बुधवार, ४ फेब्रुवारी, २०१५

माझी पहिली मुलाखत.. निशांत सरवणकर

माझी पहिली मुलाखत.. निशांत सरवणकर............

तेव्हा मी ‘सांज लोकसत्ता’मध्ये होतो. १९९५ च्या निवडणुकीचा काळ होता तो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात सर्वत्र जोशात होता. मी राजकीय बातमीदारी करीत नसतानाही माझ्यावर बाळासाहेबांची मुलाखत घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली. सकाळची पाळी असताना मातोश्रीवर संपर्क साधून चार ते पाच वेळा बाळासाहेबांशी बोललो होतो. नुसता फोन केला तरी तेव्हा बाळासाहेबांना तो दिला जात होता. ‘सांज लोकसत्ता’तून फोन आहे म्हटल्यावर बाळासाहेब तो घ्यायचे आणि आम्हाला हमखास मथळा द्यायचे. त्याचप्रमाणे मी मुलाखतीसाठी वेळ मिळावा म्हणून बाळासाहेबांना फोन केला. ते लगेचच म्हणाले, ये रात्री आठ वाजता. मला तो सुखद धक्का होता. जानेवारीचा शेवटचा आठवडा होता. जुन्या मातोश्रीच्या तळमजल्यावरील खोलीत मी गेलो. बरोबर आठ वाजता मला बाळासाहेबांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. मनात धाकधूक होती. बस.. असे बाळासाहेबांनीच म्हटले. समोर ‘आफ्टरनून’चे संपादक व दिग्गज पत्रकार बेहराम कॉन्ट्रक्टर होते. त्यांच्याकडे पाहून बाळासाहेब म्हणाले, ‘तुला चालेल ना, हा असला तर..’
मी क्षणभर गोंधळलो आणि म्हणालो.. हो.. नक्कीच! (मी कोण नाही म्हणणारा.. पण बाळासाहेबांचा हा एक वेगळाच मूड मी अनुभवला.)
मुलाखतीची तयारी म्हणून मी माझ्याकडील टेपरेकॉर्डर बाहेर काढला. बेहरामजी एक नोटपॅड घेऊन सरसावले होते.. आणि मी नव्या पिढीतला पत्रकार मात्र इलेक्ट्रॉनिक साधनांवर अवलंबून होतो..
बेहरामजींनी मला विचारले की, तू रेकॉर्ड करून घेणार आहेस का? मी ‘हो’ म्हटले .. पर्सनल युझसाठी.. असे शब्द उच्चारताच बाळासाहेब ताडकन् म्हणाले, पर्सनल-बिर्सनल काही नसतं. पर्सनल असेल तर तो टेप बंद कर..
मी म्हणालो, नाही साहेब.. तुमची पहिल्यांदाच मुलाखत घेत आहे ना.. त्यामुळे कुठलीही चूक होऊ नये यासाठी काळजी घेतोय.. असे जरा घाबरतच म्हणालो.
‘ठीक आहे..’ असे म्हणत बाळासाहेबांच्या मुलाखतीला सुरुवात झाली. मी प्रश्नावलीच घेऊन बसलो होतो.. बेहरामजींनी मला इशारा केला की, मुलाखत सुरू कर..
तब्बल दोन तास बाळासाहेब विविध विषयांवर बोलत होते. रात्री आठ वाजता सुरूझालेली मुलाखत रंगत चालली होती. बेहरामजी मध्येच हळुवारपणे प्रश्न विचारीत होते.. मी विचारलेल्या प्रश्नांना जोडप्रश्नही विचारत होते.. एका दिग्गज पत्रकाराच्या उपस्थितीमुळे मला टेन्शनच आले होते.. माझा कुठला संदर्भ चुकला तर तो दुरुस्त करण्याचे काम बेहरामजी आवर्जून करीत होते.. मुलाखत संपली.. मला सहज खोकला आला.. बाळासाहेबांनी लगेचच त्यांच्याकडे असलेली ‘खो-गो’ची डबी मला दिली.. ही ठेव.. असे सांगितले. बाळासाहेबांनी दिलेली ती भेट कोण नाकारणार..
‘विधानभवनावर भगवा फडकणारच,’ अशी गर्जना करणारी घोषणा तेव्हा बाळासाहेबांनी केली होती. मला मथळा मिळाला होता. ४ फेब्रुवारी १९९५ च्या ‘सांज लोकसत्ता’मध्ये ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. ‘राज्य आमचेच येणार’, या मथळ्याने.. आणि काय आश्चर्य त्याच वेळी शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली.. बाळासाहेबांचा दुर्दम्य आत्मविश्वास मी स्वत: अनुभवला होता..
विशेष म्हणजे या मुलाखतीमुळे मी बेहरामजींच्या ‘बीझीबी’मध्येही झळकलो होतो.. त्यांनी माझी खूप स्तुती केली. नाव टाकले नसले तरी माझ्यासाठी तो सुखद धक्का होता.. परंतु मी त्यांना नीटपणे ओळखलेले असतानाही त्यांनी खोचकपणे मी त्यांना ओळखले नाही म्हणून ते दु:खी झाल्याचे का लिहिले, हे मात्र मला शेवटपर्यंत कळू शकले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा