शनिवार, २४ जानेवारी, २०१५

मथितार्थ : ब्रॅण्ड आणि ग्रॅण्ड; बाळासाहेब !


विलेपाल्र्यामध्येच लहानाचा मोठा झालेला कॅप्टन विनायक गोरे हा युवक काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाला. केवळ विलेपार्लेच नव्हे तर अवघा महाराष्ट्र त्याची शौर्यगाथा ऐकून सुन्न आणि त्याच वेळेस शोकाकुलही झाला. एरवी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली ऑपरेशन्स याचे काही फारसे नावीन्य सामान्य माणसाला नव्हते. मात्र कॅप्टन विनायक गोरे हा आपला होता, अशी भावना सामान्यांमध्ये होती आणि म्हणूनच त्याआधी त्याचे नाव फारसे चर्चेत नसतानाही त्याच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी होती. त्याच सुमारास विलेपाल्र्याच्या प्रसिद्ध पार्ले ग्लुकोज कंपनीजवळ रेल्वेमार्गावरून जाणारा पूल तयार होत होता. या पूर्ण होत आलेल्या पुलाला कॅप्टन विनायक गोरे यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव समोर आला आणि तसेच व्हायचेही होते. पण त्याच वेळेस माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यानंतर परिस्थिती वेगात पालटली. त्यानंतर लगेचच विलेपाल्र्यात शिवसेनेचे फलक लागले. त्यावर लिहिलेले होते की, त्या पुलाला आता माँसाहेबांचेच नाव दिले जाणार. खरे तर पार्लेकरांच्या मनातील इच्छेविरोधात हे सारे होत होते. पण बोलणार कोण, हा प्रश्न होता. कारण शिवसेनेला आणि शिवसैनिकांना अंगावर घेण्याची ताकद कुणातच नव्हती. शिवसेनेचा दरारा आड येत होता. अखेरीस थेट बाळासाहेबांशीच संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेब फोनवर आले.. शहीद कॅप्टन विनायक गोरे यांची माहिती देण्यास सुरुवात करताच बाळासाहेब म्हणाले, बातम्या मी वाचल्या आहेत पुढे बोला.. समस्त पार्लेकरांची इच्छा त्यांच्या कानावर घालण्यात आली. त्यावर ते म्हणाले, मग अडचण काय आहे? त्यांना कौशल्याने सांगण्यात आले की, माँसाहेबांचे नावच त्या पुलाला देणार असे शिवसेनेचे फलक लागले आहेत आणि कुणी मध्ये आले तर खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेब म्हणाले, लिहून घ्या.. ‘विलेपार्ले येथील पुलाला शहीद कॅप्टन विनायक गोरे याचे नाव वगळता इतर कोणतेही नाव देण्याचा प्रयत्न झाल्यास तिथे येऊन मी स्वत: ती नावाची पाटी उखडून फेकून देईन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’! अर्थात दुसऱ्या दिवशीच्या ‘लोकसत्ता’मध्ये पहिल्या पानावर हे वृत्त अर्थात बाळासाहेबांचे विधान प्रसिद्ध झाले.. आणि त्या पुलाला कॅप्टन विनायक गोरे यांचेच नाव मिळाले!
हे बाळासाहेब होते. लोकभावना समजून घेणारे आणि मागचा पुढचा विचार न करता देधडक-बेधडक वागणारे! शिवसैनिकांना थोपविण्याची ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेबांमध्येच होती. म्हणूनच तर बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर १९६९ साली तत्कालीन काँग्रेस सरकारवर नामुष्की आली आणि त्यांनाच बाळासाहेबांना विनंती करावी लागली की, त्यांनी तुरुंगातूनच शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करावे.. कारण मुंबई पेटण्यास सुरुवात झाली होती आणि शिवसैनिकांना रोखण्याची ताकद कुणाकडेच नव्हती. पोलिसी बळाचा वापर करून प्रश्न चिघळला असता याची जाणीव काँग्रेसी राज्यकर्त्यांना होती.
एवढेच नव्हे तर अगदी बाळासाहेब गेल्यानंतरही त्यांची ताकद दिसली ती लाखोंच्या संख्येने जमलेल्या त्यांच्या चाहत्यांमध्ये. आणि लोकमान्य टिळकांनंतर झालेला हा दुसरा सार्वजनिक अंत्यविधी. त्याला परवानगी देतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता टाळण्यासाठी असे कारण देऊन अपवाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष मृत्यूनंतरही ती ताकद कायम होती !
ही ताकद बाळासाहेबांकडे आली ती त्यांच्यातील गुणवैशिष्टय़ांमुळे. अमोघ वक्तृत्व, धारदार शैली, थेट काळजाला भिडणारे भाषण आणि नसानसांत भरलेला बेधडकपणा यामुळे. अगदी आधुनिक चष्म्यातून पाहायचे तर बाळासाहेब हे स्वत:च एक उत्तम ब्रॅण्ड होते. त्यांचे ते ब्रॅण्ड असणे त्यांच्या चालण्यावागण्या आणि बोलण्यातूनही जाणवायचे. त्यांनी स्वत:ला तसे सादर केले. एका उत्तम ब्रॅण्डमध्ये जी सर्व गुणवैशिष्टय़े असावी लागतात ती सर्व बाळासाहेबांमध्ये होती. त्यामुळेच केस विस्कटलेले, गचाळ अवस्थेतील बाळासाहेब कधीच पाहायला मिळाले नाहीत. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र प्रसिद्ध झालेली छायाचित्रे पाहिली तर हे अगदी सहज लक्षात येईल.
सुरुवातीच्या काळात जोधपुरी कोट हा त्यांचा पेहराव होता. त्यानंतर सदरा, पायजमा, अंगावर शाल समोरून गळ्यात दिसणाऱ्या रुद्राक्षांच्या माळा आणि हाताच्या बोटांमध्येही ती रुद्राक्षाची माळ अडकलेली ! बाळासाहेब हे सर्वोत्तम ब्रॅण्ड असल्याचीच ही सारी लक्षणे होती.
‘ठाकरी शैली’ आणि ‘ठाकरी बाणा’ हे तर केवळ त्यांच्या वक्तृत्व आणि भाषेसाठी खास वापरण्यात आलेले शब्दप्रयोग यामध्येही त्यांचे नाव आहेच. ही ठाकरी शैलीच सामान्यांना सर्वाधिक भावली. त्या सर्व गोष्टींच्या मुळाशी होती ती उत्स्फूर्तता आणि बेधडकपणा. जाऊन थेट धडकायचे नंतर काय होणार याचा फारसा विचार त्या मागे नसायचा. खरे तर तारुण्यामध्ये प्रत्येक माणूस कमी-अधिक फरकाने हा गुण मिरवत असतो. बाळासाहेबांनी तो आयुष्यभर मिरवला, ते आयुष्यभर तरुणच राहिले. त्यांची भाषणे ही प्रामुख्याने तरुण सळसळत्या रक्ताच्या तरुणांना आवाहन करणारी असायची. त्यात आवाहन कमी आणि आव्हानच अधिक असायचे. ती भाषणे अंगार फुलवणारी आणि चेतवणारी होती. म्हणूनच त्यांच्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे हे चिथावणीखोरीचे होते! सर्व गुन्ह्य़ांमध्ये चिथावणीखोरीचे कलम समान दिसेल. हाच त्यांचा बेधडकपणा, अंगावर घेण्याची वृत्ती प्रकर्षांने जाणवली ती ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर. त्याची जबाबदारी घेण्यासाठी रास्वसंघ किंवा मग भाजपा, विश्व हिंदूू परिषद कुणीच तयार नव्हते. त्यावेळेस ते शिवसैनिक होते, अशी आवई आली. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेबांचे विधान आले.. ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे!
त्यांचा हा दरारा काही केवळ जनसामान्यांपुरताच मर्यादित नव्हता. तर थेट न्यायालयांपर्यंत होता. बाळसाहेबांचे अभय अनेकांना मोठा मदतीचा हात देऊन गेले. बोफोर्स प्रकरणात वादग्रस्त ठरलेला अमिताभ बच्चन असो किंवा मग बॉम्बस्फोटांच्या आरोपाखाली पकडला गेलेला संजय दत्त असो. संजय दत्तच्या सुटकेसाठी तर मग बाळासाहेबांनी थेट टाडा न्यायालयाच्या न्यायमूर्तीनाच लक्ष्य केले. किणी प्रकरणात राज ठाकरे अडकले होते तेव्हाही त्यांनी थेट दसरा मेळाव्यात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवरच आरोप केले! एवढे सारे होऊनही बाळासाहेबांवर या दोन्ही प्रकरणांत कोणतीही कारवाई झाली नाही. हा दरारा की, सरकारची निष्क्रियता यावर वाद होऊ शकतो!
कोणताही ब्रॅण्ड वर्षांनुवर्षे तसाच राहिला तर तो कालगतीत नामशेष होण्याचा धोका असतो. बाळासाहेबांनी कालगतीनुसार बदलही केला. हिंदुत्वाच्या मुद्दय़ाचा स्वीकारही त्यांनी असाच केला. मग तो अखेपर्यंत कायम होता. त्यानंतर बदललेले बाळासाहेब नंतर केवळ भगव्या वेशातच दिसले. त्यांची शालही भगवी होती. अंत्यसंस्काराच्या वेळेसही त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रेच होती. फक्त पेहेराव नाही तर बाळासाहेबांच्या सवयीदेखील त्यांच्या ब्रॅण्डच होत्या. सुरुवातीस त्यांच्या तोंडातील चिरूट हा त्यांचा परिचय होता. कधी हातात सिगार असायचा. नंतर हाताच्या बोटांमध्ये रुद्राक्षांची माळ विसावली. त्यांचा मोठय़ा फ्रेमचा चष्मा हादेखील तसाच. यातील प्रत्येक गोष्ट ही बाळासाहेबांचा परिचय होती.
पण या सर्वाना दशांगुळे उरणारी गोष्ट होती ती त्यांचे धारदार नेतृत्व. त्यांचे वागणे, बोलणे, भूमिका यांत अनेकदा विरोधाभास असायचा. त्यामागे त्यांचे स्वत:चे असे वेगळे तर्कशास्त्र होते. पण सामान्य माणसाचा मात्र गोंधळ व्हायचा. पाकिस्तानी संघाला विरोध करणाऱ्या बाळासाहेबांच्याच घरात जाऊन जावेद मियांदाद मेजवानी कशी काय घेऊ शकतो, असा प्रश्न सामान्यांच्या मनात यायचा. पण हा विरोधाभास हेदेखील बाळासाहेबांचेच पेटंट असावे.
मनात येईल ते बोलायचे हे त्यांचे तत्त्व होते म्हणून त्यांना कदाचित रूढार्थाने राजकारणी म्हणताना थोडा विचार करावा लागतो. कारण राजकारणी व्यक्ती अनेकदा केवळ मतलबाचेच बोलतात. बाळासाहेब हे एक अजब रसायन होते. म्हणूनच ते या ब्रॅण्डच्याही पलीकडे जाऊन ‘ग्रॅण्ड’ ठरले. भव्यदिव्यता हे त्यांचे आकर्षण होते, असे त्यांनी स्वत: एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर चिरकूट गोष्टींपेक्षा भव्यतेची आस धरावी, तर माणूस मोठा होतो!
त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा हा ब्रॅण्ड स्वत:सोबत वागवला. पण हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे! म्हणूनच सर्वाना आता प्रश्न सतावतो आहे, बाळासाहेबांनंतर काय? शिवसेनेचे काय होणार? खरे तर हा प्रश्न कदाचित बाळासाहेबांच्याही मनात होताच म्हणूनच तर त्यांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले. बाळासाहेबांचा हा ब्रॅण्ड पुढे नेणे सोपे काम तर निश्चितच नाही आणि आताच्या परिस्थितीत तर ते अधिकच कठीण असणार आहे. त्यांचा वारसा सांगणाऱ्या प्रत्येकाला हाच विचार करावा लागेल की, बाळासाहेब ठाकरे नावाच्या ग्रॅण्ड अशा ब्रॅण्डचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आपल्यात आहे काय?
vinayak.parab@expressindia.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा