शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

जेव्हा साहेब दिघेसाहेबांवर चिडतात..

विधानसभेची १९९९ ची निवडणूक आजही आठवते. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. ठाणे जिल्ह्यातही कॉंग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युती असा सामना चांगला रंगात आला होता. जिल्ह्यातील युतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यावर सोपवण्यात आली होती. सुनियोजित तंत्र वापरून जिल्ह्यातून तेरापैकी आठ आमदार निवडून त्यांनी निवडून आणले होते.

या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पालघरच्या आमदार सौ. मनीषा निमकर यांच्या प्रचारासाठी आले होते. वेळ खूप कमी होता. राज्यात दौरे करून ते काहीसे थकले होते. मात्र, दिघे यांच्या आग्रहाखातर अगदी शेवटच्या टप्प्यात ते पालघरच्या सभेसाठी आले होते. अर्थात ते कसे आले, कसे "अडकले', याचा किस्सा खूपच गमतीदार आहे. बाळासाहेबांना तब्बल एक दिवस "कोंडून' ठेवण्याची हिंमत दिघे यांनी दाखविली होती. तो किस्सा असा घडला होता...

दिघे यांच्या हट्टापुढे बाळासाहेबांना माघार घ्यावी लागली होती. आपल्या पूर्वनियोजित जाहीर सभांना कात्री लावणे त्यांना भाग पडले होते. अखेर त्यांचा हिरवा कंदील मिळाला आणि पालघरसारख्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात साहेब येणार, या वृत्तानेच वातावरण भारले गेले. शिवसैनिकांची एकच धावपळ सुरू झाली. ते कुठे थांबणार? त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे काय? असे प्रश्‍न होते. परंतु दिघे असल्याने साहेब आणि शिवसैनिक तसे निर्धास्तच होते.२५ मार्च १९९९ रोजी सांयकाळी शेकडो गाड्यांचा ताफा पालघरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नंडोरे या आदिवासी गावात घुसला. आजूबाजूला वस्तीही नव्हती. चिकूच्या वाडीत असलेल्या एका कॉंग्रेस नेत्याच्या बंगल्यात बाळासाहेबांची थांबण्याची व्यवस्था केली होती. बाळासाहेब पोचले आणि काही वेळात वीज गेली. विजेची पर्यायी कोणतीच सोय नव्हती. त्यातच बंगल्यातील नळाला पाणीच येईना. साहेब अस्वस्थ झाले होते. बाळासाहेब म्हणाले, "आनंद कुठे आहे?'

दिघे त्यांच्यासमोर हजर!
""काय रे! मला कुठे आणून ठेवले आहेस? मला काय हवे, काय नको, हे तुला माहीत नाही का?'' ते चिडले होते.
चुकलो! साहेब!

काय चुकलो म्हणतोस! सभेची तयारी झाली का? चला आता...

दिघे गप्पच. साहेबांना कळेच ना. ते प्रश्‍नार्थक नजरेने बघू लागले.

चल म्हणतोय ना... साहेब गुरकावलेच.

दिघे सावरून म्हणाले, ""साहेब! सभा उद्या संध्याकाळी आहे.''

काय? उद्या संध्याकाळी सभा? मग आज कशाला आणलेस?

साहेब भडकलेच. सभा उद्या असताना या खेड्यात मला उगीचच चोवीस तास अगोदर आणले आहे, यामुळे ते संतापाने थरथर कापू लागले. त्यांचा हा पवित्रा पाहून नजरेला नजर भिडवण्याची ताकदच कुणात राहिली नाही...

सुधीर (जोशी) कुठे आहे?

आलो, साहेब!

दिघे आणि जोशी यांची धारदार शब्दांत खरडपट्टी सुरू झाली. आपला संताप बाहेर काढल्यानंतर धुमसणारे बाळासाहेब शेवटी शांतपणे खुर्चीवर बसले. क्षणभरानंतर आपल्या नेपाळी सहायकास ते म्हणाले, "चल! आताच मुंबईला निघायचे.'

आवराआवर सुरू झाली. बाळासाहेब एक शब्दही न बोलता खुर्चीवर रेललेले.

दुसरीकडे दिघे हे जोशींना म्हणाले, ""भाऊ, काही करा; पण साहेबांना थांबवा!''

जोशी म्हणाले, ""आनंद, मी काही बोलणी खाणार नाही. तू असे केलेच का? आता तुझे तू बघ. त्यांना कोणी आता थांबवू शकणार नाही?''

दिघे म्हणाले, ""माझ्यासाठी शेवटचा प्रयत्न करा?''

शक्‍य नाही, बाबा! माझी हिंमत नाही, जोशींनी पुन्हा नकार दिला.

शेवटी मनाचा हिय्या करून दिघेच तोफेच्या तोंडी आले. बाळासाहेबांसमोर लवून पण नेटाने उभारले.
"हवं तर उद्याच मला शिवसेनेतून काढून टाका? पण तुम्ही जाऊ नका! ही सभा व्हायलाच हवी! एका आदिवासी महिलेचा प्रश्‍न आहे. साहेब! तुम्ही थांबलेच पाहिजे.''

पाच फूट उंच, डोळ्यांत तेज, दाढीवरून सतत हात फिरविणाऱ्या या छाव्याकडे सिंहाने जळजळीत नजर टाकली. डोळ्यांत संताप धुमसत होता; पण कुठे तरी राग शांत झाल्याच्या खुणा चेहऱ्यावर झळकत होत्या. त्यातच दिघेचे ते शब्द साद घालणारे होते. क्षणभर सुन्न शांतता होती. त्याचा भंग करीत बाळासाहेब बोलले.

"ठीक आहे, तू म्हणतोस तर थांबावेच लागेल!''

या शब्दांनी दिघेंवरील सर्व दडपण गळून पडले. सभा होणार, हे नक्की झालेले असते. साहेबांचे चरणस्पर्श करून त्यांनी लगेचच बंगला सोडला. फक्त एक तासाच्या सभेसाठी बाळासाहेब चोवीस थांबणार होते. त्यामुळे झालेली तगमग आपल्या "छाव्या'साठी बाळासाहेबांनी झेलली होती. दुसऱ्या दिवशी सभेला जनसागर लोटला. मनीषा निमकर दणदणीत मतांनी विजयी झाल्या.

बाळासाहेबांनी दिघे यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. दिघे शिवसेनेच्या वाटचालीतील अनेक घटनांचे साक्षीदार होते. धगधगती मशाल होती. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवीत असल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच झाला. त्यांची निष्ठा होती ती शिवसेनाप्रमुखांवर आणि शिवसेनेवर. मुक्त हस्ते मदत हाच त्यांचा धर्म होता. त्यांच्या "दरबारा'त म्हणूनच साधुसंताबरोबरच मुल्ला-मौलवी, पाद्रीही दिसत. चार खासदार, आठ-दहा आमदार निवडून आणण्याची ताकद ज्या माणसाकडे होती, ते दिघे आमदारच काय मंत्रीही झाले असते; परंतु आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे एकच पद घेऊन शिवसेनेत जगले. ते पद होते शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख. २७ जानेवारी हा आनंद दिघे यांचा स्मृतिदिन. बाळासाहेब आणि दिघे या दोन नेत्यांमधील असलेले विश्‍वासाचे नाते शेवटपर्यंत टिकून होते. त्याला उजळणी देणारा हा अनुभव होता...* हा लेख ई-सकाळ मधून घेतलेला असून श्री. प्रकाश पाटील यांनी लिहिला आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा