भाग २ : रणभूमी गिरणगाव
महानगरी मुंबई पोर्तुगिजांच्या ताब्यात
होती.. त्यांनी ती आपल्या ब्रिटीश जावयाला आंदण दिली..हीच मुंबापुरी इंग्लडच्या
राजानं दहा पौंड भाड्यानं ईस्ट इंडिया कंपनीला दिली...हा इतिहास सगळ्यांनाच माहीत
आहे. पण पुढं ही उद्योगनगरी घडवली कोणी याबाबत कवी नारायण सुर्वे गर्जून सांगतात,
‘‘तोच मी, तेच आम्ही ह्या तुझ्या वास्तूशिल्पाचे
शिल्पकार,
तुझ्या सौंदर्यात हे नगरी! दिसोंदीस घालीत असतो भर...’’
तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात,
‘‘बा कामगारा तुजठायी अपार शक्ती।
ही नांदे मुंबई तव तळहातावरती।।...’’
अण्णाभाऊंच्या पोवाड्यातला हा कामगार म्हणजे
गिरणगावातला गिरणीकामगार. तो आला महाराष्ट्रभरातून. सुरुवातीला आली कोकणी माणसं.
कारण भाऊच्या धक्क्यावरून समुद्रमार्गे कोकणात ये-जा करण्याची त्यांची सोय होती.
नंतर मुंबई-पुण्याहून मिरज-कोल्हापूरला जाणारा रेल्वेमार्ग सुरु झाला, तशी घाटावरची माणसं गिरणगावात येऊ लागली.
मुंबईच्या मध्यभागी असलेलं गिरणगाव म्हणजे, धुराड्यांनी व्यापलेलं आकाश, दाटीवाटीनं उभ्या असलेल्या लाल कौलारू चाळी, त्याशेजारी अहोरात्र सुरू असणा-या गिरणी. गिरणगाव म्हणजे जवळपास ६०० एकरावरच्या ५८ गिरण्या आणि पंधराशे एकरांवरचा कामगारांचा परिसर. ढोबळ नकाशा सांगायचा म्हटला तर
मुंबईतल्या भायखळ्यापासून दादरपर्यंत आणि
महालक्ष्मीपासून एल्फिन्स्टन रोडपर्यंत पसरलेला भाग म्हणजे गिरणगाव.
गिरणगावातले बसचे प्रमुख स्टॉप म्हणजे, महालक्ष्मीतील संत गाडगेबाबा चौक, गुलाबराव गणाचार्य चौक, खालचे परळ, प्रभादेवी, प्रबोधनकार ठाकरे चौक, नायगाव, शिवडी, घोडपदेव, माझगाव, भायखळा.
रेल्वे स्टेशन्स सांगायची तर भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परळ आणि दादर. उलट दिशेने पच्छिम रेल्वेमार्गाने दादर, एल्फिस्टन रोड, लोअर परळ आणि महालक्ष्मी. हार्बर मार्गावरचं कॉटनग्रीन, रे रोड,शिवडी. तर लखमसी नप्पू मार्ग, पश्चिमेला सेनापती बापट मार्ग आणि ना. म. जोशी मार्ग, डॉ.आंबेडकर मार्ग आणि पूर्वेकडचा रफी अहमद किडवाई मार्ग हे प्रमुख रस्ते.
याबरोबरच नरे पार्कातलं गणेश गल्ली मैदान, कामगार मैदान, त्याच्या पलिकडं गिरणगावात न मोडणारी गिरगावची चौपाटी, दादरचं शिवाजी पार्क मैदान, प्रभादेवीचं नर्दुल्ला टँक मैदान ही गिरणगावाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणं. याशिवाय कम्युनिस्टांची ऑफिसं असणारी परळमधली दळवी बिल्डिंग, खेतवाडीतलं राजभवन, लालबागेतलं तेजुकाया मॅन्शन, तसंच करीरोड पुलाजवळची हाजीकासम,प्रभादेवीची ‘वाकडी’, आग्रीपाड्याच्या बीआयटी चाळी, कामाठीपु-यातल्या बटाट्याची चाळी यांच्याशिवाय गिरणगावाचा उल्लेख पूर्ण होणार
नाही.
शहरातल्या याच भूभागानं, गिरणगावानं मुंबईचं आणि संपूर्ण देशाचं औद्योगिक जीवन घडविलं. आणि ते घडवण्यासाठी राबणारे हात होते, मराठी माणसाचे. जवळपास ८० टक्के म्हणजेच सुमारे अडीच लाख मराठी माणसं
गिरणगावात राहत होती. त्यामुळं साहजिकच या एकगठ्ठा समाजावर राजकीय पक्ष डोळा ठेवून
होते.
पण हा मराठी गिरणी कामगार होता, कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य, कार्यकर्ता. कारण हाच पक्ष कामाच्या
ठिकाणी अर्थात गिरणीत त्यांचा पाठीराखा होता.
अर्थात या कामगारांचा लढाऊ बाणा कम्युनिस्टांच्या नेहमीच उपयोगी आला. पण १९६६मध्ये
मराठीचा जयजयकार करत शिवसेनेचा उदय झाला आणि हा कामगार वर्ग शिवसेनेच्या भगव्या
झेंड्याखाली जमू लागला.
साहजिकच अस्तित्वाच्या लढाईसाठी तलवारी उपसल्या गेल्या.
अर्थात या लढाईतला सैनिक होता, सर्वसामान्य मराठी गिरणी कामगार. त्याच्या
लढाऊ बाण्याविषयी बोलूयात पुढच्या भागात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा