राजा कलावंतांचा !
वासुदेव कामत
(शब्दांकन - विनायक परब)
response.lokprabha@expressindia.com
जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला शिकत असताना आमचा मित्रांचा एक गट होता. या संपूर्ण
गटाचे तेव्हाचे आकर्षण होते, मार्मिक ! बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेले व्यंगचित्र
त्याच्या मुखपृष्ठावर असायचे आणि आतमध्ये सेंटरस्प्रेडवरही बाळासाहेबांचीच व्यंगचित्रे
असायची. आमच्यापैकी प्रत्येकाला ती खूप आवडायची. त्यावेळेस आर. के. लक्ष्मण हेदेखील
तेवढेच प्रसिद्ध होते. पण आरकेंची व्यंगचित्रे लहान आकाराची होती, अर्थात ती पॉकेट
कार्टुन्स असायची. आणि बाळासाहेबांची मात्र मोठय़ा आकारात. त्या मोठय़ा आकारातील
व्यंगचित्रांचे एक वेगळे आकर्षण होते. बाळासाहेब त्या व्यंगचित्रामध्ये त्या संबंधितांचे
व्यक्तित्त्व नेमके कसे पकडतात, ते पाहणे हा आमच्यासाठी त्यावेळेस अभ्यासाचा विषय
होता. खरेतर त्या वेळेस माझा शिवसेनेशी तसा काहीच संबंध नव्हता. पण बाळासाहेबांना
आम्ही सर्वजण एक चांगले कलावंत मानायचो. मानवी शरीररचनाशास्त्राचा अर्थात अॅनाटॉमीचा
बाळासाहेबांचा अभ्यास अतिशय दांडगा होता, हे त्यांची व्यंगचित्रे पाहून जाणवायचे
आणि त्याचे प्रचंड कौतुकही वाटायचे. कुदळीच्या पात्याप्रमाणे नाक असलेले इंदिरा
गांधीचे त्यांनी चितारलेले व्यंगचित्र तर त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी
थोडी; असेच होते. त्यानंतर अनेक वर्षे मी त्या व्यंगचित्रावर विचार करत होतो. आजही
ते व्यंगचित्र मला स्पष्ट आठवते आहे.
बाळासाहेबांच्या व्यंगचित्रात त्यांनी कधीच ओढून ताणून व्यंग त्यात आणलेले मी पाहिलेले
नाही. किंबहुना त्यामुळेच त्यांची व्यंगचित्रे पाहताना एक वेगळीच धमाल त्या वयात
वाटायची. हे सारे मी कॉलेजमध्ये असतानाचे म्हणजे १९७४ ते ७७ या कालखंडातील आहे.
ज्यांना व्यंगचित्रांची आवड होती, अशी सर्वच मंडळी त्यावेळेस मार्मिक विकत घ्यायची.
त्यात शिवसैनिक नसणाऱ्यांचाही समावेश होताच. त्यानंतरही बाळासाहेबांची व्यंगचित्रे
पाहण्यात होतीच. पण प्रत्यक्ष संबंध यायला बराच अवधी जावा लागला. १९९७ साली मला
म्हाडाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे चित्र चितारण्यासाठी पाचारण
करण्यात आले. दिलीप नेरूरकर यांनी माझे
नाव सुचवले होते. म्हाडाच्या मुख्यालयाच्या इमारतीची रचनाही मंत्रालयाच्याच इमारतीप्रमाणेच
आहे. महाराज गडावरून उतरत असल्याचे प्रसिद्ध चित्रकार कांबळी यांनी केलेले चित्र
मंत्रालयात आहे. तसेच चित्र या म्हाडाच्या मुख्यालयातही असावे, अशी एक कल्पना त्यावेळेस
पुढे आली होती. मला पाचारण करण्यात आले त्यावेळेस मी म्हटले की, इमारती वेगवेगळ्या
आहेत त्यातून चालणारा कारभारही वेगळाच आहे. तर मग चित्र तेच कशासाठी? आतले चित्र
वेगळे असावे. त्यावेळेस डोक्यात एक कल्पना घोळत होती. आजपर्यंत आपण शिवाजी महाराजांची
पाहिलेली सर्व चित्रे ही प्रोफाइल पद्धतीची एका बाजूने महाराज दिसतील, अशा पद्धतीने
चितारलेली आहेत. त्यात एका बाजूस इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करत असल्याचे
गाजलेले चित्रही आहे. ..पण राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपतींच्या चेहऱ्यावरचे भाव
समोरच्या बाजूने दाखवता आले तर? महाराज मेघडंबरीमध्ये विराजमान आहेत, त्याचे चित्र
मला चितारायचे होते.
विषय निश्चित केला. विषयासाठी आवश्यक त्या संदर्भाचा अभ्यासही केला. त्यावेळेस
असे लक्षात आले की, तेव्हा खूर्ची नव्हती. त्यामुळे खाली पाय सोडून बसण्याची पद्धत
नव्हती. त्यामुळे मग खूरमांडी घालून बसलेले शिवराय असे वेगळे स्केच तयार केले.
ते रेखाचित्र बाळासाहेबांना दाखवायचे आणि त्यांनी ‘हो’ म्हटले तर विषय पुढे सरकणार,
असे सांगण्यात आले होते. पहिल्यांदा एकदा सुभाष देसाई यांच्यासमवेत मातोश्रीवर
गेलो होतो. पण त्यावेळेस बाळासाहेबांची भेट झालीच नाही. निराशेने परतलो. नंतर दुसऱ्यांदा
गेलो त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई दोघेही तिथेच होते. बाळासाहेबांसमोर
मॉडेल ठेवले त्याचवेळेस ते खुश झाले आणि सुभाष देसाईंकडे पाहून म्हणाले. ही खरी
भारतीय बैठक. याला खुरमांडी म्हणतात. हे केले आहेस ते अगदी बरोबर आहे ! ती बाळासाहेबांची
झालेली पहिली थेट भेट होती !
त्यांच्या कौतुकाने उत्साह दुणावलेला होता. नंतर परत एकदा बाळासाहेबांची भेट झाली
त्यावेळेस मी माझे चित्रांचे आल्बम घेऊन गेलो होतो. त्यांनी आल्बम व्यवस्थित पाहिले
त्यातील चित्रांवर त्यामधल्या बारकाव्यांवर चर्चाही केली. मग त्यांच्या संग्रहामध्ये
असलेली काही चित्रेही दाखवली. त्यात प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी चितारलेल्या
शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या चित्राचाही समावेश होता.
त्या आणि नंतर झालेल्या भेटींमध्येही मला जाणवलं होतं की, बाळासाहेब ठाकरे
या व्यक्तीला कलाकार-कलावंत यांच्याबद्दल विशेष आपुलकीची भावना होती. ‘म्हाडा’साठी
केलेले ते चित्र पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सजावटीचे काम प्रसिद्ध नेपथ्यकार रघुवीर
तळाशीलकर यांनी केले होते. त्याचे उद्घाटन बाळासाहेबांच्याच हस्ते व्हायचे होते.
कार्यक्रमापूर्वी तळाशीलकर मला म्हणाले, ‘ आपली राजकीय मते काहीही असोत. कलाकारांबद्दल
बाळासाहेबांच्या मनात आपुलकी व प्रेम कसे असते, याचा प्रत्यय तुला येईलच.’ ते असे
का म्हणाले ते मला तेव्हा कळले नव्हते. पण नंतरच्या कार्यक्रमात मला त्याचा प्रत्यय
आला. त्या कार्यक्रमात बाळासाहेबांच्या हस्ते अनेकांचा सत्कार झाला.
पण आमच्या
दोघांच्या सत्काराच्या वेळी बाळासाहेब खुर्ची मागे करून व्यासपीठाच्या एका बाजूला
चालत जात टेबलांच्या पुढच्या बाजूस आले आणि त्यांनी मी व तळाशीलकर यांचा सत्कार
केला. ते त्या वेळेस म्हणालेही की, कलावंतांचा मान वेगळा असतो. तो त्यांना द्यायलाच
हवा!
त्यानंतर बाळासाहेबांचा संबंध आला तो बोरिवली येथे प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाची
निर्मिती झाली त्या वेळेस. प्रबोधनकारांचे व्यक्तिचित्र साकारण्याची संधी मला मिळाली
होती. चित्रकलेच्या बाबतीत बाळासाहेब अतिशय काटेकोर होते. शिवाय त्यांच्यासमोरचा
माणूस कितीही मोठा असला तरी त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर ते कुणालाही ऐकवायला
कमी करीत नाहीत. शिवाय बाळासाहेबांचे शब्द म्हणजे धारदार. या सर्व गोष्टींचे टेन्शन
होतेच. पण माझ्या अभ्यासाविषयीदेखील मला खात्री होती. मी आवश्यक ते सर्व संदर्भ
गोळा केले. प्रबोधनकारांचे फारसे फोटो उपलब्ध नव्हते. पण प्रबोधनकारांची पाहिलेली
चित्रे आणि बाळासाहेबांचे फोटो यावरून त्यांच्यातील अनेक साम्यभेद लक्षात आले होते.
अखेरीस माझ्या अभ्यासानुरूप मी व्यक्तिचित्र साकारले. उद्घाटनाच्या वेळेस सुभाष
देसाई म्हणाले की, उद्घाटनाच्या वेळेस सोबत राहा.
बाळासाहेब म्हणजे उत्स्फूर्तपणा आणि त्याचबरोबर बेधडकपणाही. त्यामुळे ते काय व
कशी दाद देतात याकडे माझेही लक्ष लागून राहिले होते.. उद्घाटनाच्या वेळेस चित्रावरचा
पडदा दूर झाला आणि बाळासाहेब खूश झालेले दिसले. बाळासाहेबांना प्रबोधनकारांचे व्यक्तिचित्र
आवडले होते. स्वत: चित्रकार असलेल्या बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांचे व्यक्तिचित्र
आवडणे हीच माझ्यासाठी मोठी पावती होती. पाठीवर बाळासाहेबांची शाबासकीची थाप होती.
ते म्हणाले, उत्तम झालंय पोर्ट्रेट. एका क्षणात मला माझी छाती अभिमानाने फुलल्याचा
प्रत्यय आला.
या उद्घाटन सोहळ्यातही पुन्हा एकदा तोच प्रत्यय आला. सुमारे ३० जणांचा सत्कार होता.
पहिल्या १५ जणांचा सत्कार बाळासाहेबांच्या हस्ते पार पडला. त्यानंतरचा सत्कार तत्कालीन
केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार राम नाईक यांच्या हस्ते होता. माझे नाव पुकारताच
बाळासाहेबांनी राम नाईक यांना खुर्चीतून न उठण्याविषयी खुणावले व ‘हा सत्कार मी
केला तर चालेल ना..’ असे विचारले, अर्थात रामभाऊंनी होकारच दिला. आणि मग पुन्हा
एकदा बाळासाहेब सर्व समोरची टेबलांची रांग ओलांडून पुढे आले आणि माझा सत्कार केला.
त्याही वेळेस ते राम नाईक आणि माझ्याकडे पाहून म्हणाले.. कलाकाराला द्यायचा सन्मान
वेगळा असतो. त्यांचा मान त्यांना मिळायलाच हवा.
मला जी व्यक्तिमत्त्वे आवडतात त्यांची व्यक्तिचित्रे अर्थात पोर्ट्रेट्स करण्याची
संधी मी मागून घेतो. बाळासाहेबांचे असेच व्यक्तिचित्र करण्याची संधी मिळावी, ही
अनेक दिवसांची इच्छा होती. त्याचा योग जुळून आला तो सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाच्या
दिवशी २००८ साली. बाळासाहेबांनी होकार दिला. खरे तर त्या वेळेस त्यांची तब्येत
तेवढी चांगली नव्हती. पण तरीही त्यांनी वेळ दिला. तब्बल दीड तास ते व्यक्तिचित्रणासाठी
न हलता बसून होते. अर्थात ते बाळासाहेबच, त्यामुळे चित्रण करतानाही त्यांच्या गप्पा
सुरूच होत्या. कधी वाढलेल्या त्यांच्या दाढीवर तेच टिप्पणी करीत होते तर कधी अलीकडच्या
चित्रकलेवर. पण तब्येत बरी नसलेल्या अवस्थेतही त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला
हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. तैलरंगात केलेले ते बाळासाहेबांचे पहिले व्यक्तिचित्र
होते. त्याच वेळेस त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे मी चित्र काढत
असताना त्यांना पाहायचे होते मागे बसून. मी त्यांना म्हटले की, मलाही आवडेल की,
मी चित्र काढतो आहे आणि एक महान कलावंत मागे बसून ते पाहतो आहे. यापेक्षा एका कलावंतांच्या
आयुष्यात दुसरा दुर्मिळ योग काय असू शकतो?
हा योग नंतर जुळून आला तो २००९ साली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मी चितारलेले
व्यक्तिचित्र त्यांना भेट द्यावे असे बाळासाहेबांना वाटले आणि मग त्यांनी मला मातोश्रीवर
बोलावून घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याचे व्यक्तिचित्र करायचे त्याच्याशी
उत्तम संवाद साधावा लागतो. माझा बाबासाहेबांचा फारसा परिचय नव्हता. पण मी मातोश्रीवर
पोहोचलो त्या वेळेस लक्षात आले की, मी तिथे पोहोचण्यापूर्वी बाळासाहेबांनीच बाबासाहेबांना
माझी पुस्तके, माझे काम, माझे आल्बम दाखवून मी चांगला कलावंत असल्याचा विश्वास
दिला होता. त्यामुळे मी माझ्या कामाविषयीची खात्री त्या बोलण्यातूनच बाबासाहेबांना
आली होती. बाळासाहेब कुणाचीही खोटी स्तुती करीत नाहीत, याचा माझ्यापेक्षा बाबासाहेबांनाच
अधिक अनुभव असावा. मग बाळासाहेबांनी त्यांच्यासमोर बसवून माझ्याकडून बाबासाहेबांचे
व्यक्तिचित्र करवून घेतले. पुन्हा एकदा मी त्याच तणावाखालून जात होते. मागे बाळासाहेबांसारखा
जाणता कलावंत बसलेला त्याच्यासमोर काम करायचे. पण बाळासाहेबच ताण हलका करीत होते.
बाळासाहेब म्हणजे अनेक विषयांमधील किश्शांचा ओघवता धबधबाच होता. व्यक्तिचित्रण
सुरू असताना ते सतत बोलतच होते. कधी चित्रांबद्दल, कधी चित्रांच्या वैशिष्टय़ांबद्दल,
तर कधी त्यांना जाणवलेल्या चित्रांच्या गुणविशेषांबद्दल. त्यामुळे हास्यविनोदामध्ये
काम करणे फारसे अवघड गेले नाही. ते व्यक्तिचित्रही बाळासाहेबांना खूप आवडले. ते
त्यांनी बाबासाहेबांना भेट दिले.
त्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेबांकडून बोलावणे आले ते लीलावतीच्या विजयभाई मेहता
यांच्या व्यक्तिचित्रणासाठी. विजयभाईंना त्यांचे व्यक्तिचित्र भेट देऊन बाळासाहेबांना
कृतज्ञता व्यक्त करायची होती आणि ते व्यक्तिचित्र मीच करावे, अशी बाळासाहेबांची
इच्छा होती. बाळासाहेबांची इच्छा हीदेखील मी माझ्या कामाला मिळालेली पावती म्हणूनच
घेत होतो.
विजयभाईंचे चित्र करण्यासाठी घेतले. टर्पेंटाइनची बाटली उघडली आणि त्याच्या उग्र
वासाने बाळासाहेबांना खोकला आला. डॉक्टरांनी त्यांना तिथे बसून राहण्यास मनाई केली.
त्यावर ते म्हणाले, काम बंद करू नका, सुरूच ठेवा आणि आतमध्ये त्यांच्यासाठी खास
केलेल्या आयसीयूमध्ये गेले. पण बाहेर चित्रण सुरू आहे आणि आपल्याला ते पाहायला
मिळत नाही, त्याचा आनंद लुटता येत नाही, याची खंत त्यांच्या मनात होती आणि म्हणून
ते त्याही अवस्थेत तब्बल तीन ते चार वेळा बाहेर काम पाहण्यासाठी आले. थोडा वेळ
थांबायचे, काम पाहायचे आणि मग आतमध्ये परत जायचे.
कलावंताला काम करताना पाहण्याची हौस ही पट्टीच्या कलावंतांना असतेच. बाळासाहेब
हे स्वत: उत्तम दर्जाचे कलावंत होते आणि त्यांची ती आस, ओढ, हौस त्यांच्या त्या
अस्वस्थतेतून आणि परत परत बाहेर येऊन चित्र पाहण्यातून त्या दिवशीपुरती जाणवली.
फार कमी राजकारण्यांना चित्रकलेविषयी आवड किंवा आस्था असते आणि त्यांना त्यातील
ज्ञानही असते. बाळासाहेब हे असे विरळा अपवादात्मक राजकारणी होते. महत्त्वाचे म्हणजे
आजवरच्या सर्व भेटींमध्ये कधीही आमच्या चर्चेत राजकारण हा विषय बाळासाहेबांनी कटाक्षाने
बाजूला ठेवला होता. विजयभाईंच्या व्यक्तिचित्रणाच्या वेळेसही बाळासाहेबांनी मी
पोहोचण्यापूर्वीच माझ्या पुस्तके आणि आल्बममधून त्यांना माझा परिचय करून दिला होता
आणि चित्रणाबद्दल विश्वासही जागवला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेबांनी
पाचारण करून केलेल्या प्रत्येक चित्राचा मोबदला त्यांनी मला न मागता दिला. कलावंताला
कधीही दु:खी करायचे नाही आणि त्याच्याकडून फुकटही काही करून घ्यायचे नाही, हा त्यांचा
खाक्या होता. राजकारणी मंडळी फार कमी वेळा स्वत:च्या खिशात हात घालतात, असे म्हटले
जाते. माझ्यासाठी बाळासाहेब हे अपवाद होते.
बाळासाहेबांशी झालेल्या गप्पांमघ्ये जलरंग, प्रसिद्ध चित्रकार वॉल्टर लँगहॅमर,
व्यंगचित्रे असेच विषय असायचे. २००८ मध्ये केलेल्या पहिल्या व्यक्तिचित्राच्या
वेळेस बाळासाहेबांची तब्येत चांगली नव्हती. पण नंतर ते बरे झाले आणि मग पुन्हा
एकदा ताजेतवाने झालेल्या बाळासाहेबांचे व्यक्तिचित्र साकारले. यात बाळासाहेबांचे
तेज अधिक जाणवते. (‘लोकप्रभा’च्या याच अंकाच्या मुखपृष्ठावर ते व्यक्तिचित्र वापरण्यात
आले आहे) उद्धव ठाकरे यांनीही त्या वेळेस बरेच फोटो काढून घेतले. उद्धवजी मला म्हणाले,
‘एरवी मीही खास फोटोग्राफीसाठी बाळासाहेबांच्या मागे लागलो होतो. पण एवढा वेळ त्यांनी
दिला नाही. त्यामुळे मीही संधी साधून घेतली.’ त्या वेळच्या गप्पांमध्ये जाणवलेला
एक विशेष म्हणजे बाळासाहेब स्वत:वरही विनोद करायचे. हे सर्वानाच जमत नाही. पहिल्या
व्यक्तिचित्राच्या वेळेस त्यांच्या कपाळावर एक चामखीळ होती. नंतर मात्र ती नव्हती,
त्यावरून ते म्हणाले होते, कामत पूर्वीच्या चित्रात असलेला कपाळावरचा तिसरा डोळा
आता नाही. कारण सारे काही स्पष्ट दिसतेय, त्यामुळे त्याची गरज नाही !
त्यानंतर बाळासाहेबांची पुन्हा भेट झाली ती, १४ फेब्रुवारी २०१० रोजी ज्योत्स्ना
प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘पोर्ट्रेट्स’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस. मातोश्रीवरच
बाळासाहेबांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळेस त्यांनी पुस्तकातील जवळपास प्रत्येक
चित्रातील बारकावे पाहिले एवढेच नव्हे तर त्यावर चर्चाही केली. ती चर्चाही अशी
होती की, त्यातून त्यांच्यातील कलासमीक्षक कुणालाही लक्षात यावा. अखेरीस म्हणाले,
काय देऊ? मी म्हटले आशीर्वाद लिहून द्या. त्यांनी त्यांच्या साहाय्यकाला पाचारण
केले आणि सांगितले.. ‘एका महान कलावंतास..’ मग पुन्हा थांबले व म्हणाले.. हे सारे
कमीच आहे. ते खोडून टाका आणि लिहा ‘एका महान कलामहर्षीस.. ’ त्यांनी मला कलामहर्षी
म्हणणे ही माझ्यासाठीची आजवरची सर्वात मोठी बिदागी होती !
राजकारणी व्यक्तींवर राजकारणाचे एवढे रंग चढलेले असतात की, त्यांना बाकी काहीच
दिसत नाही. बाळासाहेबांच्या बाबतीत असे कधीच झाले नाही. ते उत्तम वक्ता, कलारसिक
तर होतेच पण ते खूप चांगला माणूस होते. म्हणूनच २६ जुलै रोजी आलेल्या महापुराच्या
वेळेस जेव्हा शेजारच्या बंगल्यातील ज्येष्ठ चित्रकार माधवराव सातवळेकर यांच्या
घरातील चित्रे भिजली तेव्हा मदतीला माणसे सर्वप्रथम पाठवणारे बाळासाहेबच होते.
बाका प्रसंग आला की, प्रथम आपण आपली वस्तू जपतो. बाळासाहेबांनी माणसे जपली आणि
त्यांची कला जिवापाड जपण्यासाठी प्रयत्न केले.
असेच त्यांना एकदा विचारले तुला काय देऊ? नंतर त्यांचे छायाचित्रकार बाळ मुणगेकर
यांना बोलावले आणि माझ्या खांद्यावर हात टाकून फोटो काढून दिला. त्यावर बाळ मुणगेकर
नंतर बाहेर आल्यावर म्हणाले की, यापूर्वी बाळासाहेबांनी खांद्यावर हात टाकून काढलेला
कलावंत म्हणजे मायकेल जॅक्सन आणि आता तुम्ही! बाळासाहेबांनी अशा अनेक क्षणांनी
मला वेळोवेळी श्रीमंतच केले!
यंदाच्या वर्षी तर त्यांनी मला आणखी एक सुखद धक्का दिला. २७ एप्रिल रोजी सकाळीच
बाळासाहेबांचा फोन आला. शुभेच्छा देण्यासाठी.. त्या दिवशी वाढदिवस होता माझा. बाळासाहेबांची
ही आपुलकी हीच माझी खरी श्रीमंती होती.
आज बाळासाहेब आपल्यात नाहीत, हे मनाने स्वीकारणे खूपच जड जाते आहे. असे व्यक्तिमत्त्व
पुन्हा होणे नाही! खरे तर हे विधान आजवर अनेकदा ऐकलेले आहे. पण हे विधान कुणाला
तंतोतंत लागू होत असेल तर ते बाळासाहेबांनाच. फार पूर्वी कलावंतांना राजाश्रय मिळायचा.
प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहेमान यांनी शाहू महाराज गेल्यानंतर प्रचंड हळहळ व्यक्त
केली होती. ती हळहळ शब्दांत सांगता येणार नाही, असे ते म्हणाले होते. त्या वेळेस
रहेमान यांना नेमके काय वाटले होते ते मला आज बाळासाहेब गेल्यानंतर जाणवते आहे!
त्याच भावना आज माझ्याही आहेत. कलावंतांना आपलंसं करून घेणारं दुसरं कुणी व्यक्तिमत्त्व
आज आहे, असे वाटत नाही. तमाम कलावंतांसाठी त्यांचा राजाच आज काळाच्या पडद्याआड
गेला आहे!
जेजेबाबत मात्र अढी!
एकदा मातोश्रीवर जाणे झाले. त्या वेळेस बाळासाहेबांनी खूप व्यक्तिगत माहिती विचारली.
मी माझे आल्बम घेऊन गेलो होतो. ते आस्थेने पाहिले. त्यातील चित्रांविषयीदेखील त्यांनी
चर्चा केली. कुठे शिकलात, मार्गदर्शन कुणाचे घेतले, असे अनेक प्रश्न विचारले. मी
जे जेमध्ये शिकलो. असे म्हटल्यानंतर मात्र काहीसे चिडलेल्या स्वरात ते म्हणाले
की, जे जे वगैरे काही नाही. ही चित्रकला हे तुमच्या तपश्चर्येचे फळ आहे.. जे जे
विषयी मात्र बाळासाहेबांच्या मनात नेहमीच एक अढी होती. कदाचित त्याचे मूळ त्यांच्या
पूर्वानुभवात आणि त्यांच्या बालपणीच्या एका घटनेमध्ये दडलेले असावे. हा किस्सा
मला खुद्द बाळासाहेबांनीच सांगितला होता. ते म्हणाले होते की, बाबुराव पेंटर प्रबोधनकार
ठाकरेंचे चांगले मित्र होते. ते घरी आले त्या वेळेस त्यांनी पाहिले की, लहानगे
बाळासाहेब चित्र काढत होते. त्यांचे चांगले चित्र पाहून त्यांनी प्रबोधनकारांना
सांगितले की, याची चित्रकला चांगली आहे. मोठा चांगला चित्रकार होईल. फक्त जे जेला
घालू नका, नाही तर चित्रकला बिघडेल.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा