शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी
तरुणांमध्ये असं कोणतं रसायन भरलं, की ज्यामुळं हे तरुण बेभान शिवसैनिक बनले? कोणाशीही पंगा घ्यायला तयार झाले? कुठलंही आव्हान झेलायला तयार झाले? बेधडकपणे समोरच्याला भिडू लागले? हे रसायन होतं,
शिवसेनाप्रमुखांच्या लेखणीत अन् वाणीत.
बाळासाहेबांच्या लेखणीतून आणि वाणीतून उकळत्या लाव्हारसासारखे बाहेर पडणारे शब्द
मराठी तरुणांच्या रक्ताचा थेंब न थेंब तापवत होते. हे शब्द होते मराठी असल्याचा
स्वाभिमान जागवणारे. ‘मार्मिक’मधल्या ‘वाचा आणि उठा’ या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो तरुण
रस्त्यावर उतरले.
‘ठोकशाही’चं समर्थन करत ठाकरेंनी पहिला हल्ला चढवला तो
गांधीजींच्या अहिंसेवर. या अहिंसा तत्वज्ञानाची त्यांनी ‘षंढ’ म्हणून खिल्ली उडवली. या नपुंसक अहिंसेनंच देशाचं वाटोळं केलं, हे त्यांचं म्हणणं तरुणांना पटू लागलं.
‘मराठी माणूस गुंड का नाही? मराठी माणूस हातभट्ट्या का चालवत नाही? तो मटक्याचं बेटींग का घेत नाही?’ असे प्रश्न ते जाहीर सभांमधून विचारीत. या
खिजवण्यातून मराठी तरुणांना बरोब्बर मेसेज मिळाला.
‘मला ‘मर्द’ शिवसैनिक हवेत. शेळपट, नामर्दांची फौज नको’ अशा आशयाच्या ‘मार्मिक’मधल्या लिखाणांतून, कार्टून्समधून आणि जाहीर सभांमधील भाषणांतून मराठी तरुणांच्या
मनात जोश आणि त्वेषाचा दारुगोळा ठासला गेला. मग हे तरुण रस्त्यावर उतरून काहीही करायला
तयार झाले.
महत्त्वाचं म्हणजे, शिवसेनाप्रमुख नेहमीच या तरुणांच्या पाठीशी उभे राहिले. राजकारणी उघडपणे जे
करत नाहीत ते बाळासाहेबांनी केलं. त्यांनी शिवसैनिकांच्या प्रत्येक कृत्याचं जाहीर
समर्थन केलं. त्या कृत्य़ाची जबाबदारी घेतली. शिवसैनिकांना शाबासकी दिली.
सामान्य शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख हे नातं
अत्यंत जिव्हाळ्यानं परस्परांशी घट्ट जोडलेलं होतं. लॉकअपमधल्या शिवसैनिकांना
जामीन मिळवून देणं असो, त्यांच्या घरातल्यांना दिलासा देणं असो, शिवसेनाप्रमुख स्वत: जायचे. सैनिकांच्या पाठीवरून मायेनं हात
फिरवायचे. शिवसैनिक भेटायला आला तर उठून उभे राहायचे. त्याला दरवाजापर्यंत
सोडवायला जायचे. त्यामुळं बाळासाहेबांच्या शब्दाखातर हजारो शिवसैनिकांनी तळहातावर
शीर घेतलं.
बाळासाहेबांचे शब्द वाचकांवर भूल टाकत.
त्यांचं भाषण म्हणजे ‘बेस्ट ऑडिओ व्हिज्युअल परफॉर्मन्स’ आणि ‘हिप्नॉटिझम’चा प्रयोगच. तो ऐकून, पाहून हजारोंचा समूह मंत्रमुग्ध होई. त्यांच्या इशा-यावर डोलू लागे, गर्जू लागे, बेधुंद होऊन नाचू लागे.
शिवसेनाप्रमुखांनी ‘घाटी’ म्हणून अवमानीत होणा-या मराठी माणसाच्या अस्मितेचा अंगार फुलवला. त्यांच्या
रुपानं मुंबईतल्या मराठी माणसाला संरक्षणाची ढालच मिळाली.
बाळासाहेब हे तरुणांचे हिरो बनले. त्यासाठी
बाळासाहेबांनी आपली इमेजही जाणीवपूर्वक उभी केली. किरकोळ शरीरयष्टीचे बाळासाहेब
सुरुवातीला लांब बाह्यांचा शर्ट इन करून वावरत. त्यानंतर व्यक्तिमत्वाला
रुबाबदारपणा यावा म्हणून त्यांनी गळाबंद जोधपुरी वापरायला सुरुवात केली.
नंतर पांढराशुभ्र कॉलरचा झब्बा लेंगा घालायला
सुरुवात केली. त्यानंतर भाषण करताना खांद्यावर शाल आली. गळ्यात, हातात रुद्राक्षाच्या माळा आल्या. यातून संकटातून तारणारा महामानव, अशी शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा उभी राहिली.
याच दरम्यान बेरोजगार तरुणांना कायदा हातात घेऊन अन्यायाविरुद्ध लढणारा अमिताभचा ‘अँग्री यंगमॅन’ थिएटरमध्ये पाहायला मिळू लागला. अमिताभचा
नायक आणि बाळासाहेब यांच्यात कमालीचं साम्य असल्याचा साक्षात्कार या तरुणांना
झाला. त्यामुळं बाळासाहेबांच्या हुकमतीखाली शिवसैनिक होऊन रस्त्यावर राडा करावा, असं मुंबईतल्या प्रत्येक मराठी तरुणाला वाटू लागलं. तसं तो प्रत्यक्षपणे करूही
लागला. त्याच्या या ‘राड्या’विषयी उद्याच्या भागात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा