मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

'बाळासाहेबांचा संताप, बाळासाहेबांचं प्रेम – छगन भुजबळ'१९८६ साली गरवारे क्लबच्या निवडणुकीला भुजबळांचं नाव परस्पर पुढे करून मनोहर जोशींनी त्यांचा 'कात्रज' करायचा प्रयत्न केला होता. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारून खंद्या शिवसैनिकासाठी या क्लब निवडणुकीची सूत्रं आपल्या हाती घेतली होती. शिवसेनाप्रमुखांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या (रविवार, १७ नोव्हेंबर) पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी उलगडलेली एक आठवण.

१९८६ च्या अखेरीची गोष्ट. मी माझ्या पहिल्या गाजलेल्या महापौरपदावरून पायउतार झालो होतो. ‘सुंदर मुंबई, मराठी मुंबईया नाऱ्यामुळे माझी महापौरपदाची कारकीर्द खूप गाजली होती. त्यामुळे प्रसिद्धीही खूप मिळाली होती. शिवसेना महाराष्ट्रभर वाढवण्यासाठी मी त्यावेळी प्रयत्न करत होतो. बेळगाव-कारवारच्या आंदोलनात मी बेळगावमध्ये वेश बदलून आंदोलनासाठी प्रवेश केला होता. या आंदोलनादरम्यान खूप मोठं फायरिंग झालं होतं. अनेक लोक धारातीर्थी पडले. मलासुद्धा दीड महिन्यासाठी धारवाडच्या कारागृहात डांबण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेची आणि माझी लोकप्रियता त्या भागामध्ये प्रचंड वाढली होती.

याच दरम्यान थोडा वेळ मिळाला  म्हणून मी माझ्या कुटुंबियांना घेऊन कोडाईकनालला चार दिवस सहलीसाठी गेलो होतो. दुसऱ्याच दिवशी तिकडे मनोहर जोशींचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, गरवारे क्लबची निवडणूक आहे, विरुद्ध बाजूला शरद पवार आहेत आणि त्यांच्यासमोर निवडणुकीत तुम्हाला उभं राहायचं आहे. मी गरवारे क्लबचा मेंबर होतो, पण मला एकूण क्रिकेट क्लबमधल्या राजकारणाची कल्पना नव्हती. मनोहर जोशींनी आणि त्यांच्या मुलाने तो फॉर्म भरला होता आणि तीन-चार दिवसांनीच निवडणूक होती. त्यामुळे मी आमची सहल गुंडाळली आणि मुंबईत येऊन थडकलो. इथे आलो आणि विचारलं मनोहर जोशी कुठे आहेत, तर कळलं बाहेरगावी गेलेत. मी बाहेरगावाहून धावपळ करून आलो होतो आणि यांचा इथे पत्ताच नाही. ताबडतोब बाळासाहेबांकडे गेलो. त्यांना या सर्व निवडणुकीच्या प्रकरणात मी कसा अडकलो याची माहिती दिली. हे जोशी वडील-मुलगे माझ्या नावे फॉर्म भरून कुठे तरी गायब झालेत... हेही सांगितलं. बाळासाहेब सुरुवातीला संतापले. पण त्यांचा स्वभाव आव्हानं पेलण्याचा होता. पवारसाहेबांचा त्यावेळी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश झाला असावा

या गरवारे क्लबच्या निवडणुकीची व्यूहरचना करण्यासाठी बाळासाहेब स्वतः सरसावले. त्यांनी त्यांच्या वर्तुळातील बजाज वगैरेसारख्या प्रभावी लोकांना स्वतःहून फोन लावला. ‘आमचे छगन भुजबळ गरवारेच्या निवडणुकीला उभे आहेत, त्यांना मत द्या’, असं ते त्यांना आवर्जून सांगत होते. इकडे जोशींचा पत्ताच नव्हता. मीही माझ्या परिचयातल्या काही लोकांना फोन केले. तयारी तशी काहीच नव्हती.

निवडणुकीचा दिवस उजाडला. माझ्याबरोबर काही शिवसैनिक आणि समोर पवारसाहेब आणि त्यांच्या पॅनलचे लोक बॅच लावून आणि थोड्या वेळाने बघतो तर तिथे सुधीर जोशी आणि त्यांचा ग्रुप. ते पवारसाहेबांचा प्रचार करायला उभे होते. खरं तर या निवडणुकांमध्ये पक्षाचा संबंध नसतो. मनोहर जोशींनी मारून मुटकून मला पवारांविरोधात उभं केल्यामुळे आपोआपच या निवडणुकीला पक्षीय राजकारणाचं स्वरूप प्राप्त झालं होतं.

अर्थात निकाल जो काही लागायचा तो लागला. मी चांगली मतं घेतली, पण बऱ्यापैकी मतांनी हरलोही. मग मी संध्याकाळी महापौर बंगल्यावर गेलो. मी स्वतः महापौर नव्हतो, पण त्यावेळी सायंकाळी बाळासाहेब महापौर बंगल्यावर पाय मोकळे करायला यायचे म्हणून गेलो. मला त्यांनी विचारलं, किती मतं पडली? मी तिथे काय घडलं ते सर्व सांगितलं. त्यानंतर बाळासाहेब असे काही संतापले, की असं मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. मनोहर जोशींना त्यांनी वाट्टेल त्या शिव्या घातल्या. अगदी कोहिनूरला आग लावतो, असंही म्हणाले. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. झालं ते जाऊ द्या, वगैरे म्हणालो. पण फार बोलण्याची माझीही टाप नव्हती. नंतर त्यांनी मनोहर जोशींना प्रत्यक्ष किती झापलं ते मला माहीत नाही. पण मनोहर जोशींनी मला अडकवून चुकीचं राजकारण केल्यानंतरही आपला शिवसेनेचा खंदा नेता छगन भुजबळ निवडणुकीला उभा आहे आणि तो निवडून यायला हवा, या भावनेने स्वतः बाळासाहेबांनी सगळी सूत्रं हाती घेतली. त्यांच्या हृदयात एवढं प्रेमसुद्धा होतं. या सगळ्या भानगडीत माझा काय संबंध, असा विचारही त्यांनी केला नाही. उलट मनावर घेऊन ऐनवेळी त्या निवडणुकीसाठी आटापिटा केला. त्यांना संताप आला... दुःख झालं... पण त्यांच्या हृदयातलं प्रेम आणि त्यांची जिद्द कधी तसूभरही ढळली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा