शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही
जाती-पातीचे राजकारण केले नाही. बहुजन समाजातील तरूणांना त्यांनी जितक्या
संधी दिल्यात तितक्या कोणत्याच राजकीय पक्षाने अथवा नेत्याने दिल्या नाहीत.
त्यांनी रिक्षा चालकांपासून ते हात मजुरी करणार्या अनेकांना आमदार,
खासदार, मंत्री बनवित त्यांचे आयुष्य घडविले असे अनेक किस्से महाराष्ट्र
जाणुन आहे. जळगाव जिल्ह्यातील उंबरे या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबात
जन्म घेणार्या मच्छींद्र पाटलांचीही अशीच कहाणी आहे. छोट्याशा गावातील अन्
अत्यंत गरीब घरातील हा तरूण ‘मातोश्री’वरील सेवक बनून गेल्यानंतर त्याचे
आयुष्य कसे घडले याची ही कथा!
जळगाव – ‘‘तु हुषार आणि हुन्नरी पोरगा आहे. आयुष्यात खुप पुढे जाशील’
मॉंसाहेबांचे हे वाक्य आजही माझ्यात उर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करतात.
मातोश्रीवर सेवक म्हणून काम करणारा अत्यंत गरीब कुटुंबातील, ‘‘एका
सर्वसामान्य मुलाला साहेबांचा परीसस्पर्श झाल्यानेच मी आज जि.प.चा
उपाध्यक्ष झालो.’’ दाटलेल्या कंठाने मच्छिंद्र पाटील यांनी आज सकाळी
‘साईमत’जवळ आपल्या हृदयातील बंध उलगडून दाखविले.
बाळासाहेबांनी आयुष्यात सत्तेतील पदांपेक्षा जीवाभावाची माणसे मिळवली.
सर्वसामान्य शिवसैनिकाला देखील ते आपल्या मुलाप्रमाणे प्रेम देत होते. अशीच
एक अद्भूत कहाणी आपल्या जळगाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील
यांची आहे. साहेबांची सावली म्हणून ओळखला जाणारा चंपासिंग थापा असल्याचे
महाराष्ट्राला ज्ञात आहे. पण त्याच थापांसोबत मातोश्रीवर सेवक म्हणून
मच्छिंद्र पाटीलही होते हे फार कमी लोकांना माहीती आहे. ऐंशीच्या दशकाच्या
प्रारंभीच त्यांना बाळासाहेबांच्या विचारांनी भुरळ घातली होती. १९८६च्या
दसरा मेळाव्यात साहेबांचे भाषण ऐकले आणि एरंडोल तालुक्यातील उमरे येथील मूळ
रहिवासी असणार्या मच्छींद्र रतनजी पाटील हा तरुण त्यांचा निष्ठावान
शिवसैनिक झाला. प्रत्येक शिवसैनिकांप्रमाणे त्यालाही बाळासाहेबांना जवळून
पाहायचे होते, बोलायचे होते. लाखो शिवसैनिकांमधुन ही इच्छा मच्छिंद्र
पाटलांची पुर्ण झाली. या गोष्टीला ते दैवी चमत्कारच मानतात. जोगेश्वरी
येथील ‘रॉयल सिक्युरीटीज’मध्ये काम करीत असतांना मच्छिंद्र पाटील स्व.शशांक
टंकसाळे यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या मार्फत त्यांना ‘मातोश्री’वर
सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. काही दिवसांतच ते ठाकरे
कुटुंबियांचे सदस्य झाले. कै. मीनाताईंसह जयदेव ठाकरे यांचा मुलगा राहूल
यांच्यासोबत त्यांची विशेष जवळीक. ‘मातोश्री’वर आलेल्या प्रत्येक माणसाचा
चहा-पान देवून आदरतिथ्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर. राहण्यापासून ते
जेवण देखील मातोश्रीवरच! ही स्नेहपूर्ण दोन वर्ष कशी निघाली हे त्यांना
देखील कळाले नाही. परिस्थिती हालाखीची असल्यामुळे लग्नानंतर मच्छींद्र
पाटील यांनी बाळासाहेब व उध्दव ठाकरे यांची परवानगी घेवून जड अंतरणाने
‘मातोश्री’ सोडले. पण जातांनाही ‘काही मदत लागली तर सांग बर का!’ हे
साहेबांचे बोल त्यांंना खुप मोठा आधार देवून गेले. यानंतरही ठाकरे कुटंबाने
त्यांना वार्यावर सोडले नाही. स्वत: मच्छींद्र पाटील यांनी बिगारी काम
सुरू केले. याचसोबत त्यांच्या धर्मपत्नी उध्दव ठाकरे यांचे डोंबिवली येथे
राहणारे साडूभाऊ सरदेसाई यांच्याकडे घरकाम करू लागल्या. पण साहेबांचा
परिसस्पर्श लाभलेला कुठलाही माणुस कसा मागे राहू शकतो. समाजसेवा करण्याचा
साहेबांकडून घेतलेला आदर्श मच्छिंद्र पाटलांची पुढे नेण्यासाठी धडपड सुरु
झाली. यथावकाश छोटे-मोठे काम घेतल्यानंतर ते मोठे कॉन्ट्रॅक्टर झाले.
यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्याच आशीर्वादाने डोंबिवलीला ‘सद्गुरु कृपा
हॉस्पीटल’ नावाचे मोठे धर्मार्थ रुग्णालय सुरू केले. या रूग्णालयाचे
उद्घाटन करण्यासाठी मच्छींद्रजींनी उध्दव ठाकरे यांनाच विनंती केली. या
रूग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी गरीबांची सेवा सुरू केली. दरम्यान,
त्यांचा गावाकडील लोकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क आला. आपल्या गावाकडील
लोकांच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यामुळे लोकांनी
आग्रह धरला व त्यांना जबरदस्तीने जिल्हा परिषदेसाठी उभे केले.
महाराष्ट्रातून सर्वाधिक मते निवडून येत ते थेट जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष
झाले.
‘मातोश्री’वरील ‘त्या’ भारावलेल्या दिवसांविषयी मच्छींद्र पाटील यांना
विचारले असता त्यांना ‘काय बोलू अन् काय नको’ असे झाले. ‘‘जर मी
साहेबांच्या संपर्कात आलो नसतो तर या दगडाचं कधीच सोनं झालं नसतं.
स्पष्टवक्ता, आक्रमक असणारे साहेब आतून तेवढेच हळव्या मनाचे होते. एक
साधारण शिवसैनिक मातोश्रीवरील सेवक असुन देखील मला दिलेलं प्रेम हे खरच
अतुलनीय आहे. बाळासाहेबांसाठी प्रत्येक शिवसैनिक हा त्यांच्या मुलासारखा
होता. माझ्या आयुष्यातील दोन वर्षे मी साहेबांच्या संपर्कात राहीलो हे मी
माझे भाग्यच समजतो.’’ असे ते म्हणाले. ‘‘जि.प. उपाध्यक्ष झाल्यानंतर
साहेबांना भेटण्याची इच्छा होती. पण त्यांच्या प्रकृतीमुळे भेटू शकलो नाही.
मला साहेबांना सांगायचे होते की साहेब तुमच्या आशिर्वादानं तुमचा
मच्छिंद्र आज जळगाव जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झाला, पण देवाने ही माझी
इच्छा अपुर्णच ठेवली. आज जरी मी मोठा झालो असलो अनेक प्रसंगी लोक मला भेट
वस्तु देतात पण मातोश्रीवर असतांना प्रत्येक वाढदिवसाला साहेबांकडून
कपड्यांसाठी मिळणारे पैसे आणि मॉसाहेबांकडून मिळणारी मिठाईची सर आज कशातच
मिळत नाही. आज मी या सर्व गोष्टींना मुकलो आहे.’’ हे बोलत असतांना
मच्छिंद्र पाटलांचा आवाज गदगदला होता. एका सर्वसामान्य तरूणाला आयुष्यात
उभे करतांनाच त्याला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष करून समाजात सन्मान
देण्याची किमया ही फक्त बाळासाहेबच करू शकतात हे त्यांनी आवर्जून सांगितले.
अर्थात खेडोपाडी आणि कोणत्याही शहराच्या गल्लीबोळात असणारे असे असंख्य
मच्छींद्र पाटील हीच बाळासाहेब आणि शिवसेनेची खरी ताकद होती अन् राहणार हे
सांगण्यासही ते विसरले नाहीत.
< प्रसिद्ध दिनांक १९ नोव्हेंबर १२ >
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा