मंगळवार, २० जानेवारी, २०१५

अखेरचा "जय महाराष्ट्र'

शिवसेनेचे सरसेनापती, हिंदुहृदयसम्राट आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला सातत्याने हलवत पाच-सहा दशकांहून अधिक काळ गाजणारा झंझावात म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांना आज अखेरचा "जय महाराष्ट्र' म्हणताना राज्यातील गरम रक्ताच्या तरुणाईला आणि मराठी माणूस म्हणून मिरवत असलेल्या असंख्य लोकांना हुंदका फुटला असणार. "आव्वाज कुणाचा', अशी ललकारी मारत भगवा फडकवणाऱ्यांचे शब्दही गोठले असणार. लोकप्रियतेच्या अत्युच्च लाटेवर आरूढ होऊन सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले एक दुर्मिळ नेते, चमत्कार वाटावेत, असे झुंजार नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय! प्रबोधनकारी विचारांची परंपरा असलेला एक तरुण व्यंग्यचित्रकार कुंचल्याच्या मदतीने प्रस्थापित राजकारणाला एकावर एक फटके मारत स्वतःच एक महानेता बनतो काय आणि महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करीत दिल्लीच्या राजकारणावरही पंजा मारतो काय, सारे काही अचंबित करणारेच होते. कोणत्याही राजकीय लाटेबरोबर किंवा कोणत्याही प्रस्थापित राजकीय प्रवाहाबरोबर नव्हे, तर प्रवाहांच्या विरोधात जाऊन राजकारण कसे करता येते आणि लोकप्रियतेच्या शिखरावर कसे पोचता येते, याचे आधुनिक राजकारणातील एक उत्तम उदाहरण म्हणजेही बाळासाहेब ठाकरे होय. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने त्यांचे राजकारण सुरू झाले आणि पुढे पन्नास वर्षे ते या त्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे दिशा देत राहिले. मराठी माणसाचा जयजयकार करत प्रस्थापितांना दोन देण्याचे आणि दोन घेण्याचे त्यांचे हे राजकारण होते. मराठी माणसाची अस्मिता जागी करून तिला सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचे हे राजकारण होते. खरे तर तसे हे खूप अवघड होते. हुकूमशाही पद्धतीने संघटना चालवून लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकण्याचे हे राजकारण होते. पिंजऱ्याबाहेर असलेल्या वाघ-सिंहावर रोज बसण्याचे हे राजकारण होते. ते यशस्वी करून दाखविणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी पर्वाचे नाव होते बाळासाहेब ठाकरे. वाघनखे असलेल्या कुंचल्यातून निर्माण झालेले हे राजकारण माळ धारण केलेल्या त्यांच्या मनगटावर टिकून राहिले. महाराष्ट्राने असे विलक्षण राजकारण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. आपल्या खास ठाकरे शैलीच्या या राजकारणाला बाळासाहेबांनी नाव दिले होते, "शिवशाही!' अर्थातच शिवसेनेची शिवशाही... आपल्या देशात आणि राज्यात स्वातंत्र्यानंतरचे राजकारण कल्याणकारी मानले जाते; पण याकल्याणकारी राज्यातही सर्वसामान्यांच्या अस्मितेचे प्रश्‍न असतात. माणूस एकाच वेळी नागरिकही असतो आणि मराठी माणूसही असतो. तो एकाच वेळी देशाच्या नकाशातही असतो आणि त्याच वेळी बेळगावसारख्या सीमा भागात घुसमटतही असतो. एकाच वेळी तो वर्तमानही असतो आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने भारावून गेलेला इतिहासही असतो. बाळासाहेबांनी सर्वप्रथम हात घातला तो मराठी माणसाच्या संवेदनांना. या संवेदनांचे त्यांनी घोषणांमध्ये आणि राजकारणामध्ये रूपांतर केले. "जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा आणली. लोकशाहीचा तिरस्कार करत आणि तिच्या मर्यादांवर बोट ठेवत स्वत:चे शिवशाहीचे मॉडेल मांडण्यास आणि मराठी माणसाच्या सर्व प्रश्‍नांवर शिवसेना हेच एक उत्तर आहे, असे विश्‍वासाने सांगण्यास सुरवात केली. सीमा भागातील मराठी माणसाच्या मदतीसाठी ते सर्व शक्तीनिशी धावले. या प्रश्‍नावरून त्यांनी रान उठविले. मोरारजी देसाई यांची गाडी अडवून तुरुंगवास पत्करला. मराठी माणूस आणि त्याचा विकास हेच माझे आणि माझ्या शिवशाहीचे एकमेव ध्येय आहे, असे म्हणत पंतप्रधानांपासून ते गल्लीतल्या एखाद्या गब्बर पुढाऱ्यापर्यंत साऱ्यांशीच सातत्याने दोन हात केले. आपल्या कृतीच्या परिणामाची तमा त्यांनी कधीही बाळगली नाही. माझा शिवसैनिक म्हणजे माझी कवचकुंडले, असे ते सांगत राहिले. त्यांचा फाटकातुटका कार्यकर्ताही "आवाज कुणाचा' अशी गगनभेदी घोषणा देत अन्याय करणाऱ्यावर तुटून पडायचा. गळ्यात बाळासाहेबांचा फोटो आणि हातात शिवसेनेचे बॅनर घेऊन रस्त्यारस्त्यावर तो उभा ठाकायचा. बाळासाहेब हीच या कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि बाळासाहेब हेच त्यांचे हत्यार होते. बाळासाहेबांनी हल्लाबोल असा आदेश दिला, की कार्यकर्ते कशाचीही तमा न बाळगता तुटून पडायचे. शिवसेनेसाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास सज्ज राहा, असा जबरदस्त ट्रिपल डोसही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. शिवसेनेत पदाला किंवा जातीला महत्त्व नसते, तर त्यागाला आणि कामालाच महत्त्व असते, हा मंत्र त्यांनी बिंबवला. प्रस्थापित कॉंग्रेसच्या सत्ताभिमुख आणि ऊबदार राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर खरे तर हे सारे अवघड होते. तरीही बाळासाहेब ते करत होते. आपण यशस्वी होणारच, असा जबरदस्त विश्‍वास बाळगून लोकांच्या प्रश्‍नांना ते थेट भिडत होते. प्रश्‍नांच्या आड येणाऱ्यांना "दे दणका'सारखा कार्यक्रम राबवून वचक निर्माण करत होते. जेथे जेथे मराठी माणसांची कोंडी होईल तेथे तेथे शिवसेना धावून येईल, असे चित्र निर्माण होऊ लागले. प्रशासन आणि राजकारणातही त्यामुळे शिवसेनेचा दबदबा निर्माण होत होता.
वरकरणी सामाजिक व अस्मितारक्षक वाटणारी शिवसेना हळूहळू राजकीय शक्तीत रूपांतरित होत होती. पुढे पुढे तर "ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण' हे सूत्र उलटे झाल्यानंतरही लोकांनी ते आनंदाने स्वीकारले. शिवसेनेला सत्तेवर बसविले. 1966 ला शिवसेना जन्माला आली आणि अनेक वर्षे आग, विस्तव, वादळ, डोंगर यांच्याबरोबर सातत्याने लढत लढत 1995 मध्ये भगवा घेऊन ती सत्तेच्या सिंहासनावर गेली. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट आदी पक्षांबरोबर तिने टक्कर दिली. मुंबईच्या महापौरापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि लोकसभेच्या सभापतिपदापर्यंत एका प्रादेशिक पक्षाने मोठ्या आत्मविश्‍वासाने मारलेली ही धडक होती. या काळात बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला, साहित्यिकांना बैल म्हटले, आणि होय, आम्हीच बाबरी मशीद पाडली, असे ठणकावून सांगितले. हिंदुत्ववादाच्या बाबतीत भाजप मिळमिळीत आणि शिवसेना आक्रमक आहे, असे सांगत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याची स्वप्ने पेरली आणि ती उगवली तीही त्यांच्या हयातीतच. बाळासाहेबांच्या अंगा-खांद्यावर वाढलेले आणि मोठे झालेले त्यांचे काही सरदार शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याबाहेर पडले. शिवसेनेला जातिवादी ठरविणारे काही जण शिवसेनेच्या किल्ल्यात येऊन किंवा शिवसेनेच्या मदतीने सत्तेची ऊब भोगू लागले. याच काळात मुंबईत मायकल जॅक्‍सनचा प्रयोग घेऊन बाळासाहेबांनी संस्कृतिरक्षकांना जबरदस्त धक्का दिला होता. याच काळात शिवसेनेला अनेक पराभवही पचवावे लागले होते आणि शिवसेनाप्रमुखपदही सोडेन, अशी घोषणाही बाळासाहेबांनी याच काळात केली होती. सर्वांत धक्कादायक घटना म्हणजे याच काळात राज ठाकरेही शिवसेनेबाहेर पडले. आणखी काय काय झाले, हे सांगता येऊ नये इतके घडत गेले. लोकांनी मात्र आपला महानायक म्हणून बाळासाहेबांवरील आपली अभंग निष्ठा कायम ठेवली होती. त्यांची प्रकट झालेली विविध रूपे मान्य केली होती. मला प्रबोधनकारांची श्रेष्ठ परंपरा आहे, असेही बाळासाहेब सांगायचे आणि त्याच वेळेला "गर्व से कहो हम हिंदू है' हेही सांगत एका विशिष्ट समूहावर तुटूनही पडायचे. लोकांनी बाळासाहेबांच्या या भूमिकांविषयी कधीही प्रश्‍न उपस्थित केला नाही. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे हेच बळ होते. साहित्यिकांना बैल म्हणणारे बाळासाहेब पुढे कुसुमाग्रजांच्या पायावर माथा टेकवतात, हेही लोकांनी पाहिले होते. देश सोनिया गांधींच्या इटलीत गहाण पडलाय, असे म्हणणारे बाळासाहेब महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देतात, हेही पाहिले होते. एक मनस्वी आणि स्वतःला वाटेल तेच करणारा आणि त्याची बरी-वाईट किंमत मोजणारा, कधी वादळाच्या हातात हात देऊन तर कधी वादळावर स्वार होऊन जगणारा आणि स्वतःच्या हिमतीवर राजकारण वळवणारा हा नेता होता.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक पक्ष आणि संघटना जन्माला आल्या. काही काळ त्या चमकल्या आणि निस्तेजही झाल्या; पण शिवसेनेचे मात्र तसे झाले नाही. यामागची नेमकी कारणे शोधण्याचा नीट प्रयत्न झाला पाहिजे. बाळासाहेब नुसतेच व्यंगचित्रकार नव्हते, तर ते धूर्त, मुरब्बी राजकारणीही होते. त्यांना राजकारणाचे वारे नीट कळायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात तेव्हा विविध समाजघटकांचे विविध पक्षांत विभाजन झाले होते. दलित, अल्पसंख्याक कॉंग्रेसकडे, उच्चवर्गीय भाजपकडे, श्रमिक डाव्यांकडे, अशी ढोबळमानाने ती विभागणी होती. बाळासाहेबांनी या सर्वांचा खोलवर अभ्यास केलेला होता. जे समूह वा घटक सत्तेच्या विभागणीबाहेर फेकले गेले होते त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेत खेचले. मराठेतर ओबीसी, बौद्धेतर दलित, अल्पशिक्षित, बेरोजगार तरुण असे हे घटक होते. यांपैकी बहुतेकांना स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या कारणाने सत्ता मिळाली नव्हती. ती मिळण्याची शक्‍यताही नव्हती. हा सारा वर्ग शिवसेनेने आपल्याकडे वळवला. त्याला थेट सत्तास्थानावर नेऊन बसविले. बाळासाहेबांनी घडवलेला हा राजकीय चमत्कार होता. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी घडले नव्हते. शिवसेनेत जात-पात मानली जात नाही, हे बाळासाहेबांनी कृतीतूनच सिद्ध केले. मातंग, चर्मकार, साळी, माळी, कोष्टी, कोळी, तेली, तांबोळी आदी अनेक उपेक्षितांमधील लोक विधानसभेत आणि लोकसभेत शपथ घेताना दिसले. सत्ता तळागाळापर्यंत नेण्याचा दावा कॉंग्रेस करत होती आणि बाळासाहेब प्रत्यक्षात ते घडवत होते. हेही खरे आहे, की बाळासाहेबांची अनेक कल्याणकारी स्वप्ने "ओव्हरसाइज' होती; पण लोकांनी त्याकडे कानाडोळा केला. गरिबांसाठी गावोगाव झुणका-भाकर केंद्रे, चाळीस लाख झोपडवासीयांना मुंबईतच मोफत घरे, सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज, प्रत्येकाला नोकरी अशी किती तरी आश्‍वासने म्हणजे वचननामे शिवसेनेने आभाळभर पसरवली होती. प्रत्यक्षात या वचननाम्यांचे काय झाले हे सर्वश्रुत आहे. अर्थात, सत्तेच्या राजकारणात बाळासाहेबांनीच अशी वचने दिली असे नाही. पुढे इतरांनाही या वचननाम्यांची भुरळ पडली हा भाग वेगळा. राजकारणातच शिवसेना तयार झाली असे नाही, तर अल्पावधीतच कामगार सेना, विद्यार्थी सेना, शेतकरी सेना, टपरीधारक सेना, दलित सेना, कलावंत सेना, महिला सेना, वाहनधारक सेना अशा असंख्य रूपांत ती प्रकट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात अद्‌भुत कादंबरी वाटावी असे एक वैशिष्ट्यपूर्ण पर्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. मराठी माणसाच्या हितापोटी जन्माला आलेली शिवसेना पुढे पुढे व्यापक रूप घेऊ लागली. गरिबांचे तारणहार आम्हीच आहोत, असे सांगू लागली. दुसऱ्या बाजूला बदलत असतात तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि तीच शिवसेना, असे समीकरण रूढ होऊ लागले. मराठी माणसाच्या उद्धाराचा निर्धार कायम ठेवत शिवसेनेने हे बदल घडविले होते. सर्वांनाच आश्‍चर्यचकित करणारे हे बदल आहेत. आयुष्यभर लढत राहिलेला हा महानेता मृत्यूशीही लढत राहिला. बऱ्याच वेळेला विजय मिळवत राहिला; पण शेवटी माणूस हरतो आणि मृत्यूच विजयी होतो, हे निसर्गाचे सूत्र त्यांनाही स्वीकारावे लागले. मराठी माणसाच्या अस्मितेला जेव्हा केव्हा यापुढेही अंकुर फुटतील, अंकुराचे टोकदार भाले व्हायला लागतील, तेव्हा याद येत राहील ती बाळासाहेबांचीच. या महापराक्रमी नेत्याला अखेरचा जय महाराष्ट्र.

बाळासाहेब आणि शिवसेना राजकारणात एक चमत्कार वाटत असला, तरी या चमत्काराच्या मागेही काळ आणि माणूस वेळीच समजून घेण्याचा प्रयत्नही होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा