बाळासाहेब
ठाकरे हे केवळ देशपातळीवरचं नेतृत्व नव्हतं तर जगभर त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आकर्षण
होतं. म्हणूनच तर त्यांच्या मृत्यूची बातमी जगभरातील मीडियानं दिली. त्यातील
काही महत्त्वाच्या दैनिकांच्या अशा होत्या हेडलाईन्स...
बाळासाहेब स्वत:ची तुलना हिटलरशी करायचे, तर कधी स्वत:ला 'टायगर ऑफ महाराष्ट्र' असं म्हणायचे. मात्र त्यांच्या व्यक्तीमत्वात जादू होती. आजारी पडल्यापासून हजारो कार्यकर्ते मातोश्रीवर येत होते. मृत्यूची बातमी येताच मुंबईसह सर्व महाराष्ट्रात बंदचं वातावरण आहे.
बीबीसी
बीबीसीनं बाळासाहेबांना हिंदू धार्मिक राजकारणी असं म्हटलंय. बातमीची सुरुवातच त्यांनी मुंबईत झालेल्या दंगलीसाठी बाळासाहेब जबाबदार होते, अशी केलीय. सनसनाटी विधानामुळे बाळासाहेब भारतातील सर्वाधिक वादग्रस्त नेते होते. कार्टुनिस्ट असलेल्या बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, प्रांतवाद, भाषावादाचे समर्थन करत अल्पसंख्याकाविरुध्द त्यांनी कायमच भूमिका घेतली. मुंबई दंगलीतील त्यांची भूमिका स्पष्ट असूनही त्यांना कधीच अटक झाली नाही, असंही बीबीसीनं ठळक शब्दात मत नोंदवलंय.
ब्लूमबर्ग
मुंबईवर कायम राज्य करणारा नेता असं बाळासाहेबांचं वर्णन ब्लूमबर्गने केलंय. ते हिंदू राष्ट्रवादी राजकीय नेते होते. त्यांनी सातत्यानं भाषा, प्रांतवाद, स्थलांतर या मुद्यांवर विरोध केला.
रॉयटर्स
भारतातील सर्वात अधिक वादग्रस्त नेता आणि हिंदू राष्ट्रवादी संघटनेचा जनक असं बाळासाहेबांचं वर्णन रॉयटर्सनं केलय. भारतातल्या सर्वात श्रीमंत शहरावर त्यांनी दोन दशकं राज्य केलं. चाकरमानी हिंदूंचे ते हिरो होते, असंही रॉयटर्सनं लिहिलंय. 'सन ऑफ सॉईल' म्हणजेच भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांनी हयातभर लढा दिला. मोठ्या फ्रेमचा चष्मा घालणाऱ्या, भगवे कपडे परिधान करणाऱ्या बाळासाहेबांनी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या शिवसैनिकांच्या जोरावर मुंबईवर कायम पोलादी पकड ठेवली.
डॉन न्यूज
पाकिस्तानच्या अग्रगण्य डॉन न्यूज पेपरनं बाळासाहेबांची मृत्यूची बातमी देताना कुठलाही वादग्रस्त लिहिलेला नाही. 'शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचं वयाच्या 86 वर्षी निधन' असा मथळा त्यांनी दिलाय.
हफिंग्टन पोस्ट
कडवे हिंदू राष्ट्रवादी, मुस्लीम आणि स्थलांतरीत कामगारांना कायम विरोध करणारा नेता, असं हफिंग्टन पोस्टनं लिहिलंय. ठाकरे यांनी इस्लाम आणि पाश्चिमात्य संस्कृतीला कायम विरोध केल्याचं लिहिलंय.
फॉक्स न्यूज
ठाकरे प्रभावी वक्ते होते, मात्र त्यांनी आपल्या या शक्तीचा वापर कायम फुटीरवादी राजकारणासाठी केल्याचं फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनींनं म्हटलंय. त्यांच्या प्रयत्नामुळं बॉम्बेचं मुंबई नामकरण झाल्याची आठवणही फॉक्स न्यूजने करुन दिलीय.
द न्यूज
आघाडीचं पाकिस्तानी वृत्तपत्र 'दि न्यूज'ने बाळासाहेबांच्या निधनाची बातमी देताना, 'ठाकरेंनी कायम लोकांच्या हृदयावर राज्य केलं, आजारी असताना त्यांना भेटायला येणाऱ्या सर्व थरातील व्यक्तीमत्वातूनच त्यांचा प्रभाव किती होता हे लक्षात येऊ शकते.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा