शिवसेनाप्रमुख माननीय
बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला इंद्रधनुष्याचे रंग आहेत – सारेच तेजस्वी
आणि मोहक. मार्मिक व्यंगचित्रकार कुशल संघटक, प्रभावी वक्ते, जागृत पत्रकार सहृदयी
विचारवंत असे हे दैदिप्यमान रंग लाखो लोकांना गेली कैक वर्षे आकर्षुन घेत आहेत.
ज्याकाळात बाळासाहेबांनी
व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरवात केली तो काळ राजकारणाच्या दृष्टीने
अत्यंत वैभवशाली होता. चर्चिल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशी त्यावेळची व्यंगचित्रकलेतील
त्यांची मॉडेल्स हि तितकीच महान होती. त्याकाळी फ्रिप्रेस काय किंवा आचार्य अत्र्यांचा
नवयुग काय व्यंगचित्रकार ठाकरे यांच्या मार्मिक आणि राजकीय भाष्यासहित अवतीर्ण होणार्या
व्यंगचित्रासाठी वाचकांकडून मोठ्या आतुरतेने या अंकाची वाट पाहीली जायची. त्यानंतर
सुरू झाले मार्मिक पर्व, हर्ष, राग, लोभ, तिरस्कार, प्रेम अशा भावनांच्या लाटा व्यंगचित्राच्या
माध्यमातून जनसमुहामधून उत्पन्न करण्याचे सामर्थ्य मार्मिक व्यंगचित्रांनी दाखवून दिले.
आजही ती अवीट गोडीची व्यंगचित्र पाहणे म्हणजे पुन:प्रत्ययाचा आनंद मनाला देण्यासारखे
आहे.
भ्रष्टाचार, फसवणूक,
अनैतिकता हे समाज पुरूषाला ग्रासणारे रोग जेव्हा – जेव्हा उत्पन्न झाले त्यावेळी बाळासाहेबांनी
कुशल शल्यचिकित्सकासारखे रोगट भाग कापून काढून समाजजीवन शुद्ध करण्यासाठी आपल्या लेखणीचे
शस्त्र चालविले. त्यातून अनेक उत्पाद घडले. परंतु पारदर्शक प्रामाणिकपणा हा या लेखणीचा
गुण असल्यामुळे अखेर प्रत्येक वादग्रस्त विषयातून बाळासाहेबच विजयी होऊन बाहेर पडले.
आजच्या उदयोन्मुख पत्रकारांना त्यांच्या सडेतोड – प्रामाणिक लिखाणातून बरेच काही घेण्यासारखे
आहे. अल्पावधितच शिवसेनेची बलाढ्य संघटना निर्माण करणे हा एक चमत्कारच! प्रचलित राजकीय
पक्षापेक्षा सर्वस्वी भिन्न अशा स्वरुपाची शिवसेना स्थापन करणे, जनसामान्यांच्या हृदयात
रूजविणे आणि परिस्थिती अनुकुल असो अथवा प्रतिकुल असो ती सातत्याने जीवंत व जागृत ठेवण्याचा
चमत्कार बाळासाहेबचं करू जाणे.
महाराष्ट्राला लोकोत्तर
वक्त्यांची परंपरा लाभली आहे. लोकमान्य टिळकांपासून आचार्य अत्र्यांपर्यंतच्या प्रदीर्घ
काळात महाराष्ट्राने प्रभावी वक्त्यांची एक मालिकाच पाहिली. त्यानंतर मात्र वक्तृत्वविश्वात
टिळक युग आणि अत्रे युगानंतर बाळासाहेब ठाकरे युग अवतरले. समोर लाखोंचा जनसमुदाय बसला
आहे आणि व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे आपल्या खणखणीत आवाजात श्रोत्यांना कधी हसवीत
– कधी रडवीत – कधी चिडवीत तर कधी समजावीत आपले विचार पटवून देत आहेत. तहान, भूक, श्रम,
देहभान हरपून तासन् तास चाललेली सभा हे दृष्य केवळ बाळासाहेबांच्याच कार्यक्रमांना
दिसते. आजतरी महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या जोडीचा वक्ता नाही आणि म्हणून मराठी श्रोत्यांच्या
दृष्टीने बाळासाहेबांचे भाषण हा एक अमोल ठेवा असतो. किंबहुना ते भाषण नसून ते संभाषण
असते. हृदयाचा हृदयाशी झालेला तो एक सुसंवाद असतो.
आज बाळासाहेब केवळ शिवसेनाप्रमुख
राहिले नाहीत तर देशातील हिंदूंचे अद्वितीय नेते झाले आहेत. जनतेनेच त्यांना हिंदुहृदयसम्राट
हि समर्पक पदवी बहाल केली आहे. खर्या अर्थाने हिंदुत्वाच्या आशा फलद्रुप होण्याचे
ऐतिहासिक कार्य बाळासाहेबांमुळेच घडेल असा तमाम हिंदूंचा विश्वास आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा