प्रिय बाळासाहेब,
हांहां म्हणता वर्ष कसं उलटलं हे समजलंच नाही. १७ नोव्हेंबर २०१२ ते १७
नोव्हेंबर २०१३. एक वर्षाचा हा काळ तुमच्या लाडक्या शिवसैनिकांना मोठा
जीवघेणा वाटला असणार यात शंका नाही. कर्ता सवरता बाप गेल्यानंतर मुलांची जी
अवस्था होते तीच त्यांची झाली असणार. आजही शिवसेना आणि शिवसैनिक तुमच्या
जाण्याच्या धक्क्यातून सावरले आहेत असं दिसत नाही.
पण शिवसेनाच कशाला, आमच्यासारख्या पत्रकारांना, तुमच्या राजकीय
विरोधकांना, तुमच्या जवळच्या मित्रांना आणि शत्रुंनाही तुमची उणीव आजही
जाणवते आहे. तुमच्या राजकारणाचा अनुभव महाराष्ट्राने ५० वर्षांहून अधिक काळ
घेतला. तुमच्या वादळाच्या तडाख्यात अनेकांचा उत्कर्ष झाला आणि तेवढेच इतर
उद्ध्वस्त झाले. पण तुमच्यासारखे तुम्हीच हे तुमच्या परखड टीकाकारांना आजही
मान्य करावं लागतंच. बाळासाहेब ठाकरे नावाचा विषय पुढची अनेक वर्षं
महाराष्ट्रात आणि देशात चर्चेत राहील याविषयी शंका नाही. तुमच्या
व्यक्तिमत्त्वाची आणि राजकारणाची धगच तेवढी प्रखर आहे.
प्रिय बाळासाहेब, मला आपली शेवटची भेट अजूनही आठवते. १२ जानेवारी २०१३.
त्यादिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे फॉर्मात होतात. आपलं खाजगीत काय बोलणं झालं
हे मी कुणालाही सांगणार नाही. तसं वचन मी तुम्हाला दिलं आहे. फारच
आणीबाणीचा प्रसंग आला तर हे वचन मोडीन, असं मी तुम्हाला सांगितलं आहे. पण
तो प्रसंग अजून आलेला नाही. त्यादिवशी दोन तास तुम्ही मला दिलखुलास मुलाखत
दिलीत. तुम्ही तुमच्या शैलीत बोललात, तडाखे मारलेत, माझे गुगली टोलवलेत,
हास्यविनोद केलेत आणि मीनाताईंचा उल्लेख आल्यावर तुमच्या डोळ्यांत पाणीही
आलं. जाताना मला म्हणालात, ‘आई जगदंबेचा आशीर्वाद तुझ्यावर कायमच राहो.’
बाळासाहेब मी पूर्णपणे नास्तिक आहे, प्रबोधनकारांची परंपरा मानणारा आहे, हे
माहीत असूनही तुम्ही मला असा श्रद्धाळू आशीर्वाद दिलात. माझ्या दृष्टीने
तुमची भावना महत्त्वाची होती. आपल्या वैचारिक विरोधकांचं हित चिंतायलाही एक
ताकद लागते. ती तुमच्यात होती. म्हणूनच तुम्ही मला असा आशीर्वाद देऊ
शकलात. याचा अर्थ आपले मतभेद मिटले किंवा मी तुम्हाला वश झालो असा होत
नाही. माझी पत्रकार म्हणून असलेली बांधिलकी तुम्हाला ठाऊक होती. तरीही
तुम्ही पुढे म्हणालात, ‘छान झाली मुलाखत. आता जाहीरसभेत भाषणं करण्यापेक्षा
अशाच मुलाखती करू. तू ये रे पुन्हा.’ तुमचं आमंत्रण नाकारण्याचा प्रश्नच
नव्हता. आणखी पाच सहा मुलाखती करायचं असं ठरलं आणि तुमचा निरोप घेऊन मी
निघालो. उद्धव ठाकरेही खूश झालेले दिसत होते.
पण काळाच्या मनात दुसरंच काही होतं. तुमची तब्येत खालावत गेली आणि आपली
एकही भेट होऊ शकली नाही. बाळासाहेब, तुम्हाला खूप काही विचारायचं होतं.
तुमच्या बालपणापासून व्यंगचित्रांपर्यंत आणि तुमच्या राजकारणाच्या बदलत्या
आलेखाबद्दलसुद्धा. पण नियतीच्या ते मनात नसावं. आपल्या होऊ घातलेल्या
मुलाखती अशा अर्ध्यावर टाकून तुम्ही निघून गेलात. माझं तर नुकसान झालंच पण
त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या इतिहासाचं खूप मोठं डॉक्युमेंटेशन राहून
गेलं.
बाळासाहेब, महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचं आणि शरद पवारांचं स्थान
कुणीही नाकारणार नाही. गेल्या ५० वर्षांतले, यशवंतराव चव्हाणांनंतरचे
सर्वाधिक प्रभावी नेते तुम्ही दोघं आहात. पण असे दोन कणखर नेते असूनही या
माझ्या प्रिय महाराष्ट्राची अशी वाताहत का झाली, हा प्रश्न मला वारंवार
बोचत राहतो. ज्यांनी भ्रष्टाचाराला विरोध केला तेच भ्रष्ट व्यवस्थेत सामील
कसे झाले हाही एक शोधाचाच विषय आहे. महाराष्ट्र गरीब झाला, पण इथले
राजकारणी श्रीमंत झाले, हे तुम्ही माझ्या मुलाखतीत मान्य केलं होतत. मुद्दा
इतकाच आहे की, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम आता पुढच्या
पिढ्यांना करावं लागणार आहे. किंबहुना रसातळाला गेलेलं हे राज्य उभारीला
आणण्याचं काम मोठं जिकरीचं आहे. ते कोण आणि कसं करणार हाच खरा मोठा प्रश्न.
ज्या नेत्यांकडून आम्ही अपेक्षा केली त्यांनी अपेक्षाभंग केल्यावर दुसरं
काय होणार? पावसानं झोडपलं, सुमद्राने बुडवलं आणि मायबाप पुढार्यांनीही
वार्यावर सोडलं तर करायचं काय हा सवाल आज तुमच्या प्रिय मराठी जनेतेपुढे
उभा आहे.
बाळासाहेब, तुमच्या जाण्याच्या दुःखातून उद्धव आणि शिवसेना अजून
सावरलेली दिसत नाही. तुमच्यानंतर शिवसेनेचं काय होणार, हा प्रश्न विचारला
जात होता. पण तसं काही वावगं घडलेलं दिसत नाही. शिवसेनेचे सगळे सुभेदार
आपापल्या सुभेदार्या सांभाळून आहेत. आतून अस्वस्थता आहे, पण अजून मोठी
फंदफितुरी कुणी केलेली नाही. तुमच्या पंतांना उद्धवने जो दणका दिला तो
पाहून सध्या तरी हिंमत कुणी करेल असं दिसत नाही. एकापरिने पक्षप्रमुख
म्हणून उद्धवचा शिवसेनेवर पूर्ण ताबा आहे. आदित्यही आता दुडूदुडू धावू
लागला आहे. तुमच्या शेवटच्या दसरा मेळाव्याच्या रेकॉर्डेड भाषणात तुम्ही या
दोघांना सांभाळून घ्या असं आवाहन उभ्या महाराष्ट्राला केलं होतं.
शिवसैनिकांनी आणि लोकांनी हे खरोखरच मनावर घेतलं आहे. यावेळच्या दसरा
मेळाव्यात उद्धवने खणखणीत भाषण केलं. हृदयविकाराच्या दुखण्यातून तो
सावरताना दिसतो आहे. पण शिवसेनेची पुढची दिशा कोणती या प्रश्नाचं उत्तर
अजून मिळालेलं नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही शिवसेनेसाठी
अॅसिड टेस्ट ठरणार आहे. नरेंद्र मोदींच्या हवेमुळे सेनाभाजपच्या जागा
वाढल्या तर सध्यातरी उद्धव पुढे फारशा अडचणी निर्माण होणार नाहीत. पण याचा
अर्थ नवी पिढी शिवसेनेकडे येते आहे असा मात्र लावता येत नाही.
प्रिय बाळासाहेब, तुम्हाला उद्धवची काळजी वाटत असणार याविषयी शंका नाही.
पण तुम्हाला अजूनही राजची आठवण येते का हो? राजविषयीचं तुमच्या मनातलं
अथांग प्रेम तुम्ही आपल्या शेवटच्या भेटीच्या वेळीही व्यक्त केलं होतं.
त्याने आणि उद्धवने एकत्र यावं अशी तुमची इच्छा होती पण ते घडणार नाही ही
शंकाही तुमच्या मनात होती. बाळासाहेब, आजही ही शंका दूर झालेली नाही.
शिवसेना आणि मनसे एकत्र आले आणि भाजप आणि आरपीआयला त्यांनी बरोबर घेतलं तर
पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेवर तुमचा भगवा फडकू शकतो, असं अनेक मान्यवर
विश्लेषकांचं मत आहे. पण उद्धव-राजला हे कोण समजवणार? ज्यांनी तुमचंही
ऐकलं नाही ते इतरांचं काय ऐकणार? दोघांच्या मनातील कटुता आजही इतकी टोकाची
आहे की राजकीय तडजोड म्हणून एकत्र यायचीही त्यांची तयारी नाही. हे पाहून
तुम्ही ठाकरी भाषेत काय म्हणाल हे मला ठाऊक आहे! पण बाळासाहेब, एक गोष्ट
मात्र निश्चित तरुणांना आकर्षित करण्यात आणि स्वतःचा मतदार तयार करण्यात
राज काही अंशी यशस्वी झाला आहे. पण पक्ष वाढवण्यासाठी तुमच्याकडे जसे छगन
भुजबळ किंवा नारायण राणे यांच्यासारखे शिलेदार होते तसे अजून राजला
मिळालेले दिसत नाहीत.
बाळासाहेब पत्र फार लांबवत नाही. पण एक गोष्ट सांगितल्याशिवाय रहावत
नाही. तुमच्या स्मारकावरून शिवसेना नेत्यांनी जो घोळ घातला तो पाहून तुम्ही
आजही लाखोली वाहत असाल यात शंका नाही. आधी शिवाजी पार्क, मग महालक्ष्मी
रेसकोर्स मग आणखी कुठे असे वाद झडत राहिले. असल्या भंपकपणाला तुम्ही कायमच
विरोध केलात. प्रबोधनकार असते तर त्यांनी असल्या नेत्यांना शब्दांच्या
आसूडाने फोडून काढलं असतं. तुमच्या स्मारकाचं राजकारण करून मलिदा खाऊ
इच्छिणार्या या नेत्यांना आपण बाळासाहेबांचाच अपमान करत आहोत, याचंही भान
राहिलेलं नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून त्यांच्या एक कानाखाली द्यावी,
अशी अपेक्षा तुमच्या चाहत्यांनी केली तर गैर ठरेल काय?
प्रिय बाळासाहेब, दिवस आता पूर्वीचे राहिलेले नाहीत. शिवसेनाही बदलली
आहे. पण तुमचा भाबडा शिवसैनिक अजून आहे तसाच आहे. वरळीचा अरविंद भोसले
अजूनही अनवाणीच फिरतो आहे. नारायण राणेंचा पराभव होईपर्यंत मी चपला घालणार
नाही, अशी त्याची शपथ आहे. तुमची आठवण म्हणून दर महिन्याला रक्तदान
शिबिराचं आयोजन तो करतो आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा
असाच सच्चा शिवसैनिक तुम्हाला अपेक्षित होता. तुमच्या राजकीय विचारांशी
मतभेद होऊ शकतात, पण खरी शिवसेना बांधली ती या शिवसैनिकांनीच हे कुणीही
मान्य करेल. अशा असंख्य अरविंद भोसलेंच्या रक्त नि घामावर शिवसेना उभा
राहिली आहे. बाळासाहेब तुम्ही परत येणार नाही हे ठाऊक आहे पण जिथे कुठे
असाल तिथून या साध्याभोळ्या शिवसैनिकांची काळजी घ्या. उद्धव आणि आदित्यची
काळजी आम्ही घेतच राहू!
आता थांबतो. वेळ खूप झाला आहे. गर्दी वाढते आहे. १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क तुडुंब भरणार याची खात्री आहे.
कळावे.
तुमचा
निखिल वागळे
निखिल वागळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा