बाळासाहेब
ठाकरे असे म्हटले की वादविवाद आलेच असे अनेक जण म्हणतात. पण हे काही
शिवसेनेच्या स्थापनेनंतर सुरू झालेले सत्र नाही. तर त्याही आधीपासून
बाळासाहेब हे तसेच होते. किंबहुना त्यांच्या त्या देधडक- बेधडक वृत्तीमुळेच
त्यांच्यासोबत राहण्याचे भाग्य मला लाभले. कारण सेनेच्या
स्थापनेपूर्वीपासून मी त्यांच्यासाठी माझे गुरू अॅड. सुशील कवळेकर
यांच्यासमवेत वकील म्हणून उभा राहिलो होतो. बाळासाहेबांचा व माझा परिचयही
त्यामुळेच झाला. म्हणजे साधारण १९६४-६५च्या सुमारास घडलेली ती घटना असावी.
बाळासाहेबांवर बेअब्रूचा खटला गुदरण्यात आला होता आणि अॅड. कवळेकर हे माझे
गुरू त्यांचे वकील होते. न्यायालयातील केस आम्ही जिंकलो आणि मला आजही लख्ख
आठवते आहे की, त्यावेळेस नेहमीच जोधपुरी सूटमध्ये असणारे बाळासाहेब
गिरगावातील कवळेकर सरांच्या ऑफिसमध्ये बुके आणि मिठाई घेऊन आले होते.
त्यावेळेस कवळेकर सर त्यांना म्हणाले की, हे ऑफिस तुमचेच आहे, कधीही या आणि
मग माझ्याकडे पाहून म्हणाले की, काय रे अधिक बरोबर की नाही? अर्थात मी
नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. बाळासाहेबांशी पहिला परिचय त्यावेळेस
झाला !
ज्या केसच्या निमित्ताने बाळासाहेबांचा परिचय झाला ती
केस होती बाबुराव पटेलांची. सुरुवात त्यांनीच केली होती. पटेलांनी
बाळासाहेबांवर घाणेरडय़ा भाषेत टीका करणारे दोन लेख लिहिले होते. अर्थात
त्यानंतर ठाकरी शैलीमध्ये बाळासाहेबांकडून त्याला प्रत्युत्तर आले नसते तर
नवलच होते. त्यावेळेस पटेल हे औषध विक्रीच्या व्यवसायात होते आणि ते सर्वश्रुत
होते ते त्यांच्या विवेकानंद स्टाइलसाठी! म्हणजे ते उभे राहताना कुठेही
स्वामी विवेकानंदांसारखे हाताची घडी करून एका बाजूला तिरके उभे राहायचे.
त्यांचे ते व्यंग हेरून बाळासाहेबांनी त्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या लेखाचे
शीर्षक दिले होते. ते होते.. कुठे ते स्वामी विवेकानंद आणि कुठे हा
अविवेकानंद !
झाले, तेच निमित्त ठरले आणि मग पटेलांनी
बाळासाहेबांविरोधात कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा केला. आम्ही ती केस जिंकलो
होतो. त्याच्या अभिनंदनासाठी बाळासाहेब कवळेकर सरांच्या ऑफिसमध्ये आले
होते.
त्यानंतर अधुनमधून बाळासाहेबांशी बोलणे व्हायचे. ६६
साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर तर बाळासाहेब अतिशय
आक्रमक झाले आणि मग अखेरीस त्या आक्रमकतेने त्यांच्यामागे विविध प्रकारच्या
खटल्यांचा ससेमिरा सुरू झाला. साधारण १९७०च्या सुमारास या सर्व केसेस
मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आणि मग आमच्या गाठीभेटीही ! त्याचवेळेस अकस्मात
घडलेली आणखी एक दुर्दैवी घटना प्रत्यक्षात मला बाळासाहेबांच्या अधिक जवळ
जाण्यास कारणीभूत ठरली.
माझे गुरू आणि बाळासाहेबांचे पहिले वकील सुशील कवळेकर यांचे गोव्याला एका
अपघातामध्ये दु:खद निधन झाले. कवळेकरसाहेबांचे अशा प्रकारे जाणे हे अतिशय
धक्कादायक होते. ही घटना १९७० सालातील आहे. त्याचवेळेस दुसरीकडे बाळासाहेब
आणि सेनेच्या विरोधातील खटलेही वाढू लागले होते. शिवसेना जसजशी वाढायला
लागली तशी केसेसची संख्याही वाढायला लागली. मग बाळासाहेबांच्या सतत
संपर्कात आलो आणि त्यांची भेट नित्यनेमाची झाली. तोपर्यंत माझ्या वकिलीला
२० वर्षे झाली होती. मीही चांगला स्थिरावलो होतो. बाळासाहेबांनी विचारणा
केली तेव्हा त्यांचे प्रतिनिधित्व करण्यास नकार देण्याचा काही प्रश्नच
नव्हता. मग बाळासाहेब न्यायालयात जातील त्या त्या ठिकाणी त्यांच्यासाठी मी
बाजू मांडण्यासाठी हजर असायचो.
हा प्रवास मग अगदी अलीकडेपर्यंत अव्याहत सुरूच राहिला. त्यांच्या
केसेससाठी मी सारे काही बाजूला सारून येत असे. बाळासाहेबांची केस ही
माझ्यासाठी माझी स्वत:चीच केस असायची. महत्त्वाचे म्हणजे आजवर
बाळासाहेबांसाठी जेवढे खटले लढलो ते सर्वच्या सर्व जिंकलो. एकाही
खटल्यामध्ये बाळासाहेबांवर आंच येऊ दिलेली नाही, हे मी माझे भाग्यच समजतो!
बाळासाहेबांचा पहिला परिचय प्रत्यक्षात हा कवळेकर सरांच्या ऑफिसमध्ये
झालेला असला तरी त्याही पूर्वीपासून ते मला माहीत होते. खरे तर मी
त्यांच्या व्यंगचित्रांचा चाहता होतो. ‘मार्मिक’चा नियमित वाचक होतो. मी
मूळचा गोव्याचा. गोव्याच्या भूमीत जन्मलेला माणूस हा कलावंत तरी असतो किंवा
मग रसिक तरी. त्यामुळे माझ्यावरही त्याच गोव्याच्या मातीचे संस्कार होते.
कलेची आवड ही बालपणापासूनच होती. त्यामुळे त्या कलाप्रेमामुळे बाळासाहेब हे
प्रत्यक्ष परिचय होण्याच्या अगोदरपासून ठाऊक होते. मी आणि बाळासाहेब
यांच्यामध्ये एक दुवा होता. तो म्हणजे आम्हा दोघांनाही विनोद आणि वाचन या
दोन्हींची आवड होती. त्यामुळे कदाचित आमचे सूत चांगले दीर्घकाळ जमले.
बाळासाहेबांची व्यंगचित्रे मला नेहमीच आवडायची. कारण कधी ती गुदगुल्या
करणारी असायची तर कधी समोरच्या व्यक्तीला टीकेने थेट भाजून काढणारी !
माध्यम व्यंगचित्राचेच असायचे पण समोरच्या व्यक्तीला वाटायचे की,
बाळासाहेबांनी आपल्याला सोलून तरी काढले आहे किंवा भाजून तरी काढले आहे.
अंगाची लाहीलाही व्हायची विरोधकांची. ही त्यांची ताकद होती.
कॅसेल अॅण्ड कंपनीने जगभरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांचा एक संग्रह
त्यावेळेस प्रसिद्ध केला होता. त्यात भारतातील एकमेव व्यंगचित्रकाराचा
समावेश होता, ते म्हणजे बाळासाहेब. महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेब ज्या
डेव्हिड लोवे यांना गुरू मानायचे त्यांचेही नाव त्याच यादीत होते. यामुळे
बाळासाहेबांबद्दल एक आदराची भावना निर्माण झाली होती.. त्यांची जेव्हा
प्रत्यक्ष भेट झाली त्यावेळेस तर असा हा व्यंगचित्रकार- कलावंत आपल्याला
भेटला याचा खूप आनंद झाला होता. बाळासाहेबांना खूप जवळून पाहिले तेव्हा
लक्षात आले की, त्यांच्या आवाजाला एक विलक्षण धार होती आणि त्यांच्या
विरोधकांना तर असे वाटायचे की, त्यांच्या जिभेलाही धार आहे. कल्पना करा की,
धारदार जीभ आणि तेवढाच धारदार आवाज एकत्र आले.. अर्थात त्याचा परिणाम नंतर
सर्वानीच पाहिला. त्यांची संघटना म्हणून स्थापन केलेल्या या पक्षाने केवळ
राज्याच्या विधान भवनावरच भगवा फडकवला असे नव्हे तर थेट देशाच्या
राजकारणातही एक महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अशा असामान्य व्यक्तीचे
प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी आनंदाचा भाग होता.
अशा
या बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेकांना अनेक कोडी पडली होती.
त्यामुळे त्यांच्याविषयी एक फसवणुकीची कल्पनाही जनमानसात अस्तित्वात आली.
खरे तर तो निव्वळ गैरसमज होता. राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रचंड
धारदार होते. पण बाहेर आक्रमक असलेला हा माणूस वैयक्तिक आयुष्यात मात्र
अपार हळवा होता. ते वैयक्तिक पातळीवर अतिशय प्रेमळ होते. किंबहुना म्हणूनच
त्यांच्या वागण्याबोलण्यामध्ये एक विरोधाभास पाहणाऱ्यास जाणवू शकतो. म्हणजे
पाकिस्तानी संघाला विरोध करायचा आणि जावेद मियांदादला मात्र घरी बोलवायचे.
बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचा प्रयत्न काळजीपूर्वक केला तर
मग ही सारी कोडी राहणार नाहीत. त्याची उकल होत जाईल आणि मग लक्षात येईल की
ते वागण्यामध्ये पारदर्शक होते. त्यात कुठेही लपवाछपवी नव्हती. म्हणूनच ते
हे सारे जाहीररीत्या करू शकायचे.
बाळासाहेबांच्या जवळ गेल्यामुळे मला त्यांना अधिक जवळून समजून घेता आले, हे
माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कदाचित म्हणूनच मला ठाकरे
कुटुंबीयांमधीलच एक होण्याचे भाग्य लाभले. मातोश्री हे अगदी छोटेखानी घर
होते तेव्हापासून मला चहा कधीच बाहेरच्या खोलीत मिळाला नाही. चहा
स्वयंपाकघरात डायनिंग टेबलवर मिळायचा तोही माँसाहेबांकडून. मी त्यांना
नेहमीच वहिनी म्हणायचो. मग तिथे घरच्या गप्पा व्हायच्या. तुम्ही घरचे आहात.
त्यामुळे तुम्हाला चहा बाहेर नाही तर आतमध्ये मिळणार, असे त्या नेहमी
म्हणायच्या. माँसाहेब या बाळासाहेबांच्या खऱ्या आधारवड होत्या. किंबहुना
म्हणूनच त्या अकाली गेल्या त्यावेळेस बाळासाहेबांना मी प्रथमच
हरवल्याप्रमाणे भान हरपलेले पाहिले.
आजही आठवतेय.. मी आणि बाळासाहेब वयात तसे चार वर्षांचे अंतर होते. मी चार
वर्षांनी लहान होतो. पण इतरांच्या मानाने बाळासाहेबांचा तसा समवयस्क.
कदाचित त्यामुळेच असेल उद्धवने फोन केला होता. हा अगदी हक्काने तो म्हणाला
की, बाळासाहेबांच्या सोबत येऊन बसाल का? मी काही दिवस नंतर नित्यक्रम
म्हणून मातोश्रीवर जात होतो. बाळासाहेबांची व माझी मैत्री वेगळ्या
पातळीवरची होती. त्यामुळे थोडय़ा गप्पा माराव्यात. म्हणजे त्यांचे हरपलेले
लक्ष लागेल, अशी अपेक्षा होती. पण माँसाहेब हळव्या बाळासाहेबांमध्ये खूप
खोलवर रुजलेल्या होत्या. त्यामुळे कितीही गप्पा झाल्या तरी अखेरीस विषय
माँसाहेबांवर यायचा आणि पुन्हा बाळासाहेब हरवल्याप्रमाणे वाटायचे.
त्यांच्याबरोबरच्या ४८ वर्षांत त्यांना मी कधी एवढे हळवे किंवा निराश
पाहिले नव्हते. बाकी कितीही अडीअडचणी आल्या किंवा अगदी पहाड
कोसळल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली तरी बाळासाहेब कधीच डगमगलेले मी
पाहिले नाहीत.
एकदा आफ्टरनूनच्या पत्रकाराने प्रश्न विचारला की, बाळासाहेबांच्या
राजकारणाबद्दल काय वाटते. मी म्हटले, मला मुळातच बाळासाहेब हे राजकारणी
आहेत, असे वाटत नाही. त्याने पुन्हा आश्चर्यमुग्ध होऊन विचारले की, तुम्ही
काय म्हणालात माहिती आहे का? मी माझे विधान पुन्हा सांगितल्यावर तो म्हणाला
हे तुमच्या नावानिशी प्रसिद्ध करू का? मी होकार दिला. फक्त त्याला जोड
म्हणून मी म्हणालो की, माझे त्यामागचे तर्कशास्त्रही लिहा त्यासोबत.
राजकारणी मंडळी नेहमीच प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतात. मग एखादे विधान
असेल किंवा मग कृती. लोकांना काय वाटेल, याचा विचार ते नेहमीच करतात.
बाळासाहेब लोकांना किंवा इतरांना काय वाटेल, याचा विचार करत नसत. राजकारणी
केवळ आपल्या फायद्याचे काय आहे, याचा विचार करतात. बाळासाहेबांचे तसे
नव्हते. त्यांना वाटले म्हणून ते एखादी गोष्ट करत. त्यात फायदा-तोटा ते
पाहात नसत. ते राजकारणी असते तर त्यांनी केवळ फायद्याच्याच गोष्टी केल्या
असत्या. पण तसे त्यांनी केले नाही. आपल्या विधान किंवा कृतीवरून आपल्याला
काय फायदा होईल, याचा विचार त्यांनी केला नाही. ते थेट हृदयाला जे भावेल ते
बोलायचे आणि मोकळे व्हायचे. हे विधान प्रसिद्धही झाले. संध्याकाळी त्यांचा
फोन आला. म्हणाले, वाचले माझ्याबद्दलचे विधान. आवडलेही मला ते. कुणी तरी
मला समजून घेत आहे याचा आनंद आहे.
बाळासाहेबांच्या या परखडपणे बोलण्याच्या सवयीमुळे आणि स्वभावामुळेच नंतर
केसेस यायच्या. सभा झाली की. रात्री उशिरा आमचे बोलणे व्हायचे. मग मी
सांगितले की, अमुक एक विधान थोडे धोकादायक होते. की मग म्हणायचे की, मला
वाटले ते बोललो आता पुढचे काम तुमचे आहे. तुम्ही काय ते पाहून घ्या.
व्हायचे काय की, बाळासाहेबांचे एखादे विधान पकडून मग कारवाई केली जायची.
त्यावेळेस मी बाळासाहेबांना सुचवले की, आपण भाषण देता तेव्हा टेपरेकॉर्डर
सोबत ठेवा आणि नंतर कॅसेटवर भाषणाची तारीख, वार लिहून ठेवा. मूळ टेप
काळजीपूर्वक जपू या. ती कोर्टात कामी येईल. कारण एखादे विधान कुणी फिरवून
काही केले किंवा अर्धवटच सांगितले तर आपल्याला आजूबाजूचा संदर्भ सांगणे
सोपे जाईल. त्यानंतर म्हणजे साधारणपणे १९८५ पासून मग बाळासाहेब टेपरेकॉर्डर
सोबत ठेवायला लागले.
बाळासाहेबांचे बोलणे ऐकत राहावे असा थाट होता. ते अतिशय उत्तम नट आणि
नकलाकार होते. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांच्या नकला ते अगदी हुबेहूब
करायचे. खासगीत तर मी हे अनेकदा पाहिले आहे. एखादे नाव आले, संदर्भ आला की,
लगेचच बाळासाहेबांमधील नट जागृत व्हायचा. बाळासाहेबांचा दुसरा पैलू म्हणजे
ते प्रभावी नेते होते. माझ्या माहितीतील असे एकमेव नेते की, ज्यांच्या
पहिल्या वाक्यालाच श्रोत्यांच्या टाळ्यांची कडकडून दाद मिळायची. माझ्या
प्रिय बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो असे शब्द कानी पडले की त्यापाठोपाठ
टाळ्यांचा प्रचंड मोठा कडकडाट कानी यायचा. असा कडकडाट भाषणाच्या पहिल्याच
वाक्याला घेणारा दुसरा नेता मी नाही पाहिला.
अनेकदा बाळासाहेबांकडून आदेश यायचा रात्री ९ वाजता भेटायला या. मग मी समजून
जायचो की, मध्यरात्री किमान दीड वाजेपर्यंत आपली मैफल रंगणार. जुन्या
मातोश्रीमध्ये असताना ते दरवाजापर्यंत सोडायला यायचे. गाडी आणली आहे की,
ड्रायव्हर देऊ अशी विचारणा करायचे. अलीकडे नवीन मातोश्रीमध्ये भेटायला
गेल्यानंतर कुणाला तरी खालपर्यंत सोडण्यासाठी आवर्जून सांगायचे..
हा किस्सा फार दूरचा नाही तसा अलीकडचाच आहे. बाळासाहेबांची स्मरणशक्ती
अतिशय तल्लख होती. त्यांना भेटायला गेलो तेव्हा सहज बोलताना एक संदर्भ आला.
तेव्हा बाळासाहेबांनी जुन्या पद्धतीनेच थापाला हाक मारली आणि म्हणाले..
त्या दुसऱ्या कपाटात दुसऱ्या कप्प्यात उजवीकडून पाचवे पुस्तक आण. हवे होते
तेच पुस्तक थापाच्या हाती लागले होते. कुठल्या कपाटात कुठली पुस्तके हे
त्यांना नेमके ठाऊक असायचे. असेच माणसांचे संदर्भही त्यांना लक्षात
राहायचे. अर्थात ते मोठे लोकनेतेच होते.
मध्यंतरी बाळासाहेब प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले. मग ते
महाराष्ट्रापुरते न राहता हिंदुस्थानमधील महत्त्वाचे नेते झाले. तेव्हा
त्यांच्या लक्षात आले की, आता इंग्रजीला पर्याय नाही. मग त्यांनी एक डिजिटल
डिक्शनरी घेतली. या वयात म्हणजे ६५-७० व्या वर्षी त्यांनी इंग्रजीचा
अभ्यास केला. एक जबरदस्त जिद्द होती बाळासाहेब म्हणजे. एकदा मला म्हणाले,
खूप चांगली आहे ही डिक्शनरी, तुलाही देतो. नंतर कोणता तरी एक शब्द अडला
त्यावेळेस मी अर्थ सांगितला. तो नेमका होता हे त्यांना लक्षात आले. मग लगेच
म्हणाले, नाही देणार तुला डिक्शनरी, तुला तर येतेय सगळे. उगाच का फुकट
घालवू ? हे बाळासाहेब होते, उत्स्फूर्त आणि मनात येईल ते बोलायचे.
मराठी भाषेवर तर त्यांचे अप्रतिम प्रभुत्व होते. शब्दफेकीची उत्तम जाण
त्यांना रंगभूमीवरील चांगल्या अभिनेत्याइतकीच होती. शिवाय त्यांच्या भाषणात
एक महत्त्वाचा भाग असायचा तो म्हणजे ऑडियन्स पार्टिसिपेशन. दसरा
मेळाव्यातील किंवा इतर कोणतेही भाषण ऐका. ते मधेच विसरल्यासारखे करायचे आणि
म्हणायचे.. कोण तो आपला, अरे काय नाव त्याचे.. तोपर्यंत लोकांनीच उत्तर
दिलेले असायचे. ही बाळासाहेबांची खासियत होती. लोकमानसाच्या नाडीवर त्यांनी
नेमके बोट ठेवलेले होते. त्यांना ती नेमकी गवसलेली होती.
पण बाळासाहेब जेवढे सार्वजनिक होते तेवढेच ते खासगीही होते. एकदा त्यांनी
मला सांगितले की, मी तुझ्या कर्जतच्या फार्मवर येणार आहे. तिथे मी नवीन
बंगला बांधला होता. ते म्हणाले मी येईपर्यंत इतर कुणीही जायचे नाही. त्यावर
मी म्हणालो, मीच माझ्या पैशांनी बांधले आहे, मी गेलो तर चालेल ना. ते
म्हणाले तुला कोण अडवणार? पण इतरांच्या आधी मला यायचे आहे. साहेब येणार,
गर्दी होणार हे ठरलेले. म्हणून साडेतीनशे जणांच्या जेवणाची ऑर्डर दिली. पण
त्यांच्यासाठीचे जेवण घरचे होते.
बंगला पाहण्यास सुरुवात झाली. तीन बेडरुम्स होत्या. मला म्हणाले ही कोणाची?
मी म्हटले, मुलांकरता. त्यावर लगेचच म्हणाले, इकडच्या पंख्याचा रॉड कमी
करा. मुलं नेहमी उडय़ा मारतात हात पंख्याला लागू शकतो. त्यांची
निरीक्षणशक्ती अशी अफाट होती. गोष्टी त्यांना सहज लक्षात यायच्या. म्हणून
तर शिवसेनेसारखी संघटना एवढा काळ सहज सांभाळू शकले; एवढेच नव्हे तर ती
मोठीही केली.
एकदा मी माझा मुलगा राजनसह मातोश्रीवर गेलो होतो. सोबत मनोहर जोशीही होते.
एका महत्त्वाच्या केसची चर्चा सुरू होती. जेवणाच्या वेळेस सर्वजण जेवले पण
राजन जेवला नाही. म्हणाला डोकं दुखंतंय.. थोडय़ा वेळात बाळासाहेब आले तेव्हा
त्यांच्या हातात तेल होते. त्यांनी त्याच्या डोक्यावर तेल घातले.
बाळासाहेबांच्या या कृतीने राजन पुरता हबकला होता. त्याच्यासाठी हे
अनाकलनीय होते. नंतर तो तीन- चार वेळा मी मातोश्रीवर गेलो तर सोबत राजन
नाही. त्याला ओशाळल्याप्रमाणे झाले होते. साहेबांनी विचारणा केली. मी
त्यांना त्याचे ओशाळलेपण सांगितले तर ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, राजनला
सांगा.. गेलास तेल लावत.
एरवी
घरी महत्त्वाची चर्चा सुरू असेल आणि कुणी लहान मुले आली तर त्यांना बाहेर
पिटाळले जाते. बाळासाहेब बोलत असताना आदित्य किंवा कुणी आले की त्या लहान
मुलांना ते मांडीवर घेऊन बसत. कुटुंबवत्सल होते ते.
मला स्वत:ला राजकारणात रस नव्हता. पण बाळासाहेब म्हणाले, तुम्ही राज्यसभेवर
जा. सेनेची ताकद वेगळी आहे हे तुमच्या परीने देशाच्या सर्वोच्च अशा संसदेत
दाखवण्याचा प्रयत्न करा. तुमचे इंग्लिशवर प्रभुत्व आहे. त्यामुळे तुम्ही
चांगली भूमिका मांडू शकता. त्याचवेळेस मी त्यांना म्हटले की, तुमचा आदेश
म्हणून जातो. पण मी सभापतींच्या समोरच्या व्हेलमध्ये जाणार नाही. आरडाओरडा
करणार नाही. ते म्हणाले, तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. उत्कृष्ट संसदपटू
म्हणून काम करा. त्यानंतर शिवसेनेचा खासदार म्हणून मी सहा वर्षे काम केले.
अनेक वर्षे बाळासाहेबांसाठी काम केले. पण त्याची फी कधीच घेतली नाही.
त्यावर अनेकदा बाळासाहेब विचारायचे, तुला काय हवयं. त्यावर माझे उत्तर
ठरलेले असायचे, काहीही नको. मराठी माणसांवर तुमचे ऋण आहे. ते फेडण्यासाठी
तुमच्यासोबत आहे. मी ऋण फेडतोय.
सहा वर्षांनंतर मी पुन्हा खासदार व्हावे अशी बाळासाहेबांची इच्छा होती. पण
मीच कंटाळलो होतो. कारण राजकारण हा माझा पिंड नाही. माझा आत्मा हा
वकिलीमध्येच होता. त्यामुळे बाळासाहेबांनी दोनदा सांगून पाहिले. पण माझ्याच
मनात नाही,असे लक्षात आल्यावर त्यांनी नंतर तो विषय नाही काढला.
बाळासाहेबांची प्रत्येक भेट ही संस्मरणीय होती. आयुष्यात एकच खंत राहील
आता, ती म्हणजे एवढी वर्षे बाळासाहेबांसोबत राहिलो. पण बाळासाहेब गेले
त्यावेळेस त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी नाही जाऊ शकलो. अलीकडेच माझ्या
पायावर दोन ऑपरेशन्स झाली आहेत. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे पूर्णपणे
टाळण्याचे डॉक्टरांचे आदेश आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या त्या भव्यदिव्य
अंत्ययात्रेत त्यामुळेच सहभागी होता आले नाही. पण त्या यात्रेत सहभागी
झालेल्या लाखोंपेक्षा त्यांचा सहभाग अधिक लाभल्याने मी स्वत:ला भाग्यवान
मानतो! असा नेता पुन्हा होणे कदापि शक्य नाही! |
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा