बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाच्या व्याख्येवर
सामनाचे तत्कालीन रिपोर्टर योगेश त्रिवेदी यांनी कोर्टात साक्ष दिली. या साक्षीमुळे
1995 साली मनोहर जोशींची आमदारकी रद्द होता होता वाचली. काय होता हा किस्सा सांगताहेत
योगेश त्रिवेदी. बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने हा विशेष लेख तुमच्यासाठी...
“महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजराथमध्ये
राहतो तो गुजराथी, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या नात्याने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू!
आमचे हिंदुत्त्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्त्व नाही तर आमचे हिंदुत्त्व हे राष्ट्रीयत्त्व
आहे !”
१९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या
रणधुमाळीत गिरगाव चौपाटीवरच्या शिवसेना – भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या भव्य जाहीर
सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषणात हिंदुत्त्वाची
व्याख्या अशी स्पष्ट शब्दात सांगितली होती. याचवर्षी विधानसभा निवडणुकीत शिवसेना –
भाजप युतीने एकूण ९४ जागा जिंकल्या होत्या. ज्यापैकी ३० जागा या मुंबईतील होत्या.
१९९० सालच्या शिवसेनाप्रमुखांच्या सभा
विक्रमावर विक्रम करत होत्या. या काळात मी सामनाचा वार्ताहर म्हणून काम करत होतो. त्यानिमित्ताने
सभा, भाषणं, निवडणुका यांचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली होती. मी आणि माझे
सहकारी संजय डहाळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभांचे वृत्तांकन केले होते. या भाषणांमध्ये
बाळासाहेब हिंदुत्त्वाची व्याख्या मांडत होते.
दादर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे
ज्येष्ठ नेते श्री. मनोहर जोशी यांनी काँग्रेसचे भाऊराव पाटील यांना निवडणुकीत पराभूत
केले होते. भाऊरावांनी मनोहर जोशींच्या निवडीला हिंदुत्त्वाच्या मुद्यावर न्यायालयात
आव्हान दिले होते. भाऊरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र नितीन पाटील याने मनोहर जोशींवरील
खटला पुढे सुरू ठेवला.
या खटल्याचा एक साक्षीदार मी आहे. ‘दैनिक
सामना’ वर्तमानपत्राचा प्रतिनिधी या नात्याने मला या साक्षीसाठी बोलावण्यात आले होते.
कारण, गिरगावच्या त्या सभेचे वृत्तांकन मी केले होते म्हणून मला साक्षीसाठी बोलावले
होते. अॅडव्होकेट एम. पी. वशी आणि मुकेश मनुभाई वशी यांनी साक्षीदार म्हणून मला बोलावले
होते. रमाकांत मयेकर, अभिराम सिंह यांच्यानंतर मनोहर जोशी यांच्या निवडणुक याचिकेच्या
वेळीही मी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा होतो. न्यायमुर्ती होते एस.एम वरियावा. आपटे
अँड कंपनीतर्फे मनोहर जोशी यांच्या वतीने अॅडव्होकेट जय चिनॉय आणि नितीन पाटील यांच्यावतीने
मनुभाई आणि मुकेश वशी हे आपापली बाजू मांडत होते.
मी मराठी असलो (बाळासाहेबांच्या व्याख्येप्रमाणे)
तरी माझी मातृभाषा गुजराथी असल्याचे मुकेश वशी यांना माहित होते. त्यामुळे सुरुवातीलाच
मी मराठीत बोलणार की इंग्रजीमध्ये असे मला विचारण्यात आले. त्यावर साहजिकच ‘मराठीत
बोलेने’ असे माझे स्पष्ट उत्तर होते.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती वरियावा,
अॅडव्होकेट जय चिनॉय आणि एम.पी. वशी या तिघांना गुजराथी येत होते. त्यामुळे त्यांना
मराठी ऐवजी गुजराथी समजणे जास्त सोपे होते. त्यानंतर वशी यांनी त्यासाठी परवानगी घेतली.
त्यावर मी देखील गुजाराथी भाषेत साक्ष देण्यास तयार झालो. त्यानंतर तब्बल ५ दिवस मी
गुजराथी भाषेत साक्ष देत होतो. शिवसेनाप्रमुखांनी मांडलेली गुजराथी हिंदुत्त्वाची व्याख्या
मी न्यायालयात त्यांच्याच शब्दात सांगितली.
तुम्ही हे जे सांगत आहात त्याचा पुरावा
आहे का? असे न्यायमुर्तींनी विचारले. त्यावर होय म्हणून सांगितले. तसेच सामना वर्तमानपत्राच्या
फाईल्स न्यायमुर्तींसमोर सादर केल्या. निरनिराळे १३ अंक न्यायमुर्तींसमोर सादर केले.
ज्यामध्ये शिवसेनाप्रमुखांची हिंदुत्त्वाची व्याख्या होती.
यावर शिवसेनेने बिगर हिंदू उमेदवार उभे
केले आहेत काय? असा प्रश्न अॅड. वशी यांच्याकडून झाला. अंबरनाथचे आमदार शेख सीर हाजी
करीम म्हणजेच ‘साबीर भाई शेख’ हे मुस्लिम आहेत. मुंबईच्या समितीचे स्थायी अध्यक्ष अँथनी
ब्रिटो, जे ख्रिश्चन आहेत. नागपाडा येथे उभ्या केलेल्या उमेदवार अंजू अहमद या मुस्लिम
आहेत. तर राज्यसभेच्या खासदार चंद्रिका केनिया या जैन आहेत. अशा थेट शब्दात मी न्यायमुर्तींना
माहिती दिली.
शिवसेना प्रमुखांनी जात-पात कधी मानलीच
नाही. महाराष्ट्रात राहतो ना मग तो मराठी आणि हिंदुस्थानात राहतो तो हिंदू अशी साधी
स्पष्ट व्याख्या बाळासाहेबांची होती.
या
खटल्यात ९० साली झालेल्या अनेकांच्या निवडी रद्द ठरविण्यात आल्या होत्या. परंतु, ११
डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमुर्ती. जे. एस. वर्मा यांनी मनोहर जोशी
यांची निर्दोष मुक्तता केली.
डिसेंबर
१९९५. नागपूरला विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते
मनोहर जोशी. सामना वर्तमानपत्रासाठी मी, राजेंद्र कांबळे आणि दोपहर का सामना चे विद्यमान
कार्यकारी संपादक प्रेम शुक्ल रिपोर्टिंग करत होतो. त्यावेळी नागपूर विधिमंडळात चर्चेचा
विषय होता ११ डिसेंबरला लागणाऱ्या केसचा निकाल. राज्याचे मुख्यमंत्री बदलणार अशा अफवा
वातावरणात पसरल्या होत्या.
१०
डिसेंबर १९९५. रात्री राजेंद्र कांबळे यांनी अॅड. चिनॉय यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क
साधला. त्यांचं बोलणं सुरू असताना मी आणि प्रेम शुक्ल त्या रुममध्येच होतो. यावेळी
अॅड. चिनॉय यांनी कांबळे यांना मनोहर जोशींची निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता असल्याचे
सांगितले. मनोहर जोशींच्या निर्दोष सुटका होण्यामागे अनेक कारणे असल्याचे चिनॉय यांनी
कांबळे यांना सांगितले. “त्यापैकी एक कारण म्हणजे शिवसेना प्रमुखांची हिंदुत्त्वाची
जी व्याख्या योगेश त्रिवेदी यांनी साक्षीच्या वेळी सांगितली ती आहे” असे अॅडव्होकेट
चिनॉय यांनी कांबळे यांना सांगितले. निकालानंतर १३ डिसेंबर १९९५ रोजी ‘मुंबई सकाळ’
या वर्तमानपत्राला अॅड. चिनॉय यांनी दिलेल्या मुलाखतीत माझ्या साक्षीचा आवर्जून उल्लेखही
केला होता.
झालं
११ डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले होते. कोर्टाचा
निकाल आला मनोहर जोशींना कोर्टाने निर्दोष मुक्त केले. ही बातमी आम्हाला सर्वात प्रथम
दिली ती ज्येष्ठ पत्रकार माधवराव गडकरी यांच्याकडून. नवी दिल्लीहून त्यांनी फोन केला
होता.
ही
बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. नागपूरात प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, अॅड लीलाधर डाके,
सुभाष देसाई आदी नेते त्यावेळी नागपूरात होते. शिवसेना नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी
आणि तमाम शिवसैनिकांनी जल्लोष केला. उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे त्यादिवशी नागपूरात
आले होते. त्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव यांच्याशी बोलताना मनोहर जोशी यांनी माझ्याकडे
बोट दाखवून ‘हा माझा साक्षीदार’ असे आवर्जून सांगितले.
या
साक्षीची सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे ‘मार्मिक’च्या शिवाजी मंदीर येथील वर्धापन
दिन समारंभात दस्तुरखुद्द शिवसेना प्रमुखांनी जाहीर भाषणात माझे नाव घेऊन माझ्या साक्षीचा
संदर्भ दिला होता. त्यानंतर असंच एकदा मातोश्रीवर जाणं झालं. बाळासाहेबांची भेट झाली.
त्यावेळी सुधीर जोशी यांनी माझ्याकडे बोट दाखवून हिंदुत्त्वाची साक्ष देणार हाच तो
पत्रकार अशी माझी बाळासाहेबांबरोबर ओळख करुन दिली. त्यावर बाळासाहेबांनी माझ्या पाठीवर
थोपटलं. मुठभर रेनॉल्डचे पेन माझ्या हातात दिले.
आज
बाळासाहेब आपल्यात नाहीत. याची खंत आहे. पण त्यांच्या एका भाषणामुळे मी एका ऐतिहासिक
क्षणाचा साक्षीदार होऊ शकलो. त्यावेळी त्यांनी माझ्या पाठीवर दिलेल्या शाबासकीमुळे
मला खुप प्रोत्साहन मिळालं. बाळासाहेबांनंतरही आत ती शाबासकीची थाप मला स्वस्थ बसू
देत नाही.
(वि.सू.
हा लेख या आधी काही वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेला आहे. परंतु, ज्यांना काही कारणास्तव
वाचता आलेले नाही खास त्यांच्यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा