शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

मी बाळासाहेबांची धाकटी सून

मी बाळासाहेबांची धाकटी सून

बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जास्तीत जास्त वाचायला , जाणायला लोकांना आवडतं . राजकारण , त्यांचे छंद , बाळासाहेबांची किंवा त्यांचा भाचा .. त्यांच्याशी संबधित प्रत्येक गोष्ट सतत चर्चेत असते . चर्चेत नसतात त्या रश्मी ठाकरे . शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीत असलेल्या पण दृश्यपटलावर नसलेल्या रश्मी , शिवसेनेचे युवा नेते उद्धव ठाकरे यांची ताकद असलेल्या रश्मी सांगत आहेत त्यांच्या आणि उद्धवच्या नात्याविषयी .

उद्धव ठाकरेशी माझं लग्न झालं १३ डिसेंबर १९८८ ला. त्याअगोदर दीड वर्ष आमचा साखरपुडा झाला होता . त्यादरम्यान आम्ही एकमेकांना भेटत होतो. त्यावेळी उद्धव शिवसेनेचे मुखपत्र ‘ सामना ’ काढण्याच्या तयारीत गुंतलेले होते. त्या कामासाठी मीसुद्धा त्यांच्याबरोबर जायचे. त्याचवेळी मला जाणवलं की , उद्धव अत्यंत मितभाषी आहे. संयत आणि थेट असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या पारदर्शक डोळ्यात मला नेहमीच प्रामाणिकपणा दिसतो.
उद्धव यांच्या प्रत्येक गोष्टींत मी सहभागी व्हावं असा त्यांचा आग्रह असायचा. मी सहभागी झालेही मात्र , तसा माझा सहभाग कधी लोकांच्या समोर आला नाही. साखरपुड्यानंतरच दीड वर्ष कसं गेलं ते कळलंही नाही आणि एक दिवस ठाकरे घराण्याची सर्वात धाकटी सून म्हणून मी ‘ मातोश्री ’ त पाय ठेवला।या नावाचा मोठा दबदबा आहे. तेव्हाही होता आणि आजही आहे. त्यात आजपर्यंत तरी फरक पडलेला नाही. जितके ठाकरे परिवारावर प्रेम करणारी माणसं आहेत तितकेच त्यांना विरोधकही आहेतच. जेव्हा सून म्हणून मी या घरात पाय ठेवला तेव्हा बाळासाहेबांविषयी माझ्या मनात आदरयुक्त भीती होती. असं वाटत होतं की त्यांच्या घरातलं वातावरण काही वेगळंच असेल. त्यामुळेच मातोश्रीवर प्रवेश करण्याचं मला काहीसं टेन्शनच होतं. पण , आई मीनाताई आणि उद्धव हे दोघेही मला शक्तिस्तंभासारख्याच होत्या. या घरात रुळायला त्यांनीच मला मदत केली. स्वयंपाकघरात आईंना मदत करणं , येणा-या जाणा-यांचे आदरातिथ्यं करणं , उद्धवबरोबर बाहेर जाणं या सा-यांत माझा दिवस निघून जायचा. त्यावेळी उद्धव एक जाहिरात एजन्सी चालवायचे. १९९० च्या निवडणूकांसाठीची शिवसेनेच्या प्रचाराची थीम उद्धवनेच तयार केली होती.

मी मध्यमवर्गीय कुटुंबातच राहिले वाढले आहे. त्यामुळे मला वाटतं होतं की , ठाकरे परिवारात मिसळायला मला जड जाईल. पण खरं सांगायचं तर , असं काही झालं नाही. सासरची संस्कृती आणि परंपरा या गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक मुलीला थोडे बदल करावे लागतात. मी त्यांच्यात मिसळून गेले. त्यामुळेच ठाकरे परिवाराचाच एक भाग होण्यात मला काही अडचण आली नाही. त्रास झाला नाही.


आमच्या लग्नानंतर साधारण महिनाभरात बाळासाहेबांनी ‘ सामना ’ सुरू केला. त्याची जबाबदारी उद्धववर देण्यात आली. मी फ्कत त्याला सोबत म्हणून त्याच्याबरोबर जायचे. आवृत्ती निघेपर्यंत आम्ही तिथे थांबायचो. सामनाशी आमचं जवळंच नातं होतं. हळू हळू तिथे शिवसैनिकांची वर्दळ सुरू व्हायला लागली. उद्धव त्यांना भेटायला लागले. ओळख वाढत गेली. अजाणताच उद्धव यांच्या राजनैतिक वाटचालीची सुरवात झाली आणि मी त्यांच्या सोबत राहिले।
आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. खूप. सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यात इतका एकटा असत नाही जितका ते राजकारणात एकटा असतो. राजकारणात उतार - चढाव , ऊन-सावली , आनंद- दु : ख अशा अनेक स्थित्यंतरांमधून जावं लागतं. या सा-या बदलांमध्ये नव-याला ताकद द्यायची जबाबदारी बायकोला घ्यावीच लागते. ती ताकद बनण्याचा मी प्रयत्न करते. स्वत : उद्धव खंबीर आहेतच. घरातलं शेंडेफळ असूनही मीनाताईंचं निधन आणि मोठा भाऊ बिंदा याचा अचानक मृत्यूनंतर वडिलांना उद्धवनेच सावरले. विस्कळीत झालेलं घरही त्यांनी पूर्वपदावर आणले. कितीही कठीण परिस्थितीत न डगमगणं आणि विनोदबुद्धी शाबित ठेवणं या त्यांच्या गुणांवर मी फिदा आहे।

एकदा कसलीतरी अडचण घेऊन एक बडे उद्योगपती आले होते. त्याने सहज बोलताना सांगितले की , सध्या परिस्थिती मोठी कठीण आहे. आम्हाला परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करायला लागतेय. त्यावर हजरजबाबीपणे उद्धव लगेच उत्तरले , तुम्हालाच का आम्हालाही परदेशी व्यक्तिंशी स्पर्धा करायला लागते आहे. उद्धवचा इशारा त्यावेळी सोनिया गांधींकडे होता. त्यांच्या विनोदी स्वभावाचे असे अगणित किस्से आहेत.


ठाकरे परिवारातल्या अनेकजणांचा स्वभाव असा विनोदी आहे. विशेषत : बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवरील टिप्पणी ऐकणे आणि वाचणे अनेकांना आवडते. ठाकरे परिवारातल्या व्यक्तिंचे पशु , पक्षी आणि झाडांवर मनापासून प्रेम आहे. जेव्हा मी लग्न होऊन या रात आले तेव्हा घरात तीन ग्रेट डॅन कुत्रे होते. आता फक्त एक कुत्रा आहे. फिश टँकमध्ये रंगीबिरंगी मासे होते आणि कुंड्यांमध्ये झाडे होती. उद्धवला जंगलात फिरायला आवडतं. ड्रायव्हिंग आणि फोटोग्राफी या गोष्टींवर त्यांचं बेहद प्रेम आहे. त्यांना वेळ मिळाला की ते मला लाँग ड्राइव्हवर घेऊन जातात. तेव्हा फक्त आम्ही दोघेच असतो. जबाबदारी वाढल्यापासून अर्थातच आता असे क्षण कमीच वेळा वाट्याला येतात..
ठाकरे परिवार आस्तिक आहे , पण घरात पूजा-पाठ केले जात नाहीत. बाळासाहेब सकाळी काही तास १५ ते १६ पेपर वाचतात. काही लेख आणि बातम्यांना अंडरलाइन करून ते उद्धवकडे पाठवतात. त्यांनी वाचावं म्हणून. माझ्या मुलांनी किंवा मी वाचावं असं काही असेल तर ते आमच्या रूमपर्यंतही येतच. ते इतके शिस्तीचे आहेत की , अव्यवस्थितपणा त्यांना अस्वस्थ करतो.

लहान-सहान आजारांसाठी त्यांना अॅलोपथीच्या गोळ्या घ्यायला आवडत नाही. होमिओपथीचे उपचार घेण्याकडेच त्यांचा अधिक कल असतो. बाळासाहेबांचे खाणे अगदीच कमी आहे आणि खाण्यासाठी त्यांनी कधी काही फर्माइश केलेली मी ऐकलेली नाही. सध्या तर ते खूपच कमी आहार घेत आहेत. त्यांच्या नातवांच्या बाबतीत तर ‘ आज्जा ’ खूपच संवेदनशील आहे. थोडासा पाऊस पडत असला तरी ते मला विचारतात की , आज या मुलांना शाळेत पाठवणं गरजेचं आहे का ? ‘ नातवांसाठी पुस्तकं आणणं त्यांना सर्वाधिक आवडतं काम आहे.


बाळासाहेब ठाकरे या नावाच्या ताकदीचा मी कित्येकदा अनुभव घेतला आहे. एकदा आम्ही अमेरिकेच्या ट्रीपला गेलो होतो. तिथे आमचे इमिग्रेशनचे पेपर तपासणारी महिला अमेरिकन भारतीय होती. उद्धवचे पेपर तपासताना तिने उद्धव बाळ ठाकरे असं नाव पाहिलं आणि ती एकदम चकित झाली. तिने आमच्याकडे बाळासाहेबांविषयी विचारपूस केली आणि आमची तपासणी केल्याशिवायच आम्हाला जाऊ दिले. असे अनेक प्रसंग मला सांगता येतील. मात्र आम्ही कधीही या गोष्टीचा गैरफायदा घेतला नाही. माझी मुलं सामान्य मुलांप्रमाणेच शाळेत जातात. मी सुद्धा खरेदीसाठी कोणत्याही बाजारात जाते. पार्ल्याच्या बाजारातल्या कोळीणींशी गप्पा मारायला मला आवडतं.

वीस वर्ष हा खूप मोठा काळ आहे. विशेषत : ज्या कुटुंबावर सतत नजरा रोखलेल्या असतात अशा कुटुंबासाठी तर तो निश्चितच मोठा काळ आहे. शिवसैनिकांसाठी मातोश्री एखाद्या श्रद्धास्थानापेक्षा कमी नाही. दिवस-रात्र लोकांचे जाणे-येणे असते. नवीन लग्न होऊन आले तेव्हा मी मातोश्रीवर शिवसैनिकांचे , अन्य पक्षांच्या नेत्यांचे , कितीतरी बड्या मंडळींचे जाणे-येणे पाहिले आहे. एका परिवाराशी , कुटुंबाशी समरस झालेला शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शिवसेनेची बांधणी , जडण-घडण आणि विस्तार सारे काही ठाकरे परिवाराशी जोडलेले आहे. ठाकरे आणि शिवसेना दुधात साखरेसारखे मिसळलेले आहे. आमचे घरदेखील पक्षाच्या कार्यालयासारखेच आहे.


मीनाताई किती प्रेमाने शिवसैनिकांचे स्वागत करायची ते मी पाहिले आहे. त्या त्यांचे सुख-दु : ख समजून घ्यायच्या. त्यांच्या घरातली पूजा , लग्न अशा अनेक प्रसंगांना त्या उपस्थित असायच्या. शिवसेनेत नसूनही त्या शिवसेनेचा मोठा हिस्सा होत्या. या नात्याला तुम्ही काय म्हणाल ? काय तुम्ही असं म्हणाल की , त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा मोह होता. हे सारं त्या राजकारणात सामिल होण्यासाठी करत होत्या ? मी पण तेच करतेय ज्याची ठाकरे कुटुंबाला गरज आहे. कोणी याला राजकारण म्हणू दे किंवा राजकीय महत्वकांक्षा. मला त्याने फारसा फरक पडत नाही.


काहीजणांनी उद्धवच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली. जसं काही फोटोग्राफी करणं हा गुन्हाच आहे. ठाकरे परिवाराला कलेची देणगीच आहे. बाळासाहेब कार्टूनिस्ट आहेत. उद्धव यांना फोटोग्राफीची आवड आहे. खूप कमीजणांना माहितेय की ते सुंदर पेंटिंग्जही काढतात. आमचा मोठा मुलगा आदित्य कविता करतो. छोट्या तेजसला पशु-पक्षी यांची आव़ड आहे. त्याच्याजवळ पशु-पक्ष्यांची माहिती देणारी २०० ते ३०० पुस्तकं आहेत. आम्ही सिंगापूरला प्राणीसंग्रहालय पाहायला गेलो होतो तेव्हा त्याने प्रत्येक प्राण्याविषयी आम्हाला पूर्ण माहिती दिली होती. मुंबईतल्या झाडांविषयीची त्याची माहिती विस्मय करायला लावणारी आहे. जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो तेव्हा उद्धव आणि तेजस निसर्गात हरवून जातात. विमानप्रवासात मुलं उद्धव यांच्याकडून पेंटिंग्ज करवून घेतात. तेव्हा आम्ही अगदीच वेगळ्या जगात असतो आणि असे दौरे मला फार आवडतात. पण..ते लवकरच संपतात आणि आम्ही ‘ मातोश्री ’ च्या जगात परत येतो.


संकट येवोत किंवा आनंदाचे क्षण , उद्धव दोन्ही परिस्थितीत सामान्याप्रमाणेच असतात. त्यांची तटस्थता मला एखाद्या संतासारखी वाटते. मागच्या वर्षीची पालिकेची निवडणूक उद्धवसाठी अग्निपरिक्षेसारखीच होती. आपल्याच लोकांनी केलेले प्रहार , राजनैतिक लोकांनी केलेले आणि मोठाल्या आव्हानांनी घेरलेलं असतानाही त्यांनी यश खेचून आणलं. त्यांच्यासाठी यापेक्षा मोठा आनंदाचा आणि गर्वाचा क्षण असू शकत नाही. पण शिवसेनेत मोठी फूट पडली तेव्हा उद्धव जितके शांत होते तितकेच शांत ते तेव्हाही होते।
मालवण आणि राजापुरमधील विधानसभा उपनिवडणुका हरल्यानंतर शिवसेनेत कमालीची मरगळ होती. हताशपणा होता. तो काळच वाईट होता. चारी बाजूंनी उद्धववर वार होत होते. मीडियातूनही त्यांच्या क्षमतेबाबत शंका व्यक्त केली जात होती. कोणतीच चांगली गोष्ट ऐकायला मिळत नव्हती. ‘ शिवसेना जिंदाबाद ’ असं ऐकायला माझे कान अगदी आसुसले होते. म्हणूनच श्रीवर्धनची उपनिवडणूक जिंकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. रामटेक लोकसभा उपनिवडणूकांच्या विजयानेही मी भावविभोर झाले होते , पण उद्धववर त्याचा फारसा परिणाम नव्हता. हरण्या-जिंकण्यात त्यांचे फक्त डोळे बोलतात. हलक्या भु-या रंगाचे त्यांचे डोळे हा त्यांच्या मनाचा आरसाच आहे जणू ! त्यांच्या डोळ्यांतून आजपर्यंत ना कोणाविषयी द्वेष दिसलाय ना निराशा. कधीच नाही. आपल्या लोकांनी त्याच्यावर बिनबुडाचे आणि घाणेरडे आरोप केले तेव्हाही नाही। कोणाला ऐकून खरं वाटणार नाही , पण गेल्या २० वर्षात उद्धव माझ्याशी मोठ्या आवाजात कधीही बोललेले नाहीत. कधीही त्यांनी एखाद्या गोष्टीवर त्यांची नाराजी दाखवली नाही. मुलांवरही त्यांचे खूप प्रेम आहे. उद्धव कधीही त्यांना ओरडत नाहीत. इद्धव अंतर्मुख आहे तर मी बहिर्मुख. म्हणूनच कदाचित आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत. संकटात आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ असतो. वाईट काळ जाण्याची वाट पाहतो. आम्हाला माहितेय की , जगात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. आमचे त्रासही नाहीत। याबाबत मी गेल्या तीन-चार वर्षांचा उल्लेख करेन. उद्धवच्या राजनैतिक आयुष्यात जे वादळ आले त्यामुळे बडे बडे नेतेही हलले असते. पण उद्धव जराही विचलित झाले नाहीत. बाळासाहेबांचा आदर्श तर त्यांच्याबरोबर होताच. पण सगळ्यांशी टक्कर उद्धव यांना एकट्याने द्यायची होती. त्याबाबतीत ते अगदी एकटे होते. आपल्याच लोकांनी केलेले आरोप त्यांना सहन करायचे होते. चारित्र्य हननही सहन करायचे होते. मोठा कसोटीचा काळ होता तो. उद्धवने शांत राहून वार झेलले. आरोपांना उत्तर देण्याऐवजी आत्मविश्वासाने पार्टीला पुन्हा उभे राहण्यासाठी सारी उर्जा वापरली. मी कितीतरी वेळा चिडायचे. ओरडायचे. पण ते मला सांगायचे की , आपण त्यांच्याइतकं खालच्या पातळीवर नाही उतरू शकत. जर आपण त्यांना उत्तरे दिली तर आपल्याला भडकावण्याचा त्यांचा हेतू साध्य होईल. म्हणूनच शांत राहण्यातच समजूतदारपणा आहे. खरोखरीच उद्धव खूपच परिपक्व आणि धैर्यवान आहेत. याबाबतीत त्यांच्यासारखे कोणीही नाही। लोक मला विचारतात की , तुमच्या मुलालाही तुम्हाला राजकारणातच पाहायला आवडेल का ? यावर माझं उतर असतं उद्या कोणी पाहिलायं ? त्यांना ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात जाऊ दे पण आमची इच्छा इतकीच आहे की त्यांनी चांगली व्यक्ती बनावं. आदित्य मागच्या वर्षी दहावी झाला. दहावीतही त्याला इकॉनॉमिक्स शिकवायचे. तेजस लहान आहे. त्याचा गृहपाठ मीच घेते. आदित्यच्या स्कॉटिश शाळेने एकदा साफ-सफाई मोहिम चालवली होती. त्याच्या शिक्षकांकडून मला कळलं की , पहिला झाडू आदित्यने उचलला होता. मला खूप आनंद झाला ते ऐकून. सध्या तो सेंट झेवियर्समधून पॉलिटिकल सायन्स घेऊन बी.ए करतोय. त्याच्या वागण्यातून तो बाळासाहेबांचा नातू असल्याचे कधी जाणवूनही देत नाही.

आयुष्यात मी संतुष्ट आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागतं. नावाबरोबरच जिथे प्रतिष्ठा , ओळख आणि लोकप्रियता मिळते तिथेच जबाबदा-याही स्विकाराव्या लागतात. त्याचवेळी तुमच्या स्वातंत्र्याची रेषही आखली जाते. नाव आणि प्रतिष्ठेसाठी तुम्हाला स्वत : ला काही बंधनात बांधून घेणं आवश्यक असतं. मी आपखुशीने स्वत : ला काही आवश्यक त्या मर्यादेत बांधून घेतलंय. फक्त परिस्थितीच नाही ,
तर परिस्थितीच्या आरपार पाहणेही आता शिकले आहे।
साभार - मटा. ऑनलाईन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा