मंगळवार, २० जानेवारी, २०१५

मराठीसाठीच शिवसनेचा जन्म- शिवसेनाप्रमुख

मुंबई, शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2008 (12:06 IST)


शिवसैनिक जोपर्यंत आहेत तोपर्यंत शिवसेना जिवंत आहे. आता अनेकांनी मराठीचा मुद्दा काढला आहे. परंतु मुळात मराठी माणसांच्या हक्कांसाठीच शिवसेना जन्माला आली असून, जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत मराठी माणसांच्या केसांनाही धक्का लागणार नाही असा इशारा देत पुन्हा एकदा शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुखांची तोफ कडाडली.
वयोमान झाल्याने शिवसेनाप्रमुख जरी थकल्याचे या मेळाव्यात जाणवत असले तरी त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत केलेल्या भाषणाने उपस्थित शिवसैनिकांना वर्षभराचे तरी टॉनिक मिळाले आहे.
वयोमान झाले असल्याने आपल्या हातात काठी आली असली तरी, ते पाहून मुळीच वाईट वाटू देऊ नका, जवळ आलेली माकडं हाकलण्यासाठी मी ही काठी घेतल्याचे शिवसेनाप्रमुखांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करत आपल्याला वृद्ध म्हणवणाऱ्या नेत्यांना चांगलेच झोडपले.
उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार ते मवाळ असल्याचे आरोप होतात. परंतु आज आपण उद्धवला ऐकले तेव्हा आपणच ठरवा तो आक्रमक का मवाळ आहे ही जबाबदारीही त्यांनी उपस्थित शिवसैनिकांवर सोपवली.
आपल्या खास ठाकरे शैलीत त्यांनी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. त्या गुरू दा गद्दी कार्यक्रमात जातात पण त्यांना गुरू गोविंद सिंग कोण होते याची माहिती तरी आहे का असा प्रश्न शिवसेनाप्रमुखांनी उपस्थित केला. इटलीची कॅटली अशी उपमा त्यांनी सोनिया गांधी यांना दिली.
सरकारवर ताशेरे ओढताना सरकार नामर्द असल्याचे ते म्हणाले. इस्लामी कट्टरवादाचा विळखा देशाला बसत असताना सरकार केवळ मतांसाठी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला.
देशात दहशतवाद फोफावत आहे. सरकारला दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आले असून, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श सरकारने घ्यावा असे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणात केले.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा