भाग २१ : उमेदवारी घ्या उमेदवारी...
निवडणुकीचा सीझन आला की ‘बंडगार्डन’ला मोठा बहर येतो. यंदाचा मोहोर जरा जास्तच
होता. काही केल्या ‘बंडोबा थंड’ होत नव्हते. कसं तरी बाबापुताकरून, गोडीगुलाबीनं, वेगवेगळी गाजरं दाखवून, प्रसंगी ‘हात’ दाखवून त्यांना गार केलं गेलं. पण धुसफूस
राहिलीच. ही समस्या आता सर्वपक्षी आणि सर्वव्यापी झालीय. शिवसेनेला तर अगदी गुपचूप
उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. तर मनसेचे नाराज कार्यकर्ते तर थेट ‘कृष्णकुंज’वर धडकले.
१९६८मध्ये हे चित्र एकदम उलटं होतं. मराठी
माणसाचं भलं करायचंय असं सांगत शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरली. पण
आपल्याकडं पुरेसे उमेदवारच नाहीत, हे सेनेच्या लक्षात आलं. होतंही साहजिकच.
स्थापनेनंतर लगेच दोन वर्षात निवडणूक लागली होती. मग अगदी मिळेल त्यांच्या गळ्यात
उमेदवारीची माळ घालणं सुरू झालं.
त्याचं उदाहरण देताना ‘मार्मिक’चे संपादक पंढरीनाथ सावंत सांगतात, ‘‘त्या वेळी काळा चौकीतून सेनेच्या पठडीत न बसणा-या साटमगुरुजी नावाच्या
अत्यंत मवाळ माणसाला उमेदवारी देण्यात आली. हे गुरुजी म्हणजे एक पात्रच होतं.
संयुक्त महाराष्ट्राची रस्त्यावरची रणधुमाळी पाहत ते गॅलरीत उभे होते. त्यावेळी
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात यांच्या खांद्याला गोळी लागली. हेच त्यांचं
उमेदवारीसाठी क्वालिफिकेशन.
माथाडी कामगारांवरचे जे ‘गुमास्ते’ अर्थात मुकादम असतात तसे हे गुरुजी दिसायचे. धोतर
नेसायचे. त्यांचा पिंड ना कोणाशी शत्रुत्व घेण्याचा ना अंगात सेनेचा आक्रमकपणा. पण
दोनदा निवडून आले. त्यांना निवडणुकीला उभं राहायला मीच भरीस घातलं होतं.
दुसरे गणेश गल्लीत क्लासेस चालवणारे प्रि.
हळदणकरही असेच. त्यांनाही शिवसेनेनं निवडून आणलं. एखादा कार्यकर्ता अमूक भागात
राहतो म्हणून द्या त्याला उमेदवारी, असंही झालं. काळाचौकीतून मलासुद्धा उमेदवारी
देण्यात आली. माझ्या नावाने गेरुनं भिंतीही रंगवल्या गेल्या. पण इथल्याच
हरिश्चंद्र पडवळांनी हट्ट केला. मग मी बाळासाहेबांना त्यांना उमेदवारी द्यायला
सांगितली.’’
बरं अनुभवी कार्यकर्ते तरी आणणार कुठून? शिवसेनेची पहिली बॅच तर कम्युनिस्ट विचारसरणीचीच होती. कारण बहुतेक लोक
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून आले होते. दत्ताजी साळवी, प्रजा समाजवादी पक्षाचे प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे. हे सर्व कामगार भागातले
होते. त्यामुळं ते डाव्या विचारसरणीशी निगडीत होते. पण त्यांचा फायदाच झाला.
काँग्रेसविरोधी जे डावपेच त्यांनी पूर्वी वापरले तेच शिवसेनेत आल्यावर
कम्युनिस्टांच्या विरोधात वापरायला सुरुवात केली.
साटमगुरुजींच्या उमेदवारीसाठी तर पंढरीनाथ
सावंतांनी टी. व्ही. सावंत या कट्टर कम्युनिस्ट कार्यकर्त्याची मदत घेतली होती.
नंतर ज्यांच्या खुनाचा शिवसेनेवर आरोप झाला त्या आमदार कृष्णा देसाईंचे हे सावंत
खास कार्यकर्ते होते. त्यांचा काळा चौकी परिसरात मोठा दबदबा होता.
शिवसेनेच्या यादीत डॉ. हेमचंद्र गुप्ते, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर,मनोहर जोशी, सुधीर जोशी, शरद आचार्य, अमरनाथ पाटील, दत्ताजी नलावडे या पहिल्या फळीतल्या
कार्यकर्त्यांचा प्राधान्यानं समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये
हिंदू महासभेच्या पंडित बखले आणि पदमाकर ढमढेरे यांचाही समावेश करण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा