍या भाषेत विरोधकांना नामोहरम करतात आणि पुढच्याच क्षणी त्याच व्यासपीठावर आडवे होऊन त्यांना निवडून देणार्‍या जनतेला ते अक्षरश: साष्टांग दंडवत घालतात. यापैकी बाळासाहेबांचे कुठले रूप अधिक चांगले ते सांगता येणार नाही. बाळासाहेबांच्या आवाजात दरारा आहे, पण दर्प नाही; त्यामुळे बाळासाहेबांनी घातलेली हाक हृदयाला भिडते.
'बाळासाहेब ठाकरे' या आठ अक्षरात हजार सूर्यांच प्रखर तेज सामावलेलं आहे. राजकारणातच तसेच समाजकारणात त्यांची उंची अन्य कुठलाही नेता गाठू शकलेला नाही. प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि सद्‌गुणांची पूजा हा त्यांचा स्वभावधर्म असल्यामुळे लक्षावधी मराठी माणसांचे ते श्रद्धास्थान बनले आहेत. आचार आणि विचारांत अंतर नसलेला हा नेता हिंदूंचे श्रद्धास्थान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा