शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

शिवसेनाप्रमुखांवर नागपूर व माहीम येथे जीवघेणे हल्ले


१९६९ साली शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांची नागपूर येथे जाहीर सभा झाली. काही महत्त्वाचे काम असल्यामुळे ते सभा संपल्यावर रात्रीच मुंबईस यायला निघाले. रात्री दीडचा सुमार होता. शिवसेनाप्रमुखांनी नागपूर विमानतळावरच बुक स्टॉलवरून पं. नेहरूंची प्रस्तावना असलेले ( ‘वाईल्ड लाईफ इन इंडिया’ ) हे पुस्तक विकत घेतले आणि ते आवडल्यामुळे वाचनात रंगून गेले. इतक्यात दिलीप देवधर घाबऱ्या आवाजात सांगू लागले की, “नागपूरच्या कुप्रसिध्द लालभाईपैकी नायडू, चौबे, यादव, पाटील इ. दहाजणांचे टोळके तिथे आले आहे,” त्यामुळे अर्थात चौघेही जण ‘तय्यार’ होतेच. परंतु सावधगिरी म्हणून बाळासाहेब तिथे उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला ती माणसे दाखवून त्यांचा बंदोबस्त करायला सांगून पुन्हा आपल्या जागी आले. एवढा प्रकार होतो तो ते टोळके त्यांच्याजवळ आले. त्यांचा म्होरक्या नायडूने शिवसेनाप्रमुखांजवळ येत आपल्याशी चर्चा करायची आहे, अशी मागणी केली. विमानाला अगदीच थोडा अवधी होता आणि चर्चा करणे हा निव्वळ बनाव होता. ते आले होते निराळ्याच इराद्याने. अर्थात बाळासाहेबांनी नकार दिला. त्याबरोबर ‘इतना बडा नेता होकर चर्चा नही कर सकते, तो अपमान करना पडेगा’ असे म्हणून त्याने काही संशयास्पद हालचाल करताच त्याला पहिला तडाखा खुद्द शिवसेनाप्रमुखांनी हाणला. मग इतर अवघे तीनच शिवसैनिक असले तरी गप्प बसतात की काय? त्यांनी मग परिणामाची क्षिती न बाळगता त्या टोळक्याला खरपूस रगडून काढले. शिवाय मनोहर शामराव पाटील, मोहनसिंग यादव, मनोहर नायडू यांना पकडून तिथे बघ्याच्या भूमिकेत उभ्या असलेल्या पोलिसांच्या हवाली केले. त्यांच्यातला सर्वांत धोकेबाज समजला जाणारा चौबे याची अशी खातरजमा शिवसैनिकांनी पटवून दिली की तो अक्षरश: ढुंगणाला पाय लावून कुंपणावरून सरड्यासारखा पळाला ! दहा विरुध्द चारांचा हा सामना पाहून सर्वजण स्तिमित झाले. हे सर्व चालले असता स्टुडंट युनियनचे कार्यकर्ते मात्र एका कोपऱ्यात उभे राहून भेदरट नजरेने पाहत होते.हा सर्व प्रकार नागपूरची पोलीस मंडळी सिनेमासारखी पाहत बसली होती. कमाल आहे ! अशा बघ्या लोकांची नेमणूक सरकार का करते हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रकरणात शिवसैनिकांची ताकद काय आहे याचा प्रत्यय तर लालभाईंना आलाच, पण त्यांचा सेनापतीदेखील तसाच धडाडीचा नि साहसी आहे याचेही प्रत्यंतर मिळाले. या लढाईमुळे नागपुरातल्या तथाकथित भयंकर लालभाईंची अब्रू अक्षरश: उघड्यावर आली आणि नागपुरात त्यांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. शिवसेनेशी दिलेला सामना किती गरम पडतो हेही त्यांच्या चांगले लक्षात आले असेल.दुसरी घटना माहीमची. शिवसेनाप्रमुख सपत्नीक दादरहून वांद्र्याला जाणण्यासाठी रात्री निघाले होते. माहीम चर्चजवळ गाडी आली आणि एका टॅक्सी ड्रायव्हरने त्यांच्यासमोर गाडी काढण्याचा प्रयत्न केला. शिवसेनाप्रमुखांनी गाडी उभी करून त्याला जाब विचारला. हा ड्रायव्हर मुसलमान असल्यामुळे आणि माहीमची वस्ती मुसलमानांची असल्यामुळे ताबडतोब त्या भागातील अनेक मुसलमान गाडीजवळ गोळा झाले. हे दृश्य बघून शिवसेनाप्रमुखांनी आपले रिव्हॉल्व्हर जमावावर रोखले आणि ते तेथून सरळ पोलीस स्टेशनला गेले. त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला पकडून आणण्यात आले.शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचे नेते महाडमार्गे कोकण दौऱ्यावर गेले. तेथून परत येत असताना कौसा गावाजवळ एका बैलगाडीवाल्याने बैलगाडी पुढे काढण्याचा प्रयत्न केला. त्याला बैलगाडी थांबवण्याची विनंती शिवसैनिकांनी केली, परंतु ती विनंती या गाडीवाल्याने मानली नाहीच. उलट विनंती करणाऱ्या शिवसैनिकाला चाबकाने फटकाविले आणि भगव्या झेंड्याला शिव्या दिल्या. त्यावरून बोलाचालीस सुरुवात होते न होते तोच कौसा गावातून शे-दोनशे लोकांची झुंड येऊन त्यांनी बेफाम दगडफेक व सोडावॉटरच्या बाटल्यांनी हाणामारीस सुरुवात केली. बैलगाडीवाला मुसलमान होता म्हणून तेथील जातभाई संघटित झाले. या प्रकाराला अनिष्ट वळण लागू नये या हेतूनेच केवळ कसेबसे स्वत:चे संरक्षण करीत गाड्या पुढे रवाना झाल्या. गाडीत बसलेले श्री. भालचंद्र ठाकूर आणि इतर शिवसैनिक तात्काळ खाली उतरले आणि त्यांनी अंगावर येणारी मुस्लिमांची झुंड रोखली.दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांच्या गाड्या महाडला जात असताना वाटेत कौसा गावाजवळ दगडफेक होऊन दंगल पेटली. कौसा गावात आगी लावण्यात आल्या. एस.टी.च्या गाड्या मागे परतल्या. या सर्व शिवसैनिकांबरोबर दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी आदी होते. ही सर्व गडबड सुरू झाल्यामुळे थोड्याच वेळात तेथे पोलिसांच्या गाड्या आल्या आणि एका सब-इन्स्पेक्टरने मनोहर जोशींवर रिव्हॉल्व्हर रोखले. कदाचित गोळीसुध्दा झाडली असती, परंतु शिवसेनेचे श्री. शरद आचार्य हे मध्ये पडले व त्यांनी स्वत:जवळचे खाजगी रिव्हॉल्व्हर काढून पोलीस अधिकाऱ्यावर रोखून धरले व त्यास रागाने विचारले, ‘‘मनोहर जोशींना ओळखत नाहीस काय? तू जर गोळी घातलीस तर पुरा महाराष्ट्र पेटेल.” शरद आचार्यांचा रोख आणि आव्हान पाहून पोलीस अधिकारी सरळ झाला आणि त्याने जोशींची माफी मागितली.मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राष्ट्रातील एक जबरदस्त राजकीय व्यक्ती बनली होती. आपल्या देशातील राजकीय नेत्यांची मुले राजकारणात उतरलेली आहेत. राजकारणात घराणेशाहीला मग ती कुठलीही असो, याला अपवाद मात्र मा. बाळासाहेबांचा. आपल्या तिन्ही मुलांनी राजकारणात पडावे असे मात्र कधीही त्यांना वाटले नाही. तसा हट्ट अथवा प्रयत्नदेखील त्यांनी केला नाही. आपल्या मुलांनी संसार सुखाने नीट चालावावा याकडे त्यांचे पिता म्हणून, कुटुंबप्रमुख म्हणून लक्ष असे. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या काळात आपल्या मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना याकडॆ त्यांचे लक्ष असे. आज जगभर हिंदू नेते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख आहे. एक धुरंधर राजकीय नेते म्हणून त्यांची गणना केली जाते.१९९५ सालची विधानसभा शिवसेना-भाजपा युतीने जिंकली. ‘याची देही याची डोळा’ मा. शिवसेनाप्रमुखांचे शिवशाही व विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर लगेच १९९६ ची लोकसभा निवडणूक होणार होती. शिवसेना आपल्या सर्वशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरली. मा. बाळासाहेब प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईबाहेर गेले होते. त्या दिवशी बाळासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र बिंदुमाधव यांच्यावर महासंकट कोसळले. त्यांच्या गाडीला जबरदस्त अपघात झाला. त्या अपघातात बिंदुमाधवांचं दुर्दैवी निधन झालं. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. ठाकरे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळवणारी ही परिस्थिती मोठी गंभीर होती. अत्यंत कठीण प्रसंग होता. मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांनी मनाचा दगड करून ही दु:खद वार्ता बाळासाहेबांना कळवली. माझ्या लाडक्या बिंदुमाधवचं निधन! तेही अपघाती निधन! अरेरे ! बाळासाहेब कमालीचे सुन्न झाले. प्रचार दौरा अर्ध्यावर सोडून बाळासाहेबांनी मुंबईकडे धाव घेतली. मुलाच्या निधनाची बातमी ऎकून बाळासाहेब कमालीचे कासावीस झाले होते. त्यांचा गळा दाटून आला होता. श्वासही कोंडला होता. बिंदुमाधवाचा पार्थिव देह पाहून त्यांचा बांध फुटला. दु:खाचा ओघ वाहू लागला. असह्य दु:खामुळे डोळ्यांतून अश्रूंच्या अखंड धारा वाहू लागल्या. बिंदुमाधवचा मृत्यू बाळासाहेबांच्या मनस्वी पितृहृदयाला सहन होत नव्हता. कुठल्याही क्षणी ते सर्वार्थाने कोलमडून पडतील अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रयत्नाने बाळासाहेब बिंधुमाधवच्या निधनाचं दु:ख सहन करीत होते. स्वत:च स्वत:ला धीर देते होते. आधार देत होते. आणि पुन्हा सहा महिन्याच्या आत आणखी एक जीवन उन्मळून टाकणारा प्रचंड आघात झाला. पत्नी मीनाताईंच्या निधनाचा नियतीने आणखी एक जबरदस्त हादरा दिला! शिवसैनिकांच्या माँसाहेब, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची सावली हे जग सोडून गेली. यामुळे शिवसेनाप्रमुख पुन्हा एकदा उन्मळून गेले. बिंधुमाधव आणि मीनाताई यांच्या जाण्याने बाळासाहेब खचले होते. पण त्यांनी ते कधीच आपल्या चेहऱ्यावर दिसू दिले नाही.काही वर्षांनंतर ज्याच्यावर पुत्रवत प्रेम केले, ज्याला मुख्यमंत्री केले त्या नारायण राणेंची हकालपट्टी करावी लागली. पुतण्या राजही सोडून गेला. आपली सारी दु:खं विसरून मा. बाळासाहेब अतिशय ताठ मानेने, पूर्ण आत्माविश्वासाने जीवनसंग्रामात ठामपणे उभे राहिले. आपल्या मराठी माणसासाठी! आणि हिंदू धर्मासाठी!! त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही. शिवसेनेच्या सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी मा. बाळासाहेब अहोरात्र झटत राहिले. महाराष्ट्रात पुन्हा शिवशाही यावी, मंत्रालयावर भगवा फडकावा हे त्यांचे स्वप्न होते आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हे प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकांचे कर्तव्य आ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा