भाग ११ : राडा
‘राडा’ हा शब्द कानावर पडला की मागून ‘आवाज कुणाचा,
शिवसेनेचा!’ हा प्रतिध्वनी ऐकायला येतो. दाक्षिणात्य लोक
आपल्याच शहरात राहून आपल्याच हाता-तोंडचा घास हिरावून घेत आहेत. नोकरीधंदे बळकावून
बसले आहेत. त्यांना हुसकावले पाहिजे. त्यासाठी ‘बजाओ पुंगी,
हटाओ लुंगी’ असं आवाहन‘मार्मिक’मधून होऊ लागलं होतं. मराठी मनं चेतवली जात
होती. त्याला संघटनात्मक रुप देण्यासाठी शिवसेनेची पायाभरणी सुरू झाली होती.
५ जून १९६६च्या अंकात चौकट प्रसिद्ध झाली. ‘यंडुगुंडुंचे मराठी माणसांच्या हक्कावरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची
नोंदणी सुरू होणार!’त्यानंतर चौदाच दिवसांनी म्हणजे १९ जून १९६६
रोजी शिवसेनेची स्थापना झाली.
३० ऑक्टोबरच्या शिवसेनेचा पहिल्या
मेळाव्यातल्या भाषणात बाळासाहेब गरजले, ‘‘अरे सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्यात! मर्दाचं ते काम नव्हे! महाराष्ट्र हा काय लेच्यापेच्यांचा देश नाही.
ही वाघाची अवलाद आहे. या वाघाला कुणी डिवचलं तर काय परिणाम होतील याचे इतिहासात
दाखले आहेत. भविष्यकाळात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील.’’ बस्स! चेतलेल्या तरुण मनांना एवढ्या ठिणग्या पुरेशा होत्या. या सभेहून परतणा-या
जमावानं दादर भागात मोठी दगडफेक केली. उडप्यांच्या हॉटेलांची आणि रेल्वे
स्टेशनवरच्या स्टॉल्सची मोडतोड झाली. ‘राड्या’ची ही सुरुवात होती. अर्थात सुरुवातीचं
टार्गेट होते, दाक्षिणात्य लोक.
१९६७च्या निवडणुकीत राड्याला अधिकृत कारण
मिळालं. माजी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे दाक्षिणात्य उमेदवार निवडणुकीला उभे
राहिले. त्यांना विरोध करायचा म्हणून प्रचाराच्या काळात लालबाग, परळ, काळाचौकी परिसरातल्या उडपी हॉटेलांमध्ये घुसखोरी सुरू झाली. दाक्षिणात्यांच्या
हॉटेलात गटागटाने घुसायचं. बिल न देताच तिथले पदार्थ फस्त करायचे, असे प्रकार सर्रास सुरू झाले.
या प्रचाराच्या काळातच चेंबूर परिसरातल्या
दाक्षिणात्यांची वस्ती असलेल्या एका झोपडपट्टीस आग लावून देण्यात आली.
काळा चौकी परिसरातील दाक्षिणात्यांच्या
हॉटेलावर २९ फेब्रुवारी १९६७ रोजी केलेल्या दगडफेकीत ३२जण जखमी झाले. यात चार
शिवसैनिकांना अटकही झाली. बाळासाहेबांनी मात्र या सर्वांना शाबासकी दिली.
यानंतर शिवसेनेनं टार्गेट केली ती मुंबईतली
थिएटर्स. इथं सिनेमे दाखवून दाक्षिणात्य निर्माते पैसे मद्रासला घेऊन जातात. मराठी
माणसाच्या या पैशाने यंडुगुंडूची घरे भरू देणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका होती. यातूनच फेब्रुवारी १९६८मध्ये लालबाग परिसरातल्या
प्रसिद्ध गणेश टॉकीजवर हल्ला चढवला गेला. तिथं सुरू असलेला ‘आदमी’ सिनेमा बंद पाडण्यात आला.
१ मार्च १९६८ रोजी तर मुंबईतल्या १७
थिएटर्सवर एकाच वेळी हल्ला चढवून हिंदी आणि दक्षिणेत निर्माण झालेल्या सिनेमांचं
प्रदर्शन बंद पाडण्यात आलं. अर्थात हे ‘राडे’ तसे सौम्य होते. कारण १९६८च्या निवडणुकीत
शिवसैनिकांची गाठ पडली ती कडव्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी. त्यानंतर ख-या
अर्थाने मोठे ‘राडे’ सुरू झाले. त्याविषयी आपण पुढं बोलणारच आहोत.
पण विशेष म्हणजे सुरुवातीला हे ‘राडे’ बघत पोलीस आश्चर्यकारकरित्या गप्प होते. कारण तेही‘मराठी’च होते ना! मात्र सरकारचीच हे ‘राडे’ थांबवण्याची इच्छा नव्हती, हे हळू हळू स्पष्ट होऊ लागलं. आणि त्यानंतर शिवसेना म्हणजे ‘सदाशिवसेना’, ‘वसंतसेना’ असल्याची टीका होऊ लागली. त्याविषयी उद्याच्या भागात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा