संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात राज्यातल्या
काँग्रेस नेत्यांना जनतेच्या रोषाचा वणवा अंगावर घ्यावा लागला. यात सर्वाधिक भाजून
निघाले ते मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि सदोबा कान्होबा पाटील उर्फ स. का. पाटील! त्यांच्यावर तोफा डागण्यात आघाडीवर होते, आचार्य अत्रे आणि त्यांच्या मागोमाग
व्यंगचित्रकार बाळ ठाकरे.
‘मुंबई हे ‘कॉस्मॉपॉलिटन’ अर्थात बहुसांस्कृतिक शहर आहे’, अशी भूमिका घेत
स. का. पाटलांनी मुंबई महाराष्ट्राला
जोडण्यास विरोध केला होता. त्यावेळी ते मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. त्यांना ‘मुंबईचे अनभिषिक्त सम्राट’ असं संबोधलं जाई. त्यामुळं तेच पहिल्यांदा
संयुक्त महाराष्ट्रवाद्यांच्या टार्गेटवर आले. अत्र्यांनी तर १९४८ पासूनच ‘नवयुग’मधून पाटलांवर नेम धरला होता. १९५० पासून
बाळासाहेबही अत्र्यांच्या जोडीला आले. ‘नवयुग’चे कव्हर्स ‘बी. के. ठाकरें’च्या धमाल व्यंगचित्रांनी सजले. या चित्रांमध्ये मुख्य पात्र असे मोरारजी
किंवा स. का. पाटील.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अत्र्यांनी
पाटलांची केलेली जाहीर हजामत तर प्रसिद्धच आहे. एका सभेत स. का. पाटील म्हणाले ‘यावश्चंद्रदिवाकरौ (म्हणजे आकाशात सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत) ही मुंबई
महाराष्ट्राला मिळणार नाही’. त्यावर अत्र्यांनी ‘सूर्य आणि चंद्र’नावाचा तिखटजाळ अग्रलेख लिहिला. त्यात ते
म्हणाले, ‘‘जसे काही चंद्र सूर्य याच्या बापाचे नोकर. जणू सूर्य आणि चंद्र यांची थुंकी झेलणारे आणि जोडे पुसणारे केशव बोरकर आणि
रामा हर्डीकर’’.
सदोबा कोळसे पाटील, द्विभाषिकवादी सदोबा, अशा विशेषणांनी अत्र्यांनी स. का. पाटलांना
या काळात हिणवलं.
अत्र्यांचीच री पुढं बाळासाहेबांनी ओढली. ‘मार्मिक’मधून त्यांनी स. का. पाटलांना यथेच्छ ओरबाडलं.
पुढं याच पाटलांनी बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवली.
निवडणूक होती १९६७ची. माजी संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी
केली. दाक्षिणात्य म्हणून त्यांना विरोध करत शिवसेनेनं काँग्रेसचे मराठी उमेदवार
स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, आचार्य अत्रे तसंच इतर तीन काँग्रेसविरोधी उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेनं ‘पंचमहाभूतांना गाडा’ असं आवाहन करत प्रचार केला. परिणामी मेनन, अत्रे पडले. तसंच सूत्रधार स. का. पाटलांना पाडून जॉर्ज मुंबईचे अनभिषिक्त
सम्राट बनले. पण यानिमित्तानं काँग्रेसला म्हणजेच पाटलांना मदत करणा-या शिवसेनेला ‘सदाशिवसेना’ म्हणून विरोधकांकडून हिणवलं जाऊ लागलं.
पुढं मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि वसंतदादा
पाटील यांनीही हाच काँग्रेसी धूर्तावा वापरला. मुंबईतलं विशेषत: गिरणगावातलं कम्युनिस्टांचं बळ ही काँग्रेसची डोकेदुखी होती. नाईकांनी हा
कम्युनिस्ट साप पाव्हण्याच्या अर्थात शिवसेनेच्या काठीनं मारायचा ठरवला. सेना
रस्त्यावर उतरून राडे करू लागली. पण सरकार त्याविरोधात काहीही कारवाई करेना.
उदाहरणच द्यायचं तर १९६९च्या मुंबईतल्या दंगलींचं देता येईल. दोन-तीन दिवस दादरमध्ये दगडफेक, लुटालूट, जाळपोळ आणि हिंसाचार सुरू होता. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक सोलापुरात जाऊन बसले होते.
उदाहरणच द्यायचं तर १९६९च्या मुंबईतल्या दंगलींचं देता येईल. दोन-तीन दिवस दादरमध्ये दगडफेक, लुटालूट, जाळपोळ आणि हिंसाचार सुरू होता. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक सोलापुरात जाऊन बसले होते.
१९६२ ते १९७४ या आपल्या चौदा वर्षांच्या
कालखंडात नाईकांनी असंच धोरण ठेवलं. नंतरच्या काळात वसंतदादा पाटलांनी नाईकांचाच
वारसा चालवला. त्यामुळं शिवसेना म्हणजे ‘वसंतसेना’ आहे, अशी टीका विरोधक करू लागले.
याच पार्श्वभूमीवर आली ठाणे महापालिकेची निवडणूक.
इथं शिवसेनेनं पहिल्यांदा भगवा फडकवला. तो इतिहास उद्याच्या भागात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा