शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

अखेरचा हा तुला दंडवत…स्थळ : मातोश्री


सकाळी 7 पासून
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेल्याची बातमी शनिवारी संध्याकाळी शिवसैनिकांना समजली आणि केवळ मुंबईतूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपर्यातून शिवसैनिकांचे तांडेच्या तांडे वांद्रे कलानगर येथील मातोश्री बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. रविवारी सकाळी 7 वाजता बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कला नेण्यात येणार होते. परंतु आपल्या देवाचे अखेरचे `दर्शनघेण्यासाठी शनिवारची अख्खी रात्र हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर जागून काढली. सकाळचा सूर्य उगवण्याआधी लाखो शिवसैनिक कलानगर परिसरात दाखल झाले होते, ते आपल्या लाडक्या दैवताला अखेरचा दंडवत घालण्यासाठीपोलिसांनी वारंवार विनंत्या करूनही शिवसैनिक मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे अंत्ययात्रेला दोन तास उशिराने म्हणजे 9 वाजता सुरूवात झाली. ठाकरे कुटुंबियांपैकी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सर्वप्रथम बंगल्याबाहेर पडले आणि ज्या फुलांनी सजवलेल्या रथावर बाळासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात येणार होता, त्याच्याजवळ येऊन उभे राहिले. शिवसेनेच्या वाघाचे पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचे हात उंचावून अभिवादन करतानाचे पोस्टर या रथावर लावण्यात आले होते. मराठा मावळ्याच्या वेषातील शिवसैनिक हातात भगवा ध्वज फडकवत होता. नऊच्या सुमारास बाळासाहेबांचे पार्थिव मातोश्रीबाहेर आणण्यात आले. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांच्यासह तमाम शिवसेना नेते लाडक्या साहेबांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी तिथे होते. याठिकाणी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी जमल्याने थोडा काळ गोंधळाची आणि धक्काबुक्कीची स्थिती निर्माण झाली. बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने पोलिसांनी सर्वप्रथम त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर तिरंगी झेंडय़ामध्ये लपेटलेला बाळासाहेबांचे पार्थिव पोलिसांनीच फुलांनी सजवलेल्या रथावर आणून ठेवला. सुमारे साडेनऊच्या सुमारास प्रत्यक्ष महाअंत्ययात्रेला सुरूवात झाली. बाळासाहेबांचे पार्थिव असलेल्या रथावर शिवसेनेचे यच्चयावत नेते उपस्थित होते. साहेबांच्या पार्थिवाशेजारी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला देखील उभ्या होत्या. गेली कित्येक वर्षे बाळासाहेबांची अत्यंत निष्ठेने त्यांची सेवा करणारे नेपाळी अंगरक्षक चंपासिंग थापा हे हातात गुलाबपुष्प घेऊन साहेबांच्या पार्थिवाला तन्मयतेने वारा घालत होते. उपस्थित शिवसैनिकांनी ठाकरे कुटुंबीय अभिवादन करत होते. राज ठाकरे मात्र या रथावर चढले नाहीत, त्याऐवजी त्यांनी पायी चालणे पसंत केले. मातोश्रीच्या बाहेर कलानगर जंक्शनजवळ शिवसैनिकांची एवढी तोबा गर्दी उसळली होती की, मुंगी शिरायलाही रस्त्यावर जागा नव्हती. अगदी समोरच्या उड्डाणपुलावर तसेच स्कायवॉकवरही राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी कब्जा केला होता. अगदी मुंगीच्या पावलांनी महाअंत्ययात्रा माहीमच्या दिशेने सरकायला सुरूवात झाली.     (प्रकाश सावंत)

उसळला जनसागर
स्थळ शिवसेना भवन
वेळ सकाळी 7 ते संध्या. 4
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त महाराष्ट्रभर पसरताच त्यांच्या अंत्यदर्शनसाठी चहात्यांनी मुंबईकडे धाव घेतली. अंत्यदर्शनासाठी बाळासाहेबांचा पार्थिव शिवाजी पार्क येथे ठेवण्यात येणार असे शिवसैनिकांच्या कानी पडले. परंतु शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनास अडचण निर्माण होऊ शकते हे लक्षात घेता सेना भवनाजवळच साहेबांचे दर्शन घ्यावयाचे असा निर्णय असंख्य चहात्यांनी घेतला. त्यामुळे आज सकाळी 7 वाजल्यापासून चहात्यांनी सेनाभवन जवळ एकच गर्दी केली होती आणि ती म्हणजे साहेबांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी.
गेली चाळीस वर्षे मराठी माणसांच्या हद्यात घर करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त शनिवारी काही वेळेतच महाराष्ट्रभर पसरले. रविवारी सकाळी 7.30 वा. मातोश्रीवरुन साहेबांची अंत्ययात्रा निघणार असून 10 वाजेपर्यंत शिवाजी पार्क येथे पोहचणार असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. मात्र शिवाजी पार्क येथे पार्थिव नेण्यापूर्वी काही वेळेसाठी सेनाभवनाजवळ पार्थिव ठेवण्यात येणार असल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागली. परंतु मातोश्रीवरुन साहेबांची अत्ंययात्राच सकाळी नऊ वाजता निघाली. त्यामुळे शिवाजी पार्क येथे साहेबांचा पार्थिव पोहचण्यास दुपारचे तीन चार वाजणार याचा अंदाज शिवसैनिकांनी घेतला. त्यामुळे सेनाभवन जवळ पार्थिव आल्यावर साहेबांचे अंत्यदर्शन घ्यावा, असा निर्णय असंख्य चहात्यांनी घेतला.
बाळासाहेबांच्या अंतिम दर्शनासाठी रविवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच सेनाभवनजवळ शिवसैनिकांसह साहेबांना मनापासून मानणार्या लोकांनीही एकच गर्दी केली होती. सेनाभवना समोर कोहिनूर स्कॅवेअर या नवीन टॉवरचे बांधकाम सुरु आहे. परंतु आज या टॉवरचे बांधकाम पूर्णतः बंद होते. याच गोष्टीचा फायदा घेत साहेबांच्या चहात्यांनी टॉवरच्या पहिल्या ते तिसर्या मजल्यावर धाव घेतली. यामागे शिवसैनिकांचा एकच उद्देश साहेबांचे अंतिम दर्शन योग्य प्रकारे व्हावे.
मुंबईसह महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त पसरताच चहात्यांनी अंत्यदर्शनसाठी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांची एक झलक पहाण्यासाठी असंख्य शिवसैनिक रविवार सकाळपासूनच सेनाभवना जवळ ठाण मांडून बसल्याचे नजरेस पडले. सेनाभवन परिसरात जागा मिळेल तेथे शिवसैनिकांनी आपले बस्तान मांडले होते. सेना भवनाची भिती, सेना भवनाला लागून असलेल्या इमारती, झाडे , दुकाने आदी ठिकाणच्या जागेचा ताबा शिवसैनिकांनी घेतलेला दिसत होता. ताबा घेण्यामागे शिवसैनिकांचा एकच उद्देश  असल्याचे स्पष्ट होत होते ते म्हणजे साहेबांचे शेवटचे अंत्यदर्शन व्यवस्थित व्हावे.
सकाळपासून साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी  उभे असणार्या शिवसैनिकांचा आवाज अचानक फुटला आणि एक घोषणा सुरु झाली. बाळासाहेब `अमरे रहे’  `साहेब आपण परत या’ `कोण आला कोण आला शिवसेनेचा वाध आला’ या घोषणांनी सेना भवन परिसर दणाणून उठला. आणि सकाळपासून साहेबांच्या अंत्यदर्शनाची प्रतिक्षा करणार्या शिवसैनिकांची इच्छा पूर्ण झाल्याचा एक वेगळा अनुभव शिवसैनिकांच्या चेहर्यावर बघायला मिळला.    (गिरीश चित्रे)
साहेब आले, पण बोलले नाहीत
स्थळ शिवाजी पार्क
वेळ सकाळी 7 ते संध्या. 7
गेल्या कित्येक वर्षांपासून दादरच्या शिवाजीपार्क मैदानावर शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली असेल ती नेहमी दसरा मेळावा साजरा करण्यासाठी. वेळेआधी पार्कात यायचे आणि सर्वात पुढची जागा पकडायची. उन्हातान्हात तासंतास बसून वाट पाहायची. कारण तेव्हा त्यांचे लाडके बाळासाहेब पार्कात येऊन त्यांना मार्गदर्शन करायला येणार असायचे. मात्र आजचा माहोल काही वेगळाच होता. आजही शिवसैनिकांनी हजेरी लावली. सर्वात पुढची जागा पकडली. कारण आजही त्यांचे `साहेब’ येणार होते. फरक फक्त इतकाच होता की आज साहेब काही बोलणार नव्हते, आज ते त्यांच्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार नव्हते. तर आज फक्त साहेबांना ते पाहणार होते. ते देखील अखेरचे.
1966 सालापासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कमध्ये सुरवात झाली. ज्याला वर्षानुवर्षे हे शिवसैनिक अत्यंत आनंदाने आणि जोषाने साजरा करत आहे. दरवर्षी घोषणा आणि जयघोषांमध्ये शिवाजीपार्कमध्ये शिवसैनीक प्रवेश करत. आजही दादरपासून ते शिवाजीपार्क पर्यंतच्या रस्त्यांवर `अरे आवाज कुणाचा, शिवसेनेचा’ `बाळासाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा ऐकायला मिळत होत्या. मात्र या घोषणांमध्ये नव्याने भर झालेली ती `जब तक सुरज चाँद रहेगा, बाळासाहब आपका नाम रहेगा’, `परत या परत या, बाळासाहेब परत या’ , `बाळासाहेब अमर रहे’ या घोषणांचा. मुंबईसह नागपूर, सोलापूर, धुळे, अहमदनगर, अमरावती, बीड, कोल्हापूर, नाशीक अशा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून शिवसैनिक आज पहाटेपासूनच पार्कात जमा झाले होते. कुणी 86 मिटरचा भगवा झेंडाच पार्कात आणि पार्काच्या बाहेर फिरवत होते. शिवसैनीकांनाच आपले कुटुंब मानणार्या बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपले भाऊबंद शिवसैनिक वेगवेगळ्या शहरातून आलेत, ते लांबचा प्रवास करुन आलेत. तसेस हॉटल्स आणि दुकाने बंद असल्याने त्यांची उपासमार होणार याची जाणीव असल्याने दुखःच्या या क्षणी देखील ठिकठिकाणी दादरमधील शिवसैनिकांनी चहा, कांदेपोह्यांचे वाटप सुरु केले होते. तर कुठे पाण्याचेही टँकर उभे करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर पार्कामध्येही पाण्याच्या बाटल्या पुरविण्याचे काम हे शिवसैनिक करत होते. बाळासाहेबांचा अंत्यविधी शिवाजीपार्कमध्ये करण्यात येणार असल्याने त्याची सर्व योजना ही कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केले होते.
आज बोचणार्या उन्हाचे चटके त्यांना जाणवत नव्हते कारण `साहेब’ गेल्याच्या बातमीने त्यांच्या मनाला लागलेल्या चटक्याचे दुखणे हे अधिक होते. पार्कात सतत `हरे रामा, हरे कृष्णा’ चा मंत्रजाप सुरु होता. पार्कात येणार्या गर्दीला मुंबई पोलिसाही अत्यंत हुशारीने नियंत्रणात आणत होते. तसेच सेनेच्या मोठय़ा पदाधिकार्यांकडूनही योग्य ते सहकार्य पोलिसांना मिळाले होते. साहेबांची वाट पाहणार्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेची माहिती वारंवार घोषणा करुन दिली जात होती. त्यामुळे प्रत्येकाच्या ह्दयाचे ठोके वाढले होते. गेल्या दसरा मेळाव्याला बाळासाहेबांनी `व्हीडीओ कॉन्फरसींग’ द्वारे शिवसैनिकांशी संपर्क साधला होता. थकलेला आवाजही या मावळ्यांना दिलासा देऊन गेला. मात्र आज साहेबांना या अवस्थेत पाहणे खर्या अर्थाने त्यांच्यासाठी फार मोठे आव्हान होते. ज्याला पेलण्याची हिंमत त्यांना परमेश्वराने द्यावी, अशी प्रार्थनाही ते मनोमन करताना दिसत होते. अखेर बाळासाहेबांचे पार्थीव या परिसरात दाखल झाले आणि सर्वांच्याच अश्रूंचा तो बांध कधी फुटला हे त्यांनाही समजले नाही.
(गौरी टेंबकर)
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा