शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

हेच का ते बाळासाहेबांचे खरे ‘श्वास’ ?



केतन बेटावदकर कल्याण दि. २५ जानेवारी (एलएनएन वेबमिडिया) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. एक असे उत्तुंग आणि असामान्य व्यक्तिमत्व. ज्यांच्या अफाट कर्तृत्वापुढे आतापर्यंत भले भले नतमस्तक होवून गेले. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे या नावाची जादू केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळाली आणि मिळत आहे. ‘शिवसेना’ नावाच्या बलाढ्य ताकदीच्या कायम केंद्रस्थानी राहूनही साहेबांनी नेहमी ‘शिवसेने’तील सामान्य कार्यकर्त्यालाच बळ देत मोठे केले. आपल्या हयातीमध्ये साहेबांनी कधीही ना या केंद्रस्थानाला महत्व दिले ना सत्तेला. पक्ष स्थापनेपासून ते आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांनी फक्त आपल्या लाडक्या शिवसैनिकाला, सामान्य कार्यकर्त्यालाच आपली ताकद आणि संपत्ती मानत अक्षरशः फुलासारखे जपले. त्यामुळेच तर शिवसैनिक त्यांना आपले दैवत आणि ते शिवसैनिकांना आपला श्वास समजत. परंतु बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त कल्याणात आयोजीत करण्यात आलेला ‘बाळासाहेब ठाकरे स्मारका’च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, ज्याप्रकारे संपन्न झाला, तो पाहता हेच का ते बाळासाहेबांचे खरे ‘श्वास’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब म्हणजे शिवसेनेचे कुटुंबप्रमुख. त्यांना जेवढी काळजी शिवसेना नेत्यांची तेवढी काळजी सामान्य शिवसैनिकांची. बाळासाहेबांचे आतापर्यंत झालेले कोणतेही भाषण हे ‘शिवसैनिकां’च्या उल्लेखाशिवाय पूर्ण झाले नाही. साहेब नेहमीच आपल्या सैनिकांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवायचे. यामुळे अनेक शिवसैनिकांची आणि त्यांची नाळ जुळली ती कायमचीच. बाळासाहेबांनी मतांसाठी आपल्या तत्वाला कधीच तिलांजली दिली नाही. सत्ता आणुन दिली पण तिला शिवलेसुद्धा नाही. ‘पोटात आणी ओठात एकच’ असणारे शिवसेनाप्रमुख चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगांमध्ये नेहमीच शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राज्याच्या विधानसभेवर भगवा फडकल्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये साहेबांनी “ या विजयाचे मानकरी तुम्ही आहात आणि म्हणूनच ज्या वेळेला हे ऋण फेडेन तेव्हा फेडेन, पण आज मी तुमचा अत्यंत उत्तरदायी आहे. फार मोठा ऋणी आहे” असे सांगत चक्क साष्टांग नमस्कार घातला होता. शिस्त आणि अवघ्या समाजासाठी आपले आयुष्य झोकून देणारा शिवसैनिक प्रमाण मानूनच बाळासाहेबांनी सेनेला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच तर ते नेहमी म्हणत, “मी सर्वांना सांगतो शिवसैनिक हे माझं सर्वस्व आहे, शिवसैनिक हे आपलं भांडवल आहे. ते आहेत म्हणून तुम्ही आहात, मी आहे’. असे हातचे काहीही राखून न ठेवता बाळासाहेबांनी ज्यांच्यावर एवढे अतोनात प्रेम केले, त्यांच्याकडूनच आपल्याला अशी सामान्य दर्जाची वागणूक मिळेल असा विचारही बाळासाहेबांनी कधी केला नसेल. ज्या व्यक्तीमुळे आणि त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेमुळे आज आपण सत्तेची फळे उपभोगत आहोत, समाजामध्ये मानमुरातब मिळवत आहोत, आपल्या पदांचा टेंभा मिरवत आहोत, त्यांच्या उत्तुंग कार्याची जाण ठेवण्याची अपेक्षा शिवसैनिकांकडून नाही करायची तर कोणाकडून? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा म्हटल्यावर तो ‘त्या’ नावाला साजेसा होणे अपेक्षित होते. मात्र कोणत्याही प्रकारची वाच्यता न करता आणि घाईघाईने हा सोहळा का उरकला गेला? एरव्ही रस्ते-पायवाटांचे भूमिपूजन समारंभही मोठ्या थाटामाटात आणि गाजावाजात करणाऱ्यांना, बाळासाहेबांच्या स्मारकाचा सोहळा एवढ्या छोटेखानी पद्धतीने का करावासा वाटला? या प्रश्नांची उत्तर मिळणे आवश्यक आहे. त्याहून गंभीर म्हणजे या भूमिपूजन सोहळ्याकडे सेनेच्या बहुतांश आणि वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवकांनी फिरवलेली पाठ. जी व्यक्ती आपल्या उभ्या हयातीमध्ये सुखा-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहिली, तिच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला अनुपस्थित राहून आपण नेमकी कोणती ‘कृतज्ञता’ व्यक्त केली याचे भानही संबंधिताना न उरावे. हे बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा