मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

शिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला हा कॉलम.-भाग ५



भाग ५ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- १)

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानं मराठी माणसांना डोंगराएवढे नेते दिले. या लढ्यात आणि त्यानंतरही मराठी माणसांना आधार देणारे हे नेते म्हणजे, समाजवादी पक्षाचे  एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, झुंजार पत्रकार आचार्य अत्रेकॉम्रेड डांगेआणि नंतरच्या काळात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस. 

मराठी माणसांची नस गवसलेले हे नेते नंतरही आपापला प्रभाव टिकवण्यासाठी प्रयत्नशील होतेच. यात सरशी झाली ती प्रबोधनकार ठाकरेंची. त्यांचे पुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे कुंचल्याची तलवार घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी होते. 

मराठी माणसाला मुंबई मिळाली. पण या उद्योगनगरीत मराठी माणूस मात्र उपराच राहिला. त्याला न्याय मिळावा, स्वत:चा आवाज मिळावा म्हणून ठाकरे बंधूंनी साप्ताहिक ‘मार्मिक’ सुरू केलं. त्याला मोठा प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळं ठाकरे उपरोक्त नेत्यांचे थेट स्पर्धकच बनले. १९६६ ला शिवसेना स्थापन झाल्यानंतर तर या स्पर्धेला चांगलीच धार चढली. 

मराठी माणसाच्या हृदयसिंहासनावर राज्य करायचं असेल तर या नेत्यांना वाटेतून दूर करायला लागणार, हे ठाकरेंच्या लक्षात आलं. पहिला नंबर होता, आचार्य अत्रेंचा. खरं तर अत्रे हे प्रबोधनकार ठाकरेंचे जीवलग मित्र. पुण्यात सत्यशोधक चळवळीत एकत्र आलेले हे समाजधुरीण नंतरही साहित्य, सिनेमा आदी क्षेत्रांमध्येही एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन कार्यरत होते. 
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तर त्यांनी भीमपराक्रम केला होता. पण नंतर अत्रे आणि ठाकरे यांच्यात वाद उभा राहिला. यामागचं कारण सांगितलं जातं ते अत्र्यांची डाव्यांशी असलेली मैत्री. मग या मुलुखमैदान तोफा समोरासमोर येऊन एकमेकांवर आग ओकू लागल्या. ‘मार्मिक’ आणि ‘मराठामधून परस्परांवर शेलकी विशेषणं उधळली जाऊ लागली. ‘सुव्वराचार्य’, ‘प्रल्हादखान’, ‘वरळीचा डुक्कर’ अशा विशेषणांनी अत्र्यांचा ‘मार्मिकमधून उद्धार केला जाऊ लागला. डांगेंसोबत राहतात म्हणून त्यांनालालभाई’ असंही हिणवण्यात येऊ लागलं.

अत्र्यांनी तर ठाकरेंविरुद्धच्या ‘ सांज मराठातील लेखांची एक पुस्तिकाच तयार केली. तिचं नाव होतं,‘कमोदनकार ठाकरे आणि त्यांची कारटी’. आणि तिची किंमत ठेवण्यात आली होतीएक कवडी!
नंतर मात्र अत्रेंच्या विरोधात शिवसेनेनं कंबर कसली. १९६७मध्ये शिवसैनिकांनी अत्र्यांचीठाण्यातली सभा उधळली. अत्र्यांवर जोडे फेकले. गदारोळात अत्र्यांना मारही बसला. त्यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली. त्या काळात अत्र्यांचा महाराष्ट्रात प्रचंड दबदबा होता. पण या दिवशी शिवसैनिकांनी अत्रेंच्या व्यक्तिमत्वातली हवाच काढून घेतली. या लोकसभा निवडणुकीत अत्र्यांचा पराभव झाला. अर्थात या पराभवात शिवसैनिकांचा मोठा वाटा होता.

असं सांगितलं जातं की, सुरुवातीला अत्र्यांनाच ‘मार्मिकचं संपादक करण्याचा ठाकरेंचा विचार होता. तसंच ‘शिवसेनचं मुख्य पदही त्यांना देण्याचा विचार होता. मात्र अत्रे काही शिवसेनेच्या व्यासपीठावर आले नाहीत. पण शिवसेनाप्रमुखांवर अत्र्यांच्याच लेखणी आणि वाणीचा प्रभाव असल्याचं मराठी माणसाला सतत जाणवत राहिलं.
अत्र्यांची जादू तर शिवसेनेनं निष्प्रभ केली. आता उरले होते, मुंबईतील कामगारांवर पर्यायानं मराठी माणसांवर अधिराज्य गाजवणारे नेते, कॉम्रेड डांगे आणि जॉर्ज फर्नांडिस. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा