मंगळवार, २० जानेवारी, २०१५

बाळासाहेब, शिवसेना आणि मी -छगन भुजबळ

मी महाविद्यालयात असताना, नेमकं सांगायचं झाल्यास माटुंगा, मुंबई येथील व्ही.जे.टी.आय. या संस्थेत शिकत असताना तिथल्या विद्यार्थी संघटनेचा मी सचिव होतो. बाळासाहेब ठाकरे त्यावेळी प्रसिद्घ अशा सा.मार्मिक मधून वाचा व थंड बसा हे सदर चालवायचे. त्यामध्ये मुंबईत असलेल्या दाक्षिणात्यांच्या कंपन्या व त्यामध्ये काम करणाया दक्षिण भारतीयांची नावे जाहीर करायचे हे सदर अनेक आठवडे चाललं. त्यानंतर त्यांनी वाचा आणि उठा अशी घोषणा केली. त्यानंतर एके दिवशी अचानक बाळासाहेब ठाकरे जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर झालं. विद्यार्थी मित्र म्हणाले, ही सभा नोकरीच्या संदर्भात आहे. आपण सभेला जाऊया. भविष्यात आपल्याला फायदाच होईल. बाळासाहेबांची ही सभा मोठया दणक्यात पार पडली. या सभेत त्यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी आपण काम करणार असल्याचं जाहीर केलं. सभेनंतर मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला माझगांव शिवसेना शाखेचा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली. त्यावेळी वॉर्ड निहाय शाखा प्रमुख नव्हते. शिवसेनेतील एक ज्येष्ठ नेते दत्ता प्रधान यांनी शिवसेनेच्या शाखांची व्यवस्थित मांडणी केली.

बाळासाहेबांची नंतरची भाषणं म्हणजे लोकांना चेतवण्याचा अंगार आणि ताकद असलेली भाषणं होती. त्यांच्या भाषणानं मराठी तरूण पेटून उठू लागले. आपल्या हक्कासाठी जागरूक झाले. त्यावेळी मुंबईत दाक्षिणात्यांची उडूपी हॉटेल्‌स आणि मराठी शिवसैनिक यांच्यामध्ये फार मोठा संघर्ष झाला. मुंबईच्या कामगार क्षेत्रात विशेषतः गिरणगावात कम्युनिष्टांचं मोठं प्राबल्य होतं. कम्युनिष्टांबरोबर शिवसेनेचा तीव्र असा संघर्ष झाला. कम्युनिष्टांचा विरोध वाढत गेला आणि त्यांच्या विरोधात वातावरणही वाढत गेलं.

बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर प्रेम होतं. त्यांच्या समवेत मी २५ वर्षे काम केलं. आम्ही एकत्र कुटुंबासारखे राहिलो. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी आम्हाला प्रेम दिलं. ते नाशिकला आले म्हणजे माझ्याच घरी उतरत असत. माझ्या घराबाहेरील आवारात बाग बगीच्या करण्यामध्ये त्यांना आनंद मिळत असे. कोणते फुलझाड किंवा वेल कुठल्या ठिकाणी लावावी, याचं त्यांनी त्यावेळी मार्गदर्शन केलं. आवारातील एका विहीरीला पाणी लागत नव्हतं. त्यावेळी त्यांनी विहीरीला आडवे बोअर घेण्याची सूचना केली, ती आम्ही मानली, विहीरीला पाणी लागलं. 

बाळासाहेबांना गुणवान माणसं जमविण्याचा छंद होता. त्यांनी चित्रपट सृष्टीसह अनेक क्षेत्रातील दिग्गज माणसं जोडली. सुपरस्टार अमिताभ बच्चनला बोफोर्स प्रकरणात मदत केली. संजय दत्तला देखील त्यांनी मदत केली. दादा कोंडके तर शिवसैनिकच झाले होते. चित्रपट सृष्टीतले असे अनेक दिग्गज लोक बाळासाहेबांच्या प्रेमात कायमचे पडले. शिवसेनेत बाळासाहेबांमुळेच मोठमोठया सभा गाजवणारे आणि तोफखाना समजले गेलेले अनेक लोक आले. वि.मा.दि. पटवर्धनांसारखा ज्येष्ठ विचारवंत शिवसेनेच्या थिंकटँक मध्ये होता. बाळासाहेब त्यांच्याशी नेहमी चर्चा करीत असत. पत्रकार ग.वा. बेहरे, सेनापती बापट यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांशी बाळासाहेबांची घनिष्ट मैत्री होती. बाळासाहेबांच्या बोलण्यात हजरजबाबीपणा होता. विनोदी कोटया करून समोरच्या जनतेला हसविण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. अनेकांच्या नकला आपल्या भाषणात ते सहजपणे करीत. परिणामाची चिंता न करता एखाद्या सामाजिक हिताच्या विषयावर ते परखडपणे, स्पष्टपणे बोलत असत, कठोर आघात करीत असत.पुढे मी शिवसेनेतर्फे नगरसेवक झालो. १९८५-८६ साली मुंबईचा महापौर झालो. बेळगांवकारवार महाराष्ट्राला मिळावं म्हणून मोठं आंदोलन झालं होतं. मोरारजी देसाईंनी त्यावेळी कडक भूमिका घेतली होती. मी या आंदोलनात उतरल्यामुळे मला पहिल्याच दिवशी अटक झाली व सुटकाही झाली. पण पुढे मुंबई पेटली, जाळपोळ सुरू झाली. लोक भयंकर चिडले होते. बाळासाहेब ठाकरेंना देखील अटक झाली. तीन महिने बाळासाहेब तुरूंगात होते. नंतर १९८७ साली बेळगांव प्रश्नी झालेल्या आंदलनात आमचे नेते शरद पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे, एस.एम.जोशी. एन.डी.पाटील यांनी बेळगांवात सत्याग्रह करावयचं ठरविले. या सत्याग्रहात शिवसेनेचं दुसया फळीचं नेतृत्त्व छगन भुजबळ करतील, असं ठरलं. कर्नाटकात हे समजताच भुजबळांना बेळगावामध्ये पाय ठेऊ देणार नाही असे जाहीर झालं. मी पांडे नावाचा हिंदी पत्रकार बनून कुर्ता पायजमा आणि गळ्यात शबनम बॅग अडकवून बाळासाहेबांना भेटायला गेलो. मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे, अस त्यांना म्हणालो परंतू त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मला ओळखलं नाही. नंतर गोव्याला गेलो तिथून नारायण आठवले आणि तरूण भारतचे संपादक किरण ठाकूर माझ्याबरोबरहोते. प्रमोद नलावडे नावाच्या वेशभूषाकाराने मला शेख इकबाल बनवले. सुटाबुटात आणि हातात पाईप घेऊन शेख अब्दुल्ला हे नाव धारण करून लोखंडी पाईपचा कारखानदार या नात्याने बेळगांवात प्रवेश मिळवला. आणि तेथे गुजराती व्यापायाच्या घरात आश्रय घेतला. भुजबळ म्हणून मला त्यावेळी कोणीही ओळखले नाही. बेळगांवात मोठे आंदोलन झाले. अनेकांची डोकी फुटली. आंदोलन कर्त्यांना धारवाडच्या जेलमध्ये टाकण्यात आले. मी दीड महिना जेल मध्ये होतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या इतिहासात अविभाज्य स्थान असलेल्या या सीमा आंदोलनात मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली, ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. चांगले काम केल्यामुळे त्यांच माझ्यावरील प्रेम आणि विह्णास वाढला. माझ्या पत्नीचं ऑपरेशन झाल्यामुळे ती मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल होती. त्यावेळी बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी मॉ साहेब दोघेही रुग्णालयात येऊन माझ्या पत्नीच्या उशाशी बसले होते, असं भुजबळांनी आपल्या मुलाखतीत कृतज्ञतेने नमूद केलं आहे. शिवसेनेचा महापौर आणि आमदार अशी दोन्ही पदं मी भूषविली. सुंदर मुंबई मराठी मुंबई ही घोषणा देऊन त्याची सुरूवात म्हणून हुतात्मा स्मारकाजवळ अवघ्या ३३ दिवसात उद्यान शिल्प उभारले. प्रविण काटवींनी त्यांचं डिझाइन केलं. त्याचा पाया देखील मजबूत असा आहे. २६ जानेवारी १९८६ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे बॉम्बे चे मुंबई असं नामकरण करण्यात मी पुढाकार घेतला. या नामकरण समारंभास सर्व पक्षाचे नेते आणि विविध भाषिक उपस्थित होते. आणि सर्वांनी त्यावेळी आम्ही यापूढे बॉम्बेचा उल्लेख मुंबई असाच करणार असा निर्धार केला.

यामुळे मुंबईवर मराठीचा ठसा उमटला. मराठीचा हा ठसा कायम उमटला जावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठी भाषेतून सुरू झाला. सुंदर मुंबईस्वच्छ मुंबई या घोषणेअंतर्गत मुंबईतील सर्व ट्राफीक आयलंड सुंदर आणि हिरवीगार करण्याचं काम १९८६ साली विविध कंपन्यांना त्यांचा लोगो वापरण्याच्या अनुमतीसह दिलं ही संकल्पना त्यावेळी मुंबईत नवीनच होती. या कामावर बरीच टीका झाली. परंतू ही संकल्पना राबविण्यासाठी मला बाळासाहेबांचं सहकार्य आणि प्रोत्साहन मिळालं. मी हाती घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या बाबतीत त्यांनी मला वेळोवेळी धीर दिला.
बाळासाहेब ठाकरे हे ख्यातनाम व वाचकप्रिय व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रातून हजारो शब्दांचे सामर्थ्य व्यक्त होत असे. अशी व्यंगचित्र काढण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. आता सुध्दा फटकारे या त्यांच्या व्यंगचित्र पुस्तकात बाळासाहेबांच्या स्वभावातील हा पैलू स्पष्टपणे दिसून येतो. शिवसेनेत असताना मी लढवय्या नेता म्हणून ओळखला जात होतो. अनेक आंदोलनात मलाच अग्रभागी पाठवीले जात असे. विधानसभेत शिवसेनेचा एकमेव आमदार म्हणून मी हिरीरीने आवाज उठवित होतो. शिवसेना वाढविण्यासाठी मी मोठे योगदान दिलं. पुढे मंडल आयोगाच्या प्रश्नावर माझे आणि शिवसेनेचे मतभेद झाल्यामुळे मी १८ आमदारांसह शिवसेना सोडली. शिवसेना ब गटाचा मी नेता झालो. पक्षांतरानंतर १९९५ मध्ये विधान सभेत विरोधी पक्ष नेता बनलो. माझ्यावर शिवसेनेकडून हल्ले झाले. २५ वर्षे शिवसेनेसाठी शिवसेनेत राहून लढलो.
१९९० साली बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात एक प्रकरण न्यायालयात दाखल केलं होतं. बरीच वर्षं हे प्रकरण प्रलंबित होतं. बाळासाहेबांची प्रकृती विचारात घेता त्यांना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टात बोलवणे योग्य नव्हे, असं माझं मत झाल्यामुळे हे प्रकरण मी मागे घेतलं. त्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांसह मातोश्री वर स्नेहभोजनासाठी गेलो. अतिशय आनंदी वातावरणात आमची भेट झाली. आमच्यामध्ये पूर्वी भांडणे झाली होती, याची पूसटशी जाणीव देखील यावेळी झालेल्या आमच्या संवादात बाळासाहेबांकडून दिसून आली नाही. आमच्यातील प्रेमाचे संबंध पुन्हा पूर्ववत झाले. वाढदिवसाला आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत असू. आमच्यामध्ये असलेला पूर्वीचा कडवटपणा नंतर नाहीसा झाला. ज्या ज्या वेळी मी बाळासाहेबांना भेटलो, त्या त्या प्रत्येक वेळी त्यांचे विचार त्यांचा
दृष्टीकोन वेगळा असल्याचं जाणवलं. तरी सुद्घा आमच्या स्नेह संबंधामध्ये दुरावा आला नाही.
शिवसेनेत असताना ती वाढविण्यासाठी ज्या ताकदीनं मी लढलो, शिवसेना सोडल्यानंतर तेवढयाच ताकदीनं शिवसेनेच्या विरोधात लढलो. शिवसेनेत २० वर्षे मराठी भाषा आणि मराठी जनतेसाठी कार्य करीत होतो. तरीसुद्घा शिवसेना विधान सभेत जाऊ शकली नाही. ठाणे तसेच मुंबई महापालिकेत शिवसेना जिंकली होती. मात्र, विधान सभेत जाण्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड शिवसेनेला वापरावे लागले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे दुर्गा पूजनानंतर झालेल्या आंदोलनात मी वेषांतर करुन गेलो होतो. 

या विषयावर नागपुरच्या विधानसभा अधिवेशनात चर्चाही झाली होती. काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांकाच्या बाजूने बोलत होता. हिंदुत्वासाठी मी कडक शब्दात आणि घणाघाती बोललो होतो. भाषण करताना काहीही बोलण्या ऐवजी विधान सभेत हाताच्या बोटाची मी विशिष्ट खूण केली होती. त्यावर मोठा गहबज झाला होता. मार्शलकरवी मला सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं होतं. १५ दिवस मी बाहेर होतो. विधानसभेत मी जे काही केलं,त्याची माहिती देण्यासाठी भीतभीतच बाळासाहेबांना भेटलो. कदाचीत ते रागवतील, अशी मला भिती वाटत होती. मात्र, बाळासाहेबांनी मला या प्रकरणी शाबासकीच दिली. शिवसेनेने घेतलेल्या हिंदुत्वाच्या कार्डावर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला आमदार म्हणजे डॉ.रमेश प्रभू होय. टी.बाळू आणि लखोबा याबाबत बोलताना भुजबळांनी आपली आठवण सांगितली. ते म्हणाले, मी विरोधी पक्ष नेता होतो. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनाभाजपचं सरकार होतं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक वर्ष कुठल्याही वृत्त पत्रात किंवा प्रसिद्घी माध्यमात सेनाभाजपाच्या विरोधात एक अवाक्षरही छापलं गेलं नाही. याच काळात मी विरोधी पक्ष
नेता होतो. टीका करणं हे माझं काम होतं. याच काळात घाटकोपर येथे एक सभा झाली. तत्पूर्वी मी शिवसेना सोडल्यामु
ळे मला लखोबा हे नाव देऊन माझ्यावर टीका केली जात असे. याच घाटकोपरच्या सभेत मी माझ्या घणाघाती भाषणात बाळासाहेबांचा उल्लेख टी.बाळू असा केला.

नंतरच्या काळात किणी प्रकरण, मनोहर जोशी प्रकरण इत्यादी प्रकरणे बाहेर आली, वर्तमानपत्रात टीका सुरू झाली.शिवसेना सोडल्यानंतर माझ्यावर शिवसैनिकांनी मंत्रालय समोरच्या बंगल्यात मी राहत असताना मोठा हल्ला केला. बंगल्याच्या पुढून आणि पाठीमागून शिवसैनिक मला मारण्यासाठी बंगल्यात घुसले. त्यांनी बंगल्याचं वातानुकुलीत यंत्र फोडलं, दरवाजे फोडले, मी बंगल्याच्या शयन कक्षात होतो. माझ्या रक्षणासाठी एक पोलीस गार्ड आणि एक नवीन पोलीस तैनात होता. माझ्यावर आलेला बाका प्रसंग पाहून माझा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर माझ्या मदतीसाठी धावून आले होते. परंतू मी त्यांना येऊ नका म्हणून सांगितलं. माझ्या समवेत असलेल्या पोलिसाला काय सुबुद्घी सुचली कोणास ठाऊक? समोर हल्लेखोर दिसताच त्यानं हातातील बंदूक ताणून धरली आणि स्वतःच फायर फायर म्हणून जमावाच्या दिशेनं धावत गेला. त्याच्या या कृत्यामुळे आता गोळीबार होणार म्हणून माझ्यावर हल्ला करण्यासाठी आलेला जमाव पांगला गेला. अन्यथा त्यावेळी माझी काही खैर नव्हती. ४५ वर्षांपूर्वी शिवसेनेची निर्मिती करुन बाळासाहेबांनी शिवसेनेचा झेंडा मंत्रालयात फडकविण्याचं महाराष्ट्राला स्वप्न दिलं. आणि प्रयत्नपूर्वक त्यांनी ते साकार देखील केलं. एवढचं नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभेत देखील त्यांनी शिवसेनेचे खासदार पाठविले. काही जणांना केंद्र सरकारमध्ये मंत्री सुद्घा केलं. बाळासाहेबांनी जे जे कार्य केलं, ते जागतिक दर्जाचं होतं. जाहीर स

भेत बोलताना ते कधीच घाबरत नसत. तडजोड हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता. त्यांच सडेतोड बोलणं लोकांना भावायचं म्हणूनच बाळासाहेबांच्या शब्दाखातर लोक प्राण देण्यास तयार असत.


(छगन भुजबळ यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींचा संपादित भाग.)
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा